रविवार, २९ एप्रिल, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " परमेश्वराप्रती असणारे प्रेम, हृदयाच्या गाभ्यामधून महापुराच्या लोट्यासारखे दुथडी भरून वाहायला हवे."

प्रकरण अठरा 

अन्नविद्या 

               मी जन्मापासूनच सातत्याने श्री कृष्णाच्या विचारांमध्येच होते. भक्तीरसामध्ये विरघळून मी भगवंताला माझ्या प्रेमाचा नैवेद्य दाखवला. स्वामींनी माझे प्रेम ग्रहण करून बदल्यात मला सत्य प्रसाद दिला. मी फक्त हाच प्रसाद ग्रहण करते. सर्वसाधारणपणे आपण देवाला अन्नाचा नैवेद्य दाखवून तेच अन्न प्रसाद म्हणून खातो. मी बाह्योपचारांना कधीच महत्व दिले नाही. सर्व काही मनातल्या मनात, अंतरंगात केले. बाह्योपचारांना ' यज्ञ ' म्हटले जाते, तर अंतर्मनातील भक्तीला ' विद्या ' म्हणतात. अशा तऱ्हेने मी रात्रंदिवस माझ्या प्रेमाचा नैवेद्य त्यांना अर्पण करत होते. त्याच्या बदल्यात मला सत्यप्रसादाचा लाभ झाला. याला ' अन्न विद्या ' म्हणतात. कोणत्याही उपनिषदांमध्ये उल्लेख नसलेली ही नूतन विद्या आहे. 
               परमेश्वर आपल्यामध्ये स्फुल्लींगरूपाने वास करत असतो. माझ्या प्रेमरूपी अन्नाने मी त्याचे पोषण केले. तो स्फुल्लींग १५ वॅटच्या दिव्याप्रमाणे प्रकाशु लागला. त्याच्यासाठी मी अविरत अश्रू ढाळल्यामुळे काही काळाने हा दिवा जास्त प्रखर होऊन १०० वॅटच्या दिव्याप्रमाणे प्रकाश देऊ लागला. मी घेतलेल्या परमेश्वराच्या अखंड ध्यासामुळे माझे चिदाकाश उजळून निघाले. जणूकाही हृदयगुंफेतील सूर्यच ! साई सूर्याने माझे अंधकारमय आध्यात्मिक हृदय तेजोमय बनवले. माझे परमेश्वराचे वेड अधिकच वाढले. माझ्या प्रेमाने सर्व मर्यादा ओलांडल्या. ह्या प्रेमाचे अधिकाधिक भक्षण करून तो माधव लक्षावधी सूर्यांच्या तेजाने तळपू लागला. त्याने त्याचे सत्य माझे अन्न केले. आता ' कोटीसूर्य समप्रभ ' अशा त्याला मी पाहू शकते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " मनामध्ये सदैव सत् प्रवृत्ति  आणि दुष्प्रवृत्ती यांच्यामध्ये लढा चालू असतो. मनुष्याने आत्मविश्लेषण करून मनाचे मंथन केले पाहिजे."

प्रकरण अठरा 

अन्नविद्या 

             हृदयगुंफेत निवास करणाऱ्या भगवंताला आपण आपले विशुद्ध प्रेम साधनेद्वारा अर्पण केले पाहिजे. जेव्हा आपण आपली इंद्रियं, मन, बुद्धि, अहंकार ईश्वराभिमुख करतो तेव्हा आपल्या अंतर्यामी वसणाऱ्या भगवंताचे भक्तीरुपी अन्नावर पोषण होते व तो जोमाने वाढतो, विस्तारही पावतो. तो त्याचे सत्य प्रकट करू लागतो आणि ते सत्य आपले अन्न बनते. आपण ज्ञानाने परिपूर्ण होतो. ज्ञानाद्वारे हे नाते जाणून घेणे, हा सत्यप्रसाद होय. 
               मी नेहमीच साई अन्न ग्रहण करते. त्यामुळे माझा स्वभावच सत्य झाला. मी दोन युगांपासून केवळ सत्यच ग्रहण करते आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

सोमवार, २३ एप्रिल, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

मोती चौथा

              १७ एप्रिल २००० रोजी सकाळच्या ध्यानामध्ये स्वामींनी मला मायेविषयी लिहिण्यास सांगितले. 
               माया म्हणजे काय ? जे तेथे नाही ते तेथे असल्याचा आभास निर्माण करणे ह्याला माया म्हणतात. ती कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात दृश्यमान होऊ शकते . हे विश्व विश्वविधात्यालाच झाकून टाकते. जर आपण त्याला विश्व म्हणून पाहिले तर आपल्याला त्याचे विस्मरण होते. परंतु जर आपण केवळ त्याला आणि त्यालाच पाहिले तर आपणास विश्व दृष्टीस पडेल का ?
               हीच माया आहे. निर्मात्याला विसरायला लावून, निर्मितीमध्ये अडकवून ठेवणारी ! 
             अज्ञानाच्या अंधःकारात बुडाल्यामुळे मनुष्य, जे वास्तवात नाही अशा असत्याला सत्य मानून त्यावर विश्वास ठेवतो. नंतर गुरु वा आध्यात्मिक विभूती ज्ञान दीप त्याच्या ठायी ज्ञान ज्योत प्रज्वलित करतात आणि त्या ज्योतीच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधःकार नाहीसा होऊन मनुष्याला बोध होतो. 
              ही माया आहे. आपल्या अज्ञानामुळे आपण भौतिक जीवनाच्या जाळ्यात अडकतो आणि दुःखी होतो. कोणाचे कोणाशी नाते आहे ? भौतिक नात्यागोत्यांना काय अर्थ आहे ? आसक्ती आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या ममत्वामुळे मनुष्य हेलकावे खातो. तो आनंद आणि मनःशांती गमावून बसतो. हा एक मोठा संभ्रम आहे परंतु तो संभ्रम आहे हे समजण्यासाठी आपल्याला गुरुंच्या कृपाशिर्वादांची आवश्यकता आहे. 
             माया मनुष्याला सहज फसवते. तुमची बौधिक पातळी कशीही असली तरी माया मनुष्याला हातोहात फसवू शकते म्हणून आपण सदैव दक्ष राहिले पाहिजे. 
             एकदा स्वामी मला म्हणाले, " तू स्वतःला मायेने झाकून घेतले आहेस मायेमुळे  अनेकजण वाहवत जातात. लोकांची मायेमधून मुक्तता करणारी एकमेव अद्वितीय महामाया तू आहेस. " 
             जर मायेला आपल्यापासून दूर ठेवायचे असेल तर आपण सदैव परमेश्वराच्या चिंतनात व त्याच्या सान्निध्यात राहिले पाहिजे. 
             मायेपासून आपण कसे मुक्त होऊ ? ह्यावर स्वामींनी दिलेले स्पष्टीकरण 
            " मनुष्याचा स्वभाव कसाही असो, माया त्याच्यावर कब्जा करून त्याला गिळंकृत करते. एवढेच नव्हे तर महाज्ञानी, भक्त हेही त्याला अपवाद नाहीत. एखादा धागा आत जाईल एवढे छिद्रही मायेस प्रवेश करण्यासाठी पुरेसे आहे.  चंचुप्रवेश करून माया लोकांवर कब्जा करते. माया विविध रूपांमध्ये प्रकट होते." 
             मी स्वामींनी विचारले," मग ह्यावर उपाय काय ?" 
             स्वामी म्हणाले," प्रत्येक क्षणी आपण दक्ष राहिले पाहिजे. जर तुम्ही २४ तास परमेश्वराच्या चिंतनात मग्न असाल तर माया तुमच्या जवळपास येणार नाही, येऊच शकणार नाही.
             मी विचारले " हे कसे शक्य आहे ? आम्हाला आमची कर्तव्ये आणि कर्म करायची असतात. " 
स्वामी म्हणाले," मग काय झाले ? तुम्ही ते सर्व करू शकता. स्थळकाळाचा विचार न करता जर तुम्ही परमेश्वराचे चिंतन केलेत तर सर्व गोष्टी आपोआप होतील." जेव्हा तेथे परमेश्वराशिवाय दुसरे अन्य काहीही नसते तेव्हा माया तेथे कशी येऊ शकेल ? जे परमेश्वराशी संपूर्ण शरणागत झाले आहे ते मायेपासून मुक्त आहे. परमेश्वराला दृढतेने धरून ठेवणे हा मायेला टाळण्याचा एकमात्र उपाय आहे. " 

*      *     *
संदर्भ - श्री वसंत साईंच्या ' प्रेम निवारण साई ' ह्या पुस्तकातून 


जय साईराम

रविवार, २२ एप्रिल, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " जागे व्हा ! परमेश्वराची दिव्य हाक ऐका. मोक्षप्राप्तीसाठी आता याक्षणी जिकराचे प्रयत्न करा."
प्रकरण अठरा 
अन्नविद्या 
               
                " प्रभू परमेश्वराने ' प्रेम ' ह्या वसंतफलाचा आस्वाद घेतला आणि त्या बदल्यात मला सत्यप्रसाद दिला. सत्यप्रसाद म्हणजे सत्ययुग होय."
                आपण ग्रहण करत असलेले अन्न, आपला स्वभावप्रवृत्ती ठरवते. म्हणून साधकांच्या दृष्टीने आहाराची शुचिता फार महत्वाची आहे. आपण काय खातो याबद्दल साधकाने अत्यंत जागरूक असले पाहिजे. कारण त्या अन्नाचा आपल्या वृत्तींवर प्रभाव पडतो. लहानपणापासून बाहेरचं खाण्यास मला माझ्या वडिलांची परवानगी नव्हती. याबाबतीत ते अत्यंत चोखंदळ होते. ते म्हणत " इतरांनी शिजवलेले अन्न आपण खाल्ले तर त्यांचे गुणावगुण आपल्यामध्ये येतील." आम्हीही ही आज्ञा मानून बाहेर कोठेही खात नसू. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १९ एप्रिल, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" साधना, साधना, साधना ! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो."

प्रकरण सतरा 

युद्धासाठी सुसज्ज 

स्वामी - तू सत्य आहेस. तुझी शक्ती संपूर्ण चराचरात भरून राहू दे. 
वसंता - स्वामी, मला तुम्ही हवे आहात. तुम्हाला सोडून मी एकटी कोठेही जाणार नाही. 
स्वामी - मी तुझ्यामध्येच आहे. आपण दोघं ऐकत्रच जाऊ. तुझा विजय होईल. विजयी भव ! विजयादशमीच्या दिवशी तू विजय मिळवशील, विजयी होशील. 
ध्यानसमाप्ती 
             काही वर्षांपूर्वी मी माझ्या आजच्या ध्यानाशी सुसंगत असे एक गीत लिहिले होते. त्या गाण्यामध्ये मी म्हणते, की मी बंदीवान जीवांची मुक्तता आणि जगातील समस्त लोकांना मुक्ती मिळवून देण्यासाठी लढा देण्यास सुसज्ज आहे. 
   हे प्रभू साईश्वर,
          आगेकूच करीता करिता 
          सामोरे जाऊ युद्धाला 
          आमुच्या सवे 
                                  - आहेस तू अन् 
                                  - तुझ्या दिव्य पादुका 
          युद्धासाठी सुसज्ज आम्ही 
          गुलाम आम्हा करणाऱ्या
          शत्रूचा करू निःपात 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १५ एप्रिल, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " मनाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यांनंतर, ते मन आणि ती गोष्ट एक होऊन जाते. परमेश्वराचा ध्यास घेतलेले मन परमेश्वर बनते."

प्रकरण सतरा

युद्धासाठी सुसज्ज 

            स्वामी एवढे जोरदार बोलल्यानंरही मी डोळे उघडले नाहीत. मी गहन ध्यानात होते. माझ्यामधून अनेक वसंता निर्माण झाल्याचे मी पाहिले. युद्धावर जाण्यासाठी सज्ज झालेल्या सैनिकांप्रमाणे त्यांचा पेहराव होता. सर्व जीवांमध्ये शिरत असलेल्या मला मी पाहिले. लाखो वसंतसैनिक सर्वांमधील दुष्प्रवृत्तीचा नाश करून त्यांच्यात प्रेम भरत होते.
            " मी सत्य आहे. सत्य प्रत्येकामध्ये प्रवेश करत आहे. सर्वांमध्ये जागृती निर्माण करत आहे. केवळ मानवजातच नव्हे तर झाडे, झुडपे, पक्षी, प्राणी या सर्वांमध्येही सत्य प्रवेशत आहे. मी सत्य आहे, मी सत्य आहे. " 
             मी बराच वेळ ह्या भावावस्थेत होते. माझे डोळे उघडत नव्हते. बऱ्याच वेळानंतर मी ध्यानावस्थेतून बाहेर आले व काही क्षणातच माझे डोळे पुन्हा मिटले .....

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १२ एप्रिल, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" जेव्हा  प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पित केले जाते तेव्हा त्याचाच योग होतो."
प्रकरण सतरा 
युद्धासाठी सुसज्ज 

              "  मी मला विभाजित केलं, नंतर माझ्यामधून मला अलग करून लाखो वसंता निर्माण केल्या. ही बिंदूची शक्ती आहे."
१५ सप्टेंबर २००३ पहाटेचे ध्यान 
वसंता - स्वामी, लोकांमध्ये कधी बदल होणार ?
स्वामी - ते कधीही बदलणार नाहीत. केवळ तूच त्यांना बदलायला हवेस. तू त्यांचं परिवर्तन कर. तूच अनेक हो. तुझ्यातील एकास लाखो रूपांमध्ये विभाजित करून प्रत्येकामध्ये प्रवेश कर. प्रत्येकात शिरून कार्यतत्पर हो. अनेक हो, सर्व हो. वसिष्ठ ऋषींच्या गाईमधून निर्माण झालेल्या सैन्याप्रमाणे तुझ्यामधूनही लक्षावधी वसंता निर्मण होवोत. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, ८ एप्रिल, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" खरा आनंद आत्मसाक्षात्कारामध्ये दडलेला आहे."

प्रकरण सोळा 

ऑपेरेशन संस्कार 

               मनामध्ये खोलवर रुजलेले संस्कारच पुनर्जन्मास कारणीभूत होतात. माझ्या मनातील भाव हेच शस्त्र बनवून लोकांच्या मनातील जुने संस्कार काढून टाकण्यासाठी मी संस्कार शस्त्रक्रिया केली. मी माझ्या प्रेमभावाच्या संपूर्ण शक्तीनिशी शस्त्रक्रिया केली. 
                सत्युगामध्ये कोणाचाही जन्म कर्मांमुळे होणार नाही. कोणावरही कर्माचे ओझे नसेल. देह कर्मापासून मुक्त असेल व मन जुन्या संस्कारांपासून मुक्त असेल ; कारण संस्कार शस्त्रक्रिया करून, सर्वांचे जुने संस्कार काढून टाकून मला स्वतःलाच त्या जागी मी रोपीत केले आहे. सर्वांमध्ये माझा समर्पित भाव असेल. जगदोद्धार करण्याच्या माझ्या शुद्ध भावाची ताकदच सत्ययुग आणणार आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" निर्मल हृदय स्वच्छ आरशासारखे प्रतिबिंबित होते. "

प्रकरण सोळा

संस्कार ऑपेरेशन 

७ सप्टेंबर २००३ सकाळचे ध्यान
स्वामी - परमेश्वरप्राप्ती झाल्यांनतर सर्व महान आत्मे सारखीच आनंदाभूती घेतात. त्यांना सत्य दर्शन होते. परमोच्च स्थितीला पोहोचल्यानांतर सर्वांचा अनुभव एकसारखाच असतो. तू मात्र परमेश्वराशी योग झाल्यांनतर मिळणाऱ्या दिव्यानंदाची अनुभूती नाकारत आहेस. सर्वांना याची अनुभूती मिळावी, असे तुझे म्हणणे आहे. तू सर्वांना तुझ्याबरोबर खेचून आणते आहेस. हे यापूर्वीही कोणी केलं नाही आणि पुढेही कोणी करणार नाही, न भूतो न भविष्यती ! 
वसंता - स्वामी, काही तरी करा ना जेणेकरून मी त्यांना तुमच्याकडे घेऊन येऊ शकेन. हे कसं काय करायचं ? मी सर्वांमध्ये प्रवेश करायला हवा. माझे भाव सर्वांच्या अंतर्यामी पोहोचले पाहिजेत. स्वामी, हृदयरोपण, मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया करतात ; तशी संस्कार रोपण शस्त्रक्रियाच केली पाहिजे. सर्वांच्या मनातील जुने संस्कार काढून तिथे मला माझ्या संस्कारांचे रोपण केलेच पाहिजे. तसे केले तरच त्यांच्या मनात माझे भाव रुजतील. मी सर्वांची हृदये माझ्या प्रेमाने निर्मल करून त्यांचे हिऱ्यामध्ये रूपांतर केले पाहिजे. प्रत्येकाच्या मनातील जुने संस्कार मला काढून टाकायला हवेत. 
स्वामी - तुला हे ' शक्य ' आहे आणि तू ते करशीलच. केवळ कृष्णावर असलेल्या राधेच्या एकाग्र भक्तीमध्येच ते सामर्थ्य आहे. एखाद्या कागदाच्या तुकड्यावर भिंग धरून सूर्यकिरण एकत्रित केले तर अग्नी निर्माण होतो. त्याचप्रमाणे तुझ्या प्रेमाच्या सामर्थ्याने सर्वांची कर्मे बेचिराख होतील. 
वसंता - स्वामी, मी सत्य आहे. सर्वांना सत्यप्राप्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे. मी सर्वांना सत्य बनवेन. 
स्वामी - तू हे करणार आहेस. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १ एप्रिल, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " मनामध्ये कधीही न शमणारी आध्यात्मिक तृष्णा जागृत झाल्यास नरजन्माचे सार्थक होते."

प्रकरण सोळा 
संस्कार ऑपरेशन    
               
               " मी संपूर्ण मानवजातीचा स्वभावच (नैसर्गीक प्रवृत्ती ) बदलून टाकेन आणि त्यांची नव्याने उभारणी करेन. ह्या जगामध्ये फक्त आम्ही दोघंच असू. स्वामी आणि मी !" 
               ' सर्वांना परमेश्वराप्रत नेले पाहिजे ' प्रत्येकाने मोक्ष मिळवला पाहिजे. ह्या इच्छेने सध्या मी झपाटली गेले आहे. सर्वांना त्याच्याप्रत घेऊन जाणे ह्या एकमेव अखंड ध्यासाने, माझे मन माझ्या ध्येयप्राप्तीसाठी सतत नवनवीन मार्ग शोधत असते. " या सर्वांचे परिवर्तन कशाप्रकारे करता येईल ? सर्वांच्या मनामध्ये गतजन्माचे संस्कार रुजलेले आहेत, मग हे कसे काय घडेल ?" हेच विचार माझ्या मनामध्ये सतत घोळत असतात. 
               मला एक कल्पना सुचली. ' मी संस्कांचे ऑपरेशन करेन !' मी सर्व जुने संस्कार काढून टाकून त्याठिकाणी माझे प्रेमभाव रुजवेन. असे केल्याने सर्वजण ' वसंता ' होतील. कोणीही गतजन्मातील संस्कार व कर्म यांचे परिणाम अनुभवणार नाहीत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम