ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
गुरु पौर्णिमा संदेश
श्री वसंतसाई अम्मांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम. २०२२ ची गुरु पौर्णिमा! अम्मांच्या चरणी मी पामर काय समर्पण करणार? भगवान श्री सत्य साई बाबांवरील आत्यंतिक प्रेमानं त्यांना मिळालेले अभूतपूर्व आध्यात्मिक अनुभव आणि त्यांच्या लेखणीतून स्त्रवलेलं ज्ञानामृत मी मराठी वाचकांकरता मराठीत भाषांतरित करण्याचा दुबळा प्रयत्न करते. खास गुरु पौर्णिमे निमित्त! “अगदी लहान वयापासून ते आजपर्यंत मी सर्वांना माझे गुरु मानते. लहानशा अळीपासून ते ब्रह्मापर्यंत प्रत्येकाकडून मी काही ना काही शिकत आले आहे. बालपणी स्त्रिया दारात रांगोळी काढत असताना मी आमच्या घराच्या पायरीवर बसून पाहत असे. मुंग्यांची शिस्त मी लक्षपूर्वक पाहत असे आणि चकित होत असे. सगळ्या कशा शिस्तीत आणि ओळीने धान्य गोळा करत असत! गडबड गोंधळ, घाईगर्दी ह्याचा मागमूसही नसे. एखादी मुंगी तिच्या मागच्या मुंगीला धान्य कुठे आहे ह्याची माहिती देत असे. सर्व काम नीटनेटके आणि एकोप्यानं होत असे. मुंग्यांकडून मी शिस्त आणि एकोपा शिकले.तसेच कावळे! आपण जर कावळ्यांसाठी अन्न ठेवलं तर ते काव काव करून सर्व कावळ्यांना बोलावतात,आणि त्यांच्यासाठी ठेवलेलं अन्न मग ते कमी असो की जास्त, सर्वांमध्ये वाटूनच खातात. कावळ्यांचा हा गुण माझ्या रक्तातच उतरला. मला मिळालेली कोणतीही गोष्ट मग ती केवढी का असेना मी सर्वांमध्ये वाटल्याशिवाय अनुभवू शकत नाही. माझ्या कठोर तपश्चर्येमुळे स्वामींनी मला मुक्ती बहाल केली. तथापि मी मुक्तीचा आनंद एकटीनं उपभोगणार नाही, ते चोरी केल्यासारखं होईल म्हणून मी स्वामींना सांगितलं की त्यांनी अखिल विश्वाला जीवनमुक्ती बहाल केली तरच मी माझ्या मुक्तीचा स्वीकार करून आनंद अनुभवू शकीन. ह्यामुळे येणाऱ्या सत्य युगात सर्वजण जीवनमुक्त असतील. मुक्तीच्या आनंदाचा अनुभव घेत त्यांचं जीवन व्यतीत करतील.”
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा