रविवार, २७ नोव्हेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " भक्ती आणि प्रेम यांच्याद्वारे पसरणारी स्पंदने सिद्धीद्वारे प्रसूत होणाऱ्या स्पंदनांहून अधिक शक्तिशाली असतात."
प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

              माझ्या या भावनांमुळे कित्येक कुटुंबांमध्ये गैरसमज झाले. पालकांनी त्यांच्या मुलांना वडक्क्मपट्टीला येण्यापासून परावृत्त केले. त्यांना वाटले की त्यांची मुले कुटुंबियांपासून दुरावतील. काही स्त्रियांनी आपले पती संन्यासी होतील या भीतीने त्यांना माझ्यापासून दूर राहण्यास सांगितले. त्यावेळी अनेकांना असं वाटत होतं की जो कोणी माझ्या  सान्निध्यात येईल त्यांना मी संन्यासी करेन !
              मला स्वतःला माझे भाव आत्ताच समजत आहेत. मला जगातील सर्वांना माझी मुले करून माझ्या गर्भामध्ये धारण करायचे आहे आणि प्रत्येकाला शुकमुनी बनवायचे आहे. 

प्रेम इलाज 

              स्वामी एकदा म्हणाले," जेव्हा तू इतरांसाठी प्रार्थना करतेस तेव्हा तुझ्या मातृप्रेमामुळे त्यांना निश्चित लाभ होतो. ही तुझी प्रेमशक्ती आहे जी तू सर्वांना मुक्त हस्ताने देतेस. " 
              माझ्या प्रार्थना व प्रेमशक्ती यामुळे पुष्कळांचे दुर्धर आजार बरे झालेत. अनेक जण व्याधीमुक्त झालेत. दक्षिण आफ्रिकेच्या एक भक्त, सावित्री त्यांना कॅन्सर झाला होता. 
               त्या बऱ्या व्हाव्यात यासाठी मी स्वामींकडे रडले तेव्हा स्वामी म्हणाले, " कॅन्सर कॅन्सल्ड ". स्वामी काय म्हणाले ते मी त्यांना दुसऱ्या दिवशी सांगितले. त्या लगेचच डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्या. तपासणी केल्यावर असे आढळून आले की त्यांच्या शरीरात कॅन्सरचा मागमूसही नव्हता.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 
          

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" आपणच आपली दुःख, भोग वा मुक्ती यास कारणीभूत असतो. " 

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

             स्वामींच्या विचारात मला घरदार, मुलेबाळे, कुटुंब कशाचीही आठवणही नसे. स्वामींशिवाय मी दुसऱ्या कुणाचाही विचार केला नाही. तरीसुद्धा माझे प्रेम सर्व गोष्टींवर आणि सर्वांवर वर्षू लागले. हे प्रेमवर्तुळ इतके वाढत गेले की त्यामध्ये संपूर्ण विश्व सामावले. हे प्रेम सर्व छिन्नविछिन्न करून, सगळ्याची उलथापालथ करून, सर्वव्याप्त झाल्यानंतरच शांत होईल. 
             स्वामींसाठी माझा विलाप म्हणजेच प्रेमभाव. हा प्रेमभाव आता इतरांसाठी विलाप करत आहे. हे प्रेमभावाचे मातृभावात झालेले विस्तृतीकरण आहे, मातेची ममता. " जगातील सर्वजण माझी लेकरे आहेत, माझीच आहेत." 
              रात्रंदिवस मी जगातील सर्व लोकांसाठी रडते. कोणालाही पाहिले की ते मला आपले वाटतात. या जगात कोण बरे असे रडते ? वाचकांनो तुम्ही प्रत्येकावर एवढे भरभरून प्रेम करता का ? जो दिसतो तो आपला आहे असा तुम्ही विचार करता का ? त्यांच्यासाठी तुम्ही अश्रू ढाळता का ? तुम्ही जर असे करत असाल तर तुम्ही प्रकृतीची, पर्यायाने माझी मनोवस्था समजू शकाल.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

स्वामींचा प्रेम संदेश 

प्रेमाला ना जन्म आहे ना मृत्यू !
आज मनुष्य निरर्थक इच्छांच्या मागे धावतो आहे आणि अत्यंत स्वार्थी बनल्यामुळे तो केवळ स्वतःच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. समाजासाठी नाही. समाज कल्याण, राष्ट्र कल्याण हे  दोन्ही अत्यंत महत्वाचे आहे. समाज कल्याण हा आपल्या वर्तणुकीचा भाग असायला पाहिजे. समाजाविना व्यक्तिची प्रगती होऊ शकत नाही. व्यक्ती म्हणजे कोण ? व्यक्तिच्या अंतर्यामी असणारी शक्ती म्हणजेच प्रेमशक्ती होय. ह्या प्रेमशक्तीमुळेच विश्वात ऐक्य नांदते. 

 आज हजारो लोकं येथे जमण्याचे कारण काय ? केवळ प्रेमामुळे तुम्ही येथे आलात. हे प्रेम नसते तर तुम्ही येथे आला नसतात. हे प्रेम कसे आहे ? हे परस्परपूरक आहे. तुम्ही द्या आणि घ्या. तुम्ही परमेश्वराचे प्रेम संपादित करा व परमेश्वराला तुमचे प्रेम अर्पण करा. तथापि दोन्ही एकच आहे, सारखे आहे. मानवी प्रेम हे दिव्य प्रेमाचे प्रतिबिंब आहे, परंतु ह्या दिव्य प्रेमाची देणगी गैरवापर करण्यासाठी दिलेली नाही. तुम्ही त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर केला पाहिजे. तुमचे हृदय विशुद्ध प्रेमाने  भरून टाका व प्रेमात इतरांनाही सहभागी करा. तुमचे राष्ट्र सुखी आणि आनंदी बनवा. हा प्रेमाचा खरा स्वभाव आहे. हे दिव्य प्रेम तुमच्या मध्ये विकसित करा व तुमचा जन्म सार्थकी लावा. तुमच्या हृदयामध्ये परिवर्तन घडवा म्हणजे ते प्रेमाने काठोकाठ भरून जाईल व तेथे द्वेष, मत्सर, तिरस्कार व दुःख यांना जागाच  राहणार नाही. आज मानवता द्वेषभावनेने बाधित आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा, एक गाव दुसऱ्या गावाचा एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राचा द्वेष करते. अशा तऱ्हेने फार मोठ्या प्रमाणात द्वेषभावना सर्वत्र पसरली आहे म्हणून प्रथम तुम्ही द्वेष, तिरस्कार व क्रोध यापासून मुक्त व्हा. हे केवळ प्रेमाद्वारे शक्य आहे. त्यासाठी प्रेम विकसित करा. तुम्ही सर्वांशी प्रेमाने व सस्मित चेहऱ्याने संवाद साधला पाहिजे. एवढेच नाही शत्रूचेही प्रेमाने स्वागत करा. तुमच्या या कृतीने तुम्ही त्याच्या हृदयात परिवर्तन घडवाल. आता ह्या क्षणापासून तुम्ही प्रेमभाव विकसित करा. द्वेषभाव हृदयातून हद्दपार करा. क्रोधाला तुमच्या जवळपासही फिरकू देऊ नका. क्रोधाला दूर ठेवल्यास तुम्ही आनंदी व्हाल. हा आजच्या दिवसाचा खरा संदेश आहे. आज मी येत असताना एका परदेशी व्यक्तीने मला ' Happy Birthday ' म्हटले. त्यावर मी म्हणालो की मी सदैव आनंदी ( Happy ) असतो. तुम्ही सदैव आनंदी नसल्यामुळे मी तुम्हाला आनंदी राहण्यासाठी आशीर्वाद देतो. तुम्ही मला ' Happy Birthday ' म्हणण्याची आवश्यकता नाही कारण मी प्रत्येक क्षणी आनंदात असतो. 

तुम्ही सर्वांनी तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदात घालवावा. तुमचे जीवन आरोग्यपूर्ण असावे; प्रेमाची ही अनमोल देणगी समस्त विश्वासमवेत वाटून घेऊन तुम्ही तुमचे जीवन सार्थकी लावावेत हीच माझी इच्छा आहे. 
- बाबा 
संदर्भ - स्वामींचा, जन्मदिना निमित्त दिलेल्या संदेशातून. 



 जय साईराम

रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" आपल्या अंतर्यामी सर्वकाही सामावलेले आहे." 

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

                     मी हजारो लोकांना प्रेमशक्ती दिली. तसेच नद्या, समुद्र यांनाही प्रेमशक्ती दिली. माझ्याकडे कोणीही एखादा भक्त आला तर मी तात्काळ स्वामींकडे रडून म्हणत असे, " मला तो हवा, मला ती हवी." हे ऐकून सर्व चकित होत, त्यांना वाटे की मी खरोखरच वेडी झाले आहे. मला स्वतःलाही आश्चर्य वाटे. " मी अशी का आहे ?"

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " ' मी ' हे अहंकाराचे प्रतीक आहे. स्वप्रयत्नांद्वारे  साधक अंतरातील ' मी ' ला प्राप्त करून घेतो हाच आत्मसाक्षात्कार होय. "  

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

             स्वामींनी मला हे बऱ्याच वेळा सांगितले. ते ऐकल्यावर मी भयभीत होऊन अखंड रडत होते. मी भित्र्या स्वभावाची आहे. आता हे सांगतानाही मला अशी भीती वाटते, की लोकांना वाटेल मी वेडी आहे ; तथापि स्वामींनी मला हे लिहिण्यास भाग पाडले आहे. १९९९ मध्ये मला हे सांगितल्यावर स्वामी म्हणाले, " जगामध्ये अनेक मोठ्या दुर्घटना घडतील. " त्यांनी भाकित केल्यानुसार मोठ्या दुर्घटना घडल्या आणि अजूनही घडत आहेत. 
             या दरम्यान माझे प्रेम दुथडी भरून वाहत होते. मी त्यावर नियंत्रणही ठेवू शकत नव्हते. मी अखंड अश्रू ढाळत होते. स्वामींनी त्यावर एक उपाय शोधून काढला ते म्हणाले," तुझ्या प्रेमाचा १/१००० व भाग तू प्रत्येकाला दे. त्याने तुला थोडे बरे वाटेल.

उर्वरित प्रकरण पुढील भागात

जय साईराम

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" भाव रूप धारण करतात. "  
 
 प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

                   उच्च अध्यात्मिक तत्वे गोष्टीरूपात मांडली तर मनावर ठसतात . स्वामी आणि मी नाट्यरूपात पुरुष प्रकृती कथा सादर करत आहोत. पुरुष प्रकृती तत्व हाच निर्मितीचा मूळ पाय आहे. लोकांच्या मनात भगवद् भाव  जागृत करण्यासाठी आणि त्यांना उन्नतीची जाणीव होण्यास मदत करण्यासाठी आम्ही जन्म घेतला आहे माझे जीवन प्रकृतीतत्वाचे उदाहरण आहे. 
दुथडी भरून वाहणारे प्रेम.... 
१३ सप्टेंबर १९९९
                 माझ्या पोटात काहीतरी जड असल्यासारखे मला जाणवले. मी ध्यानामध्ये स्वामींना विचारले ते म्हणाले, 
                 " तू प्रकृती आहेस तुझ्या पोटामध्ये  ॐ कार आणि पंचमहाभूते आहेत. तुझ्यामधूनच सर्व गोष्टींची उत्पत्ती होईल . आता अस्तित्वात असलेल्या या मूळ विश्वाप्रमाणेच तू ॐ कार आणि पंचतत्वांसहित नवीन विश्वाची निर्मिती करशील. " 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम



गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

               " साधनामार्गावरून वाटचाल करत साधक पुढे जातो. त्याला वैश्विक ' मी ' चे दर्शन होते. ह्यालाच परमेश्वराचा साक्षात्कार म्हणतात. " 

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

                 ' स्त्री, पुरुष म्हणजे देहभावाशी संबंधित ' याच दृष्टिकोनातून ते पाहतात. हा दृष्टिदोष आहे. याकडे केवळ आत्मा आणि परमात्मा ह्यांच्यामधील बंध याच दृष्टिकोनातून पाहिले गेले पाहिजे. 
                  ' इथेच या क्षणी मुक्ती ' पूर्ण केल्यावर स्वामींनी मला त्याचा दुसरा भाग लिहिण्यास सांगितले. हे पुस्तक पुरुष प्रकृती तत्व आणि कर्मकायदा कसे कार्य करतो हे दर्शविते. पाप आणि पुण्य ही हातकड्यांची जोडी कशी आहे याबद्दलही मी लिहिले आहे. 
                   महान काव्यांद्वारे नीतिमत्ता शिकवली जाते. मानवाच्या हृदयातील सद्गुण आणि दुर्गुण ह्यामधील संघर्ष रामायण व महाभारत यासारख्या काव्यग्रंथांमधून व्यक्त केला आहे. नीतीतत्वे गोष्टीरूपात सांगितली की ती साहजिकच वाचकांना आकर्षित करतात. तीच नीतीतत्वे सिनेमा आणि नाटकाच्या माध्यमातून दाखवली गेली तर त्याचे मनावर खोलवर ठसे उमटतात आणि ती मूल्ये अंतर्यामी रुजतात. तथापि पुरुष प्रकृती तत्व स्पष्ट करणारे कोणतेही उदाहरण नाही. राम - पुरुष - परमात्मा सीता म्हणजे प्रकृती, कृष्ण - परमात्मा आणि राधा म्हणजे प्रकृती. पवित्र ग्रंथामध्ये फक्त इतकेच सांगितले गेले आहे. या तत्वाचे विशेष स्पष्टीकरण केलेले नाही. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " वैराग्याची तलवार आणि बुद्धीचे सामर्थ्य यांच्या सहाय्याने कामनामक शत्रूंचा नायनाट करा. " 

प्रकरण पाच  

चंद्र आणि मन 

                  मी हे स्पष्टपणे लिहिले आहे आणि स्वामींनीही हे अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे; तरीही प्रशांती निलयममधील काही जणांना ह्या शुद्ध प्रेमभक्तीबद्दल शंका आहे. ते याला ऐहिक प्रेम समजतात. या प्रेमाने भगवंताचा महिमा कसा बरं कमी होईल ? 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

ॐ  श्री साई वसंतसाईसाय नमः 

 सुविचार 

             " शिकून वा पुस्तके वाचून अंतःकरणामध्ये परमेश्वराप्रती प्रेमभाव येत नाही तर एखाद्या महापुराप्रमाणे अंतःकरणातून आवेगाने उसळावा लागतो. " 

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

                 "  राधा हे एका स्त्रीचे नाव आहे किंवा तिचे प्रेम हे सामान्य मानवी प्रेम आहे असा विचार करणे चुकीचे आहे. परमेश्वर स्त्री पुरुष असा भेदभाव करत नाही. जर एखाद्या व्यक्तीमध्ये राधेचा शरणागत भाव असेल तर ती स्त्री असो वा पुरुष, राधेचा अंश समजली जाईल. ज्यांच्यामध्ये हा अंश असेल ते परमेश्वराशिवाय दुसऱ्या कशाचाच विचार करू शकणार नाहीत. ते दुसरा कसलाही विचार करणार नाहीत. राधा ज्ञानी आहे, ती या जगात वावरली पण तिने जगाला स्वतःमध्ये राहू दिले नाही. हा अनुभव घेण्यासाठी राधेच्या भक्तीची जाण असायला हवी. " 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम