शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

महाशिवरात्री निमित्त

सर्वव्यापक दिव्य तत्वाची अनुभूती घ्या
                
                 शिवरात्री ह्या शब्दाचा खरा अर्थ समजून घेण्याचा कोणीही प्रयत्न केलेला दिसत नाही. खर तर ' शिवरात्री ' शब्द स्वतःच त्याचा अर्थ उलगडून दाखवतो. ' शिव ' म्हणजे मंगल, पवित्र आणि रात्री म्हणजे रात्र. म्हणून शिवरात्री म्हणजे पवित्र रात्र. मग प्रश्न पडतो की " शिव म्हणजे कोण ? " सर्व सजीवांना व्यापून टाकणारे दिव्य तत्व म्हणजेच शिव होय. ह्या शिवत्वाने केवळ मानवालाच नव्हे तर पशु पक्षी ह्यांनाही व्यापून टाकले आहे. खर तर आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाला शिवरात्री मानले पाहिजे, त्यासाठी वर्षातील एखाद्या विशिष्ठ दिवसाची प्रतीक्षा करण्याची गरज नाही.
शिवतत्व अनाकलनीय आहे.
प्रेमस्वरूपलारा,
शिवतत्व सर्वव्यापक आहे, मग आपण त्याला स्थळकाळाच्या मर्यादा कशा घालू शकतो ?
सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोs क्षिशिरोमुखम् 
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति
जर आपण वरील श्लोकाच्या अर्थावर चिंतन केले तर एक गोष्ट निश्चित स्पष्ट होते की आपण आपल्या भोवती असणारी प्रत्येक गोष्ट दुसरे काही नसून शिवतत्वच आहे. शिव म्हणजे व्याघ्रजीन व जटांचा संभार असलेले विशिष्ठ रूप नव्हे. आपण जेथे पाहतो, जे साकार रूप पाहतो. त्या प्रत्येक रूपामध्ये दैदिप्यमान शिवतत्व  विद्यमान आहे. दिव्यत्वाची एकच खूण आहे ती म्हणजे चैतन्य. ज्या रुपाला ते दिव्य चैतन्य व्यापते ते त्याचे रूप समजले जाते मग ते रूप कुत्र्याचे, कावळ्याचे, बगळ्याचे वा मानवाचे असू असू शकते. ईश्वरतत्वाचे वर्णन दिव्य चैतन्य असे केले जाऊ शकते. हे दिव्य चैतन्य म्हणजेच शिवत्व होय. खर पाहता आता या हॉल मध्ये बसलेले सर्व भक्त शिवस्वरूप आहेत. प्रत्येक सजीव हा दिव्यस्वरूप आहे. परमेश्वर सर्व नाम रूपांना व्यापून राहिला आहे. आपण स्वतःच दिव्यस्वरूप आत्मा आहे हे न जाणल्याने मनुष्य आज परमेश्वराचा सर्वत्र शोध घेत आहे. परमेश्वराप्रती प्रेम विकसित करून प्रत्येकाने दिव्यत्व जाणले पाहिजे. जर त्या निर्गुण निराकार परमेश्वराचे वर्णन करायचे झाले तर ते पुढीलप्रमाणे ' एकम् , नित्यम् विमलम, अचलम् सर्वधी साक्षीभूतम् , भावातीतम् त्रिगुणरहितम् ' असेल.
संदर्भ :- भगवान बाबांच्या शिवरात्री ८/३/२००५ च्या प्रवचनातून

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा