शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

भगवान बाबांचा ३वा जन्मदिन संदेश 

प्रेमस्वरूपलारा, 
                       दुःखाला दूर ठेवण्यासाठी, प्रत्येक मनुष्यास त्याच्या इच्छांची पूर्ती व आनंद हवा असतो. या जगामध्ये आनंद व दुःख कायमस्वरूपी नसते; काळानुसार ते बदलते. प्रत्येकास आंनद आणि दुःख दोन्ही अनुभवावे लागते. मनुष्य माया व तिरस्कार, घृणा यामध्ये अडकून चिंता व दुःखास आमंत्रित करतो. ज्याच्याकडे समभाव आहे तोच खरा मानव होय. म्हणून मनुष्याने दिव्यत्वावर श्रद्धा ठेऊन आपल्या हृदयामध्ये त्याचे प्रेम अनुभवले पाहिजे. 
                     प्रत्येकाने दिव्य आनंद प्राप्त केला पाहिजे. दुःखावर विजय मिळवला पाहिजे. निस्वार्थ, निरपेक्ष प्रेम विकसित करून ऐक्य व दिव्यत्व अनुभवले पाहिजे. हा आजचा माझा महत्वाचा संदेश आहे . मानवी जीवन अत्यंत मूल्यवान व उदात्त आहे. मनुष्याला कोमल हृदय, निरागस मन व श्वाश्वत जीवनतत्वे ही ईश्वरदत्त देणगी प्रदान केली आहे. प्रत्येकाने हे सत्य जाणून घेऊन हृदयामध्ये त्या माधुर्याची अनुभूती घेतली पाहिजे. समभाव विकसित करून कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदी राहिले पाहिजे. ह्या द्वंद्व जगामध्ये आलटून पालटून सुख आणि दुःख येणे स्वाभाविक आहे, अटळ आहे. प्रतिकूल परिस्थितीने निराश होऊ नका तसेच यशाने हुरळून जाऊ नका. कोणतीही प्रतिकूलता श्वाश्वत आनंदाकडे नेणारी पहिली पायरी आहे. पांडवांनी वनवासात असताना अनेक दुःखांचा व संकटांचा सामना केल्यानंतरच त्यांना कृष्णाची  कृपा प्राप्त झाली. कृष्ण सदैव, सर्वत्र त्यांच्या सोबत होता. पांडवांनी जीवनामध्ये उचित गोष्टींना प्राधान्य दिले. त्यांच्या जीवनामध्ये प्रथम परमेश्वर त्यानंतर जग व सर्वात शेवटी ते स्वतः असा अनुक्रम होता. ह्याउलट कौरवांचे प्रथम स्वतःहास, त्यांनतर जगास व शेवटी परमेश्वरास प्राधान्य होते. त्यामुळे त्यांचा युद्धात पराजय झाला व आनंद त्यांच्या हातातून निसटला.
                    ज्याने परमेश्वराचे सान्निध्य अर्जित केले आहे, तो सदैव आनंदी असतो. अनेक वर्षे तपश्चर्या करूनही परमेश्वराचे प्रेम संपादन करणे कठीण असते परंतु तुमचे परमभाग्य की आज तुम्ही स्वामींच्या दिव्य सान्निध्याचा आंनद लुटता आहात. ह्या दिव्य आनंदाच्या प्राप्तीसाठी, पूर्वीच्या अनेक जन्मात तुम्ही उग्र तपश्चर्या केली असणार, अनेक यज्ञ केले असणार, खडतर तप  केले असणार. माझे प्रेम इतरांच्या अलोट प्रेमास आकर्षित करते. 
                  कठोर शब्दांनी कोणालाही दुखावू नका. कुमार्गावरून वाटचाल करू नका. अणूपासून ते ब्रह्मांडापर्यंत सारे परमेश्वरव्याप्त आहे, हे सत्य जाणून घ्या. हे सत्य तुमच्यामध्येही विद्यमान आहे परंतु तुम्हाला त्याची जाणीव नाही. हीच सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही श्रद्धा आणि विश्वास स्वरूप आहात. आत्मविश्वासाने जगातील कोणतीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकता.

..... भगवान बाबांच्या २३ नोव्हेंबर २००१ च्या जन्मदिन संदेशातून


जय साईराम   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा