रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

     " कोणालाही दुखवू नका कारण परमेश्वर प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. "

पुष्प ४१ पुढे सुरु 

..... हे रुग्णांचे स्वास्थ्य, आमच्यासाठी प्रार्थना कर ..... 
                   मी अनेक लोकांना त्यांच्या आधीव्याधींसाठी धन्वंतरी शक्ती दिली आहे. यामुळे कित्येक व्याधींमुक्त झाले. काही जणांचे आजारही बरे झाले. ' प्रेम निवारण साई ' या पुस्तकांत याविषयी मी सविस्तर लिहिले आहे. माझी प्रार्थना व धन्वंतरी शक्ती याद्वारे सर्वजण व्याधीमुक्त झाले. तथापि हा काही कायम स्वरूपी इलाज नाही, कारण एक रोग बरा झाला की दुसरा उद्भवतो . जन्ममृत्यूच्या रोगाचे निवारण हा एकमात्र रामबाण उपाय आहे. या रोगाचे निवारण झाल्याने मनुष्य भगवंताशी विलीन होतो. जन्मापाठोपाठ व्याधीही येतात. हा भवरोग दूर करण्यासाठी मी या भगवंताकडे विश्व मुक्ती मागीतली. त्याने ती दिलीही कारण केवळ तोच ती देऊ शकतो. हे केवळ या साई युगात शक्य आहे. परंतु सर्वांचा कर्मसंहार झाल्याशिवाय वैश्विक मुक्ती शक्य नाही. स्वामींनी व मी वैश्विक पापकर्मे आमच्या अंगावर घेऊन फेडली. ५७० कोटी लोकांची केवढी प्रचंड पापकर्मे ! यासाठीच आम्ही दोघं २००३ पासून दुःख सोसत आहोत. स्वामींची प्रकृती हळूहळू ढासळत असल्याचे त्यांनी दर्शविले. प्रथम त्यांना नीट चालता येईना झाले. त्यांच्या दोन्ही खांद्यांखाली हात देऊन दोन मुले त्यांना चालण्यासाठी मदत करत. त्यानंतर स्वामींनी चालणेच थांबविले व खुर्चीतून दर्शन द्यायला सुरुवात केली. मग त्यांना स्पष्ट बोलणेही कठीण झाले. अखेर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अनेक डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु शेवटी स्वामींनी देहत्याग केला. माझे अश्रू व विलाप स्वामींना परत आणतील. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम  


गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार

          " परमेश्वराची शिकवण आचरणात आणली नाही तर त्याच्या दर्शनाचा काय उपयोग ? "

पुष्प ४१ पुढे सुरु 

                मदर मेरीने जीझसला जन्म दिला. मी स्वामींची शक्ती आहे. तरीही मला मान सन्मान, आदर नकोय. मला केवळ चरणांची धूळ व्हायचे आहे. स्वामींनी मला कित्येक नावे दिलीत. मला त्यातील एकही नको असे मी म्हणाले. मला केवळ त्यांची चरणरज होऊन त्यांच्या चरणतळी स्वतःस दडवायचेय. स्वामींनी मला आरती दिली, झुला गीत दिले. झुला गीत म्हणताना आम्ही माझा सदैव सोबती - स्वामींचा फोटो झुल्यामध्ये ठेवतो. काल स्वामींनी त्या फोटोजवळ एक फुल ठेवले. आम्ही सर्वांनी ते पाहिले. गुलाबी रंगाचे छोटे सुंदर फुल होते ते. देठाजवळच्या पाकळ्या पिवळ्या होत्या तर वरच्या उमललेल्या पाकळ्या गुलाबी होत्या. ते मंद सुवासिक फुल स्वामींच्या मांडीजवळ होते. या विषयी मी स्वामींना विचारले. ते उत्तरले, 
स्वामी - हे स्वर्गीय फुल तू माझ्या समीप बसल्याचे दर्शविते. माझ्या बाजूला बसण्याचा अधिकार केवळ तुझा आहे. तू माझे मधुर जीवन उर्जा पुष्प आहेस. मला झुल्यावर स्वामींच्या शेजारी बसण्याचा हक्क असला तरीही मला त्यांची चरणरज बनून त्यांच्या चरणतळी लपायचे आहे. 
झुला गीतात म्हंटले आहे, 
श्यामसंग डोले महारानी राधिका 
साईसंग डोले महारानी वसंता.
               महारानी राधिकेसंग कृष्ण झुल्यामध्ये झुलत आहे तर महाराणी वसंतासंग साई झुल्यामध्ये झुलत आहेत. 
               मला महारानी होऊन झुल्यावर स्वामींच्या शेजारी बसायचे नाही, तर त्यांची चरणरज होऊन सर्वांच्या दृष्टीआड व्हायचे आहे. म्हणून स्वामींनी ते छोटे गुलाबी फूल झुल्यावर स्वतःच्या फोटो शेजारी ठेवले. ते फुल दोन दिवस टवटवीत ताजे होते, ना कोमजले, ना त्याचा रंग विटला. मी आदरणीय, पूजनीय नाही. मी केवळ स्वामींची चरण धुलिका आहे. मला त्यांच्या चरणांखाली दडून बसायचे आहे, जेथे मला कोणीही पाहू शकणार नाही. म्हणून ते छोटुकले फुल स्वामींच्या मांडीवर होते. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, २० सप्टेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" विश्व हा एक आरसा आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पाहता."

पुष्प ४१ पुढे सुरु 

...... हे आदरणीय माते ..... 
               आदर म्हणजे काय ? याचा अर्थ महान कार्य करणे, उच्च पदावर असणे असा होतो का ? आदरणीय म्हणजे काय ? विद्वान पंडित वा धनवान मानणे ? या गोष्टी क्षणभंगूर आहेत. जग सोडताना आपण यातील काहीही बरोबर घेऊन जात नाही. केवळ सत्य न् धर्म आपण बरोबर नेतो. भौतिक मान, सन्मान, आदर हे काळाच्या ओघात नाहीसे होतात. अध्यात्मामध्ये उच्च अवस्थेला पोहोचलेल्या महात्म्यांची नावे काही काळ लोकांच्या स्मरणात राहतात. परंतु त्यांचे तत्वज्ञान व शिकवण यांचे मानवाला कधी विस्मरण होत नाही. मग ते कोणत्या देशाचे कां असोत ! दीर्घकाळ ते मानवाच्या मनात घर करतात. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागत .....

जय साईराम 

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

        " आपण का जन्मलो ? मी कोण आहे ? यावर पुन्हा पुन्हा विचार करा."

पुष्प ४१ पुढे सुरु 

..... हे आध्यात्मिक घट .....
           मी स्वतःस रिक्त करून हा घट आध्यात्मिकतेने भरला. माझ्या जीवनात भौतिकतेला स्थान नाही. जन्मापासूनच परमेश्वर माझे सर्वस्व आहे. मी परमेश्वरापासून जन्मल्यामुळे माझे जीवन इतरांहून वेगळे आहे. तुम्हीसुद्धा परमेश्वरापासूनच जन्मले आहात परंतु याबाबत अनभिज्ञ आहात. याची जाणीव सर्वांना करून देण्यासाठी मी येथे आले. लव- कुशांना त्यांचे पिता कोण हे माहित नव्हते. श्रीराम १२ वर्षे त्यांच्यापासून दूर राहिले. त्यांनी अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्यांचा घोडा दोन मुलांनी अडवून सर्वांना पराजित केले. अखेरीस राम युद्ध करण्यासाठी आले. त्यांचे पुत्र श्रीरामाशी वाद घालू लागले; सीतेने तेथे येऊन, ' हा तुमचा पिता आहे ' असे त्यांना सांगितले. तोपर्यंत त्यांना त्यांच्या पित्याविषयी काहीही माहित नव्हते. तुम्हालाही तुमचा पिता कोण हे माहिती नाही; तुम्ही त्याच्याशी वादविवाद करता. तुम्हा सर्वांचा पिता भगवान श्री सत्यसाई आहेत; तुमचा पिता तुम्हाला दाखवून देण्यासाठी मी येथे आले आहे. त्यांची प्राप्ती हा सर्वांच्या जीवनाचा उद्देश आहे. ते तुमचे हृद्यनिवासी तुमच्या हृदयांत साक्षीभावात स्थित आहेत. भौतिक मायेतून जागे व्हा; आध्यात्मिक मार्ग अनुसरा. त्यांची शिकवण आचरणांत आणून साधना करा. आसक्तीशिवाय सर्व कर्म करा. सर्वकाही त्याला अर्पण करा. मग ते भोक्ता होतील व तुमच्या प्रेमाचा आनंद उपभोगतील; हे त्यांचे फल आहे. आतापर्यंत तुम्ही त्यांच्याकडे पाहिलेसुद्धा नाहीत व त्यांना क्षुधाक्रांत केलेत. तुमची त्यांच्या विषयीची अनास्था व त्यांच्यावर भिस्त न ठेवण्याची वृत्ती यांमुळे तुम्ही खऱ्या आनंदापासून वंचित आहात. हे अध्यात्म आहे. भौतिक विषयांत फसू नका. कुटुंबात रहा पण अनासक्तीने कर्तव्य कर्म करा. हा खरा आनंद आहे. हे अध्यात्म आहे. अध्यात्माचा अर्थ सर्वसंग परित्याग करून जंगलात जाणे नव्हे तर परमेश्वर चिंतनात आसक्तीविना कौटुंबिक जीवन जगणे. हे खरे अध्यात्म आहे. अशा तऱ्हेने जीवन जगल्याने दुःख अन् क्लेश तुमच्या जवळपासही येणार नाही. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....  

जय साईराम     

रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

          " समस्या धावत्या मेघांसारख्या असतात. केवळ भक्ती म्हणजेच मुक्ती होय."

पुष्प ४१ पुढे सुरु 

                   हे सत्य आहे. रामाने गर्भवती सीतेला वनात का पाठवले ? त्यांचे पुत्र लवकुशांना पहायला ते कां गेले नाहीत ? त्या मुलांना १२ वर्षे त्यांचा पिता कोण हे ठाऊक नव्हते. स्वामी पुन्हा कवितेत लिहितात : 
निकाल तू स्वतः घोषित करिसी 
अवतार घेण्या, आदिमूलासी भाग पाडिसी 
आदिमूलम् येथे अवतरित होत आहे. स्वामी देहत्याग करणार हे मला तेव्हा माहित नव्हते ; तथापि परमेश्वरांस ठाऊक होते. आदिमूलम् स्वामी आता नूतन देह धारण करून येत आहेत. साक्षी अवस्थेतील परमेश्वर नाही तर आदिमूलम् होऊन येत आहेत. माझे अश्रू व आक्रंदन यांमुळे ते नुतन होऊन येत आहेत. हे सर्व पूर्ण ज्ञानाद्वारे घडते. ज्ञान ही न्यायाची बैठक होय. 
..... हे आनंदाचे निधान, आमच्यासाठी प्रार्थना कर ..... 
                     जगाच्या आनंदाचे कारण स्वामी आहेत. मी त्यांना वैश्विक मुक्ती देण्यासाठी विनवले. सर्वजण  जीवनमुक्त अवस्थेत जगतील; भगवंताच्या साक्षात्काराचा आनंद उपभोगतील. राजे वा उच्च अधिकारी राजा जनकासारखे राजयोगी असतील. ते अनासक्त जीवन जगतील. सामान्य कुटुंबे ' भक्त विजय ' मधील भक्तांसारखी अनासक्त भावाने, भगवत् चिंतनात आनंदाने जीवन व्यतीत करतील. विद्यार्थी पूर्वीसारखे गुरुकुलामध्ये विद्यार्जन करतील. सर्व शिक्षक आदर्श गुरु असून त्यांच्यामध्ये विद्यादानाप्रती उत्साह व कळकळ असेल. अशा तऱ्हेने समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व सर्व स्तरांवरील माणसे आनंदात जीवन जगतील. या सर्वाचे मूळ कारण विश्वब्रम्ह गर्भ कोटम् व स्तूप आहेत. ह्याद्वारे स्वामींचे व माझे भाव बाह्यगामी होत सर्वांमध्ये प्रवेशित होतात व परिवर्तन घडवितात. प्रत्येकजण आसक्तीशिवाय केवळ परमेश्वरासाठी जीवन जगेल. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम     

गुरुवार, १० सप्टेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

      " आपले विधीलिखित ब्रम्हदेव लिहित नसून आपले आपणच लिहितो. " 

पुष्प ४१ पुढे सुरु 

..... हे मूर्तिमंत ज्ञानपीठ, आमच्यासाठी प्रार्थना कर ..... 
                माझे जीवन म्हणजे निवळ ज्ञान. ज्ञान न्यायाचे शिरोभूषण ! न्यायदेवता ज्ञानपीठावर आसनस्थ असावी. परमेश्वर प्राप्तीचा पाया निवळ ज्ञान होय. अज्ञानामुळे कलियुगात सर्वत्र अन्याय, अधर्म, अनादर, असत्य, ज्ञानाचा अभाव आणि सतत दुःख न् चिंता दिसून येते. संपूर्ण जीवन संघर्षमय असते. सुखाची मात्रा स्वल्प असते. ज्ञान न्यायाची बैठक आहे. हे कलियुग अत्यंत वाईट असल्यामुळे स्वामींनी येथे अवतरून ज्ञानाची शिकवण दिली. हा जन्म कशासाठी ? केवळ जन्म मृत्यूच्या फेऱ्यांसाठी ? नाही, नाही ! सम्यक् ज्ञानाने  आपण जन्म मृत्यूवर विजय मिळविला पाहिजे. येथे माझी कुंडलिनी स्तूपाच्या रुपात मूर्त झाली ; ह्याच्या शिरोभागी सहस्त्रार आहे. हा अज्ञानाचा अंधकार दूर करून सर्वांना ज्ञानाचा प्रकाश प्रदान करणारा ज्ञानाग्नि आहे. ह्या ज्ञानामुळेच मी स्वामींना  बोलले की अवतारांनीही त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय केला. स्वामीनी पूर्वी मला एक कविता दिली होती. 
विश्वाच्या या न्यायमंदिरी 
न्यायासाठी नित्यभ्रमण करिसी 
साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे करुनी अवतारासी 
कायदेपंडितासम युक्तिवाद करिसी. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम  

रविवार, ६ सप्टेंबर, २०१५

 ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

        " कुटूंबाशी असणारे बंध पुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत होतात. परमेश्वराशी असणारे बंध मोक्ष प्रदान करतात." 

पुष्प ४१ पुढे सुरु 

                मनोनिधी चोला नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने त्याच्या महालासमोर एक घंटा बांधली होती. जर कोणाला काही दुःख असेल तर त्याने ती घंटा वाजवावी. एक दिवस एका गाईने ती घंटा वाजवली. राजाचा मंत्री तेथे आला त्याने गाईला पाहिले व तो त्या गाईच्या मागोमाग जाऊ लागला तेव्हा तेथे रस्त्यावर त्या गाईचे वासरू मरून पडलेले त्याला दिसले. ती घटना पाहणाऱ्या एका व्यक्तीला तेथे बोलावण्यात  आले. त्याने सांगितले की राजपुत्र रथातून तेथून जात असताना त्याने त्या वासराला धडक दिली व ते वासरू खाली पडून मरण पावले. मंत्र्याने ही हकीकत राजाला सांगितली. राजाने त्यांना आज्ञा केली की राजपुत्राला घेऊन यावे व त्याला रस्त्यावर झोपवून त्याच्या अंगावरून रथ न्यावा. परंतु मंत्र्याने तसे करण्यास नकार दिला. त्यावर राजा म्हणाला की तो स्वतःच त्या मुलाला रस्त्यावर झोपवून त्याच्या अंगावरून रथ चालवेल. राजा त्याच्या पुत्राच्या अंगावरून रथ नेणार इतक्यात राजाच्या न्यायप्रियतेची प्रशंसा करणारी दिव्य वाणी ऐकू आली. परमेश्वराने त्या वासराला जीवनदान दिले. राजपुत्रही उठला इथे त्या राजपुत्राच्या हातून चूक घडलेली असते. तथापि सीतामातेची काहीही चूक नाही तिने लंकेत अग्निदिव्य करून तिचे पावित्र्य व पातिव्रत्य सिद्ध केले होते तरीही तिला वनात का पाठवले ? केवळ त्या अज्ञानी धोब्याच्या विधानामुळे. हा राजाचा न्याय आहे का ? मी तरुणपणापासून या कारणासाठी मी अश्रू ढाळले.  स्वामींशीसुद्धा विवाद केला. त्यावर स्वामींनी सांगितले की प्रेमसाई म्हणून आल्यावर ते माझ्याशी विवाह करतील. माझ्या मनात भीती होती म्हणून मी त्यांन काही अटी  घातल्या. त्या अशा की, ते माझ्यापासून कधीही वेगळे होणार नाहीत. सीतामाई सारखे मला मध्येच दूर न लोटता माझा स्वीकार करतील, अजून एक अट अशी की, मला अपत्य नको. यावर स्वामी म्हणाले की एक अपत्य होईल. मग मी, ' गर्भाकालात व प्रसुतीच्या वेळी फक्त स्वामी माझ्या समवेत असले पाहिजेत ' अशी अट घातली. सीतेप्रमाणे गर्भवती असताना मलाही वनात पाठवले जाईल. या भीतीने मी ही अट घातली. अशा रीतीने स्वामी जेव्हा प्रेमसाई अवतारात येतील तेव्हा सर्व अन्यायांचा अंत होईल. या सर्व अन्यायांची भरपाई करण्यासाठी स्वामी प्रेमसाई होऊन येतील. प्रेमसाई पुस्तकांमध्ये मी हे सर्व लिहिले आहे. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 

जय साईराम 
    

शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त




अम्मांनी बालवयात लिहिलेली कविता… 

इंद्रदेवास असती नेत्र सहस्त्र 
तुझ्या सौंदर्याचे रसपान करण्यासी का नाहीत मजसी नेत्र सहस्त्र 
मज नेत्र केवळ दोन ! 
दिव्य तुझे रूप पाह्ण्यासी नेत्र दोन असती अपुरे 
हे भगवान, इंद्रामाजी नको कां मज नेत्र सहस्त्र  
आदीशेषासी असती जिव्हा सहस्त्र, 
तुझा महिमा गाण्यासाठी मला मात्र एकच !
कृष्णा! गोविंदा ! मुरली ! मुकुंदा ! 
अच्युता !अमला ! हरी ! प्रभू !
माझे प्राण ….. भगवान !हे तर अगदी अपुरे, 
तुमची स्तुतीस्तोत्रे गाण्यास, आदीशेषामाजी,
का नाही दिल्या तुम्ही मज जिव्हा सहस्त्र  ?
कर्तवीयास असतो हस्त सहस्त्र 
त्याच्यामाजी द्यावे मज हस्त सहस्त्र 
हे प्राणप्रिया, माझ्या कृष्णा 
तुमचे पूजन करण्यासी, पुष्पार्चनेसी   
अन् घट्ट धरण्यासी आपले चरण, द्या मज हस्त सहस्त्र 
या अंधाऱ्या जगात, कशासाठी मज हा मानवी जन्म ? 
नाहीत मजला नेत्र, जिव्हा अन हस्त सहस्त्र ! 
हाय ! मी करू तरी काय ? 

व्ही. एस . 

संदर्भ :- उपनिषदांच्या पलिकडे 




जय साईराम   



गुरुवार, ३ सप्टेंबर, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

        " परमेश्वराला तुमच्यामध्ये प्रस्थापित करा, तुम्ही परमेश्वरामध्ये प्रस्थापित व्हा." 

पुष्प ४१ पुढे सुरु 

                 या निर्धाराने मी तपश्चर्या केली. माझ्या कुंडलिनीने बाह्य जगात स्तूपाचे रूप धारण केले. स्तुपाद्वारे माझे भाव बाह्यगामी होत सर्वांमधील मूलाधार शक्तीचा शिवाशी योग घडवितात. शक्तीपासून विभक्त शिव सातव्या चक्राच्या माथ्यावर असतो. भौतिक जीवनात रममाण सर्वजण दुःख भोगतात. नवनिर्मितीमध्ये जीव आणि शिव एकत्र असतील. जीवनमुक्त असे सर्व दिव्यानंदात जीवन जगतील. 
आता अवतारांविषयी पाहू ……. 
                   प्रभू रामचंद्रांनी गर्भवती सीतेला वनात कां पाठवले ? अजाण वयापासूनच हा प्रश्न मी पुन्हा पुन्हा विचारात असे. राम गर्भवती सीतेला वनांत कसे पाठवू शकले ? हा राजन्याय आहे कां? 

                  उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 

जय साईराम