रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ३२  

ध्यान 

वसंता : स्वामी, दर्शनामध्ये तुम्ही त्या विकलांग मनुष्याला पाहून मागे सरलात आणि त्याला तुमच्या चरणांना स्पर्श करू दिला नाहीत, असे का ?

स्वामी : परमेश्वर साक्षीभावात असतो. तो इतरांच्या कर्मात हस्तक्षेप करत नाही. त्याने स्वतः निर्माण केलेले कायदे तो मोडत नाही. तू येथे कर्मामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आली आहेस. कर्मांचे संतुलन करण्यासाठी तू दुःख भोगते आहेस समस्त असूर वंशाचा नाश करण्यासाठी रामाची शक्ती त्याच्यापासून दूर झाली. आपल्या वियोगाद्वारे सर्व कर्मांचा नाश होत आहे. 

ध्यान समाप्ती 

           १९९८ सालची गोष्ट आहे. दर्शनाचे वेळी साई कुलवंत हॉलमध्ये पाठीला  कुबड असलेला एक मनुष्य पहिल्या रांगेत बसला होता. स्वामी त्याच्या जवळून जात असताना त्याने स्वामींच्या चरणांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ स्वामी मागे सरकले व त्याच्या कडे नापसंतीदर्शक कटाक्ष टाकून त्याला ' चरणांना स्पर्श करू नकोस ' असा हाताने इशारा केला. त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने हा प्रसंग मला कथन केला. मी स्वामींना ह्याविषयी विचारल्यावर ते म्हणाले," परमेश्वर इतरांच्या कर्मात हस्तक्षेप करत नाही तो केवळ साक्षीभावात असतो. 

           त्या मनुष्याने स्वामींच्या चरणांना स्पर्श केला असता तर कदाचित त्याची कर्म कमी झाली असती. हे घडणे स्वामींना मान्य नव्हते. परमेश्वर कधीही कोणाच्याही कर्मांमध्ये हस्तक्षेप करत नाही. एखाद्यावर विशेष कृपा करायची असेल तर कधीतरी तो त्याच्या कर्मांमध्ये बदल करतो. केवळ परमेश्वर सर्वांच्या कर्मांचा हिशेब जाणतो.

           परमेश्वराची शक्ती म्हणून मी अवतरलेय. मी कर्मांमध्ये बदल घडवू शकत नाही. वा कर्म संहार करू शकत नाही. मी केवळ माझ्या स्थूल देहावर त्यांच्या पीडा  (क्लेशां) घेऊन कर्मे समतोल करू शकते. यासाठीच मी दुःख भोगते आहे, आणि स्वामीसुद्धा दुःख भोगत आहेत. 

         आम्ही शारीरिक दुःख भोगत आहोत तसेच ह्यावेळी हे वियोगाचे दुःख हृदय पिळवटून टाकणारे आहे ह्या अतीतीव्र दुःखाद्वारेच सर्वांच्या कर्माचा हिशेब चुक्ता होईल. वियोग अश्रू आणि मीलनाची आस हयामुळे कर्मसंहार होऊन वैश्विक मुक्ती साध्य होते. मी माझ्या अनेक पुस्तकांमधून लिहिले आहे. माझे भाव स्तूपाद्वारे बाहेर पाठवले जातात आणि विश्व परिवर्तन घडते. हे लोकांमधील परिवर्तन आहे, संहार नव्हे ह्याच कारणामुळे सध्या दुःखाची तीव्रता अधिक आहे. असे हे विशेष अवतार कार्य पूर्वीच्या अवतारांनी कधीही केले नव्हते. प्रेमावतार पुस्तकात, हा अवतार कसा विशेष आहे, हे स्वामींनी स्पष्ट केले आहे. स्वामी म्हणतात, 

           " देवतेच्या निर्मितीतत्वांच्या  पलीकडे जाऊन तू स्वतःची निर्मिती करत आहेस. 

           उदाहरणार्थ सीतेने मायावी मृग आपल्याला हवा अशी इच्छा केली. तू ह्या क्षुल्लक इच्छेविना स्वतःस तयार करत आहेस. अशा प्रकारे रूक्मिणी, सत्यभामा, दाक्षायिणी आणि इतर देवतांमधील छोट्या छोट्या दोषांविना तू पावित्र्याची परिपूर्ण शिल्पकृती साकारत आहेस. तू निर्दोष महाशक्ती अवतार म्हणून स्वतःस निर्माण करत आहेस, ह्या विश्वाने पूर्वी कधीही पाहिले नाही असे देवता तत्व तू दाखवून देत आहेस. देव देवतांनीही कधी कल्पना केली नसेल असे तुझे पातिव्रत्य श्रेष्ठतम आहे. 

          प्रेम साई अवतारात तुला साजेसे माझे रूप तू साकारत आहेस. राम, कृष्ण आणि सत्य साई ह्यांच्यामधील दोष दूर करून तू प्रेम साई अवतार घेऊन येत आहेस. पुढील अवतार काळात सार काही परिपूर्ण असेल. प्रेम साई अवतार एक परिपूर्ण अवतार असेल. त्याचे प्रेम निर्दोष व परिपूर्ण असेल ! " 

संदर्भ - श्री वसंत साईंच्या ' चैतन्य ' ह्या पुस्तकातून 


जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा