गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " प्रथम भाव उमजतात व नंतर विचार. आपण कृती करण्याआधी सारासार विचार करावा. हे चांगले आहे कां ? याने मला भगवत् प्राप्ती होईल कां ? "  

प्रकरण दहा 

पार्वती
 
                कांचीपुरम येथील कामाक्षी मंदिरात एक आंब्याचे झाड आहे. त्या झाडाखाली कामाक्षी देवीने तप केले होते. तेथे चार फांद्यांना चार प्रकारची फळे येतात. प्रत्येकाची चव आणि आकार निराळा आहे. त्याचप्रमाणे तुझ्या तपोबलामुळे तुझ्यामधून चार नूतन वेदांची निर्मिती झाली आहे. 
                 तद्नंतर दुपारी यज्ञविधीला उपस्थित असणारे दोन भक्त ' Love is my form ' नावाचे इंग्लिश पुस्तक वाचत असताना त्यांनी स्वामींचा एक फोटो पाहिला. त्या फोटोत आणि माझ्यात, तसेच माझी नात वैष्णवी हिच्यात खूप साम्य असल्याचे त्यांना जाणवले. त्या फोटोमागची गोष्ट आता आपण पाहू या. १९५० मध्ये श्री कस्तुरी यांच्या मुलीचा विवाहप्रसंगी भगवानांच्या दिव्य सान्निध्यात गौरी पूजेचे आयोजन करण्यात आले होते. जेव्हा ईश्वराम्मांना सौभाग्य वाण स्वीकारण्यासाठी बोलावण्यात आले तेव्हा स्वामी तात्काळ म्हणाले," ईश्वराम्मा कशाला ? मी स्वतःच वाण स्वीकारेन " असे म्हणून स्वामींनी क्षणात चष्मा घातलेल्या स्त्रीचे रूप धारण केले. तेथील सर्व स्त्रियांनी त्यांना आदरपूर्वक बांगड्या, आरसा,  कुंकू, अक्षता इ. सौभाग्य वाण दिले. त्यांनतर स्वामींनी एका भक्तासाठी या रूपातील एक फोटो सुजित केला व पुन्हा मूळ रूप धारण केले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 
 

रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वरापासून तुम्हाला जे काही दूर ठेवते तो सर्व माया आहे." 

प्रकरण दहा 

पार्वती 

नूतन वेदमार्ग 

३०डिसेंबर २००१ 
                वैकुंठ एकादशीच्या दिवशी वडक्कमपट्टीच्या ध्यान मंदिरात यज्ञ करण्यासाठी आम्ही चार यज्ञकुंड तयार केली. 
                दुपारच्या ध्यानात स्वामी म्हणाले,
                " या अगोदर तू पंचाग्नी तप केलेस. त्यावेळेस तुला शक्ती प्राप्त झाल्या. आता त्याच शक्ती चार वेदांप्रमाणे या चार यज्ञकुंडात भरून राहतील. तू वेदनायकी आहेस. तुझ्या कार्यातील मदतनीसांनी समिधा म्हणून ह्या यज्ञामध्ये जगाची कर्मे अर्पण करून भस्म करायची आहेत. ते तुला तुझ्या कार्यात सहाय्य करतील. तुझ्या चहुबाजूंनी वेदांचा उद्भव होतो आहे. हे नवीन वेद आहेत. हा नूतन वेदमार्ग जगाला ज्ञात होणार आहे. 
               ' बनारसमध्ये पार्वती मृतांच्या आत्म्यांना भगवान शिवाकडे घेऊन जाते. शिव त्यांच्या कानात पवित्र मंत्रांचे उच्चारण करून मुक्ती देतात. इथे मुक्ती निलयममध्ये आपण सजीवांच्या आत्म्यांना मुक्ती देऊ." 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
 
सुविचार 

           " मानवाचा प्रत्येक विचार, शब्द व कृती यांद्वारे त्याच्या अंतरातील भगवान व्यक्त झाला पाहिजे. "


प्रकरण दहा 
पार्वती 

              " जेव्हा पार्वती तुमच्या बचावासाठी येते तेव्हा भगवान शंकरही पाठोपाठ येतात." 
               एका भक्ताच्या घरात पूजन समारंभाच्या वेळी घडलेल्या प्रसंगाची मला आठवण येत आहे. स्वामींनी सृजित केलेले एक लिंग त्याठिकाणी आणण्यात आले होते. लिंग पाहिल्याबरोबर भावविवश होऊन मी त्याला कवटाळले, डोळ्यातून अश्रूधारा वाहातच होत्या. अचानक माझी शुद्धी हरपली. थोड्या वेळाने मी शुद्धीवर आले. लिंग माझ्यापासून दूर नेण्यात आले होते. मला माझ्या अश्रूंना आवर घालणे अशक्य झाले होते. स्वामींनी मला सांगितले की ते त्या भक्ताच्या मुलीला एक दृश्य दाखवतील. ती  ध्यानामध्ये असताना तिने असे दृश्य पाहिले ज्यामध्ये मी स्वामींबरोबर नृत्य करत होते. आमच्या पावलांमधून कुंकवाचा सडा पडत होता. तिने स्वामींना, मी कोण आहे. असे विचारले ते उत्तरले," ती माझी शक्ती आहे." त्या मुलीने मला त्या दृष्याबद्दल सांगून, माझ्या पावलांकडे पाहण्यास सांगितले. माझ्या दोन्ही पावलांवर कुंकू होते. त्यांच्या देवघरात एका कागदावर स्वामींचा संदेश आला ... " माझी शक्ती वसंतु " 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २० ऑगस्ट, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

 सुविचार 

" जो स्वार्थ व अपेक्षा विरहित आहे त्याला कर्म बाधत नाही." 

प्रकरण  नऊ

साधनपथावरील पत्रे

प्रिय वाचकांनो, 
              जेव्हापासून मला स्वामींची माहिती झाली व मी त्यांना पत्र लिहायला सुरवात केली तेव्हापासून मी त्यांना ' अम्मा ' म्हणत असे. स्वामी या मातृछत्र नसलेल्या बालिकेची आई आहेत असा बलशाली विचार माझ्या मनात आला ; म्हणून मी सर्व पत्रांमध्ये शेवटी ' तुमची बालिका वसंता ' असे लिहीत असे. काही काळाने स्वामींनी मला मीरेचे अंतःदृश्य दाखवले आणि म्हणाले, " तू मीरा आहेस, मी कृष्ण आहे " त्यानंतर मी पत्रात ' तुमची प्रिय मीरा ' असे लिहू लागले. त्यानंतर स्वामी म्हणाले, " तू राधा आहेस."
               स्वामींच्या ७० व्या वाढदिवस समारंभाच्या दरम्यान, मी प्रशांती निलयम येथे सेवेसाठी गेले. तेथे मी जे पत्र लिहिले त्यामध्ये पहिल्यांदाच मी ' तुमची राधा ' अशी सही केली. स्वामींनी एकापाठोपाठ एक या अवस्था दर्शवल्या. स्वामींना आई मानुन मी भक्ती करेन, असे म्हटल्यावर ते म्हणाले, " तुझ्या स्वभावास मधुर भक्ती योग्य आहे." त्यांनतर हळूहळू स्वामींनी एका मागोमाग एक माझ्या अवस्था मला देऊ केल्या. प्रथम दुर्गा, सरस्वती, पार्वती, सत्यम,'मी 'आहे 'मी ', 'मी 'विना 'मी ' आणि अशा इतर. मी त्यांची शक्ती आहे. मी अवतारकार्यासाठी येथे आले आहे. ते म्हणाले की मी वेदांचा आद्य ध्वनी ' अग्नी मिले ' आहे. त्यांनतर ते म्हणाले की मी त्यांची स्पंदनशक्ती आहे ; दैवी चैतन्य शक्ती, मी त्या एकाची अर्धी आहे. जरी मी स्वामींची अर्धांगिनी असले तरी मला ' मी ' नाही. ते सर्व सांगतात व मी लिहिते.

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साई राम
 

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             " मन नेहमी नकारात्मक गोष्टींवर केंद्रित होते. त्यास सकारात्मक करा व म्हणा .... ' माझे सर्वांभूती प्रेम आहे.' " 
प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 

२१ जानेवारी १९९६
माझ्या प्रेमभगवानांच्या दिव्य चरणी,
अनंत कोटी प्रणाम !
               स्वामी, मी तुमच्याबरोबर असताना कशी असावी असे तुम्हाला वाटते ? मी तुमच्याशी एखाद्या नवपरिणित वधूप्रमाणे बोलते का ? आपला नुकताच विवाह झाला आहे का ? आपले नाते शाश्वत आहे, नाही का ?  माझेही तुमच्यासारखेच अवतार झाले आहेत. हो की नाही ?  जेव्हा तुम्ही राम तेव्हा मी सीता, तुम्ही श्रीरंग तेव्हा मी कोदे आणि तुम्ही कान्हा तेव्हा मी राधा. मग आज तुम्ही काहीतरी वेगळेच का बोलत आहात ? मला तुमच्याशिवाय दुसरे कोण आहे ? तुम्ही मला मीरा आणि राधा म्हटलेत हे खोटे आहे का ? तुम्ही मला मंत्र देऊन दीक्षा दिलीत, तुम्ही मला हार घातलात हे खोटे आहे का ? तुम्ही म्हणालात," कृष्णाची राधा आणि मीराचा पती कान्हा " हे खोटे आहे का ? जसेजसे दिवस जातात, युगे जातात तसा नवविवाहितांचा सुगंध बदलतो का ? तुम्ही माझ्याशी बोलणार नाही का ? मी कसे वागावे ? याविषयी तुम्ही मला मार्गदर्शन का करत नाही ? तुम्ही अनेकांना स्वप्नातून किंवा प्रत्यक्षपणे योग्य मार्ग दर्शविता, मग तुम्ही माझ्यासाठी असे का करत नाही ? आपल्यामध्ये मध्यस्थ कशासाठी हवा ? तुम्हाला मला जे काही सांगायचे आहे ते कृपया प्रत्यक्षपणे सांगा ना. कृपा करून मला योग्य मार्गावर ठेवा. मला तुमचे हे मौन आता सहन होत नाही. तुम्ही मला कधीही अंतर देणार नाही असे वचन दिले आहे. जर मी मार्गावरून भरकटत असेन तर कृपया माझ्यामध्ये आणि माझ्या वागण्यामध्ये बदल करा . गेले तीन चार दिवस मी किती ढळते आहे, हे तुम्हाला माहित नाही का ? तुम्ही का बरं मला नेहमी रडवता ? हे सर्वज्ञ, सर्वव्यापी, प्रभू ! कान्हा ! कृपया मला शांती द्या. 
लोका समस्ता सुखिनो भवन्तु 
तुमची प्रिय मीरा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


गोकुळाष्टमी निमित्त 


              कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी पुढे दिलेल्या सुविचारावर अम्मांनी केलेले रसाळ मधुर अमृत भाष्य 
" जेव्हा मनुष्याच्या मनात अनिवार आध्यात्मिक तृष्णा निर्माण होते, तेव्हाच मनुष्य जन्माचे सार्थक होते. "
             आज कृष्ण जन्माष्टमी. कृष्णाचा जन्मदिन ! अगदी बालपणापासून मी कृष्णावर प्रेमाचा वर्षाव केला, त्याचा माहिमा वर्णन करणारी हजारो काव्ये आणि गीते रचली. पुट्टपर्तीमध्ये सत्यसाई बाबा म्हणून पुन्हा जन्म घेतल्याचे कृष्णानेच मला सांगितले. मी तात्काळ त्यांचे दर्शन घेण्यासाठी तेथे गेले आणि माझी भक्ती अनन्य भावे साईकृष्णाकडे वळली. 

*  *  *
              आज एडी ला स्वामींच्या मूर्तीजवळ दोन दगड सापडले. 
२२ ऑगस्ट २०१६ दुपारचे ध्यान 
वसंता - स्वामी, मी तुम्हाला काहीतरी देण्यास सांगितले व तुम्ही मला हे दगड दिलेत. त्यांचा अर्थ काय ? 
स्वामी -  त्यातील एक दगड एकत्व दर्शवतो व दुसरा दगड जो दोन भागांनी बनला आहे तो एकातून दोन झाल्याचे दर्शवतो. ते दोन्ही वैकुंठातून आले आहेत. ते हिरव्या रंगाचे आहेत. आपण सदाहरित विश्व निर्माण करू. 
वसंता - स्वामी, आगोदर तुम्ही पोपटी रंगाचे दिलेत. हा हिरवा रंग वेगळा आहे. 
स्वामी - हा शेवाळ्याचा रंग आहे. मनुष्य ह्या भवसागरामध्ये बुडुन गेला आहे. व त्याच्या ' मी आणि माझे ' ह्यामधून निर्माण होणारी आसक्ती, मोहमाया ह्या शेवाळ्या सारखी आहे. आपण ते शेवाळे दूर करून आपल्या अंगावर घेऊ. आपण त्यां सर्वांना सदाहरित, अमर, चिरस्थायी बनवू.
आता आपण ह्याचे स्पष्टीकरण पाहू. 
              हे दोन्ही दगड वैकुंठातून आले, स्वामींनी त्यांच्यामधून मला वेगळे केले आम्ही दोघ विश्वाला शुद्ध आणि पवित्र बनवण्यासाठी भूतलावर अवतरलो. 
             विहिरीमध्ये आत जाणाऱ्या पायऱ्यांवर नेहमी शेवाळे आलेले असते व तेथे निसरडे झालेले असते. जर काळजीपूर्वक  पायऱ्या उतरल्या नाहीत तर पाय घसरून पडण्याची दाट शक्यता असते. स्वामी ह्या शेवाळ्याची तुलना भवसागरातील मनुष्याच्या मोहमाया, आसक्ती ह्यांच्याशी करतात. ' मी व माझे ' ह्या मधून निर्माण होणारी ही आसक्ती सर्वकाही झाकून टाकते. आणि ही आसक्तीच मनुष्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यांमध्ये अडकवते. आपल्या मनावरील खोल संस्कार ह्या चक्रात अडकून राहतात. हे स्वामी आणि मी मनुष्याच्या मनावरील खोल संस्कार पुसून त्याचे चित्त शुद्ध करत आहोत. सर्वांची मने शुद्ध होताच स्वामींचे आणि माझे भाव तेथे प्रवेश करतात व हे पावित्र्य जीवनमुक्त अवस्था प्रदान करते. 
               अशा तऱ्हेने सत्ययुगामध्ये सर्वजण सदाहरित व अमर होतील. हा हिरवा रंग शेवाळ्याचा  नसून चिरंतन, शाश्वत जीवनाचा सदाहरित रंग आहे. 
              कलियुगातील लोकांवर केवढी ही स्वामींची कृपा ! हे कलियुगातील लोकांनो, उठा, जागे व्हा, तुमच्या मोहमायेचा, आसक्तीचा त्याग करा ! तुम्ही कोण आहात हे सत्य जाणून घेतले तरच तुम्ही ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हाल !
             " जर मनुष्याच्या मनात अनिवार आध्यात्मिक तृष्णा निर्माण झाली तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते. " हे माझ्या जीवनात घडले माझी परमेश्वरविषयीची तृष्णा न भागणारी आहे. जन्मापासून ते आज पर्यंत मी परमेश्वरासाठी अविरत अश्रू ढाळते आहे. जरी परमेश्वराने मला अनेक अनुभव दिले तरी मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव हवा आहे. उपनिषदात सांगितल्या प्रमाणे मला स्वामींचे प्रत्यक्ष प्रमाण हवे आहे. प्रत्यक्ष प्रमाणाच्या माझ्या इच्छेसाठी माझी न भागलेली तृष्णा भागवण्यासाठी प्रेमसाई अवतार येणार आहे. 

साईंचा जयजयकार ! 
त्यांच्या कार्याचा जयजयकार !!

जय साईराम  
   
        

रविवार, १३ ऑगस्ट, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " आधिभौतिक गोष्टींमधून मिळणारी शांती खरी नाही हे जेव्हा मानवाला कळून येते व तो खऱ्या शांतीचा स्तोत्र शोधू लागतो, तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रवास सुरु होतो. "    
प्रकरण नऊ 

साधनपथवरील पत्रे 

३० नोव्हेंबर १९९५
माझ्या प्रेमभगवानांच्या दिव्य चरण कमली 
अनंत कोटी प्रणाम !
                पर्तीमध्ये पहिल्यांदाच तुम्ही स्वहस्ते माझ्या हातातील पत्र घेतल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. प्रभू ! त्यादिवशी मला तुमच्या चेहऱ्यावरील हर्षभरित स्मिताचा अर्थ उलगडला. 
                 गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनात, तुम्ही मला ओळखत नाही अशी तळमळ लागून राहिली होती. तुम्ही मला पादनमस्कार दिलात. मी फक्त भाव जाणते. ध्यानातील दृश्यात, तुम्ही मला पिवळ्या कफनीमध्ये दर्शन दिलेत. तुमचे मनमोहक स्मित, सुंदर मुखकमल आणि करुणदृष्टी यावरून माझी नजर हालतच नव्हती. हे तुम्ही जाणताच आणि म्हणूनच पादनमस्कार घेण्यास मला उशीर लागला. तुम्ही सुद्धा एवढा वेळ माझ्यासमोर उभे राहिलात. या अपार करुणेसाठी मी काय करू ? प्रत्येक क्षण परम आनंदाने भरून टाका. आज आम्ही तुमच्या पादुकांचे नानाविध उपचार करून पूजन करणार आहोत. कृपया त्याचा स्वीकार करा आणि विभूती, कुंकू, चंदन, मध सृजित करून सर्वांची हृदये आनंदाने भरून टाका. प्रभू, मी असं ऐकलं की मदुराईतील एका घरात तुम्ही अनेक लीला करत आहात. तुम्ही त्यांच्या भिंतीवर ' गोकुलम ' लिहिले आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही इथे ' वृंदावन, ती राधा आहे.'  असे का लिहीत नाही ? मी म्हटले होते, की मी तुमच्याकडे कुरकूर करणार नाही परंतु माझे मन अत्यंत लोभी आहे. इतरांचे अनुभव ऐकून आनंद घेण्यासाठी ते नेहमीच आतुर असते. मला दिव्यानंदाची अनुभूती द्या. माझ्यावर तुमच्या कृपेचा वर्षाव करा. आणि मला कान्हाच्या हातातले लोणी बनवा. कृपया तुमच्या हातांनी तुम्ही इथे संदेश लिहा. मला ह्या आनंदाचाही लाभ मिळू दे. मला खूप दर्शने द्या. माझ्याशी बोला. तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल अशी माझी वर्तणूक असावी आणि त्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. तुमच्याशिवाय या जगात माझे दुसरे कोण आहे ? सदैव माझ्या बरोबर राहा. कधीही मला सोडू नका. कृपा करून  मला असा वर द्या, की तुम्ही क्षणभरही माझ्यापासून वेगळे होणार  नाही. मला तुम्ही हवे आहात, फक्त तुम्ही. 
लोका समस्ता सुखिनो भवन्तु 
तुमची प्रिय राधा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

          " भगवंताचा नामजप करत रहा. सुरुवातीला यंत्रवत् झाले तरी नंतर, भाव प्रवेशित होतील. " 

प्रकरण नऊ

साधनापथावरील पत्रे

१३ नोव्हेबंर १९९५
माझ्या प्रियतम कान्हाच्या चरणी
अनंत कोटी प्रणाम !
                प्रभू, स्वामी, आज मी तुमच्या अनेक भक्तांचे अनुभव वाचले. त्यांच्याप्रती असलेला तुमच्या करुणेचा महापूर मी पाहिला. मला त्यांच्याविषयी यत्किंचितही असूया वाटली नाही. तुम्ही कितीही लोकांवर, कोणत्याही नात्याने तुमच्या कृपेचा वर्षाव करा. ही नाती अगणित असतील, भक्त अगणित असतील परंतु कृष्णाची राधा मात्र एकच असू शकते. कृपा करून या सत्यास दुजोरा द्या. आम्ही सेवेसाठी पर्तीला येत आहोत. कृपया मला किमान एकदा तरी तुमच्या सेवेचे सद् भाग्य लाभण्यासाठी आशीर्वाद द्या. ह्या जगामध्ये मला तुमच्याशिवाय दुसरे काहीही नको. 
तुमची हृदयराणी 
वसंता

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, ६ ऑगस्ट, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " तुम्ही जे कर्तव्य समजता, त्याचा त्याग करा. तुमचे कर्तव्य भगवत् प्राप्ती आहे." 

प्रकरण नऊ 

साधनापथावरील पत्रे 

११ ऑक्टोबर १९९५
माझ्या प्रेमभगवानांच्या दिव्य चरणकमली, 
अनंत कोटी प्रणाम !
               उद्या आम्ही परतीच्या प्रवासास निघू. एवढ्या मोठ्या गर्दीत तुम्ही मला पाहाल का ? ध्यानात मला दिसलेली सर्व दृश्ये खरी आहेत असे तुम्ही मला सांगाल का ? मी नेहमी तुमच्या विचारांमध्ये अश्रू ढाळत असते हे तुम्हाला माहीत आहे का ? तुम्ही मला तुमच्या स्थूल रूपाचे सान्निध्य का लाभू देत नाही ? स्वामी, या जगात सर्वांना अनेक नातीगोती आहेत, आई, वडील, पती, पत्नी, मुले, भाऊ, बहीण केवढी तरी ! पण माझे या जगात कोणीही नाही. माझी फक्त तुमच्यावर श्रद्धा आहे. माझी सर्व नाती म्हणजे फक्त तुम्ही आहात. या जगात केवळ तुम्ही माझे एकमेव नातेवाईक आहात. मला फक्त तुम्ही हवेत, फक्त तुम्ही. माझ्या देहात, माझ्या रक्तात, माझ्या जीवप्रवाहात, माझ्या जीवात, माझ्या वाणीत आणि माझ्या प्रत्येक अणुरेणूमध्ये फक्त तुम्हीच आहात, हे मला तुम्ही दर्शवा. कृपया माझ्यावर कृपेचा वर्षाव करा. 
लोका समस्ता सुखिनो भवन्तु 
तुमची वसंता 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

            " मधुर भाषण करा, मधुर वागा..... तोंडदेखले नको तर हृदयापासून. " 

प्रकरण नऊ

साधनापथावरील पत्रे

२१ सप्टेंबर १९९५ 
माझ्या प्रेमभगवानांच्या दिव्य चरणकमली,
अनंत कोटी प्रणाम ! 
              स्वामी, नर नारायण गुंफेमध्ये साधक केवढे तप करत आहेत. अनेकजण वेगवेगळ्या स्थानी तप करत आहेत. त्यांच्या तुलनेत मी अगदी धूळ आहे. मी काय साधना केली आहे ? खरंच ! माझी भक्ती तरी काय ? इतरांचे तप पाहता, मला माझे ध्येय साध्य तरी होईल का ? मला तर भीतीच वाटते. मी पूर्ण शरणागत अवस्था प्राप्त करू शकेन का ? मला आशीर्वाद द्या, माझ्यावर कृपेचा वर्षाव करा की ज्यामुळे माझ्यामध्ये अधिकाधिक भक्तिभाव निर्माण होईल, मी पूर्ण शरणागत होईन आणि तुमच्यावर माझी अढळ श्रद्धा राहील. 
               ह्या जगामध्ये मला फक्त तुम्ही हवेत, फक्त तुम्ही हवेत. तुम्ही माझ्या सर्व इतर इच्छा आकांशा घ्या. 
लोका समस्ता सुखिनो भवन्तु 
तुमची प्रिय मीरा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम