रविवार, २८ जुलै, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

         " देह सोडताना आत्मा त्याच्या कर्माचे ओझे वाहतो आणि पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो."

सूत्र तिसरे 

ह्या हृदयीचे त्या हृदयी 

             हे आंधळं प्रेम आहे. त्याला फक्त स्वामी हवेत. हे गावठी भाबडं प्रेम आहे. यामध्ये स्वामींखेरीज कोणाचाही अंतर्भाव नाही. ह्याला अवतारपदाचे मूल्य माहीत नाही. म्हणून परमेश्वराने या भोळ्या भाबड्या खेडूत मुलीची प्रेमपात्र म्हणून निवड केली. राधा, गोपी आणि वसंता या खेडूत मुली आहेत. त्यांना डावा हात कोणता, उजवा हात कोणता हेही सांगता येत नाही ! काही दिवसांपूर्वी आम्ही स्वामींच्या ' समर रोझेस ऑन ब्लू माउंटन १९७६ ' पुस्तकातील २०४ नं. च्या पानावरील मजकूर वाचला. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

गुरुवार, २५ जुलै, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

         " पृथ्वीची लुटमार करणाऱ्या मानवाप्रती पृथ्वी जशी सहनशीलता दाखवते तशी सहनशीलता आपण चुकीचे वर्तन करणाऱ्यांप्रती दाखवायला हवी. " 

सूत्र तिसरे 

ह्या हृदयीचे त्या हृदयी 

            असे कोण असू शकेल ? दोन देह, एक आत्मा याचे हे उदाहरण आहे. दोन्ही देहांमध्ये एकच प्राणशक्ती कार्यरत आहे. म्हणूनच आमचे विचार सारखे, उच्चार सारखे आणि आमचे लेखनही सारखे !
२७ जून २००८ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी, तुमच्या विचारांना अनुरूप मी कसे काय लिहू शकते ?
स्वामी - तू शुद्ध सत्व झालीस आणि माझ्यामध्ये - शुद्ध सत्वामध्ये तुझा योग झाला. त्यांनतर तू स्वतःला रिक्त बनवलेस आणि मी स्वतः तुझ्यामध्ये भरून राहिलो. तू माझ्यामध्ये विलीन झालीस आणि मी तुझ्यामध्ये विलीन झालो. दोघं एक झालो म्हणूनच माझ्या मुखातून आलेले शब्द तू आचरणात आणतेस. आपल्या दोघांचा योग्य होऊन आपण एक झालो. तू याविषयी लिही. लिखाण छान होईल. 

ध्यान समाप्त

      जय साईराम     

मंगळवार, २३ जुलै, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

पुष्प एकोणवीस 

भौतिक इच्छांना परमेश्वराकडे वळवा 

           स्वामींचे जीवन, त्यांच्या लिला, आश्चर्ये चमत्कार व त्यांची शाश्वत शिकवण ह्यांनी भरलेले आहे. लक्षावधी लोकांना ह्यांचा लाभ होत आहे व त्यांना त्यांच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होत आहे. हा महामहिम अवतार, भवसागरातून आपली सुटका करण्यासाठी येथे आला आहे व त्याने सर्वांसाठी मुक्तिचे द्वार खुले केले आहे. 
          गौतम बुद्धांनी म्हटले आहे," इच्छा हे दुःखाचे मूळ आहे. इच्छांचा त्याग करा." तथापि स्वामी म्हणतात की इच्छांचा त्याग करण्याऐवजी आपण आपल्या इच्छा परमेश्वराकडे वळवल्या पाहिजेत. ते म्हणतात," परमेश्वरचा शोध घ्या. परमेश्वराची इच्छा ठेवा." हा सकारात्मक मार्ग आहे. आपल्या दुर्गुणांवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. जर आपण क्रोध, लोभ वा मत्सर ह्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलो तर ते अधिक घातक ठरतात म्हणून त्यांना परमेश्वराकडे वळवा. आपल्याला अधिक साधना करणे शक्य होत नाही क्रोध बाळगा. इतरांनी परमेश्वराचे दर्शन घेतले आणि आपण नाही ह्याबद्दल मत्सर बाळगा व परमेश्वरासाठी लोभ बाळगा. भौतिक वस्तूंसाठी व्यक्त केलेल्या भावना मनुष्याला बंधनात टाकतात आणि परमेश्वराप्रती असलेली भक्ती आपल्या दुर्गुणांचे सद्गुणात रूपांतर करते. सद्गुणांच्या जोपासनेसाठी स्वामी आपल्याला हा सकारात्मक मार्ग दर्शवत आहेत. कोणत्याही जीवाविषयी आपल्या मनात हिंसेची भवना नसावी असे गौतम बुद्ध म्हणतात तर हाच संदेश स्वामी वेगळ्या तऱ्हेने सांगतात. ते म्हणतात, सर्वांकडे परमेश्वराची निर्मिती ह्या दृष्टीकोनातून पाहा "ईश्वरः सर्व भूतानां " परमेश्वर सर्वव्यापी आहे. ' असे करा, ह्याचे अनुसरण करा ' असे म्हणणे अधिक उचित आहे. ही सकारात्मक पद्धत आहे. 
           मन अत्यंत शक्तिशाली आहे. जर एखादी गोष्ट करू नका, असे सांगितले तर तो का करू नको असा मन  विचार करते व ती गोष्ट करण्यासाठी जिज्ञासू असते. माझे वडील नेहमी म्हणत," जर तुम्ही आजारी असाल तर माझा आजार बरा होऊ दे अशी प्रार्थना न करता मला सुआरोग्य हवे आहे अशी प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही रोगाचा विचार करता तेव्हा त्याविषयीचे विचार अधिक प्रबळ होतात." त्यांचे विचार किती अचूक आहेत ! 
           स्वामी आपल्याला अमृतत्व पुत्र, प्रेमस्वरूप लारा म्हणून संबोधतात. आपण सर्वजण परमेश्वराचे मुले आहोत. आपणही परमेश्वर बनू शकतो. आपण आपल्यामध्ये परिवर्तन घडवून उन्नतीची उंच उंच शिखरे पादाक्रांत करू शकतो. आता स्वामी आपल्याला त्यांच्या स्थूल रूपाशी असलेला बंध तोडण्यास सांगत आहेत. आपल्या आतमध्ये त्यांना पाहण्यासाठी सांगत आहेत. ह्यालाच आत्मदर्शन म्हणतात. हे आपण जाणून घेऊन त्यांना आपल्या अंतर्यामी पाहण्यास शिकले पाहिजे. परिवर्तन घडवण्यासाठी, स्वामी आपल्याला प्रयत्न करण्यास सांगत आहेत. भौतिक बंधनातून आपण आपल्याला मुक्त करून मोक्ष प्राप्त केला पाहिजे. हे सत्याचे वैश्विक प्रकटीकरण आहे. 

वसंतसाई

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' मिरॅकल माया ' ह्या पुस्तकातून
   
जय साईराम    

















रविवार, २१ जुलै, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

        " जर मनाने भगवद् नामाच्या अमृताची चव चाखली तर ते इतर कोणत्याही चवीचा विचार करणार नाही."  

सूत्र तिसरे

या हृदयीचे त्या हृदयी

           स्वामी आणि मी एक आहोत. आमचे देह दोन असून आत्मा आणि जीवप्रवाह एक आहे. एकदा स्वामींनी मला विचारले," आगामी अवताराच्या जीवनाविषयी कोण लिहू शकेल ?"
           पहिल्या 'प्रेम साई ' पुस्तकामध्ये मी आदर्श पतीपत्नीच्या नात्याविषयी लिहिले आहे. प्रेमाच्या मनामध्ये तिच्या विवाहदिनी आलेले विचार खाली देत आहे. 
             "... परमोच्च प्रेमाने अनेक आत्म्यांचा संयोग घडवून आणला आहे. त्यांच्यामध्ये कदाचित काही लहानसहान मतभेद असतील, परंतु आमच्यामध्ये जन्मापासूनच कोणतेही मतभेद नाहीत. एकमेकांसाठी त्याग करण्यात आम्हाला अत्यंत आनंद मिळतो. जे तुम्हाला नको ते मलाही नको. जे मला नको ते तुम्हालाही नको. आमचे विचार, उच्चार आणि आचार यामध्ये ऐक्य आहे. एवढेच नव्हे तर आमची दृष्टीही एक आहे. जे तुम्ही पाहणार नाही ते माझी दृष्टीही पाहणार नाही. तुमच्या मनात जे विचार येणार नाहीत त्यावर माझे मनही विचार करणार नाही. तुमच्या मनातील शब्दच माझ्या मुखातून उच्चारले जातील. तसेच जे शब्द ऐकण्याची तुमची इच्छा असेल, तेच शब्द माझ्या मुखातून उच्चारले जातील."


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १८ जुलै, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

       " सत्य ईश्वर आहे. सत्यवचनाने परमेश्वर प्राप्ती होऊ शकते." 

सूत्र तिसरे

या हृदयीचे त्या हृदयी

            मला नेहमी स्वामींच्या प्रवचनांमधून, मला येणाऱ्या अनुभवांचे पुरावे मिळतात. स्वामी म्हणतात की हे ' ह्या हृदयीचे त्या हृदयी ' आहे. ' प्रेम अवतार ' पुस्तकात मी लिहिले आहे. ' तुम्ही जो विचार कराल केवळ तेच शब्द माझ्या मुखातून उच्चारले जावेत.  तुम्हाला जे शब्द ऐकण्याची इच्छा आहे केवळ तेच शब्द माझ्या मुखातून उच्चारले जावेत. ' मला तुमच्या आत्म्याचा आत्मा बनायचे आहे. 
             हे माझ्या हृदयीचे भाव आहेत. आम्ही दोघं एक आहोत, हेच यावरून दिसून येते. 
             २००२ मध्ये वृंदावन मध्ये असताना समर कोर्स सुरु होता. त्यावेळी अनेक भक्त माझ्याकडे सत्संग ऐकण्यासाठी येत. दररोज सकाळी मी इथे सत्संगामध्ये बोलत असे व दुपारी स्वामी तिथे प्रवचन करीत. सकाळी मी ज्या विषयावर बोलत असे, त्याच विषयावर स्वामी दुपारी विवरण करत असत. याचे खूप आश्चर्य वाटे. 
            ह्या अनुभवांमधूनच ' वृंदावन सत्संग ' हे पुस्तक तयार झाले. माझ्या जीवनाच्या याच कालावधीत स्वामींनी मला मंगळसूत्र देऊन आपले बनवले. आमचे भाव एकच असल्याचे स्वामींनी दर्शवले. मी अगदी पहिल्या पुस्तकापासून पुरावे का मागत होते ते मला समजले. या हृदयाचे त्या हृदयी ' या प्रकरणात स्पष्टीकरण लिहिण्यासाठी मी पुरावे मागत होते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

मंगळवार, १६ जुलै, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

श्री वसंतसाईंचा गुरुपौर्णिमा संदेश 



         मृत्युसमयी मनुष्य रिक्त हस्तांनी जग सोडून जातो तथापि त्याचे मन कार्मिक ओझ्यांनी ओतप्रत भरलेले असते त्यामुळे तो पुन्हा जन्म घेतो व भौतिक जीवन पुन्हा सुरु करतो स्वामी नेहमी म्हणतात, " कमी सामान, प्रवास अधिक सुखकारक बनतो." त्याचप्रमाणे आपली ही जीवनयात्रा सुखकारक, सुलभ बनवण्यासाठी आपण आपले कार्मिक ओझे कमी केले पाहिजे. हे सत्य सर्वांनी जाणून घ्यायला हवे केवळ ह्या कर्मामुळेच आपण सर्वजण जन्माला आलो आहोत. ह्या महामहिम परमेश्वराने ८४ वर्षे हेच शिकवले. तो केवळ लोकांना हयाचा बोध देण्यासाठी येथे आला. इतर युगांमध्ये जन्मलेल्या लोकांच्या तुलनेत, कलियुगातील लोकं अत्यंत भाग्यवान आहेत ! स्वामींनी आणि मी वैश्विक कर्म आपल्या अंगावर घेतली. एखादी सामान्य माता तिच्या मुलांचे कर्म घेऊ शकते का ? ही अशी गोष्ट आहे, जी कधीही घडली नाही. हे सत्य जाणून घ्या व मायेतून जागे व्हा. स्वामींच्या शिकवणीचा जीवनामध्ये अंगिकार करा. ' चांगले करा, चांगले पहा आणि चांगले बना ' हे स्वामींनी शिकवले. जेव्हा तुम्ही चांगले बनाल तेव्हा तुम्हाला सर्वत्र चांगुलपणा दिसेल. उदा. धर्मराज चांगला असल्यामुळे त्याला जगामध्ये केवळ चांगुलपणाच दिसला. प्रथम स्वतःमध्ये बदल घडवा आणि दुर्गुण काढून टाका. स्वतःला चांगले बनवा म्हणजे अखिल विश्वामध्ये चांगुलपणा भरून राहिल्याचे तुम्ही पाहाल. ' सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा ' हे स्वामींचे वचन तुम्ही आचरणात आणाल. सर्वांवर प्रेम केल्याने तुमचे कार्मिक ऋण कमी होईल. 

संदर्भ - श्री वसंत साईंच्या ' साधनेचे वर्ष ' ह्या पुस्तकातून 


जय साईराम   
     



जय साईराम   

रविवार, १४ जुलै, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

        " तुम्ही तुमची कर्म अत्यंत कुशलतेने व निरागसतेने पार पाडा मनाला कर्माच्या परिणामामध्ये गुंतु न देता पूर्णपणे परमेश्वराच्या चिंतनात व्यस्त ठेवा. " 

सूत्र तिसरे 

या हृदयीचे त्या हृदयी

             मी स्वामींकडे प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा का मागते ? अशाप्रकारे कोणीही लेखन पुरावा मागत नाही. असा हा जगावेगळा विचार माझ्याच मनात कसा येतो ? माझ्या पहिल्या पुस्तकापासून ते आतापर्यंत मी सतत हे पुरावे मागत आले आहे. मी लेखन केल्यानंतर एखादे पुस्तक उघडते आणि तेथे मला माझ्या लेखनाशी सुसंगत पुरावा मिळतो. मी त्या पुराव्यांचाही पुस्तकात समावेश करते. 
          ध्यानामध्ये स्वामी म्हणाले , 
          " तू माझ्याकडे नेहमी पुरावे मागतेस आणि माझ्या प्रवचनांमध्ये तुला ते सापडतात. मी जो विचार करतो त्याचे उच्चारण व आचारण तू करतेस. हा कॉपीराईट नसून ' या हृदयीचे त्या हृदयी ' आहे."

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम  

गुरुवार, ११ जुलै, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः  

सुविचार

" सत्य मनाला निर्मल बनवते. सत्य वचन ही अंतर्शुद्धी आहे.  

सूत्र दुसरे

अनुभूती

' पुन्हा गीत गोविंदम ' या पुस्तकामध्ये मी लिहिले आहे-

मला तुमच्या ब्रशवरची पेस्ट होऊ दे. 
मला तुमच्या स्नानाचे जल होऊ दे.  
मला तुमच्या देहावर लावायची चंदनाची उटी होऊ दे. 
मला तुमच्या केसांचे तेल होऊ दे. 
मला तुमचे कपाळ विभूषित करणारे विभूती कुमकुम होऊ दे.
मला तुमच्या डोळ्यातील दृष्टी होऊ दे, तुमच्या हृदयातील प्रेम होऊ दे.
मला तुमच्या आत्म्याचा आत्मा होऊ दे.
मला सूर्यापासून तुमचे रक्षण करणारी छाया होऊ दे. 
मला पावसापासून तुमचे रक्षण करणारा तुमचा आसरा होऊ दे. 
मला थंडीतील उब होऊ दे. तुमच्या पायातील वहाण होऊ दे.
दिवसरात्र मी तुमच्या अवतीभवतीच असू दे. 
प्रत्येक क्षण तुम्हाला निरखेन, तुमची सेवा करेन, तुमच्या गरजा ओळखेन. 
आणि तुमच्या चरणांशी माझे प्रेम पूर्णपणे समर्पित करेन.
तुमच्यासाठी विविध रुचकर पदार्थ बनवेन. 
तुमच्या आवडीचे पदार्थ करून तुम्हाला वाढेन. 
माझ्या मुखातून तुम्हाला हवे असलेले शब्दच उच्चारले जातील.
 हे परमेश्वरा,
छोट्या छोट्या गोष्टींमधून तू माझ्या प्रेमाची व पावित्र्याची अनुभूती घ्यायला हवीस. 
           आगामी युगात येणारा अवतार व त्याची पत्नी त्यांचे  हे दिव्य प्रेम आहे. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. देहाद्वारे केलेल्या प्रत्येक कृतीमधून प्रेम अनुभवले जाईल. केवळ त्यानंतरच प्रेमाची पूर्ण तृप्ती होईल. आगामी युगात केवळ अनुभव घेण्यासाठी मी व स्वामी परत अवतरणार आहोत.  


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

रविवार, ७ जुलै, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

          " जेथे जेथे आपली दृष्टी जाते तेथे आपले मन जाते आणि इच्छांचा उदय होतो."

सूत्र दुसरे

अनुभूती

            ज्ञान म्हणजे अंतरात स्तिथ असलेल्या परमेश्वराला जाणणे. आपले सत्यस्वरूप जाणणे. प्रेम बाहेर व्यक्त होते. ज्ञान अंतरंगातून पाहते. प्रेम बाहेर कार्य करते
            अवतार धारण करून भूतलावर आलेल्या परमेश्वरावर मी प्रेमाचा वर्षाव करते. ह्या प्रेमातून अधिक ज्ञान प्रकट होते. मी ब्रम्हसूत्र, शिवसूत्र व इतर अनेक पुस्तकं लिहून पूर्ण केली. जसे मी ' प्रेमसूत्र ' लिहायला घेतले, तसे माझ्या अंतरंगात अधिकाधिक प्रेम उमलत आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, ४ जुलै, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

          " जर आपण मनाची परमेश्वराशी गाठ बांधली तर ते नियंत्रणात येईल आणि फलस्वरूप विश्वातील कोणतीही गोष्ट आपल्याला स्पर्श करणार नाही."

सूत्र दुसरे

अनुभूती
  
२६ जून २००८ सकाळचे ध्यान 
वसंता - मी प्रेमसूत्र लिहिते आहे. प्लीज, मला तुम्ही अनुभवाबद्दल काही सांगा ना. 
स्वामी - अनुभवांची अनुभूती घ्यायलाच हवी. अनुभवाशिवाय पुर्णम् अपूर्ण आहे. तुला वाटतं की मी तुझा अनुभव घ्यायला हवा. म्हणून मी दुसरा अवतार घेणार आहे. आता तू जे काही अनुभवते आहेस , ते मी पुढील अवतारात अनुभवेन. तू म्हणतेस की मी तुझ्यासाठी काहीही केले नाही. परंतु भविष्यात होणाऱ्या अवताराबद्दल कोण लिहू शकेल ? मी तुला सांगतो आणि तू लिहितोस. 'प्रेमा' चा फोटो कसा आला ? हे सर्व तुझ्या अपरिमित प्रेमामुळेच घडले आहे. महान ऋषिमुनींनी नाडीग्रंथ लिहिले असतील परंतु त्यांनी 'प्रेमा' चा फोटो दिला का ? तू कोण आहेस हे त्यांनी दर्शविले नाही का ? तू अवतारकार्यासाठी आली आहेस. तथापि तुला ह्याची जाणीव नसल्यामुळे तू एखाद्या बालकासारखी रडतेस. 
वसंता - स्वामी, मग मी काय करू ? स्वामी सगळं माहीत आहे, तरी मला हे असह्य होतंय. मला तुम्ही हवे आहात. 
स्वामी- जोपर्यंत आपण एकत्र राहत नाही तोपर्यंत तुझ्या प्रेमाला समाधान मिळणार नाही. प्रेमाला अनुभवण्याची गरज असते. अनुभवानेच ते तृप्त होते. अनुभव घेण्यासाठी नातेसंबंध आणि नात्यांचा अधिकार असणे अत्यावश्यक आहे. 
वसंता - स्वामी,आता मला समजले. 
ध्यान समाप्त 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम