ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
मोती चौथा
मोती चौथा
माया म्हणजे काय ? जे तेथे नाही ते तेथे असल्याचा आभास निर्माण करणे ह्याला माया म्हणतात. ती कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात दृश्यमान होऊ शकते . हे विश्व विश्वविधात्यालाच झाकून टाकते. जर आपण त्याला विश्व म्हणून पाहिले तर आपल्याला त्याचे विस्मरण होते. परंतु जर आपण केवळ त्याला आणि त्यालाच पाहिले तर आपणास विश्व दृष्टीस पडेल का ?
हीच माया आहे. निर्मात्याला विसरायला लावून, निर्मितीमध्ये अडकवून ठेवणारी !
अज्ञानाच्या अंधःकारात बुडाल्यामुळे मनुष्य, जे वास्तवात नाही अशा असत्याला सत्य मानून त्यावर विश्वास ठेवतो. नंतर गुरु वा आध्यात्मिक विभूती ज्ञान दीप त्याच्या ठायी ज्ञान ज्योत प्रज्वलित करतात आणि त्या ज्योतीच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधःकार नाहीसा होऊन मनुष्याला बोध होतो.
ही माया आहे. आपल्या अज्ञानामुळे आपण भौतिक जीवनाच्या जाळ्यात अडकतो आणि दुःखी होतो. कोणाचे कोणाशी नाते आहे ? भौतिक नात्यागोत्यांना काय अर्थ आहे ? आसक्ती आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या ममत्वामुळे मनुष्य हेलकावे खातो. तो आनंद आणि मनःशांती गमावून बसतो. हा एक मोठा संभ्रम आहे परंतु तो संभ्रम आहे हे समजण्यासाठी आपल्याला गुरुंच्या कृपाशिर्वादांची आवश्यकता आहे.
माया मनुष्याला सहज फसवते. तुमची बौधिक पातळी कशीही असली तरी माया मनुष्याला हातोहात फसवू शकते म्हणून आपण सदैव दक्ष राहिले पाहिजे.
एकदा स्वामी मला म्हणाले, " तू स्वतःला मायेने झाकून घेतले आहेस मायेमुळे अनेकजण वाहवत जातात. लोकांची मायेमधून मुक्तता करणारी एकमेव अद्वितीय महामाया तू आहेस. "
जर मायेला आपल्यापासून दूर ठेवायचे असेल तर आपण सदैव परमेश्वराच्या चिंतनात व त्याच्या सान्निध्यात राहिले पाहिजे.
मायेपासून आपण कसे मुक्त होऊ ? ह्यावर स्वामींनी दिलेले स्पष्टीकरण
" मनुष्याचा स्वभाव कसाही असो, माया त्याच्यावर कब्जा करून त्याला गिळंकृत करते. एवढेच नव्हे तर महाज्ञानी, भक्त हेही त्याला अपवाद नाहीत. एखादा धागा आत जाईल एवढे छिद्रही मायेस प्रवेश करण्यासाठी पुरेसे आहे. चंचुप्रवेश करून माया लोकांवर कब्जा करते. माया विविध रूपांमध्ये प्रकट होते."
मी स्वामींनी विचारले," मग ह्यावर उपाय काय ?"
स्वामी म्हणाले," प्रत्येक क्षणी आपण दक्ष राहिले पाहिजे. जर तुम्ही २४ तास परमेश्वराच्या चिंतनात मग्न असाल तर माया तुमच्या जवळपास येणार नाही, येऊच शकणार नाही.
मी विचारले " हे कसे शक्य आहे ? आम्हाला आमची कर्तव्ये आणि कर्म करायची असतात. "
स्वामी म्हणाले," मग काय झाले ? तुम्ही ते सर्व करू शकता. स्थळकाळाचा विचार न करता जर तुम्ही परमेश्वराचे चिंतन केलेत तर सर्व गोष्टी आपोआप होतील." जेव्हा तेथे परमेश्वराशिवाय दुसरे अन्य काहीही नसते तेव्हा माया तेथे कशी येऊ शकेल ? जे परमेश्वराशी संपूर्ण शरणागत झाले आहे ते मायेपासून मुक्त आहे. परमेश्वराला दृढतेने धरून ठेवणे हा मायेला टाळण्याचा एकमात्र उपाय आहे. "
* * *
संदर्भ - श्री वसंत साईंच्या ' प्रेम निवारण साई ' ह्या पुस्तकातून
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा