रविवार, २८ मे, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

          " प्रेम आणि त्याग हे दोन समांतर रेषांसारखे आहेत. प्रेमाद्वारे त्यागभाव वृद्धिंगत होतो व त्यागाद्वारे प्रेमभाव वृद्धिंगत होतो."

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात 

                 अंतसमयी राधेला कृष्णाकडून वर मिळाला, तो वर एक विचार बनून अंतरिक्षात फिरत होता. योग्य वेळ येताच त्या विचाराने रूप धारण केले आणि पृथ्वीवर जन्म घेतला. त्या वरानुसार, परमेश्वराचा सदेह अनुभव घेणे शक्य होण्यासाठी त्या विचाराने जन्म घेतला. कृष्णाने राधेच्या विचारांची परिपूर्ती केली नाही. त्यामुळे अवतार अवतरला. पूर्वीच्या अवतारातील दोष दूर करण्यासाठी नवनिर्मिती होणार आहे. विचार रूप कसे धारण करतात, याचे हे एक छोटेसे उदाहरण आहे. इथेच, याक्षणी, मुक्ती भाग ३ या पुस्तकात मी हे लिहिले आहे. त्यानंतर मी ' भाव - रूप ' याबद्दल लिहिले. आज सर्वजण केवळ पुट्टपर्तीतील सत्य साई बाबांच्या एकाच रूपात परमेश्वर पाहत आहेत. मी त्यांचे सर्वव्यापकत्व पहाते. मी सर्व जगाला त्यांचा महिमा ज्ञात करून देत आहे. सत्ययुग कसे येणार आहे, हे स्वामी माझ्या पुस्तकांद्वारे दाखवून देत आहेत. 
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम


गुरुवार, २५ मे, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             " दुसऱ्याप्रती असलेले सामान्य प्रेम हे खरे प्रेम नव्हे. मनुष्य आनंद आणि प्रेम यासाठी आसुरलेला असतो व ते त्याला दुसऱ्याकडून प्राप्त होईल असा त्याचा समज असतो. वस्तुतः प्रेम हे प्रत्येकाच्या आतून पाझरते. " 

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात 

                अगदी असेच माझ्या लेखनाबाबत होत आहे. काही लोक म्हणतात, की मी जे लिहिते ते असत्य आहे. मी परमेश्वराविषयी सत्य सांगत नाही. ही वृत्ती बरोबर नाही. परमेश्वराचे धरतीवर अवतरण कसं होतं, विचार रूप कसे धारण करतात. ह्याचा माझ्या पुस्तकांमध्ये ऊहापोह केला आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, २१ मे, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " तुमच्या प्रेमाने परमेश्वराला तुमच्याशी बोलण्यास भाग पडले पाहिजे."

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात 

                एका आडगावातील एक मनुष्य परदेशी गेला होता. बऱ्याच वर्षांनी तो त्याच्या गावी परतला. गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीने त्याच्या परदेश वास्तव्याविषयी विचारपूस केली. त्या तरुणाने त्यांना स्वामींच्या लीला व चमत्कार याबद्दल सांगितले. तथापि या वृद्ध व्यक्तीचा त्यावर विश्वास बसला नाही. तो म्हणाला, " राम, कृष्ण, मुरुगन हेच आपले देव आहेत. तू या अशा गोष्टींवर कसा विश्वास ठेवतोस ? देव अशा गोष्टी करत नाही. हे एखाद्या जादुगाराचे काम असावे." 
                 ह्या व्यक्तीचा अविश्वास व त्याच्यासारखे इतर लोक यांच्यामुळे आपली श्रद्धा विचलित होत नाही. संपूर्ण जगाला स्वामींचे दिव्यत्व आणि वास्तव याविषयी माहिती आहे. आपल्याला ते जाणवते व आपण त्याची अनुभूती घेतो. आपले अनुभव खरे, का त्या वयोवृद्ध खेडूत व्यक्तीचे विचार ? आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींवर टीका करू नये, संयमपूर्वक प्रतीक्षा करावी. विश्लेषण करावे आणि मग निष्कर्षाप्रत यावे. तात्काळ कृती करण्यापासून स्वतःला परावृत्त करावे. तसेच घाईने निर्णय घेण्याचे टाळावे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम
 

गुरुवार, १८ मे, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

             " दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी तुम्ही काही केले नाही तरी हरकत नाही परंतु त्यांच्या आनंदावर विरजण घालू नका."

प्रकरण आठ

 प्रेमभाव रूप धारण करतात

                अनादी काळापासून, युगानुयुगे ऋषीमुनींनी उपनिषदांचे ज्ञान प्रकट केले आहे. त्यापलीकडील काहीही प्रकट केले नाही, परंतु स्वामी मला उपनिषदांच्या पलीकडे, वेदांच्या पलीकडे आणि सत्य यावर नवीन दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करून लिहायला सांगत आहेत. 
                दुसरे उदाहरण द्यायचे, तर राम आणि कृष्ण अवतारात सामान्य जन त्यांच्या जवळ जाऊ शकत नव्हते. त्यांनी अवतार कार्याचे अवलोकन केले आणि नंतर त्यांना परमेश्वर मानून त्यांची भक्ती करू लागले. तथापि साई अवतार कोट्यावधी लोकांना आपल्याकडे आकर्षून घेत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येकाच्या मदतीला ते धावून जात आहेत." तुम्ही राम, कृष्ण, जिझस, अल्ला कोणालाही हाक मारा, मीच ते ईश्वरीय तत्व आहे", हे हा साई अवतार सर्वांना सांगत आणि दर्शवत आहे. आज जगात सर्वांनी त्यांची करूणा, त्यांच्या लीला व त्यांचा  महिमा यांचा अनुभव घेतला आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १४ मे, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             " इंद्रियांकडे धाव घेणाऱ्या मनाला वैराग्याद्वारे दुसरीकडे वळवा. ही इंद्रिये शाश्वत आनंदाचे शत्रू आहेत." 

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात

               स्वामी म्हणाले की राधेच्या मनातील खोल ठशांची आर्त साद झाली, ज्या सादेने भगवंताला धरतीवर आणले. मी इथेच, याक्षणी, मुक्ती भाग -३ या पुस्तकामध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे. एखाद्याची अशी गैरसमजूत होईल की मीच परमेश्वराला निर्माण केले आहे आणि ते माझी चूक काढतील. ' एखादी खेडूत महिला कशी काय परमेश्वराला आणणार ?' ती स्वतःला परमेश्वराहूनही महान समजते. असेही कोणी म्हणेल. 
               स्वामी माझ्या माध्यमातून जगाला दाखवून देत आहेत की विचारांमधून रूपाची निर्मिती होते, विचार रूप घेऊन येतात. 
               नवीन निष्कर्ष किंवा कल्पना मान्य करण्याची जगाची तयारी नसते. शास्त्रीय जगही असेच आहे. गॅलिलियोने शोध लावला की पृथ्वी गोल आहे. सर्वांनी त्याच्यावर टीका केली आणि त्याला तुरुंगात टाकले. त्यांचा विश्वास होता की जग सपाट आहे. कालांतराने त्यांना सत्याचे ज्ञान झाले. आध्यात्मिक मार्गावरही हेच घडत आहे. नवीन ज्ञान स्वीकारायला जग तयार नाहीय. इतकेच नव्हे तर टीकाकार असाही दावा करतात, " उपनिषदांच्या पलीकडे काहीच नाहीय." 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ११ मे, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " तुमची दैनंदिन कर्म, परमेश्वराला समर्पित केल्याच्या भावनेतून करून पवित्र बना."

प्रकरण आठ 

प्रेमरूप भाव धारण करतात 

१३ नोव्हेंबर २००१ संध्याकाळचे ध्यान 
स्वामी म्हणाले,
                " हे तुझ्या आत्म्याचे गीत आहे. तुझ्या भावविश्वामधून माझे हे रूप कसे निर्माण झाले हे यातून निदर्शनास येते. तुला माहीत नाही की तू कोण आहेस. तुला असं वाटेल की मी तुझ्या अगोदर जन्मलो, परंतु तुझ्यामुळे माझा अवतार झाला आहे. आपण राधाकृष्ण असताना, अंतसमयी तू  माझ्याकडे एक वर मागितला होतास तो म्हणजे मला जाणण्यासाठी, माझी अनुभूती घेण्यासाठी, तुला पुन्हा जन्म घ्यायचा होता. त्या वरदानामुळेच माझा जन्म आधी झाला आणि तू मागाहून आलीस. माझ्या अस्तित्वाच्या अनुभूतीचा आनंद घेण्यासाठी तू आली आहेस.
               राधेच्या मनातील खोल ठसे हेच या सर्वांचे कारण आहे. राधेच्या व्याकूळ तळमळीतून साईंचे आनंदमय रूप भूतलावर निर्माण झाले. ह्या प्रेमानेच साईंचे रूप आणले. त्यांच्या देहाला राधेच्या व्याकूळ श्वासाचा सुगंध आहे. तिने ढाळलेल्या अश्रूंनी त्यांचे चरण कमल प्रदान केले. तिची हुरहूर आणि परमेश्वरासाठी ढाळलेले अश्रू ह्यांनी हे मोहक रूप पृथ्वीवर आणले. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 


रविवार, ७ मे, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " प्रेमवृद्धीसाठी एका नात्याची आवश्यकता असते. परमेश्वर तुमचा एकमेव सच्चा मित्र आहे.  सदैव तुम्ही त्याला तुमच्या सोबत ठेवा."

प्रकरण आठ 

प्रेमरूप भाव धारण करतात 

                  मी हे सर्व का लिहित आहे ? विचारांमध्ये एवढी शक्ती असते. खोलवर रुजलेल्या विचारांमध्ये तर अजून शक्ती असते. ' यद् भावम् तद् भवति ' प्रेमसाई अवतार येणार आहे. जगासाठी असणारा माझा वैश्विक मातृभाव आणि ममता प्रेमसाईचे रूप घेऊन येणार आहे. भाव, रूप धारण करतात. हे मी बऱ्याच पुस्तकामधून लिहिले आहे. 
                 १९९२ मध्ये मी एक गीत लिहिले. त्यामध्ये मी लिहिले," प्रल्हादाने निर्मिला नरहरी अवतार माझ्या प्रेमाने निर्मिले तुमचे रूप." कवितेचे नाव आहे, ' तुमचे आनंददायी रूप कोणी निर्मिले ' ही कविता मी खाली देत आहे. 

प्रल्हादाने निर्मिला नरहरी अवतार 
माझ्या प्रेमाने निर्मिले माझे प्रभू 
प्रकटले तुमचे आनंददायी रूप, 
माझ्या आर्त हाकांमधून 
हे प्रभू, 
कोणी दिला तुमच्या देहास गुलाबगंध ?
मी, माझ्या हृदयाच्या गाभ्यातून दिलेल्या सादेने 
कोणी घडवले तुमचे दिव्य चरण कमल?
मी, माझ्या करूण रुदनाने 
कोणी चितारले तुमचे मनमोहक रूप ?
मी, माझ्या अश्रूंच्या महापुराने 
अहाहा ! तुमच्या मोहक स्मिताचे सौंदर्य 
माझ्या अनंत प्रेमाचे साम्राज्य तर नव्हे ?
तुमच्या अधरांची लाली 
जणू माझ्या भक्तीचे सौंदर्य 
खट्याळ तुमचे नेत्र 
जणू माझ्या रक्तात भिनलेले तुमचे नाम 
तुमचे नर्तन करणारे सुवर्ण चरण ?
माझ्या हृदयाचे संगीत 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ४ मे, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

             " जग एक आरसा आहे , ज्यामध्ये मनुष्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसते. जगातील सर्व रूपे तुमचीच रूपे आहेत." 

प्रकरण आठ 

प्रेमभाव रूप धारण करतात

                 या जगातील सर्वजण माझीच मुले आहेत. आईला जर अमृत मिळाले तर ती एकटी त्याचा आनंद घेऊ शकेल का ? आई म्हणजे मूर्तिमंत त्याग ! मुलांसाठी वाट्टेल तो त्याग करण्याची तिची तयारी असते. माझीही नेमकी हीच स्थिती आहे. संपूर्ण विश्वाला मुक्ती मिळेपर्यंत आणि सत्ययुग जन्माला येईपर्यंत माझे अश्रू, माझी तळमळ आणि माझ्या प्रार्थना यामध्ये खंड पडणार नाही. इतरांसाठी मातृप्रेम - मातेची ममता यासारखे भाव, यामधून होणाऱ्या भावनिक उद्रेकामधून दिव्य ऊर्जेची निर्मिती होते. या दिव्य उर्जेमुळेच प्रेमसाई अवतार होणार आहे.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम