बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

स्वामींचा प्रेम संदेश 

प्रेमाला ना जन्म आहे ना मृत्यू !
आज मनुष्य निरर्थक इच्छांच्या मागे धावतो आहे आणि अत्यंत स्वार्थी बनल्यामुळे तो केवळ स्वतःच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो. समाजासाठी नाही. समाज कल्याण, राष्ट्र कल्याण हे  दोन्ही अत्यंत महत्वाचे आहे. समाज कल्याण हा आपल्या वर्तणुकीचा भाग असायला पाहिजे. समाजाविना व्यक्तिची प्रगती होऊ शकत नाही. व्यक्ती म्हणजे कोण ? व्यक्तिच्या अंतर्यामी असणारी शक्ती म्हणजेच प्रेमशक्ती होय. ह्या प्रेमशक्तीमुळेच विश्वात ऐक्य नांदते. 

 आज हजारो लोकं येथे जमण्याचे कारण काय ? केवळ प्रेमामुळे तुम्ही येथे आलात. हे प्रेम नसते तर तुम्ही येथे आला नसतात. हे प्रेम कसे आहे ? हे परस्परपूरक आहे. तुम्ही द्या आणि घ्या. तुम्ही परमेश्वराचे प्रेम संपादित करा व परमेश्वराला तुमचे प्रेम अर्पण करा. तथापि दोन्ही एकच आहे, सारखे आहे. मानवी प्रेम हे दिव्य प्रेमाचे प्रतिबिंब आहे, परंतु ह्या दिव्य प्रेमाची देणगी गैरवापर करण्यासाठी दिलेली नाही. तुम्ही त्याचा जास्तीत जास्त चांगला वापर केला पाहिजे. तुमचे हृदय विशुद्ध प्रेमाने  भरून टाका व प्रेमात इतरांनाही सहभागी करा. तुमचे राष्ट्र सुखी आणि आनंदी बनवा. हा प्रेमाचा खरा स्वभाव आहे. हे दिव्य प्रेम तुमच्या मध्ये विकसित करा व तुमचा जन्म सार्थकी लावा. तुमच्या हृदयामध्ये परिवर्तन घडवा म्हणजे ते प्रेमाने काठोकाठ भरून जाईल व तेथे द्वेष, मत्सर, तिरस्कार व दुःख यांना जागाच  राहणार नाही. आज मानवता द्वेषभावनेने बाधित आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा, एक गाव दुसऱ्या गावाचा एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राचा द्वेष करते. अशा तऱ्हेने फार मोठ्या प्रमाणात द्वेषभावना सर्वत्र पसरली आहे म्हणून प्रथम तुम्ही द्वेष, तिरस्कार व क्रोध यापासून मुक्त व्हा. हे केवळ प्रेमाद्वारे शक्य आहे. त्यासाठी प्रेम विकसित करा. तुम्ही सर्वांशी प्रेमाने व सस्मित चेहऱ्याने संवाद साधला पाहिजे. एवढेच नाही शत्रूचेही प्रेमाने स्वागत करा. तुमच्या या कृतीने तुम्ही त्याच्या हृदयात परिवर्तन घडवाल. आता ह्या क्षणापासून तुम्ही प्रेमभाव विकसित करा. द्वेषभाव हृदयातून हद्दपार करा. क्रोधाला तुमच्या जवळपासही फिरकू देऊ नका. क्रोधाला दूर ठेवल्यास तुम्ही आनंदी व्हाल. हा आजच्या दिवसाचा खरा संदेश आहे. आज मी येत असताना एका परदेशी व्यक्तीने मला ' Happy Birthday ' म्हटले. त्यावर मी म्हणालो की मी सदैव आनंदी ( Happy ) असतो. तुम्ही सदैव आनंदी नसल्यामुळे मी तुम्हाला आनंदी राहण्यासाठी आशीर्वाद देतो. तुम्ही मला ' Happy Birthday ' म्हणण्याची आवश्यकता नाही कारण मी प्रत्येक क्षणी आनंदात असतो. 

तुम्ही सर्वांनी तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदात घालवावा. तुमचे जीवन आरोग्यपूर्ण असावे; प्रेमाची ही अनमोल देणगी समस्त विश्वासमवेत वाटून घेऊन तुम्ही तुमचे जीवन सार्थकी लावावेत हीच माझी इच्छा आहे. 
- बाबा 
संदर्भ - स्वामींचा, जन्मदिना निमित्त दिलेल्या संदेशातून. 



 जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा