गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार - १४ जानेवारी 

      " तुम्ही कुठेही असा आणि काहीही करीत असा, त्यावेळचं तुमच्या हातातील कार्य भक्तिभावानं  करा. "

हा अतिशय महत्वाचा सुविचार आहे. लोकं सहसा देवपुजेसाठी ठराविक वेळ राखून ठेवतात. ते सकाळी आणि संध्याकाळी यंत्रवत देवघरात जाऊन पुजापाठ करतात. ते देवासाठी दिवसाकाठी  पाच ते दहा मिनिटं वेळ काढतात. हे काही बरोबर नाहीये.  भगवत गीतेच्या तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण कर्मयोगावर नि:संदिग्धपणे सांगतात की, तुम्ही जे कोणतेही कार्य हाती घेता ; ते श्रद्धेने पूजा म्हणून करा. तुम्ही प्रत्येक कृती भक्तिभावाने करावयास हवी. अशा रीतीनं साधं काम सुद्धा कर्मयोगात परिवर्तीत होते आणि भगवंतास अर्पण होते. स्वामींनी मला भगवतगीतेवर भाष्य लिहायला सांगितले. भगवतगीतेची शिकवण मी आचरणात कशी आणली ; ते त्यांनी माझ्या जीवन शैलीमधून दाखविण्यास सांगितले. पुस्तक लिहीत असताना माझ्या लक्षात आलं की, माझ्या नकळत मी गीतेचे अठराही अध्याय माझ्या आचरणात आणले होते. सकाळी दात घासताना मी देवाचा विचार करते. हात जरी दात स्वच्छ करण्याचं कार्य करीत असले तरी मन भगवंतामध्ये मग्न असते. ह्यामुळे हे सर्वसाधारण कार्य कर्मयोग होते. कृती पुजेत परिवर्तीत होते. स्नान करतेवेळी मी विचार करते की; हे पवित्र गंगा जल आहे आणि म्हणते, " हे जलनिधे, गंगा माता माझी पापं नष्ट कर.  " मग मी सर्व पवित्र नद्यांना त्यांच्या नावांनी आवाहन करीत असते . ह्यामुळे साधी आंघोळ करण्याची क्रिया पूजा होऊन स्नान योगात बदलली. 
 आता आपण एक गोष्ट पाहू यात. एकदा पार्वतीनं भगवान शंकरांना विचारलं की, पवित्र गंगा नदीत स्नान करणाऱ्या सर्वांना मुक्ती मिळते ना?  भगवान शिवाने नकारात्मक उत्तर दिलं. हे अजून विस्तारानं स्पष्ट करण्यासाठी शिव  पार्वतीसह एका रोगग्रस्त जोडप्याच्या रूपात पृथ्वीवर अवतरले. गंगा नदीत डुबकी मारून येणाऱ्या सर्वांना पार्वती देवी विनवत होती की; आता तुम्ही पापमुक्त झाले असाल तर माझ्या नवऱ्याला एक कप पाणी द्या, ते रोगमुक्त होतील. तिच्या असं लक्षात आलं की त्यांची पापं नाहीशी झाली असा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा कुणा एकालाही नव्हती. ती चकित झाली. पर्यायानं एकही जण तिच्या मदतीला आला नाही. अखेरीस एक गुन्हेगार गंगेत आंघोळ करून आला. गंगा स्नानाने आपण पापमुक्त झालो ; यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. त्यानं पार्वतीला तात्काळ मदत केली अन तो रोगग्रस्त वृद्ध बरा झाला.
पुष्कळ लोकं रोज गंगा नदीत स्नान करतात, तथापि ते पापमुक्त होतात यावर त्यांचा पूर्ण विश्वास नसतो. असे असेल तर  गंगेत स्नान करण्याचा काय उपयोग? माझ्या बाबतीत मी माझ्या भक्तिभावानं माझ्या घरातील साधं जल गंगाजलात परिवर्तीत केलं. ह्यामुळे साधी आंघोळीची कृती पुजेत बदलते. तुमच्या कृतीमध्ये हा भाव नसेल तर प्रत्यक्ष गंगा स्नानही निरुपयोगी आहे. 
