रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " प्रेम म्हणजे अनेकांमध्ये त्या एकाला पाहणे आणि ज्ञान म्हणजे त्या एकामध्ये अनेकांना पाहणे ." 

पुष्प २६ पुढे सुरु 

           मी माझ्या मुलांना लहानपणापासून आत्मपरीक्षण करून रोजनिशी लिहिण्याची सवय लावली . त्यांनी गीतेच्या मार्गाचे अनुसरण करावे. केवळ परमेश्वरासाठी जीवन जगावे यासाठी त्यांच्यावर तसे संस्कार केले . त्यांना मी नियमितपणे दिवसातून तीन वेळा ध्यान , भजन व प्रार्थना करायला लावत असे . त्यांनी इतरांमधील दोष न पाहता स्वतःचे दोष शोधावे अशी शिकवण मी त्यांना दिली . मला स्वामींविषयी समजल्यानंतर , मी त्यांची शिकवण आचरणात आणू लागले . ते महाअवतार असल्याचे मी घरातील सर्वांना सांगितले . माझ्या वडिलांनी गीतेचे आचरण केले , आम्हीही त्यांच्या मार्गाचे अनुसरण केले . हेच अस्तित्व शास्त्र आहे . सत्याचा बोध, ज्ञानप्राप्ती व धर्माचरण हे अस्तित्व शास्त्र आहे . धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ मानवी जीवनाचा पाया आहेत . मी माझ्या आध्यात्मिक जीवनात यांचे आचरण केले . मी मानवी जीवनाच्या चारही आश्रमांचे पालन केले . मी जातीचा धर्म, स्त्री धर्म इ. सर्व धर्मांचे काटेकोरपणे पालन केले . हा योग आहे . जन्मापासून मृत्यू पर्यंत आपण जे काही करतो ते सर्व परमेश्वराशी जोडले पाहिजे . यालाच योग म्हणतात . 
 काम + परमेश्वर = योग 
           भाव कामाचे मुळ आहे . मनात उमटणारा प्रत्येक भाव परमेश्वराशी जोडला पाहिजे . हा योग आहे . जे जे आपण पाहतो, बोलतो व ऐकतो ते सर्व परमेश्वराशी जोडले पाहिजे . सुरुवातीला मी अशा पद्धतीने साधना केली . कोणीही काही बोलले की मी त्यांचा पहिला शब्द परमेश्वराशी जोडत असे . रस्त्यावर एखादी जाहिरात पाहिली तर ती ही मी परमेश्वराशी जोडत असे . कोणी मोर हा शब्द उच्चारल्याक्षणी मी तो शब्द तत्काळ मयूर मुकुटधारी कृष्णाशी जोडे . जर कोणी विचारले , " आपण खाऊया कां ?" तर मी विचार करत असे , ' अन्न कशासाठी ! उदरभरणासाठी की आत्म्यासाठी ?' माझी विचार सरणी अशी होती . 
          माझे आचरण असे होते . सर्व काही परमेश्वराशी जोडणे म्हणजे योग होय . माझे आचरण असे का बरं होते ? मला माहित नाही . लहानपणापासून कृष्णाशी विवाह करण्याची व आंडाळप्रमाणे परमेश्वरामध्ये विलीन होण्याची मला ज्वलंत इच्छा होती . मी माझा मृत्यूही परमेश्वराशी जोडला . मला मृत्यू येणार नाही . माझा देह परमेश्वरामध्ये विलीन होईल ; अशा तऱ्हेने मृत्यूचाही योग होईल . जन्मापासून मृत्युपर्यंत माझे जीवन केवळ योग आहे . जन्मापासूनच भाव-स्त्रोतामधून मनामध्ये भाव उदभवतात . या स्त्रोतामधून उगम पावणारे आपले सर्व भाव आपण परमेश्वराशी जोडले पाहिजेत . हे आता योगसूत्र स्वरुपात आलेले ब्रम्ह्सूत्र आहे. 
          संत महात्मे विविध मार्गांनी योग शिकवतात . ते योगाचे वर्ग घेतात . गीता १८ योगांची शिकवण देते .  परंतु मला मात्र एकच योग माहित आहे. " दिवसाचे २४ तास भगवत् चिंतनात व्यतीत करणे. " कुंडलिनी म्हणजे काय ? ती जागृत कशी करायची ? "  ह्या गोष्टींची मला काही माहिती नाही . मला एकच एक गोष्ट माहित आहे . ' मला स्वामी हवेत , मला स्वामी हवेत .' या एकमेव विचाराने माझे मन, बुद्धी, आणि इंद्रिये अश्रू ढाळत आहेत . मी माझे संपूर्ण जीवन असे व्यतीत केले आहे . मी योगेश्वर कृष्णाचे चरण धरल्यानंतर योगाचे सर्व मार्ग माझे जीवन झाले .

जय साई राम    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा