रविवार, २८ सप्टेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

     " एकदा का परमेश्वराने आपल्यामध्ये प्रवेश केला की हळू हळू आपली पूर्व कर्म नष्ट होऊ लागतात . "

पुष्प २७ पुढे सुरु

            आता जंगले उरली नाहीत . माणसाने जंगले उध्वस्त करून घरे बांधली . सुमारे १०० वर्षांपूर्वी सर्व गावांमध्ये वने असत . गावकरी त्यांच्या शेतात बसून ध्यान लावत . माझे वडीलही रोज सकाळ संध्याकाळ ठराविक ठिकाणी व ठराविक वेळी ध्यान लावत असत . ते खुल्या हवेत एकांतात ध्यान करून घरी परत येत असत . आता वेगळ्या जागा नाहीयेत , फक्त घरे आणि अधिक जास्त घरे . पूर्वी घरामागे आंगण असे , तेथे एकांत व शांतता असे . आता सर्व ठिकाणी हाउसिंग सोसायट्या झाल्यात . एका इमारतीला २०,३० किंवा त्याहून अधिक जास्तच मजले असतात ! घरात शांती नसते . शेकडो लोकांची जा ये, लिफ्टसाठी प्रतिक्षा वगैरे सुरु असते . जर १० माणसे घरी आली तर बसायला सुद्धा जागा नसते . भाड्याने हॉल घेऊन कार्यक्रम साजरे केले जातात . घरे इतकी जवळ असूनही दुसऱ्या घरात काय चालू आहे याचा शेजाऱ्याला पत्ता नसतो . पूर्वी सर्व घरांना पुढे ओसरी व मागे आंगण असे . सगळे तिथे एकत्र बसत . घरात एकादी घटना घडल्यास अवघ गाव एकत्र येऊन त्यांना मदत करत असे . 
            त्याकाळी घरे विशाल असत . त्याचप्रमाणे मानवी मनही ! आता घरे संकुचित झाली व मनेही . म्हणून स्वामी म्हणतात शांतीसाठी  बाहेर जाऊ नका , तुमच्या अंतरंगात जा . घरामधील देवघरांत एका जागी बसून नामजप , ध्यान करा . अंतर्यामी भगवंताकडे मन वळवून शांती प्राप्त करा . भगवंत प्रत्येकाच्या हृदयनिवासी आहे . दैनंदिन साधनाकरत ध्यानाद्वारे सर्वांनी त्यास बाहेर प्रकट करावे , त्यांना शांती प्राप्त होईल . ही शिस्त आपण पाळायलाच हवी . आपण सकाळ संध्याकाळ दोन वेळा ध्यान लावणे आवश्यक आहे . रात्री झोपून उठल्यानंतर पहाटेच्या वेळी आपले मन ताजेतवाने असते . ध्यानासाठी ही वेळ योग्य आहे . पहाटे ४ वाजता ध्यान लावा . तुम्हाला शांती मिळेल . त्याचप्रमाणे तुमची सर्व कामे आटपल्यानंतर , झोपण्यापूर्वी ध्यान करा . ही चांगली सवय आहे . 
            हे सातत्याने केले तर तुमची इंद्रिये ताब्यात येतील . मन व इंद्रिये यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण ' आपल्या जन्माचा उद्देश काय ' यावर रोजच्या रोज चिंतन केले पाहिजे . परमेश्वर प्राप्ती हा आपल्या जन्माचा उद्देश आहे . पुन्हा जन्मास न येण्यासाठी आपण हा जन्म घेतला आहे . या विचारावर रोज ध्यान करा ; परमेश्वर तुम्हाला नवीन मार्ग दाखवेल . तो ज्ञानकवाडे खुली करील . स्वामी म्हणतात , तुम्ही हे केल्यावर ' आनंद मतिरस '- हा आहे आनंद रस , अमृत रस , मुळ रस . आपण आनंदावस्थेतून जन्मलो आहोत ; ती अवस्था आपण पुन्हा प्राप्त करायला हवी . ' आदिपुरुषा ' पासून आलेल्या आपल्याला परत तिथे परतणे प्राप्त आहे . ही ' पूर्ण आनंद ' अवस्था , चिंतामुक्त अवस्था आहे . हेच आहे कृष्णाने भगवत्  गीतेत घोषित केलेले ' रसो वैसः ' परमेश्वर मधुरम् आहे .   
उर्वरित वसंतामृत पुढील भागत ......

जय साई राम
 

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

       " केवळ विनशीलता तुम्हाला इच्छांपासून मुक्ती देईल .
 
पुष्प २७ पुढे सुरु 

          एक ठिकाण दोन प्रकारांनी कसे कार्यान्वित करते हे आपण या गोष्टीद्वारे पाहू शकतो . सामान्य माणसाला त्या झोपडीने आश्रय दिला तर योग्याला त्या जागेचे सत्यस्वरूप समजले. तर अशा अनेक तीव्र घटनांमध्ये मन विविध कल्पना करते . योग्याने एकादे चलत् चित्र पाहावे त्याप्रमाणे सर्व घटना घडताना पाहिल्या . त्याला सर्व विस्तृत स्वरुपात दाखविले गेले .      
         काहीही संबंध नसूनही मन विविध प्रकारांनी संबंध लावते . व्यवसाय, प्रदूषण वगैरे छोट्या गोष्टी मोठ्या केल्या जातात . भगवत् गीतेमध्ये श्री कृष्ण स्थितप्रज्ञाबद्दल सांगतात . कोणत्याही परिस्थितीत ज्याचे मन खंबीर असते तो स्थितप्रज्ञ ; तो कधीच व्दिधा होत नाही किंवा त्याला धक्काही बसत नाही . कोणत्याही परिस्थितीत त्याचा संयम कायम असतो . याकरता आपले विचार, वागणूक व जीवनशैली परिपूर्ण व शिस्तबद्ध असायलाच हवी . 
         याला स्वामी विचार, उच्चार व आचार यांचे सामंजस्य असे म्हणतात . जो विचार तुमच्या मनात आहे तोच तुम्ही उच्चारला पाहिजे . सर्वकाही जसेच्या तसे सांगायला हवे . ' बोले तैसा चाले ' असेच असावे . एकादी व्यक्ति तुम्हाला विचारेल , " काय विचार करताय ? " तुम्ही त्वरित उत्तर द्यावे . छुपेगिरी किंवा विपर्यस्त वागणूक नसावी . मनातील विचार व्यक्त करण्यासारखा नसेल तर तो विचारच करू नये . आपण आदर्श ( perfection ) जीवन जगले पाहिजे ; म्हणून शांतीसाठी आपले पूर्वज वनात जात असत . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम

रविवार, २१ सप्टेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

   " आपल्याला इतरांसाठी वाटणारे प्रेम हे वास्तविकतः त्यांच्या अंतर्यामी वास करणाऱ्या ईश्वराप्रती वाटणारे प्रेम होय , हे आपण जाणून घेतले पाहीजे ."

पुष्प २७ पुढे सुरु

          एक उदाहरण. दोन व्यक्ति एक घटना पाहतात. एका व्यक्तीला ती घटना सर्वसाधारण वाटते, तर दुसरी व्यक्ति ती घटना वाढवते . तिला भरपूर तिखटमीठ लावते . त्याचे मन ती घटना वाढवते वा विपर्यस्त करते . यालाच आध्यात्मात ' माया ' म्हणतात . मी ' सत्यसाई स्पीक्स ' खंड ९ ,पान ४९ वाचले.  
          सागराला जाऊन मिळण्याच्या गंगेच्या दीर्घ प्रवासातील प्रत्येक इंच न इंच पवित्र आहे . यातील तिच्या तीरावरील विशेषतः हृषिकेश , हरिद्वार , काशी , प्रयाग ही ठिकाणे आध्यात्मिक कंपनांनी संपृक्त आहेत . ही कंपने साधकाला सर्व पातळ्यांवर त्याचे चित्तशुद्धी करण्यास मदत करतात . 
         प्रत्येक ठिकाणास त्याची अशी खास कंपने असतात ; तेथे राहणाऱ्या व्यक्तीवर त्यांचा परिणाम होत असतो . एका प्रसिद्ध दरोडेखोराने लपण्यासाठी एका जंगलात दुर्गम ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली होती . मुसळधार पावसात अडकलेल्या एका जोडप्याने त्या झोपडीचा आसरा घेतला . त्या झोपडीचे वातावरण दुष्ट लोभी वृत्तीने दुषित झाले होते , तथापि त्या जोडप्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही . तेवढ्यात जंगल पार करून जाणाऱ्या एका संन्याशाने त्या झोपडीचा आसरा घेतला आणि लगेचच त्याचे शुद्ध हृदय दुषित झाले ! स्वच्छ मनाने त्वरित एक योजना तयार केली . संन्याशाच्या लक्षात आलं की तो स्वतः त्या जोडप्याचा खून करून त्यांचे दागिने लुटण्याचा विचार करत होता , कारण त्याला सर्व जगास योग शिकविण्यासाठी त्याचा मोठा आश्रम बांधायचा होता ! स्वतःची लाज वाटून तो पुन्हा बाहेर पावसात धावला व त्याने स्वतःस दुष्कृत्यापासून वाचविले !
          एका झोपडीत दोन प्रकारच्या व्यक्तिमत्वांनी घेतलेल्या आश्रयाबाबत स्वामी सांगतात . एक जोडपे मुसळधार पावसात आसऱ्यासाठी  झोपडीत शिरते . त्याच झोपडीत संन्याशाने आश्रयासाठी प्रवेश केल्याबरोबर त्याचे हृदय दुषित झाले . त्याच्या शुद्ध मनाने पटकन एका योजनेचा स्वीकार केला . तो खून करणे , दागिने चोरणे या विषयांवर चिंतन करू लागला . तो एक महान आत्मा होता , त्याच्या निवाऱ्यासाठी ही जागा अयोग्य आहे . हे त्याला कळले व त्याने परत जंगलात धाव घेतली . तो तिथे राहिला तर त्याचा विनाश होईल याची त्याला जाणीव झाली म्हणून तो पळून गेला . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम 
 
  

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" सत्याच्या प्राप्तीबरोबरच साधनेची सांगता होते . "


वसंतामृतमाला  
पुष्प २७
मन - आरसा 

     स्वामींनी पेपरच्या दुसऱ्या बाजूवर काय लिहिले ते आपण पाहू या . 
   मन - आरसा 
* प्रतिबिंबीत करतो , विपर्यास करतो व विस्तारित करतो . 
तणावपूर्ण परिस्थिती ( चित्रपट गती - मनोरंजन - मार्ग - अभियान - व्यवसाय , प्रदूषण )
* क्षुल्लक गोष्टींवर अतिशययोक्त प्रतिक्रिया  ( खरेदी )
* विचारशैली जीवनशैली 
* आपले पूर्वज शांतीसाठी वनात गेले, २/३ जंगले ओसाड झाली आहेत , आपण जंगलात जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही स्वतःत अंतर्मुख  व्हा .
* आनंद मतिरस - चिंता 
* स्वास्थासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन , सहजता , परिस्थितीचा आढावा घ्या . 
* × श्वासाचे अवलोकन करत तणावाची मुळे शोधा . 
  मुलांबरोबर गाणे , खेळणे . 
           आपले मन सभोवतालच्या गोष्टी व परिस्थित्या विविध प्रकारे कसे व्यक्त करते हे स्वामींनी दाखविले आहे . आपण एकादी घटना पाहिल्यानंतर मन ती घटना विपर्यस्त व अतिशयोक्त रीतीने  प्रतिबिंबित करते , त्या घटनेला तिखटमीठ लावते . जशाच्या तशा गोष्टी मन दर्शवू शकत नाही .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम    



रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " प्रेम म्हणजे अनेकांमध्ये त्या एकाला पाहणे आणि ज्ञान म्हणजे त्या एकामध्ये अनेकांना पाहणे ." 

पुष्प २६ पुढे सुरु 

           मी माझ्या मुलांना लहानपणापासून आत्मपरीक्षण करून रोजनिशी लिहिण्याची सवय लावली . त्यांनी गीतेच्या मार्गाचे अनुसरण करावे. केवळ परमेश्वरासाठी जीवन जगावे यासाठी त्यांच्यावर तसे संस्कार केले . त्यांना मी नियमितपणे दिवसातून तीन वेळा ध्यान , भजन व प्रार्थना करायला लावत असे . त्यांनी इतरांमधील दोष न पाहता स्वतःचे दोष शोधावे अशी शिकवण मी त्यांना दिली . मला स्वामींविषयी समजल्यानंतर , मी त्यांची शिकवण आचरणात आणू लागले . ते महाअवतार असल्याचे मी घरातील सर्वांना सांगितले . माझ्या वडिलांनी गीतेचे आचरण केले , आम्हीही त्यांच्या मार्गाचे अनुसरण केले . हेच अस्तित्व शास्त्र आहे . सत्याचा बोध, ज्ञानप्राप्ती व धर्माचरण हे अस्तित्व शास्त्र आहे . धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानवी जीवनाचा पाया आहेत . मी माझ्या आध्यात्मिक जीवनात यांचे आचरण केले . मी मानवी जीवनाच्या चारही आश्रमांचे पालन केले . मी जातीचा धर्म, स्त्री धर्म इ. सर्व धर्मांचे काटेकोरपणे पालन केले . हा योग आहे . जन्मापासून मृत्यू पर्यंत आपण जे काही करतो ते सर्व परमेश्वराशी जोडले पाहिजे . यालाच योग म्हणतात . 
 काम + परमेश्वर = योग 
           भाव कामाचे मुळ आहे . मनात उमटणारा प्रत्येक भाव परमेश्वराशी जोडला पाहिजे . हा योग आहे . जे जे आपण पाहतो, बोलतो व ऐकतो ते सर्व परमेश्वराशी जोडले पाहिजे . सुरुवातीला मी अशा पद्धतीने साधना केली . कोणीही काही बोलले की मी त्यांचा पहिला शब्द परमेश्वराशी जोडत असे . रस्त्यावर एखादी जाहिरात पाहिली तर ती ही मी परमेश्वराशी जोडत असे . कोणी मोर हा शब्द उच्चारल्याक्षणी मी तो शब्द तत्काळ मयूर मुकुटधारी कृष्णाशी जोडे . जर कोणी विचारले , " आपण खाऊया कां ?" तर मी विचार करत असे , ' अन्न कशासाठी ! उदरभरणासाठी की आत्म्यासाठी ?' माझी विचार सरणी अशी होती . 
          माझे आचरण असे होते . सर्व काही परमेश्वराशी जोडणे म्हणजे योग होय . माझे आचरण असे का बरं होते ? मला माहित नाही . लहानपणापासून कृष्णाशी विवाह करण्याची व आंडाळप्रमाणे परमेश्वरामध्ये विलीन होण्याची मला ज्वलंत इच्छा होती . मी माझा मृत्यूही परमेश्वराशी जोडला . मला मृत्यू येणार नाही . माझा देह परमेश्वरामध्ये विलीन होईल ; अशा तऱ्हेने मृत्यूचाही योग होईल . जन्मापासून मृत्युपर्यंत माझे जीवन केवळ योग आहे . जन्मापासूनच भाव-स्त्रोतामधून मनामध्ये भाव उदभवतात . या स्त्रोतामधून उगम पावणारे आपले सर्व भाव आपण परमेश्वराशी जोडले पाहिजेत . हे आता योगसूत्र स्वरुपात आलेले ब्रम्ह्सूत्र आहे. 
          संत महात्मे विविध मार्गांनी योग शिकवतात . ते योगाचे वर्ग घेतात . गीता १८ योगांची शिकवण देते .  परंतु मला मात्र एकच योग माहित आहे. " दिवसाचे २४ तास भगवत् चिंतनात व्यतीत करणे. " कुंडलिनी म्हणजे काय ? ती जागृत कशी करायची ? "  ह्या गोष्टींची मला काही माहिती नाही . मला एकच एक गोष्ट माहित आहे . ' मला स्वामी हवेत , मला स्वामी हवेत .' या एकमेव विचाराने माझे मन, बुद्धी, आणि इंद्रिये अश्रू ढाळत आहेत . मी माझे संपूर्ण जीवन असे व्यतीत केले आहे . मी योगेश्वर कृष्णाचे चरण धरल्यानंतर योगाचे सर्व मार्ग माझे जीवन झाले .

जय साई राम    

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

       " आपल्या अंतर्यामी परमेश्वराचा शोध घेतल्यानंतर होणारी अनुभूती म्हणजेच आनंद होय . "

पुष्प २६ पुढे सुरु

५ जुलै २०१३ सायं ध्यान
वसंता - स्वामी , मी योगसूत्रावर लिहू का ? अस्तित्व शास्त्र म्हणजे काय ?
स्वामी - तुझे जीवनच योगसूत्र - अस्तित्व शास्त्र आहे . तुझे बालपण परमेश्वरासमवेत गेले. तुझे शालेय जीवन, वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन, मुलांचे संगोपन सर्वकाही परमेश्वरासोबत व्यतीत झाले . तू अस्तित्व शास्त्र जगलीस .
वसंता - आता मला समजले स्वामी .
ध्यान समाप्त.
          स्वामी म्हणाले की माझे अवघे जीवनच अस्तित्व शास्त्र योगसूत्र आहे . योग म्हणजे काय ? योग म्हणजे जीवात्म्याला परमात्म्याशी जोडणे . स्वतःस परमेश्वराशी जोडणे म्हणजेच योग होय . मी जे जे पाहते, जे जे ऐकते आणि पंचेंद्रियांद्वारे जे काही करते ते सर्व परमेश्वराशी जोडते . मी आयुष्यभर गीतेतील अठरा योगांचे आचरण केले. हे अस्तित्व शास्त्र होय .
          जीवनातील सर्वकाही परमेश्वराशी जोडणे हेच अस्तित्व शास्त्र आहे .
          माझे बालपण परमेश्वरासोबत गेले. मी कृष्णाच्या बाहुलीबरोबर खेळत असे, कृष्णाशी बोलत असे . इतरांबरोबर मी कधीही खेळले नाही. कृष्णाची बाहुली माझी सवंगडी होती . शाळा दूर असल्यामुळे मी शिक्षणासाठी वसतिगृहात राहिले . तिथेही मी इतरांमध्ये मिसळत नसे . माझ्या भित्र्या स्वभावामुळे मी सदैव परमेश्वराच्या विचारांमध्ये एकटीच राहत असे . मी जीझसची प्रार्थना करत असे . मला कृष्णाशी विवाह करायचा होता . माझा विवाह परमेश्वराशी झाला पण मी अनभिज्ञ होते . बालवयात मी महान भक्तांच्या कथा ऐकल्या . गोष्ट ऐकल्याशिवाय मी रात्री झोपत नसे . अशा तऱ्हेने परमेश्वराने सर्व छुप्या मार्गाने केले . मी त्याच्याबरोबरच वावरले. माझ्या जन्मापासून तोच मला निजवत असे . मी आदर्श कौटुंबिक जीवन जगले . आमचे एकत्र कुटुंब होते . मी सर्वांशी विनम्रतेने व प्रेमाने वागले . त्यावेळी आमच्या कुटुंबातील सर्वजण त्यांच्या बायकोमुलांपासून वेगळे राहत होते . माझ्यामनात नेहमी विचार येई , " यांच्या विभक्त होण्याचे कारण काय ? " सतत प्रार्थना केल्यानंतर मला उमजले . भगवान तिरुपती सप्तगिरीच्या माथ्यावर एकटाच निवास करतो ; त्याची पत्नी पायथ्याशी निवास करते . ह्या देवीला आणि सप्तगिरीवासी तिरुपतीला पुन्हा एकत्र आणण्याची मी शपथ घेतली आहे . मी असा विचार का केला ? मला त्याचे कारण माहित नव्हते . आता मला समजले की ते कुंडलिनीच्या सात चक्रांचे निदर्शक आहे .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात  .....

जय साई राम

रविवार, ७ सप्टेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

     " जर आपण अत्यंत एकाग्रतेने एखादी गोष्ट मागितली तर वैश्विक शक्तीकडून आपल्याला त्याचे उत्तर मिळते . " 

पुष्प २६ पुढे सुरु

          हे ऐक्य घडून येण्यासाठी आपण आपले प्रत्येक कर्म जाणीवपूर्वक केले पाहिजे . आपल्या मस्तकात उत्पन्न होणारे विचार शुद्ध असायला हवेत . हृदय प्रेमाने ओथंबलेले हवे . अशा प्रेमाने हृदय परिपूर्ण होईल . आपण सर्वांवर प्रेम करायला हवे . त्यानंतरच आपले विचार शुद्ध होतील . हाती घेतलेले प्रत्येक कार्य आपण भगवंतास अर्पण करावे . जर आपण सर्वकाही परमेश्वरास समर्पित केले तर प्रत्येक कर्म पवित्र होईल . योग म्हणजे चित्त वृत्ती निरोध . याचा अर्थ चित्तातील उर्मी , प्रबळ इच्छा आणि विचार यांवर नियंत्रण ठेवणे . नियंत्रणासाठी शिस्त आवश्यक आहे . आपण प्रत्येक कर्म विशिष्ट वेळेवर करायची सवय लावून घेतली पाहिजे . वेळापत्रकानुसार जीवन जगल्यास इंद्रिये स्वाभाविकपणे नियंत्रित होतात , ती ही ते वेळापत्रक पाळू लागतात. योगसुत्रात मी हे लिहिले आहे . स्वामींनी या अध्यायाशी योगसूत्र जोडण्यास सांगून पुढे सांगितले .....
' योग अस्तित्व शास्त्राला सहाय्य करतो . '
        मनुष्य आपल्या मेंदूच्या केवळ १/१० शक्तीचा वापर करतो . योगाभ्यासाच्या सहाय्याने सर्जनशीलता विकसित करू शकतो . योग मार्गाच्या ८ पायऱ्या आहेत . पतंजलीनी अष्टांग योग स्थापित केला . अष्टांग योग म्हणजे योगाच्या आठ पायऱ्या वा टप्पे . योगाभ्यासाच्या सहाय्याने देह व मन स्वस्थ राहते . साधारणपणे अभ्यासक्रमात अनेक विषयांचे अध्ययन केले जाते . परंतु त्यामध्ये अस्तित्व शास्त्र व अध्यात्म हे विषय नसतात . अभ्यासक्रमात कदाचित काही मूल्य शिक्षणाचे वर्ग घेतले जातात , एवढेच काय ते ! त्यामध्ये संपूर्ण अस्तित्व शास्त्राचा समावेश होत नाही . अस्तित्व शास्त्र म्हणजे योग्य मार्गाने जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन . अध्यात्माच्या पायावर उभे असलेले जीवन सार्थ जीवन असते . तथापि शाळांमधून अध्यात्माचे वर्ग घेतले जात नाहीत . अस्तित्व शास्त्र अतिमहत्वाचे आहे . अध्यात्मामध्ये प्रगती करत असताना आपण सद्गुण विकसित करू शकतो, आत्मसात् करू शकतो . अध्यात्म म्हणजे देणे-घेणे . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम    
       

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार

        " मनुष्य सिद्धींद्वारे जडवस्तूंचे सृजनीकरण करू शकतो परंतु जर तो त्याच्याही पलीकडे गेला तर तो परमेश्वर म्हणून स्वतःचे प्रकटीकरण करू शकतो . "

वसंतामृतमाला
पुष्प २६ 
अस्तित्व शास्त्र 

       नुकतेच स्वामींनी दोन पानी लिखाण दिले . 
          योग म्हणजे काय ? जाणीव - ( जाणीवेचा अभाव दुःखास कारणीभूत होतो .)
          आपल्यामधील दिव्यत्वाची जाणीव . मस्तक ( Head), हृदय ( Heart ) आणि हात ( Hands ) - [ 3H ] यांमधील सुसूत्रता आपल्याला पूर्णत्वास नेते . 
चित्त वृत्ती निरोध -
          मनुष्य मेंदूच्या केवळ १/१० शक्तीचा वापर करतो . योगाच्या सहाय्याने सर्जनशीलता विकसित करता येते . 
         अस्तित्व शास्त्र . हळू हळू दैवी गुण संपादन करा .
    आध्यात्मिकता - देणे आणि घेणे 
          आता आपण याविषयी पाहू . जाणीवेचा अभाव हे जगातील सर्व दुःखांचे मूळ कारण आहे . आपल्याला जाणीव असेल तर आपण स्वतःला ' माझा जन्म का झाला ? माझ्या जन्माचे कारण काय ? ' हे प्रश्न विचारून त्याचे उत्तर जाणून व समजून घेऊ . याला सत् चित आनंद म्हणतात . सत् म्हणजे भगवंत , चित् म्हणजे अखंड एकाग्र जाणीव . ज्याला ही जाणीव असते तो परमेश्वर जाणतो , त्याला आनंद प्राप्ती होते . 
          प्रत्येक गोष्टीमध्ये दिव्यत्व विद्यमान असते. आपण आपल्यातील दैवत्व पूर्णत्वास नेले पाहिजे . स्वामींनी ' मी भगवंत आहे आणि तुम्हीही भगवंत आहात ' हे पुन्हा पुन्हा सांगितले आहे . याचा बोध आपल्याला झाल्यास आपणही परमेश्वर होऊ . कुंडलीनीमध्ये सात चक्रे असतात ; पण ती सर्व मिटलेली असतात. कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रामध्ये वेटोळे घातलेल्या सर्पाप्रमाणे सुप्तावस्थेत असते . साधनेद्वारे आपण ही शक्ती जागृत करू शकतो . मुलाधारातील सुप्तशक्ती जागृत होऊन एकेक चक्र ओलांडत सहाव्या म्हणजे आज्ञा चक्रात ( तिसऱ्या नेत्र स्थानी ) शिवाबरोबर एक होते .  हा आहे आनंद . ही अवस्था प्राप्त झाल्यावर दिव्यत्व पूर्णत्वास जाते . यासाठी स्वामी म्हणतात , " Hand ( हात ), Head ( मस्तक ), Heart ( हृदय ) [ 3 H ] ह्या तिन्हीच्या सुसूत्रीकरणाने ऐक्यावस्था प्राप्त होते . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम