मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार - ९ जानेवारी 

        " प्रथम भाव तरंग निर्माण होतात आणि नंतर विचार. विचार कृतीत उतरण्यापूर्वी आपण सारासार विवेक करावयास हवा. हे चांगलं आहे का? यामुळे मला  भगवत्प्राप्ति होण्यास मदत होईल का? "

पहिल्या प्रथम मनात भाव तरंग निर्माण होऊन ,नंतर ते विचारात परिवर्तीत होतात. जेव्हा जेव्हा आपल्या मनात भाव निर्माण होतो तेव्हा तेव्हा आपण स्वतःस विचारावं की, " हे चांगलं आहे की नाही?"  आपण येथेच ते भाव छेदून टाकले नाही तर ते विचार खोल ठसे बनतात. हे खोल ठसे आपल्या जन्म मरणाचं कारण असतात. आपल्याला मानवी जन्म भगवत्प्राप्ति करता मिळाला आहे. भौतिक सुखांच्या उपभोगासाठी हा जन्म नाहीये. इंद्रिय सुखं क्षणिक असतात. नवविवाहित अगदी आनंदी असतात. असे असूनही कालांतरानं त्यांच्यात मतभेद निर्माण होतात. तुमचा तो आनंद कुठे नाहीसा  होतो? मग मुलगा होतो, तुम्ही सुखी होता. मुलगा मोठा होतो आणि आई -  वडिलांबरोबर वाद घालू लागतो. आता तो आनंद कुठे जातो? भौतिक जीवनाचं  नाशवंत स्वरूप यामधून दिसून येतं. यावर तुम्हाला कोणीही शाश्वत उपाय सांगू शकत नाही, तसेच तुम्हाला जन्म - मरणाच्या चक्रातून मुक्तही करू शकत नाही. जीवनाच्या या वास्तविकतेवर चिंतन करा. सर्वानी त्यांची कर्तव्ये आसक्तीविनाच केली पाहिजेत. ही आसक्तीच सर्वाना जन्म मरणाच्या फेऱ्यात ढकलते. 'मी, आणि माझं ' ही प्रवृत्ती आसक्तीला जन्म देते. खरं तर ही आसक्ती म्हणजे मायाजाल होय. माया मेनकेच्या रूपातच यायला हवी असं काही नाहीये. आपले अनेकानेक विचारच विविध मेनका आहेत. चांगले विचार भगवत्प्राप्तिकरता मदत करतात; तर वाईट विचार तुम्हाला त्यापासून दूर ठेवतात. म्हणून प्रत्येकाने विचाराच्या पातळीवरच संयम ठेवून विवेक करायला हवा.  
"चांगलं पहा, चांगलं व्हा आणि चांगलं करा " ही भगवान श्रीसत्यसाई बाबांची शिकवण आहे. सगळ्यात चांगलंच पहायला  पाहिजे. मी ही  शिकवण खूप लहान वयातच आचरणात आणली. मी "तोडा आणि जोडा" ही पद्धत वापरली. मी जे काही पाहत असे त्या प्रत्येकाचा भौतिक अर्थ तोडून भगवंताशी जोडत असे. ही साधी पायवाट भगवत्प्राप्तिचा राजमार्ग झाली. अशा रीतीने मी अक्षरश: जे काही पहिले ते ते सर्व भगवंताशी जोडले. या विषयावर मी अनेक अध्यायात विस्तारानं लिहिलं आहे.
आता आपण एक गोष्ट पाहू  यात. एकदा दरबारातील ज्येष्ठांनी दुर्योधनास सांगितले,"जगभर फिरून एक चांगला माणूस शोधून आण. " दुर्योधन जगभर फिरून हात हलवत परत आला व म्हणाला, " मला चांगला माणूस भेटलाच नाही. ह्या जगात सगळे वाईट आहेत. मी एकटाच चांगला आहे." नंतर त्यांनी धर्मराजास एक वाईट माणूस शोधून आणण्यास सांगितले. तो शोधात निघाला, तथापि काही दिवसांनी एकटाच परतला. धर्मराज ज्येष्ठांना म्हणाला,"ह्या जगातील एकूणएक सर्व चांगले आहेत. मी एकटाच वाईट आहे." त्या दोघांचे उत्तर त्यांचा स्वभाव दर्शविते. त्यांचा स्वभाव त्यांच्या उत्तरातून प्रतिबिंबित झाला होता. 
धर्मराजा स्वतः इतका चांगला होता की त्याला जगात कोणीही वाईट दिसू शकले नाही. त्यानं चांगलं पाहिलं, त्याचे विचार चांगले होते आणि पर्यायानं आचरणही चांगलं होतं. स्वामींची शिकवणसुद्धा हीच आहे,"चांगलं पहा, चांगलं रहा आणि चांगलं वागा." तुम्ही जर या शिकवणुकीनुसार वर्तन केलंत तर भगवत्प्राप्ति  करू शकाल. 
मी जे जे काही पहाते ते सर्व भगवंताशी जोडते. हा माझा स्वभाव आहे. या स्वभावामुळे मी "यद् भावं तद् भवति" ह्या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. माझा प्रत्येक विचार सत्यात उतरतो. माझ्या तपश्चर्येमुळे अखिल सृष्टी,'सत्य साई' होते. सर्वत्र, प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये 'साई चेतना ' जागृत होते. हेच साई युग आहे, सत्य युग आहे. माझ्या भावविश्वाद्वारे केवळ मलाच भगवत्प्राप्ति होते असं नाही तर, माझ्यामुळे स्वामी सर्वाना भगवत्प्राप्ति बहाल करतात. हे सर्व माझ्या भाव तरंगांमुळे शक्य होते.

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा