रविवार, २९ जुलै, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" अज्ञानाच्या अंधकाराला जिंकल्यानंतर साधकाला विजयश्री प्राप्त होते. "
 
भाग चौथा 

हृद्गत ......... 

              हे प्रभू, तुम्ही याक्षणी जरी मला दर्शन दिलेत तरी त्या दर्शनास मी पात्र आहे का ? अगोदर तुम्ही माझ्यामध्ये परिवर्तन घडवा, मला योग्य बनवा आणि मग दर्शन द्या. काळ सरत आहे. या जीवनाच्या अंतापर्यंत मला पूर्ण ज्ञान होईल ? कान्हा, कान्हा, मी तुम्हाला पाहू शकेन का ? 
              मीरेची कथा वाचल्यानांतर माझ्या मनावर एक विचार पक्का ठसला, की भगवान हे एकमेव पुरुष आहेत बाकी सर्व स्त्रिया .....
              कवी भारतीयारांप्रमाणे मलाही तुमचा मित्र म्हणून, सल्लागार म्हणून, आदरणीय गुरु म्हणून अनुभव घ्यायचा आहे. तुमची लाडकी लेक बनायचे आहे. ह्या वेगवेगळ्या नात्यांमधून मला तुम्हाला अनुभवायचं आहे. आनंद लुटायचा आहे. कान्हा, या जन्मात मला हा अनुभव घेतलाच पाहिजे आणि त्याचा परिपूर्ण आनंद लुटला पाहिजे. मृत्यूनंतर मी कशी असेन ? माझ्या पुढील जन्मात मी कशी असेन कोण जाणे? हे प्रिय प्रभू, मी तुम्हाला सोडणार नाही .... 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

शुक्रवार, २७ जुलै, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


गुरुपौर्णिमा संदेश


              विचार, उच्चार आणि आचार ह्या तिन्हीमध्ये आध्यात्मिक शिकवणीचे अनुसरण केल्यास विवेकबुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते. केवळ पुस्तकी ज्ञान निरर्थक आहे. 
               भगवान श्री सत्य साई बाबा नेहमीच सांगत की विचार, उच्चार आणि आचार ह्यामध्ये सुसंगतता, एकसूत्रता असायला हवी. तथापि लोकांना हे करणे शक्य होत नाही. ते विचार एक करतात आणि वेगळेच आचरण करतात. त्यांच्या मनात एक असते व ते दुसरेच बोलतात. जे तुम्ही इतरांना सांगू शकत नाही, बोलू शकत नाही त्याचा विचारसुद्धा करू नका. जर तुमचे विचार,उच्चार आणि आचार ह्यामध्ये सुसंगतता असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवू शकता. आपण विवेकाचा वापर करून चांगले वाईट ह्यातील भेद जाणून जे चांगले आहे त्याचे अनुसरण केले पाहिजे. चांगल्या सवयी चांगले गुण अंगी बनवले पाहिजेत. असे केल्याने हळूहळू आपल्यामधील दुर्गुणांचा नाश होईल. केवळ ह्या कारणासाठी आपल्याला हा जन्म दिला आहे. तसेच हा देह, बुद्धी आणि इंद्रिये दिली आहेत. ह्याचा योग्य वापर करून आपण जन्म मृत्युच्या  फेऱ्यातून आपली सुटका करून घेतली पाहिजे. 
             जीवन एक संघर्ष आहे. वास्तविक सद्गुण आणि दुर्गुण ह्यांच्यामधील लढा आहे. आजकाल सर्वांची हृदये कुरुक्षेत्राची युद्धभूमी बनली आहेत. तेथे सत् आणि असत् मध्ये सतत संघर्ष चालू असतो. दुर्गुणांवर असत् वर विजय मिळवण्यासाठी  प्रत्येकाने अत्यंत दक्ष राहिले पाहिजे. जर आपण परमेश्वराला आपला  सारथी बनवले तर तो आपल्याला योग्य  मार्गावर घेऊन जाईल.  स्वामींनी आपल्याला हीच शिकवण दिली. कुरुक्षेत्र हे बाहेर नसून आतमध्येच आहे. जेथे हृदय आणि मन ह्यामध्ये सतत संघर्ष चालू असतो निरंतर एकात्मतेची जाणीव ठेऊन दुर्गुणांवर मात करता येते. 

श्री वसंतसाई

जय साईराम

गुरुवार, २६ जुलै, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 
  
" अधिकाधिक साधना करून ज्ञानाची वृद्धी होते आणि समग्र ज्ञान प्राप्त होते. "

भाग चौथा 

हृद्गत ......... 

६ सप्टेंबर १९८१ संभ्रम .... 

               साधकाला मार्ग माहीत असेल , प्रवासाचे अंतर माहीत असेल तर निर्धाराने पुढे जात येते. कोणत्याही कारणास्तव अथवा कोणाही व्यक्तीसाठी त्याने अडखळू नये अथवा विलंबही करू नये. ज्या गोष्टींमुळे या प्रवासाची गती मंदावते त्या सर्व गोष्टी अडथळेच असतात. 
              स्वर्गाकडे प्रस्थान करताना युधिष्ठिराने वाटेत आपली पत्नी आणि भाऊ गमावले. तरीही त्याने मागे वळून न पाहता आपली वाटचाल चालूच ठेवली. केवढा हा महान त्याग ! केवढे हे खंबीर मन ! कान्हा, तुमचे दर्शन घेणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. मी जीवनातील बाकी सर्व गरजांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. कुटुंब आणि नातीगोती असत्य आहेत. किती जन्म ? किती नातीगोती ? हा संभ्रम कशासाठी ? ह्या काळाच्या ओघात कोणाचे कोणाशी नाते ?

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

सोमवार, २३ जुलै, २०१८

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

मोती सातवा

महाअवताराची बृहद् योजना

              श्री अरविंदांनी  त्यांच्या ' सावित्री '  ह्या पुस्तकात जीवात्म्याचा अंतर्गत प्रवास व सत्यप्राप्तीच्या मार्गावर येणाऱ्या अडथळ्यांचा करावा लागणारा सामना ह्यविषयी लिहिले आहे.
              कुंडलिनीचे एकेक चक्र पार करत गेल्यानेच मनुष्य परमेश्वरप्राप्ती करू शकतो. एक व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत भगवत् प्राप्ती कशी करते. सत्यवान - सावित्री कथेमधून शब्दबद्ध केले आहे. आणि अमृतत्वास कशी प्राप्त होते हे वी. अरविंद सत्यवान - सावित्री या कहाणीमधून दर्शवितात. अरविंदांनी या पुस्तकात जे काही लिहिले आहे. त्या सर्वांचे प्रात्यक्षिक मी व स्वामी या स्थूल जगात करीत आहोत. 
               सावित्री तिच्या पतीचे विधिलिखित बदलते. स्वामी व मी एका युगाचे विधिलिखित बदलतो ! आम्ही कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन करतो. 
               आपल्या भावविश्वापलीकडे दिव्य प्रकाश आहे. हा प्रकाश अवतरल्यानंतर संसारी जीवन बदलते. हा आपला आध्यात्मिक प्रकाश आहे. सामान्य जीवनात मनुष्य फक्त खातो व झोपतो. हे त्याचे जीवन आहे. एक दिवस तो जागा होतो. त्याला त्याच्यामधील आध्यात्मिक शक्तीची जाणीव होते. ह्या आध्यात्मिक प्रकाशाद्वारे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मानवाला त्याची सत्य अवस्था उमजते. उमज येऊन साधना करायला सुरुवात केल्यावर कुंडलिनीचे एकेक चक्र उघडू लागते व माणूस पलीकडे असलेल्या त्या चैतन्याचा अनुभव घेतो. आपण अंधारात भटकण्यासाठी इथे जन्मलो नाही तर या श्रेष्ठ चैतन्याचा अनुभव घेण्याकरिता जन्मलो आहोत. मनुष्याला मुक्ती देणारे, जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करणारे असे हे मानवी जीवनाचे उद्धिष्ट आहे .
               आपण कशासाठी जन्मलो ? जन्माचे मूळ कारण काय ? स्वामींनी इथे येऊन एवढी वर्षे याचीच शिकवण दिली. तरीही माणूस बदलला नाही, तो त्याच्या दलदलीच्या आयुष्यातून बाहेर आला नाही.
               स्वामींनी सर्व कार्यक्रम आखले. ही त्यांची बृहद् योजना आहे. अखिल मानवता चुकीच्या रस्त्यावर वाईट मार्गावर जात आहे. सर्वांना भगवत् रूपाच्या साच्यात घडविण्याची ' त्यांची ' बृहद योजना आहे. या कारणास्तव त्यांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार आणि नूतन सृष्टी निर्माण करतो. तेच नवीन जग होते. यासाठीच मी आदिशक्ती आहे असे स्वामी म्हणाले, ही आदिशक्ती ' मी विना मी ' शरीरात कार्यरत असायला हवी. ही ' त्याची ' योजना आहे . एका बाजूला या शरीरात महान शक्ती आहेत तर दुसऱ्या बाजूला स्वामींसाठी माझे ' प्रेम '. या प्रेमामुळे मी असाह्य विरहवेदना सोसते. या दोन बाजू मला हादरवतात. तथापि , हे ' त्यांचे ' अवतारकार्य आहे. सर्वकाही माझ्याद्वारे होत आहे. माझे स्वामींवरील अपरिमित प्रेम व एकाग्र पातिव्रत्य यांमुळे मी अवघी सृष्टी स्वामींमध्ये परिवर्तित करते. ' त्यांच्या ' शिवाय दुसरे काहीही व कोणीही मला आवडत नाही, असे माझे पातिव्रत्य आहे. हे पातिव्रत्य घाणीत बरबटलेल्या मानवतेला दिव्यत्वाकडे नेते. ही महाअवताराची बृहद्  योजना आहे.
              महर्षी अरविंदांना हे कसे ठाऊक झाले व त्यांनी सर्व लिहिले कसे ? त्यांना हे सर्व कसं बरं ठाऊक झाले ? ते कोण होते ? असे सर्व माझे विचार आहेत. ही कथा सत्यवान सावित्रीची आहे की सत्यसाई व वसंताची ?


जय साईराम

रविवार, २२ जुलै, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " सत्य मनाला निर्मल बनवते. सत्य बोलणे ही अंतर्गत निर्मलता आहे. मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द सत्य असायला हवा."

भाग चौथा 

हृद्गत ......... 

              जेव्हा साधक साधनेमध्ये खोलवर गढून जातो तेव्हा असे अडथळे उद्भवतात आणि बुद्धीला फसवतात. मला तर असंही वाटतं की, विश्वामित्र आणि मेनका ह्यांच्या कहाणीचा हाच गर्भितार्थ असावा. साधकाच्या तपामध्ये व्यत्यय आणणारे सर्व अडथळे ' मेनका ' आहेत. 
              माझ्या तपात व्यत्यय आणणाऱ्या सर्व गोष्टी मी अडथळे मानून चिंतन मनन करून दूर सारल्या. विश्वामित्र आणि मेनका ही पुराणकथा, साधकाला साधना करत असताना संघर्षांना तोंड देऊन कसे पार करावे लागते ह्याचे प्रतिनिधित्व करते. आध्यात्मिक धड्यांचे लोकांना सहजतेने आकलन व्हावे म्हणून कथांचा उपयोग केला जातो. जन्मतः प्रत्येकामध्ये असणारे चांगले आणि वाईट यामधील संघर्ष म्हणजेच महाभारत. अनेक महत्वाचे धडे शिकवण्यासाठी ते गोष्टीरूपात सांगितले गेले. तप म्हणजे काय ? प्रत्येकाने परमेश्वराला प्राप्त करून घ्यायलाच हवे. या प्राप्तीसाठी केलेले प्रत्यत्न म्हणजेच तप. या प्रयत्नांमध्ये आलेले कोणतेही अडथळे तात्काळ दूर करायलाच हवेत. आसक्ती, इच्छा, वासना या सर्व मेनका आहेत. अहं ! दुसऱ्या कशाचीही इच्छा धरू नका. परमेश्वर हे एकच सत्य आहे केवळ त्याला घट्ट धरून ठेवा. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

गुरुवार, १९ जुलै, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " पुन्हा पुन्हा जन्म न घेण्यासाठी आपण जन्म घेतो. आणि पुन्हा मृत्यु न यावा असा मृत्यु आपल्याला यायला हवा. "

भाग चौथा 

हृद्गत ......... 

२ ऑगस्ट १९८१ विश्वामित्र आणि मेनका

               मी आज गहन ध्यानावस्थेत गेले. आज पूर्वीसारखे माझे मन कृष्णाशी तल्लीन झाले. मी प्रार्थना करत होते. " हे कान्हा, प्रभू माझ्यावर कृपा करा आणि माझी ही परमानंदाची स्थिती आहे तशीच ठेवा. त्यामध्ये काही बदल करू नका." दुपारपर्यंत मी ह्या अवस्थेत होते. अचानक माझ्या मुलीचे पत्र आले. त्यामध्ये तिने तिच्या कौटुंबिक समस्येविषयी लिहिले होते. मी चिंताग्रस्त झाले. कुटुंबातील सर्वांनी त्यावर चर्चा केली. मी रात्री मणिवन्ननला सांगितले." ही सगळी भगवावंताची लीला आहे. जेव्हा जेव्हा मी भगवंताशी तल्लीन होते तेव्हा दरवेळेस काही ना काही अडथळे उद्भवतात. कधी आनंद तर कधी दुःख, ज्यामुळे माझ्या प्रगतीला खीळ बसते. " कान्हा, तुमचा सापळा फसवा आहे. तुमच्यापासून मला वेगळे करण्यासाठी तुम्ही ही युक्ती योजली आहे. मला तुमचा स्वभाव माहित नाही का ? कित्येकदा मी याचा अनुभव घेतला आहे. काहीही होवो, मी तुम्हाला सोडणार नाही. 
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, १५ जुलै, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " परमेश्वर हृदयगुंफेमध्ये नीलज्योतीच्या रूपाने वास करतो. जशीजशी आपली साधना तीव्र होते तसे त्या ज्योतीचे तेज आपल्याला संपूर्णपणे व्यापून टाकते."

भाग चौथा 

हृद्गत.........

             आज हा अडथळा मला आहे. मला स्वामींचे दर्शन घेण्यास बंदी घातलीय. ते म्हणतात, की मी स्वामींविषयी काहीही लिहू नये. स्वामींच्या नावाशिवाय मी कसे काय लेखन करणार ? माझे विचार शब्दरूप घेतात. ते म्हणतात स्वामींचा विचारही करू नका. हे कसं शक्य आहे ? जर माझ्या देहाचे तुकडे तुकडे केले तर प्रत्येक अणुरेणु किंचाळून उठेल," स्वामी ! स्वामी ! " तुम्ही या वसंताच्या देहाला विलग करू शकाल ; परंतु सर्वव्याप्त वसंताला तुम्ही कसे काय विलग करणार ? ती स्वामींशी संयुक्त झाली आहे. जसे पेशींचे विभाजन केल्यावर त्यातून अनेक पेशी निर्माण होतात ; तसे जर या वसंताला जर तुम्ही अलग केलेत तर ती तिचे विभाजन करून अनेक वसंत निर्माण करेल. तिच्या ५८० करोड वसंता होतील. तुम्ही एका पुस्तकावर बंदी घातल्यानंतर ५० पुस्तके लिहिली गेली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

गुरुवार, १२ जुलै, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " जेव्हा आपले परमेश्वराप्रती असणारे प्रेम सर्व मर्यादा ओलांडते तेव्हा देहाच्या मर्यादाही ओलांडल्या जातात."

भाग चौदावा 

हृद्गत ......... 

               प्रल्हादालाही हरिनाम घेण्यास मनाई केली होती. त्यामुळेच तो भक्तरत्न बनू शकला. जर आता इथे हिरण्यकश्यपू असता तर मला भगवंताचे दर्शन केव्हाच झाले असते. जेव्हा एखाद्याचे प्रेम गुपित असते किंवा एखादा गूढरित्या आपले प्रेम व्यक्त करतो तेव्हा त्याची गोडी अवीट असते. म्हणूनच की काय कृष्णाने चोरलेले लोणी लज्जतदार होते. " कृष्णाचे चिंतन करू नको. त्याची भक्ती करू नको." असे म्हणून मला कोणी अडवणार नाही का ?
             १९८१ मध्ये मी हे लिहिले. मलाही असेच अडथळे यावेत जेणेकरून माझी भक्तीही फोफावेल, अशी मला तळमळ लागली होती. मला कोणीतरी म्हणावे, " कृष्णाचे चिंतन करू नको, त्याची भक्ती करू नको." असे मला तीव्रतेने वाटू लागले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, ८ जुलै, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" भक्तीचे विस्तृतीकरण म्हणजेच ज्ञान."

भाग चौथा

हृद्गत 

 
१० ऑगस्ट १९८० अडथळे आणि विकास .....

             जिथे अडथळे येतात तिथे अडथळे पार करण्याची शक्ती वाढते. अडथळे दूर करण्यासाठी मन प्रयत्नांची पराकाष्ठा करते. जर एखाद्यास विशिष्ट गोष्टीची इच्छा धरू नको असे सांगितले तर मनाला तीच गोष्ट हवी असते. जर प्रेमामध्ये अडथळे असतील तर प्रेमभाव अधिकच उफाळून येतो. " माकडाचा विचार मनात न आणता हे औषध घे." असं म्हणण्यासारखं आहे ते. अशाच तऱ्हेने महान भक्तांची भक्ती फोफावली वाटते ? मीरेला कृष्णाची भक्ती करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. सखूबाईलाही अशा अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. तिला ते भजने म्हणू देत नव्हते. तिच्या प्रिय विठ्ठलाची भक्ती करू देत नव्हते. इतर भक्तांमध्ये मिसळू देत नव्हते... 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

गुरुवार, ५ जुलै, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" जेव्हा इंद्रियांवर नियंत्रण असते तेव्हा मन आपोआपच नियंत्रित होते."

भाग चौथा 

हृद्गत 

           तीस वर्षांपूर्वी केलेले हे लेखन म्हणजे या जीवाची परमेश्वरासाठी असणारी व्याकूळ तळमळ दर्शवणारा पुरावा आहे. तेव्हापासून आजमितीपर्यंत या स्थितीमध्ये यत्किंचितही बदल झालेला नाही. मी नेहमी विचार करत असते," मी त्यांना कधी पाहीन ? मला स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे. " त्यांच्याशी संभाषण करायचे आहे. त्यांचा पादनमस्कार हवा आहे. याखेरीज मला कोणत्याही गोष्टीची कामना नाही. एवढेच नाही, तर मला भूलोकातील अथवा अन्य कोणत्याही लोकातील कशाचीही कामना नाही. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

रविवार, १ जुलै, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" जेथे मनुष्याची नजर जाते त्यामागे त्याचे मन धावते आणि इच्छांचा जन्म होतो. "

भाग चौथा 

हृद्गत ......... 

१९ जुलै १९८१ वालीची शक्ती.... 

              आमच्या घरामध्ये अंतर्योग शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी माझ्या मनात विचार आला. " हे भगवान, वालीला असा वर मिळाला होता की त्याच्यासमोर येणाऱ्या प्रत्येकाचे अर्धे शारीरिक बल वालीला प्राप्त होईल. त्याचप्रमाणे तुम्ही मलाही असा वर द्या; की मी ज्यांना पाहीन त्यांची अर्धी आध्यात्मिक शक्ती मला प्राप्त होईल." माझ्या मनात अशी अभिलाषा निर्माण झाली. मी साश्रू नयनांनी कृष्णाला विचारात होते. " कान्हा, मला सर्व आध्यात्मिक लोकांची शक्ती जरी लाभली, तरी मला या जन्मात तुझे दर्शन होईल का नाही ? माझे जीवन व्यर्थ  जात आहे. मी तुला कधी पाहू शकेन ? कृष्णदर्शनाच्या ध्यासामुळे मन नवीन नवीन मार्ग शोधून काढते आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम