विश्व प्रसाद
द्वापारयुगातील
एक रात्र , पौर्णिमेच शितल चांदण , गडद आकाशात चमकणारा चंद्र
!चांदण्याच्या मृदुल लहरी , धरती पावन करीत , अवघे वृंदावन त्याच्या
अमृतमयी शांत किरणांनी न्हाऊ घालत आहे . ह्या अमृतमयी सोमरस पानाने सर्वांना
गुंगी आली , ते निद्राधीन झाले .
अनिल सुस्वर घेऊन आला . तो मनमोहक सुस्वर ऐकताक्षणी , राधेचे हृदय आनंदाने नाचले . ही तर मनभावन कृष्णाची मधुर हांक !राधा त्या स्वराच्या दिशेने धावली , तिचे मन तिच्याशी स्पर्धा करत कितीतरी पुढे धावल ! ती कृष्णाजवळ येऊन त्याच्या चरणकमलानपाशी बसली , हलकेच ती त्या स्वरांच्या माधु-यात विरघळली . केवळ हृदय नव्हे , तर तिच अवघ शरीरही विरघळू लागले . तिचे हृदय , आत्मा , शरीर , भावविश्व , इंद्रिये ; तिचे अस्तित्वच त्याच्या दिव्य चरणी विरघळले . राधा कुठे आहे ? ज्या रुपाला राधा या नावाने हाकारले जात होते , तो देह कुठे आहे ?तो देह कृष्णाच्या चरणी विरघळून नाहीसा झाला .
झाडाखाली बसून बासरीचे मधुर स्वर वाजवणारा , ज्याला कृष्ण म्हणून हाकारत , त्याचे रूपही विरघळू लागले . राधेचा प्रेमरस , तिचे सारच कृष्णाच्या दिव्यचरणी वाहिले व त्याचे पुष्पसम मृदू चरण विरघळू लागले . त्याचा देहही विरघळला .
काय चमत्कार ! सूर थांबले ?
वादळ कुठे ? श्रोता कुठे ?
कुठेच नाही ? ते कुठेच सापडणार नाहीत !
दोन रूपे विरघळली , फक्त भाव उरले .
केवळ सत्य व प्रेम उरले .
ना नावे ना रूपे न राधा न कृष्ण
मात्र एक झालेले दोन भाव .
फक्त नारदमुनी याचे साक्षी होते . या दिव्य संगमामुळे प्रचंड उर्जा निर्माण झाली . सत्य व प्रेम यांचा संयोग झाला . यामुळे निर्माण झालेल्या लहरी प्रकाश उर्जेत परिवर्तित झाल्या . दोन ढग धडकले की वीज चमकते . गडगडाट होतो . नंतर पाऊस वर्षतो . अवघ्या जगतास त्याचा उपयोग होतो .
तथापि कृष्णवर्णी कृष्ण मेघ , व गुलाबी राधा मेघ जेव्हा स्पर्शले , तेव्हा ध्वनी झाला नाही . ते निस्तब्ध झाले . आनंद नशेत मश्गुल झाले. मिलनाच्या आनंदात सर्व काही अंतर्धान पावले . लहरींमधून प्रकाश उभरला . तो या भावसंगमाचा साक्षी म्हणून राधेच्या देहात प्रवेशला . हा राधाकृष्णाचा गांधर्व विवाह, केवळ नारदमुनी या घटनेला साक्षी होते .
राधाकृष्णांनी पुन्हा त्यांचे नाव , रूप धारण केले . राधेचे चैतन्य पुनर्प्रस्थापित झाले आणि तिने कृष्णाच्या चरणांवरील नजर हलकेच वर करून त्याच्या मुखकमलावर स्थिर केली . कृष्णाच्या मुखावर मंद स्मित होते . हे भावमिलन म्हणजेच गांधर्व विवाह . अशाप्रकारे राधाकृष्णाचा गांधर्व विवाह नारदमुनींच्या साक्षीने झाला . त्यावेळी निर्माण झालेला तेजोगोल संयोगाचा पुरावा म्हणून राधाच्या उदरी राहिला .
द्वापारयुगात घडलेल्या या घटनेची कलियुगात पुनरावृत्ती झाली !
संदर्भग्रंथ :- उपनिषदांपलीकडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा