ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पूर्ण अवतार
पुष्प - ३५
१) जर तुम्हाला राग आला असेल तर मौन बाळगा. परमेश्वराच्या कोणत्याही रूपाचे नाम उच्चारण करा. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला वारंवार राग येतो त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा.
२) ह्या क्षणापासून पुढे सर्व वाईट सवयींचा त्याग करा. त्यास विलंब करू नका वा पुढे ढकलू नका. त्या कधीही तुम्हाला आंनद देणार नाही.
३) गरीबास दरिद्री नारायण माना ( परमेश्वराला दरिद्री रूपात पाहणे. ) आणि त्यांना अन्नदान करा. किमान थोड्या वेळासाठी, तरी त्यांना आनंदी बनवा.
४) इतरांनी तुम्हाला कसे वागवावे ह्या अपेक्षेनुसार तुम्ही इतरांना वागवावे.
५) अज्ञानातून केलेल्या चुका व पापं ह्याबद्दल पश्चाताप होऊ दे. सदैव सन्मार्गाचे अनुसरण करण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करा त्यातून तुम्हाला धैर्य आणि शक्ती प्राप्त होईल.
६) वस्तु वा सुखसोयींना तुमच्या जवळ फिरकु देऊ नका अन्यथा त्या तुमच्या परमेश्वराप्रत पोहोचण्याच्या इच्छेचा नाश करतील.
७) भ्याडपणास अजिबात स्थान देऊ नका सदैव शाश्वत आनंदाच्या स्थितीत राहा.
८) लोकांच्या स्तुतीसुमनांनी हुरळुन जावू नका. लोकांच्या दूषणांनी दुःखी होऊ नका.
९) जर तुमच्या दोन मित्रांमध्ये एकमेकांविषयी द्वेष वा भांडणे असतील तर तुम्ही त्याचा मोठा मुद्दा न बनवता तुम्ही प्रेमाने व सहानभूतीने दोघांमधील जुनी मैत्री पुन्हा प्रस्थापित केली पाहिजे.
१०) इतरांमधील दोष शोधू नका. त्याऐवजी तुमच्या स्वतःमधील दोष शोधा. व त्यांचे समूळ उच्चाटन करा. स्वतःचे परिक्षण करून शोधलेला एक दोष, इतरांमधील शोधलेल्या १०० दोषांहून तुमच्यासाठी हितकारक आहे.
११) तुम्ही जरी एखादे पवित्र वा सत्कर्म केले नाही तरी चालेल परंतु पाप व दुष्कर्म करू नका.
१२) इतरांनी तुमच्यामधील दोष दाखवल्यावर राग मानू नका. तुमच्यामधील दोष नाहीसा करण्यासाठी ते सहाय्यकरी ठरते. त्या बदल्यात इतरांमधील दोष शोधणे निरर्थक आहे. जरी तुमच्यामध्ये त्यांनी दाखवलेला तो दोष नसला तरी तुम्ही दुःख मानू नका.
१३) जर तुमच्याकडे मोकळा वेळ असला तर तो वायफळ गप्पांमध्ये वाया न घालवता ध्यान वा सेवा ह्यामध्ये व्यतीत करा.
१४) केवळ भक्त परमेश्वरास जाणतो व केवळ परमेश्वर भक्तास जाणतो. अन्य कोणीही जाणणार नाही. म्हणून ज्यांच्या मनात भक्तीभाव नाही त्यांच्याशी परमेश्वराविषयी बोलू नका. अन्यथा अशा लोकांशी बोलल्याने तुमचा भक्तीभाव कमी होऊ शकतो.
१५) तुम्ही पुण्यकर्म वा सत्कर्म करू शकत नसाल वा करणार नसाल तर कोणतेही पापकर्म वा दुष्कर्म करण्याचा विचार वा कृती करू नका.
१६) तुम्ही जाणत असलेल्या तुमच्यामधील दोषांविषयी लोकं काहीही बोलले तरी त्यावर भावनिक होऊ नका. त्याऐवजी लोकांनी त्यावर काही बोलण्याअगोदरच तो दोष तुमच्यामधून काढून टाका. तुमचे दोष दाखवणाऱ्या व्यक्तिबद्दल मनामध्ये राग वा कटूता बाळगू नका व प्रत्युत्तर म्हणून त्याचे दोष न दाखवता त्यांच्यापाशी कृतज्ञता व्यक्त करा. त्यांचे दोष काढणे ही तुमची घोडचूक ठरेल. तुमचे दोष तुम्हाला समजणे हे तुमच्यासाठी हितकारक आहे. इतरांचे दोष समजणे हे तुमच्यासाठी चांगले नाही.
१७) जर कोणी तुमच्याशी एखाद्या विषयासंदर्भात गैरसमजूत करून घेऊन बोलली तर त्याच्या चुकीच्या समजूतीचा विचार करून त्यास पाठींबा देऊ नका. त्याच्या बोलण्यामधील फक्त चांगला अर्थ समजून घ्या. खऱ्या अर्थाची प्रशंसा करणे वांछनीय आहे. परंतु त्याला गैरअर्थ लावणे व त्याचे अनेक अर्थ काढणे हे केवळ आनंदाला बाधा आणणारे आहे .
१८) जर तुम्हाला मनाची एकाग्रता विकसित करायची असेल तर तुमची नजर, गर्दीमध्ये बाजारामध्ये सर्वत्र भिरभिरू देऊ नका. केवळ तुमच्या पायाखालच्या रास्ता पाहा व कोणाशी धडक (टक्कर) होऊ नये म्हणून आवश्यक तेवढे आजूबाजूस पाहा. अन्य रूपांवर दृष्टीक्षेप टाकू नका. असे केल्याने तुमची एकाग्रता अधिक दृढ होईल.
१९) गुरु आणि परमेश्वर ह्यांच्याविषयी मनात काही शंकाकुशंका असतील तर त्यांचा त्याग करा. जर तुमच्या भौतिक इच्छांची पूर्ती झाली नसेल तर तुमच्या भक्तीवर दोषारोप करू नका. कारण अशा इच्छा आणि ईश्वरभक्ती ह्यांच्यामध्ये काहीही संबंध नाही. आज न उद्या ह्या भौतिक इच्छांचा त्याग करावाच लागतो. व भक्तीचा कधी ना कधी तरी अंगीकार करावा लागतो. ह्याची पक्की खात्री बाळगा.
२०) जर तुमची जप व ध्यान ह्यामध्ये योग्य प्रगती होत नसले. वा तुमच्या मनातील इच्छांची पूर्ती होत नसेल. ह्याचे खापर परमेश्वरावर फोडू नका. त्याने तुमचे मनोधैर्य अधिक खचेल व तुम्ही शांती गमावून बसाल. जप व ध्यान करताना नाउमेद होऊ नका. असे भाव मनात आल्यास तुमच्या साधनेत काहीतरी दोष आहे असे मानून त्यामध्ये योग्य ती सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा