रविवार, ७ सप्टेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

     " जर आपण अत्यंत एकाग्रतेने एखादी गोष्ट मागितली तर वैश्विक शक्तीकडून आपल्याला त्याचे उत्तर मिळते . " 

पुष्प २६ पुढे सुरु

          हे ऐक्य घडून येण्यासाठी आपण आपले प्रत्येक कर्म जाणीवपूर्वक केले पाहिजे . आपल्या मस्तकात उत्पन्न होणारे विचार शुद्ध असायला हवेत . हृदय प्रेमाने ओथंबलेले हवे . अशा प्रेमाने हृदय परिपूर्ण होईल . आपण सर्वांवर प्रेम करायला हवे . त्यानंतरच आपले विचार शुद्ध होतील . हाती घेतलेले प्रत्येक कार्य आपण भगवंतास अर्पण करावे . जर आपण सर्वकाही परमेश्वरास समर्पित केले तर प्रत्येक कर्म पवित्र होईल . योग म्हणजे चित्त वृत्ती निरोध . याचा अर्थ चित्तातील उर्मी , प्रबळ इच्छा आणि विचार यांवर नियंत्रण ठेवणे . नियंत्रणासाठी शिस्त आवश्यक आहे . आपण प्रत्येक कर्म विशिष्ट वेळेवर करायची सवय लावून घेतली पाहिजे . वेळापत्रकानुसार जीवन जगल्यास इंद्रिये स्वाभाविकपणे नियंत्रित होतात , ती ही ते वेळापत्रक पाळू लागतात. योगसुत्रात मी हे लिहिले आहे . स्वामींनी या अध्यायाशी योगसूत्र जोडण्यास सांगून पुढे सांगितले .....
' योग अस्तित्व शास्त्राला सहाय्य करतो . '
        मनुष्य आपल्या मेंदूच्या केवळ १/१० शक्तीचा वापर करतो . योगाभ्यासाच्या सहाय्याने सर्जनशीलता विकसित करू शकतो . योग मार्गाच्या ८ पायऱ्या आहेत . पतंजलीनी अष्टांग योग स्थापित केला . अष्टांग योग म्हणजे योगाच्या आठ पायऱ्या वा टप्पे . योगाभ्यासाच्या सहाय्याने देह व मन स्वस्थ राहते . साधारणपणे अभ्यासक्रमात अनेक विषयांचे अध्ययन केले जाते . परंतु त्यामध्ये अस्तित्व शास्त्र व अध्यात्म हे विषय नसतात . अभ्यासक्रमात कदाचित काही मूल्य शिक्षणाचे वर्ग घेतले जातात , एवढेच काय ते ! त्यामध्ये संपूर्ण अस्तित्व शास्त्राचा समावेश होत नाही . अस्तित्व शास्त्र म्हणजे योग्य मार्गाने जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन . अध्यात्माच्या पायावर उभे असलेले जीवन सार्थ जीवन असते . तथापि शाळांमधून अध्यात्माचे वर्ग घेतले जात नाहीत . अस्तित्व शास्त्र अतिमहत्वाचे आहे . अध्यात्मामध्ये प्रगती करत असताना आपण सद्गुण विकसित करू शकतो, आत्मसात् करू शकतो . अध्यात्म म्हणजे देणे-घेणे . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम    
       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा