रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" सौंदर्य भक्तीचे दुसरे नांव आहे ."
 
प्रकरण सात

मंगळसूत्राची देवघेव 

                 त्यानंतर स्वामींचा फोटो व पादुका घेऊन गावामधून मिरवणूक काढण्यात आली. सर्वजण त्यामध्ये सहभागी झाले. माझ्या हातात माझी कृष्णाची मूर्ती होती. घराच्या उंबरठ्यावर माझे पाय पकडून मणिवन्नन रडू लागला. तो मला सोडेचना. मी त्याला म्हणाले, " ही स्वामींची आज्ञा आहे. मला गेलेच पाहिजे. ही सर्व माया आहे. " कृष्णासोबत जीवनयात्रा ह्या माझ्या जीवनयात्रेतील दुसऱ्या टप्प्यात मी प्रवेश केला. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

महाशिवरात्री निमित्त

सर्वव्यापक दिव्य तत्वाची अनुभूती घ्या
                
                 शिवरात्री ह्या शब्दाचा खरा अर्थ समजून घेण्याचा कोणीही प्रयत्न केलेला दिसत नाही. खर तर ' शिवरात्री ' शब्द स्वतःच त्याचा अर्थ उलगडून दाखवतो. ' शिव ' म्हणजे मंगल, पवित्र आणि रात्री म्हणजे रात्र. म्हणून शिवरात्री म्हणजे पवित्र रात्र. मग प्रश्न पडतो की " शिव म्हणजे कोण ? " सर्व सजीवांना व्यापून टाकणारे दिव्य तत्व म्हणजेच शिव होय. ह्या शिवत्वाने केवळ मानवालाच नव्हे तर पशु पक्षी ह्यांनाही व्यापून टाकले आहे. खर तर आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाला शिवरात्री मानले पाहिजे, त्यासाठी वर्षातील एखाद्या विशिष्ठ दिवसाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही.
शिवतत्व अनाकलनीय आहे.
प्रेमस्वरूपलारा,
शिवतत्व सर्वव्यापक आहे, मग आपण त्याला स्थळकाळाच्या मर्यादा कशा घालू शकतो ?
सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोs क्षिशिरोमुखम् 
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति
जर आपण वरील श्लोकाच्या अर्थावर चिंतन केले तर एक गोष्ट निश्चित स्पष्ट होते की आपण आपल्या भोवती असणारी प्रत्येक गोष्ट दुसरे काही नसून शिवतत्वच आहे. शिव म्हणजे व्याघ्रजीन व जटांचा संभार असलेले विशिष्ठ रूप नव्हे. आपण जेथे पाहतो, जे साकार रूप पाहतो. त्या प्रत्येक रूपामध्ये दैदिप्यमान शिवतत्व  विद्यमान आहे. दिव्यत्वाची एकच खूण आहे ती म्हणजे चैतन्य. ज्या रुपाला ते दिव्य चैतन्य व्यापते ते त्याचे रूप समजले जाते मग ते रूप कुत्र्याचे, कावळ्याचे, बगळ्याचे वा मानवाचे असू असू शकते. ईश्वरतत्वाचे वर्णन दिव्य चैतन्य असे केले जाऊ शकते. हे दिव्य चैतन्य म्हणजेच शिवत्व होय. खर पाहता आता या हॉल मध्ये बसलेले सर्व भक्त शिवस्वरूप आहेत. प्रत्येक सजीव हा दिव्यस्वरूप आहे. परमेश्वर सर्व नाम रूपांना व्यापून राहिला आहे. आपण स्वतःच दिव्यस्वरूप आत्मा आहे हे न जाणल्याने मनुष्य आज परमेश्वराचा सर्वत्र शोध घेत आहे. परमेश्वराप्रती प्रेम विकसित करून प्रत्येकाने दिव्यत्व जाणले पाहिजे. जर त्या निर्गुण निराकार परमेश्वराचे वर्णन करायचे झाले तर ते पुढीलप्रमाणे ' एकम् , नित्यम् विमलम, अचलम् सर्वधी साक्षीभूतम् , भावातीतम् त्रिगुणरहितम् ' असेल.
संदर्भ :- भगवान बाबांच्या शिवरात्री ८/३/२००५ च्या प्रवचनातून

जय साईराम

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः  

सुविचार 

        "  आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. "

प्रकरण सात 

 मंगळसूत्राची देवघेव 

                त्या समारंभास उपस्थित असलेल्या सर्वांना एस. व्हीं. नी ही बातमी सांगितली. ते म्हणाले, " जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस आहे. अम्मा संन्यास घेत आहेत. आजचा दिवसही विशेष आहे. आज तै (तमिळ कॅलेंडरमधील एक महिना ) महिन्याची पौर्णिमा आहे. अम्मांबरोबर श्री. मनोहरनही संन्यास घेत आहेत. याला आत्मसंन्यास म्हणतात. आत्मसंन्यास म्हणजे अरण्यात जाणे किंवा भगवी वस्त्रे परिधान करणे नव्हे. स्वामींनी त्यांना पती पत्नीच्या वैवाहिक नात्याचा त्याग करण्यास सांगितला आहे. अम्मा त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढतील आणि श्री. मनोहरन ते दुर्गामातेच्या चरणी अर्पण करतील. न भूतो न भविष्यती अशी ही घटना आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

 

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " अज्ञानाचा बुरखा पांघरल्यामुळे  आपण इतरांना आपल्यापासून वेगळे समजतो."
 
प्रकरण  सात 

मंगळसूत्राची देवघेव 

७ फेब्रुवारी २००१, वडक्कमपट्टी 
सकाळी मी माझ्या तिन्ही मुलांना आणि सुनांना बोलावून उद्घाटन समारंभात काय घडणार आहे समजावून सांगितले. मी त्यांना म्हणाले," संन्यास घेण्यासाठी तुम्ही मला मुक्त करा." हे ऐकताच सर्वजण रडू लागले व म्हणाले," तू आमची आई आहेस, आम्ही तुला सोडून शकत नाही." त्यांनी खूप आर्जवं केली. माझी सून म्हणाली, " तुम्ही काय हवं ते करा. परंतु मंगळसूत्र काढू नका." त्यावर मी म्हणाले," ही भगवंताची आज्ञा आहे. ती मला शिरसावंद्य मानलीच पाहिजे. केवळ तुम्हीच नव्हे, तर जगातील सर्वजण माझीच लेकरे आहेत. इथून पुढे मला त्यांच्यासाठी जगले पाहिजे. तुमचा त्याग अत्यंत महान आहे. आम्हाला संन्यास घेण्यासाठी आनंदाने आणि अंतःकरणपूर्वक निरोप द्या . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साईराम

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " अळीपासून ब्रम्हापर्यंत सर्वांमध्ये परमेश्वराचे प्रतिबिंब आहे. " 

प्रकरण  सात 

मंगळसूत्राची देवघेव 

* के. एस. वेंकटरामन हे अम्मांचे जुने भक्त. एस. व्ही. म्हणून ओळखले जातात. मुक्ती निलयम आश्रमाच्या बांधकामाचे कार्य त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. 
६ फेब्रुवारी २००१ वडक्कमपट्टी 
                साई गीतालयम उद्घाटन समारंभ आदला दिवस. एस. व्ही. श्री. मनोहरन यांना आमच्या देवघरात घेऊन आले आणि म्हणाले, की स्वामींनी एक महत्वाचा संदेश दिला आहे. मी तेथे प्रतीक्षा करत थांबले होते. मी त्यांना म्हणाले, " भगवानांनी उद्या केवळ मलाच नव्हे, तर तुम्हालाही संन्यास घेण्यास सांगितले आहे. तुम्ही माझ्या गळ्यातून मंगळसूत्र उतरवून दुर्गामातेला अर्पण करा. इथून पुढे आपले जगाशी नाते तुटले. शेवटपर्यंत तुम्ही मला माझ्या कार्यात मदत केली पाहिजे." 
                मी त्यांना सांगितले की स्वामी म्हणाले, " त्याने  पराकोटीचा महान त्याग केला आहे. जगाच्या कल्याणासाठी तो तुझा त्याग करत आहे. आजवर असे कोणीही केले नाही आणि कोणी करूही शकणार नाही . " त्यानंतर एस. व्हीं. नी मनोहरन्ना विचारले, " ही  बातमी कुटुंबापुरतीच मर्यादित ठेवायची का सगळ्यांना सांगायची ?"  ते त्वरित उत्तरले, "  सर्वांना सांगा." त्यांनी ही बातमी इतक्या सहजतेने घेतलेली पाहून मी आश्चर्याने थक्क झाले. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " परमेश्वराशिवाय कोणतीही गोष्ट अपरिवर्तनीय नाही हे नेहमी लक्षात ठेवा."

पुष्प सात 

मंगळसूत्राची देवघेव 

              स्वामी म्हणाले, की याद्वारे माझे भौतिक बांध तुटतील आणि केवळ त्यांच्याशी बंध उरेल. संपूर्ण जगाला आमचे नाते ज्ञात होईल आणि त्यानंतरच अवतारकार्य पूर्णत्वास जाईल. मी हे फक्त एस. व्ही. ना सांगितले. 
              काही दिवस अगोदर बंगलोरचे नागानंद यांनी प्रार्थना केली, " स्वामी, साई गीतालयमच्या उद्घाटन समारंभाला आशीर्वाद द्या."
 दर्शनात स्वामी म्हणाले," माझा आशीर्वाद आहे..... "
             नागानंद म्हणाले," स्वामी, ७ फेब्रुवारीला वडक्कमपट्टी येथे उद्घाटन समारंभ होणार आहे. तुम्ही काहीतरी सांगा ."
"स्वामी उत्तरले," छान... छान... !"
              स्वामींनी नंतर फ्रेडकडून समारंभाची निमंत्रण पत्रिका स्वीकारली. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....  

जय साईराम
 

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

" भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही."

प्रकरण सात 

मंगळसूत्राची देवघेव 

               " तुम्ही तुमच्या विचारांचा त्याग करणे आवश्यक आहे. तुमचे कर्तव्य परमेश्वरप्राप्ती आहे."
               आता आपण साई गीतालयमकडे वळूया. वडक्कमपट्टी येथील आमच्या घराच्या परसदारात आम्ही स्वामींसाठी भजन आणि ध्यान सभागृह बांधले. ७ फेब्रुवारी २००१ रोजी त्याचे उदघाटन झाले. स्वामींनी त्याचे नामकरण केले ' साई गीतालयम '. गीतेचे आचरण करणाऱ्यांचे निवासस्थान. स्वामी मला म्हणाले, " तू या दिवशी तुझे मंगळसूत्र काढून दुर्गेला अर्पण कर आणि मी दिलेले पदक पवित्र पिवळ्या धाग्यात घालून धारण कर ... सर्व संतमहात्मे, देवादिक यांना या दिव्य दिवसाची अपेक्षा आहे. तू मंगळसुत्रचा त्याग करून सन्यास घे. हे पूर्ण वैराग्याचे निदर्शक आहे."

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

           " प्रत्येकाचा स्वतःचा व्यक्तिगत स्वभाव असतो व त्यानुसार भक्तीचे रूप आणि पद्धत बदलते. " 

भाग - दुसरा 

 योग


               " धन, प्रतिष्ठा, नावलौकिक, कौटुंबिक  नातेसंबंध हे सर्व अशाश्वत आहे. या जगामध्ये केवळ त्याग शाश्वत आहे, जो मनुष्याला अमृतत्व बहाल करतो."

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             "  स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल."

प्रकरण सहा 

मंत्र 

                हा मंत्र म्हणजे स्वामींच्या आणि माझ्यामध्ये असलेल्या बंधाच्या सत्यतेचा ठोस पुरावा आहे. मी त्यांची चितशक्ती असल्याचे हा मंत्र दर्शवितो. माझा जन्म त्यांच्यापासून झाला आहे आणि माझा त्यांच्याशी योग होणार आहे. ह्या मंत्राच्या सामर्थ्याने जगातील कर्मांचा नाश होईल आणि वैश्विक मुक्ती मिळेल. नवी पंचतत्वे आणि नव निर्मिती यांची उत्पत्ती होईल. 
                 मी भगवान श्री सत्य साई बाबा ह्या रूपाची भक्ती केली. त्यांना मी सर्वव्यापी, सर्वशक्तीमान  आणि सर्वज्ञ म्हणून प्रकट केले. निर्मितीच्या प्रत्येक अंशामध्ये मी त्यांना पाहते. सर्वकाही परमेश्वरच आहे . केवळ या साक्षात्कारापासून सर्वांमध्ये एकच आत्मा आहे हे ज्ञान मिळेल आणि तेच नवनिर्मिती आणि वैश्विक मुक्तीप्रत घेऊन जाईल. 
                मला १०८ दिव्य नामे बहाल करताना स्वामी म्हणाले," आजपर्यंत परमेश्वराने कोणालाही अशी दिव्य नामे बहाल केलेली नाहीत. ह्या नामातूनच माझे तुझ्यावरील आणि तुझे माझ्यावरील प्रेम दिसून येते. तुझ्या प्रेमानेच ती नामे देण्यास मला प्रेरित केले. तुझ्या अपरिमित प्रेमामुळे ती नामे बहाल करण्याची इच्छा माझ्या मनात जागृत झाली ".  
                 परमेश्वराने कोणालाही १०८ दिव्यनामे दिलेली नाहीत. असा मंत्रही दिलेला नाही. ह्या सर्व गोष्टी हेच दर्शवितात, की मी त्यांचीच आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ...... 

जय साईराम