ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार - ७ जानेवारी
" प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार यांमधून त्यांचा अंतर्यामी भगवान व्यक्त व्हावा. "
स्वामी नेहमी सांगतात की, विचार, उच्चार आणि आचार यांमध्ये सुसंवाद असावा.. सर्वांनी जीवनात ह्याचा सराव करायला पाहिजे. पण कोण असं करतंय? माणूस विचार करतो एक, बोलतो दुसरंच आणि वागतो तिसरेच ! लहानपणी स्वामींनी एक नाटक लिहिलं होतं; त्याचं नाव होतं,'चेप्पी नाटा चेस्तारा ', म्हणजे बोलावे तसे चालावे. तथापि शिक्षक, राजकारणी, शास्त्रज्ञ, आणि आध्यात्मिक जीवन जगणारे हा नियम पाळत नाहीत. खरं तर समाजातील सर्वच स्तरांवर हे असच आहे. आध्यात्मिक जीवनात विचार, उच्चार आणि आचाराचा सुसंवाद अतिशय महत्वपूर्ण आहे. पुष्कळ जण आध्यात्मिक पुस्तकं वाचतात, व्याख्यानं ऐकतात. त्यांनी वाचलेलं आणि ऐकलेलं आचरणात आणलं नाही तर उपयोग काय? ज्यांना आध्यात्मिक जीवनात प्रवेश करायचा आहे त्यांनी त्यांच्या विचार,उच्चार आणि आचारांमध्ये सुसंवाद आणणं अनिवार्य आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं की, काय विचार करते/तो आहेस? , तर तत्क्षणी तुम्हाला संकोच न वाटता उत्तर देता आलं पाहिजे. तुम्ही उत्तर देऊ शकला नाहीत किंवा तुम्हाला लपवाछपवी करायची गरज वाटली तर तुमचा सर्व अभ्यास व्यर्थ आहे. तुम्हाला तुमच्या मनातील विचार व्यक्त करता येत नसेल तर तो विचार एक तर चुकीचा आहे किंवा वाईट आहे.
वाईट कृत्य करू नका. तुमच्या मनात सतत नाव, प्रसिद्धी, पैसा अशा गोष्टींचे विचार असल्यामुळे तुम्ही बोलता एक आणि वागता वेगळंच. शाळेत लहान मुलांना शिकवलं जातं की, " खोटं कधी बोलू नये." खरं तर लहान मुलांना खोटं म्हणजे काय हेच माहिती नसतं. जेव्हा मला शाळेत, "खोटं बोलू नये " असं शिकवलं गेलं तेव्हा मी घरी गेल्यावर लगेचच विचारलं की,"खोटं म्हणजे काय?" मला सांगितलं गेलं की ज्या गोष्टी जशा घडतात तशाच सांगाव्यात, त्यात बदल करू नये. तरीसुद्धा मला काहीही कळलं नाही. लोकांना असं बोलायची गरजच काय?
एक उदाहरण. एक दिवस वडील आपल्या लहान मुलाला सांगतात,"संध्याकाळी एक माणूस येईल.तू त्याला सांग की मी घरी नाहीये." तो माणूस आला तेव्हा मुलानं त्याला सांगितलं की,"माझे वडील घरी नाही येत." तो निरागस मुलगा विचार करतो,'शाळेत सांगतात,खोटं बोलू नका. आणि बाबांनी मला खोटं बोलायला लावलं.' जग हे असं आहे. आपणच आपल्या मुलांना खोटं बोलायला शिकवतो. पालकच जर असे असतील तर मोठं झाल्यावर ते मूल कसं वागेल? आध्यात्मिक जीवनात आपण लहान मुलासारखं निष्पाप व्हायलाच हवं. आपण आपला प्रत्येक विचार, उच्चार आणि आचार यांची छाननी करायलाच हवी; आणि ह्यांमध्ये सुसंवादआहे ह्याची खात्री करणं अत्यंत जरुरी आहे. सर्वोत्तम अवतार सत्यसाई इथे आले, त्यांनी ही शिकवण दिली. पण लक्षात कोण घेतो? जे कोणी स्वामींच्या शिकवणीचं अनुसरण करतील ते लाभान्वित होतील; आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतील.
कली युगात सहसा भगवान अवतरत नाही. तरीही त्यांच्या करुणेमुळे तसंच प्रेमामुळे मानवाला शिकवण देण्यासाठी ते आले. ह्या काळात जन्मलेले सर्व अतिशय भाग्यवान आहेत. आपण स्वामींची निदान एक तरी शिकवण आचरणात आणावयास हवी.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा