रविवार, २८ डिसेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

      " वैराग्य सर्व इच्छांचा नाश करते आणि मनुष्याला रिक्त करते . "

वसंतामृतमाला 
पुष्प ३१
सांसारिक जीवनास अशिक्षित 
              दि. १२ मे रोजी स्वामींनी एक छापील कागद दिला.  त्याचे शीर्षक होते. - ' एक नंबर निवडा ' 
              त्या कागदावर २७ पासून ४७ पर्यंत नंबर दिले होते . स्वामी म्हणाले  ' नंबर निवडून प्रश्न सोडवा .' निरखून पाहिले असता आम्हाला त्यामध्ये ३७ , ३८ व ४२ हे नंबर नाहीत असे आढळून आले . असं का बरे ? आम्ही सर्वांनी यावर चर्चा केली , प्रत्येकाने आपआपले मत व्यक्त केले . 
१२ मे २०१३; सायं ध्यान 
वसंता - स्वामी , हे असे कसे ? प्रश्नावली २७ व्या क्रमांकापासून सुरु झाली ? 
स्वामी - २७ हा आपला विवाह दिन आहे . म्हणून तेथूनच सर्व सुरु झाले . 
वसंता - स्वामी , त्यामध्ये ३७ व ३८ नंबर का नाहीत ? 
स्वामी - त्या नंबरांचे वैशिष्ट्य तुला माहित आहे का ? ३८ हे तुझे जन्मवर्ष आहे तर ३७ हे तुझ्या जन्मदात्यांचे विवाह वर्ष आहे . 
वसंता - स्वामी २६ हे तुमचे जन्मवर्ष आहे . 
स्वामी - बरोबर. 
वसंता - स्वामी , मी माझ्या आई विषयी अन्  माझी सांसारिक जीवना विषयीची अनभिज्ञता याबाबत लिहू कां ?
स्वामी - हो लिही , आणि तुला सांसारिक जीवनाचे प्रशिक्षण कसे नव्हते हे ही सांग . 
ध्यान समाप्त .  

उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 

जय साईराम      

गुरुवार, २५ डिसेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " केवळ परमेश्वराची इच्छा धरा तोच एकमात्र सत्य आहे . "

पुष्प ३० पुढे सुरु 

अगस्ती नाडी
                ती तेजासहित जन्माला आली ते तेज केवळ परमेश्वरच पाहू शकतो ते मानवी दृष्टीस दिसू शकत नाही . ती जन्मली तेव्हा तिच्या मस्तकावर ते तेज म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वर, विराजमान होते . ते तेज तिच्या हृदयामध्ये उतरले आणि ज्योतीरुपात विलीन झाले . तेज गुरुकृपा दर्शवते . तिचे हृदय एक बहरलेले नंदनवन झाले . गृहस्थाश्रमी असूनही तिला या ज्ञानजीवनाने अत्यंत आनंद दिला . ते तेज क्रमाक्रमाने वृद्धिंगत होऊन बाहेर उजळू लागले . तिचा जन्म सामान्य मानवी जन्म नव्हता ती परमेश्वराचा एक अवतार आहे . सामान्य मानवी जीवनाहून तिने स्वीकारलेला मार्ग महा कल्याणप्रद आहे . सर्वांचे कल्याण हाच तिच्या जीवनाचा उद्देश आहे तिने तिच्या जीवनातील एकही क्षण स्वतःसाठी व्यतीत केला नाही . 
               तिचा शोध घेत येणाऱ्या सर्वांना चांगले जीवन लाभो , त्यांचे जीवन व्यर्थ जाऊ नये अशी तिची इच्छा आहे . तथापि त्यांच्या प्रारब्धानुसार जर त्यांनी कुमार्ग स्वीकारला तर ती तिच्या सामर्थ्याने त्यांना परत सुमार्गावर खेचून आणू शकते . तिने उच्चारलेला प्रत्येक शब्द मंत्रासमान आहे ; अनमोल, सर्वोच्च , सुवर्णशब्द . तिला वाक् सिद्धी प्राप्त आहे . जे ती बोलेल ते घडेल . कारण तिचा प्रत्येक शब्द हृदयाच्या गाभ्यामधून येतो. अशा तऱ्हेने जे तिच्या मार्गाचे अनुसरण करतात त्यांच्या सर्व व्याधींचा नाश होऊन ते तिची भक्ती करू लागतात . तिच्या समोर उभे राहताच मनातील सर्व संभ्रम विभ्रम दूर होतात . तिच्या मनात स्पर्धात्मक भाव नाहीत . तिने सर्व भौतिक सुखांचा त्याग केला आहे . तिच्या मनात मत्सरभाव नाही . तिचे मन अत्यंत निरागस निष्पाप आहे . ती एक विशुद्ध पवित्र आत्मा असूनही तिचे मन तेवढ्याने संतुष्ट नसून ती अधिकाधिक पवित्र आणि विशुद्ध बनण्यासाठी प्रयत्न करते . ती पूर्ण क्षेम शांती अवस्थेत आहे . 
                 ती ज्ञानसूक्त आहे म्हणजेच तिच्याकडे ज्ञानाचा पूर्ण आनंद आहे . 

जय साईराम  

रविवार, २१ डिसेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

         " माया सत्याला दडवून ठेवते. एकोहम् बहुस्यामि हे सत्य जाणा. "

पुष्प ३० पुढे सुरु

              मी लिहिलेले सर्व बाह्य जगात दृश्यमान झाले आहे . स्वामी म्हणतात की , मुक्ती निलयममधील इमारती त्याचा पुरावा आहेत . माझ्या स्वामींबरोबरच्या अनुभवांनी १२० हून अधिक पुस्तकांचे रूप घेतले आहे . हे सामान्य अनुभव नसून प्रत्यक्ष ज्ञानानुभव आहेत . हे आजपर्यंत जगाला उघड न केलेले परमेश्वराचे व प्रत्येक तत्वाचे ज्ञान आहे .
              तो महाअवतार येथे आला, आता तो त्याचे महात्म्य मला सांगतो न् मी लिहिते. साधारणतः वेद पुराणे पाठाच्या स्वरुपात पाहायला मिळतात . इथे स्वामी अन्  मी आमच्या जीवनकथेद्वारे सर्व उलगडून दाखवतो . सत्य म्हणजे काय ? सत्याचरण कसे करावे ? परमेश्वर प्राप्ती कशी करावी ? हे सर्व आम्ही स्पष्ट केले आहे . कोणीही त्याचे महात्म्य पूर्णत्वाने जाणू शकणार नाही . एकदा स्वामी यासंदर्भात बोलले होते .
             " माझे खरे स्वरूप जाणण्यासाठी तुम्ही हजारो वर्षे तप केले वा संपूर्ण मानवजातीने एकत्र येऊन यासाठी कळकळीचे प्रयत्न केले तरी माझे सत्य स्वरूप तुम्ही जाणू शकणार नाही . "
              त्यांचे खरे स्वरूप कोणीही जणू शकणार नाही . असा हा परमेश्वर आपण याची देही याची डोळा पाहिला . हे आपले अहोभाग्यच म्हटले पाहिजे . ही संधी आपण चुकवता कामा नये . तुम्ही तर संतमहात्मे , ऋषिमुनी , भिक्षु , मठाधिपती या सर्वांहून भाग्यवान आहात , म्हणून ही संधी चुकवू नका . प्रयत्न केल्यास ज्ञानाद्वारे परमेश्वर प्राप्ती होऊ शकते . मायेतून जागे व्हा ! स्वामींचे अवतार कार्य दर्शविण्यासाठी मी येथे आले आहे . आता माझे कार्य जाणून घ्या . 
             स्वामी न आल्यामुळे मी अविरत अश्रू ढाळत होते . तेव्हा एस.व्ही. वैदीश्र्वरन कोविलला गेले . त्यांनी नाडीग्रंथ पाहिले . मी ह्या अवताराच्या थोरवीचा प्रसार सर्वत्र कसा करत आहे , ज्ञानाचा प्रसार कसा करत आहे व माझ्या सेवाव्रताबाबत अगस्त्य ऋषीनी लिहिलेल्या नाडीमध्ये स्पष्ट लिहिले आहे .
          
 उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम    

गुरुवार, १८ डिसेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " जेव्हा एका मागोमाग एक ज्ञानाची कवाडे खुली होतात तेव्हा आपल्याला सत्याच्या सुवर्ण तेजाचे दर्शन होते . " 

पुष्प ३० पुढे सुरु 

             कार्डाच्या मलपृष्ठावर सर्वत्र सर्वदूर जाणारी ' S ' तारका स्पंदने होती . सर्वांची स्पर्शसंवेदना केवळ सत्यास स्पर्श करेल . विविध रंगी वैविध्यपूर्ण अनेक तारका सर्वत्र पसरतील . स्वामींचे व माझे भाव सर्वव्याप्त होऊन सर्वांमध्ये प्रवेश करून कार्यरत होतील . ह्यानंतर स्वामींनी एक छोटे षट्कोनी कार्ड दिले . त्यावर लिहिले होते . 
           '..... तुम्ही प्रत्येकाने एवढे ज्ञान व अनुभव घेतला आहे .' 
कार्डाच्या मागील बाजूस एक सुंदर गुलाबी रिबीन लावलेली सुंदर घंटा होती . 
              मी उपनिषदे , महावाक्ये , ब्रम्ह्सूत्र , योगसूत्र व इतर सर्व सूत्रे यांवर लेखन केले आहे . मी ' वेदांच्या पलीकडे ' या विषयावर सांगितले आहे . आतापर्यंत जग या ज्ञानाविषयी अनभिज्ञ होते . स्वामी सांगतात केवळ तेच मी लिहिते . हे सर्व माझे अनुभव आहेत . मी स्वानुभवातून हे लिहिले आहे . अनुभवाशिवाय ज्ञान व्यर्थ आहे . आंब्याचा स्वाद मधूर आहे हे फक्त ऐकून त्याचे माधुर्य कसे बरं कळेल ? त्यासाठी त्याची चवच घ्यायला हवी . परमेश्वराचे माधुर्य , त्याचे प्रेम व कारुण्य केवळ लिहून व ऐकून समजण्यासारखे नाही . ते केवळ पुस्तकी शाब्दिक ज्ञान असेल. मी ज्ञान अनुभवले आहे ; मी स्वामींबरोबर प्रत्येक गोष्ट अनुभवली आहे . त्या अनुभवांविषयी मी लिहिले हे अनुभव ज्ञान आहे . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम  
   

रविवार, १४ डिसेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " जो पर्यंत मनुष्याच्या ठायी इच्छा, वासना असतात तो पर्यंत त्याचा परमात्म्याशी योग होऊ शकत नाही . "

पुष्प ३० पुढे सुरु

               कार्डाच्या मध्यभागी एक मोठा चौकोन होता.  त्यात एक हिरव्या रंगाचे पान - स्पर्श संवेदनेचे प्रतिक होते ; त्या पानाच्या मध्यावर S चमकत होता . त्या चौकोनात डाव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात ७ पाकळ्यांचे फूल होते . त्याच्याबाजूला अजून एक चौकोन होता ; त्यामध्ये १० पाकळ्यांचे पिवळे फूल , त्याच्या मध्यभागी हिरव्या पार्श्वरंगावर पिवळ्या रंगात V अक्षर चमकत होते . 
                पुढील चौकोनात १४ पाकळ्यांच्या धवल फूलावर मधोमध हिरवा रंग होता . मोठ्या हिरव्या पानाखाली एक पिवळ्या रंगातील आयताकृती व त्यामध्ये ६ हिरवी छोटी पाने होती . त्याच्या बाजूला रेखलेल्या चौकोनात आठ पाकळ्यांचे शुभ्र फूल होते , त्यावर S हिरव्या रंगात तर V सोनेरी रंगात चमकत होते . तळाशी ९ पाकळ्यांचे हिरव्या देठासह पांढरे फूल , व चार पाने होती . त्या देठावर मधोमध मोठे चमकदार ' V ' हे अक्षर होते . उजव्या बाजूला तळाशी १२ पाकळ्यांचे एक कमळासारखे फूल होते . त्यावर स्वामींनी ' सदाहरित ' ( evergreen ) असे लिहिले होते . हे सर्व नवनिर्मितीचे सूचक आहे . नवीन नवग्रह निर्माण केले आहेत . १० हा अंक प्रत्येक व्यक्तीमधील ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांचे नुतनीकरण दर्शवतो . १४ अंक १४ भुवनांचे परिवर्तन सुचवतो . देहातील २४ तत्वांचे ही नुतनीकरण झाले आहे . सर्वजण भौतिक जीवनाच्या चिखलापासून अस्पर्श असणाऱ्या कमळपुष्पासारखे असतील . हे विश्व सदाहरित असेल . या विश्वास सदैव परमेश्वराचे कृपाशिर्वाद व संरक्षण प्राप्त असेल . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम  

गुरुवार, ११ डिसेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

           " महाकारण जगतात जीव सत्याशी म्हणजेच परमेश्वराशी एक होतो . "

पुष्प ३० पुढे सुरु 

१४ मे २०१३ सकाळचे ध्यान 
वसंता -  स्वामी , या आठ पोपटांच्या कार्डाची विशेषता काय आहे ? 
स्वामी - आंडाळप्रमाणे तुलाही परमेश्वराशी विवाह करण्याची इच्छा आहे . तू सदैव अष्टाक्षरी मंत्र जपलास; अगदी पोपटासारखा, पुन्हा पुन्हा . आपण आदि आहोत; पूर्णम् व त्याची अर्धांगी . तू अनाहत चक्रात आरोहण केलेस , व माझे तिथे अवतरण झाले . हे विश्वब्रम्ह गर्भ कोटम् आहे ; आपल्या हृदयांचा संगम. ही आहे नवनिर्मिती . 
वसंता - आता मला समजले स्वामी . मी लिहीन . 
             आता आपण याविषयी पाहू . आंडाळची कथा मी पुष्कळ वेळा बालवयातच ऐकली होती , त्यामुळे माझ्या मनात तिच्यासारखे कृष्णाशी विवाह करून त्याच्यामध्ये विलीन होण्याची इच्छा निर्माण झाली . तेव्हापासून मी पोपटाप्रमाणे सदैव ' ॐ  नमो नारायणाय ' मंत्राचा जप करू लागले . काही काळ गेल्यानंतर स्वामींनी मला हा मंत्र जपणे थांबविण्यास सांगितले ; कारण हा मंत्र जपण्याने मी समाधी अवस्थेत गेले असते . 
              तमिळ संत  आंडाळच्या खांद्यावर नेहमी एक पोपट असतो . इथे स्वामींनी आठ पोपट चितारले होते . ते आठ पोपट मुक्ती स्तूपाच्या स्तंभाप्रमाणे उभ्या रेषेत होते . अनाहत चक्र प्राप्तकरण्यासाठी मी साधना केली . स्वामी या चक्रामध्ये अवतरले . स्वामी व मी आदि ( वैकुंठ ) आहोत , पूर्णम्  व त्याची अर्धांगी . ४ पोपट अधोगामी दाखवून स्वामींनी त्यांचे अवतरण ( सहस्त्रार या वरच्या चक्रातून अनाहत यां खालच्या चक्रात येणे . ) सूचित केले . मी खालच्या चक्रातून ( मूलाधार ) वरच्या ( अनाहत ) चक्रात गेल्यामुळे ४ पोपट ऊर्ध्वगामी दाखवले . अनाहत चक्रात आमचे मिलन झाले . हे विश्वब्रम्ह गर्भकोटम् आहे . इथून नवनिर्मिती स्तूपाद्वारे समस्त विश्वामध्ये प्रवेश करेल. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ...... 

जय साईराम

रविवार, ७ डिसेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

           " कारण जगतात जीव सत्याच्या उंबरठ्यावर उभा असतो."


वसंतामृतमाला 
पुष्प 30
आठ राघूंचा खेळ 


            आज स्वामींनी दिलेल्या कार्डात लिहिले होते ......
            ' आज आमचे विचार आणि आमच्या प्रार्थनांमध्ये तुम्हाला विशेष स्थान आहे . '
            स्वामींनी हे लिहून ते कार्ड फुलापानांची नक्षी काढून सजवले होते . कार्डच्या मुखपृष्ठावर S व V अक्षरे चमकत होती . खालच्या बाजूला सदाहरित ( evergreen ) असे लिहिले होते . मुखपृष्ठाच्या मागील बाजूस 
            ' परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो ; त्याच्याजवळ तुम्हाला स्थान देवो .'
तर दुसऱ्या बाजूला निम्नलिखीत शब्द लिहिले होते . 
            ' ....अन् सदैव आमच्या हृदयात विशेष स्थान.' 
तेथे पोपटाचा आकार दिसत होता ; त्याच्याखाली ६ हृदये चितारली होती . कार्डच्या मलपृष्ठावर 
            ' आज आणि नेहमी ' असे लिहिले होते . त्यावर ४ पिवळ्या पंचकोनी चांदण्या होत्या . प्रत्येक चांदणीवर लाल रंगात V अक्षर चमकत होते . त्याच्याखाली बऱ्याच चांदण्या होत्या . सहा भगव्या चांदण्यांवर एक पिवळी , दोन लाल तर मधे ४ हिरव्या व २ पिवळ्या आणि खाली ४ निळ्या चांदण्या होत्या . या सर्व चांदण्यांभोवती S आकारात लाल भडक रेषा होत्या . कार्डाच्या मुखपृष्ठावर डाव्या हाताला खाली ८ पोपट होते त्यातील ४ अधोमुखी तर ४ ऊर्ध्वमुखी होते . सुवर्ण रेषांनी त्याच्या दोन बाजू सजविल्या होत्या .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम  

गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

     " जीवाला सत्याप्रत नेणारी यात्रा म्हणजे सूक्ष्म जगत होय . "
 
पुष्प २९ पुढे सुरु

              आपण इतरांवर प्रेम केले पाहिजे . मगच मी आणि इतर हा भेदभाव दूर होईल . सर्वजण एकाच चैतन्यातून जन्मले आहोत . ह्याचे आपल्याला यथार्थ ज्ञान व्हायला हवे . त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्याला प्रेम देतो , त्या बदल्यात तो ही आपल्याला प्रेम देतो . आपण गांधीजींचे उदाहरण पाहू . त्यांनी सर्वांना प्रेम दिले आणि सर्वांसाठी त्रास सोसला . म्हणून ते महात्मा बनले . संपूर्ण जगानी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला . त्यांच्या मृत्यूनंतर सर्वांनी त्यांच्यासाठी अश्रू ढाळले . तुमच्या मृत्युनंतर केवळ तुमचे कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्र अश्रू ढाळतील . जगाने तुमच्यावर प्रेम केले पाहिजे . जगामध्ये कोट्यावधी लोक जन्माला येतात व मृत्यू पावतात . परंतु जगाला केवळ संत,महात्मे , ऋषी यांचेच स्मरण राहते . त्यांचे निःस्वार्थ प्रेम हेच त्याचे कारण आहे . आपण सर्वांवर प्रेम केले तरच आपण इतरांच्या प्रेमास पात्र ठरू . स्वामींनी दिलेल्या कार्डवर पुढील बाजूस एक मोठे हृदयाचे चित्र होते . त्याच्या आतमध्ये LOVE असे लिहिले होते . त्याच्या खाली एका आयतामध्ये एका ओळीत तीन हृदयांची चित्रे होती . कार्डच्या आतमध्ये एक मोठे हृदयाचे चित्र होते , त्यामध्ये the greatest gift ( सर्वश्रेष्ठ भेट ) असे लिहिले होते . त्याच्या दोन्ही बाजूला दोन छोटी हृदयाची चित्र होती . कार्डच्या खालच्या कोपऱ्यातही एक हृदयाचे चित्र होते . हे हृदय वरील दोन हृदयांपेक्षा आकाराने मोठे होते . स्वामी येत असलेल्या सत्ययुगाचे ते निदर्शक आहे . ही हृदयनिर्मिती आहे . ही तीन हृदये , परमेश्वर , शक्ती व निर्मिती हे तिन्ही एकच आहेत असे सुचवितात . स्वामींनी याचा सर्वश्रेष्ठअसा उल्लेख केला आहे . मी माझे अश्रू आणि तप याद्वारे सर्वांसाठी मुक्ती मागितली . मी सर्वांवर निःस्वार्थ प्रेमाचा वर्षाव केला. या प्रेमासाठीच स्वामींनी वैश्विक मुक्तीची महानभेट बहाल केली आहे .
जय साईराम 
व्ही.एस.

मंगळवार, २ डिसेंबर, २०१४


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः


अम्मांसाठी सामुदायिक प्रार्थना

     मुक्ती निलयममध्ये संध्याकाळी ७:४५ मि. अम्मांसाठी ही सामुदायिक प्रार्थना रोज केली जाते. तरी सर्व भक्तांनी रोज संध्याकाळी ७:४५ मि. ही प्रार्थना करावी.  




ॐ श्री साईराम

साई, प्रेममय सत्यसाई ! सनातन ज्ञानस्त्रोत , 
हे जगद्पिता
प्रार्थना आमुची ऐका
अवचित येऊनी आश्रमात अम्माच्या , करा आचंबित आम्हा सर्वा
नुकतीच भेट दिलीत तुम्ही तिज,
बहु काव्ये, चित्रे अन् छायाचित्रे .
जीवावर उदार ती तुमच्यासाठी, नको अन्य तिज काही,
एकची ध्यास, निदीध्यास! हवेत केवळ सदेह सत्यसाई!
ढाळूनी अश्रू घातले सचैल स्नान तिने
भूतलीच्या हर एक जीवात्म्यास
पळभर तरी विश्रांती देऊनी, कृपा करा तिजवरी .
स्वामी, हे जाणितो आम्ही
सदा निरंतर मार्गदर्शक तुम्ही
तिच्या वचनांसी अन् लेखनासी .
नजरेत नजर मिळवूनी तुमच्या
हलकेच विसावू दे तिज मस्तक मांडीवरी जीवलगाच्या
यातना देई तिच्या कोमल हृदयास , विरहाचा प्रत्येक क्षण
तिज अल्पविश्रांती देणे, अशक्य आहे का हे वसंतरमण?
आज्ञा तुमची शिरोधार्य मानुनी, बांधिला तिने आश्रम
नम्र विनंती तव चरणी
आश्रमात येथे यावे आपण , अन्....
अर्धांगिनीसह आश्रमात फिरून
करावे तिचे अनुनयन
तुमच्या एका नेत्रकटाक्षे
क्षणार्धात येईल पूर्वपदास
कणा पाठीचा त्या माऊलीचा
अनंत आनंदज्योती उजळतील तिच्या नेत्रातून
प्रकाशमान होईल अंतरिक्ष तिच्या सुंदर स्मितातून
स्वामी , प्रिय स्वामी, जाणितो आम्ही
किती कठीण आहे तुम्हासही
मूकपणे तिचे दुःख यातना पाहणे
वेदनादायी दुःखाचा या अंत करा स्वामी .
काकुळतीची प्रार्थना ही आमुची ,
ऐकु येत नाही का तुम्हा ?
कृपया प्रार्थनेस प्रतिसाद देऊनी
दुःख, हृदयभंग या सर्वाचा अंत करा स्वामी
माता आमुची आजही दुःख सोसते
आम्हा लेकरांसी हे पाहणे असह्य होते .
तुम्ही या येथे तिच्याकडे
तिच्यासाठी, फक्त तिच्यासाठी
नका लांबवू क्षण हा वैश्विक आनंदाचा
या येथे सत्वर , या तुम्ही
एकमेवअद्वितीय इच्छा तिची 
तुमच्यामध्ये एकत्व पावण्याची
तद्नंतर .....
आनंदाचे डोही आनंद तरंग
कोणी ना राही वंचित या आनंदा पासून
सर्वांसी मुक्त करण्याचे ध्येय तिचे ,
स्पष्ट होईल निश्चित , स्पष्ट होईल निश्चित !


जय साईराम