आता आपण स्वयंपाकाविषयी पाहू  यात. स्वयंपाकास सुरुवात करण्यापूर्वी मी स्टोव्हवर विभुतीनं 'साईराम ' लिहून प्रार्थना करते, "हे प्रभू , मी जो काही स्वयंपाक करते तो तुला अर्पण करते. सगळा स्वयंपाक चांगला होवो आणि तो सत्व गुणांनी परिपूर्ण असो." अशा रीतीनं स्वयंपाक करण्याची सामान्य क्रिया पुजापाठात बदलते. सकाळपासून रात्रीपर्यंत मी प्रत्येक घरकाम याच पद्धतीनं करते. आपल्या भावभावनांद्वारे सर्वसाधारण कामेसुद्धा पवित्र होतात. ही देवघरात केलेली यंत्रवत पूजा नाहीये. ही जीवनभर क्षणोक्षणी केलेली पूजा आहे. ह्या पुजेमुळे कलियुगाचं सत्ययुग होतं.    
हा सगळ्यात मोठा फायदा आहे. साधारणपणे लोकं दर दिवशी पुजापाठाकरिता काही मिनिटं राखून ठेवतात. तथापि माझी जीवनभराची क्षण नं क्षण केलेली पूजा आहे. ह्यामुळे वैश्विक मुक्ती प्रदान होते.  म्हणून तुम्ही दिवसाकाठी थोडे क्षण  पूजा करू नका तर पुजापाठ हाच जीवनाचा आधार बनवा. ही पूजा यंत्रवत असता कामा नये, तरच ती तुम्हाला जन्म- मृत्यूच्या चक्रातून सोडवेल. तुमच्या पुजेची जागा देवघरात सीमित करू नका. तुम्ही ऑफिसात असा, प्रवासात असा, कुठेही असा; तुमचे कर्म भगवंताला अर्पण करण्याच्या भावनेने करा. 
आता आपण एक उदाहरण पाहू यात. मी पूर्वी ट्रेननं दिल्ली, मुंबई, पुणे, चंदिगढ असा प्रवास करीत असे. आम्ही सर्वजण एकत्र बसून ध्यान, सत्संग, अभिषेक, मंत्रपठण, आणि भजने , गाणं असं सर्व करीत असू. आमचे सहप्रवासी आमच्या कार्यक्रमात सहभागी होत असत. अशा रीतीनं आम्ही ट्रेनचं रूपांतर मंदिरात करत असू. जेव्हा मी ऑस्ट्रलियाला गेले होते तेव्हा असंच झालं. आम्ही विमानतळावर बसून ध्यान करत होतो, तेव्हा पुष्कळ जण येऊन आमच्याबरोबर ध्यानाला बसले. ध्यानानंतर मी डोळे उघडले आणि मला धक्काच बसला. माझ्या भोवती खूप जणं ध्यानात बसली होती. ह्यामुळे एक साधा विमान तळ पवित्र मंदिर झाला. कारने प्रवास करताना सुद्धा आम्ही सत्संग करीत असू .तसेच मी माझे लिखाणही करीत असे. अशा  पद्धतीनंआम्ही कुठेही असलो तरी, कुठेही जात असताना, आणि कुठलीही कामं करीत असता वातावरणात पावित्र्य निर्माण करीत होतो. 
२५ /६ /२०१६  मध्यान्ह  ध्यान 
वसंता : स्वामी, तुम्ही राधा,कृष्ण आणि आपल्याबद्दल काही सांगा नं. 
स्वामी : कृष्णानं राधेला स्वतःपासून विभागलं. त्याच्या ल्हादिनी शक्तीनं राधेचं रूप धारण केलं. तिनं त्याला आनंदानुभव दिला. मी तुला माझ्यापासून विभागलं. तू  माझी संकल्प शक्ती आहेस. माझ्या कार्याला तू पूर्णत्व देतेस. राधा कृष्ण; तसेच तू आणि मी साधारण  स्त्री व पुरुष नाही आहोत. ही रूपं केवळ आपल्या कार्याकरिता आहेत. 
वसंता : आता मला समजलं स्वामी. तुम्ही लवकर या. तुम्ही आला नाहीत तर माझ्या अव्याहत लिहिण्याचा काय उपयोग?
स्वामी : असं बोलू नकोस गं. मी येईन. केवळ तुझ्या लेखनामुळे जगाचा उद्धार होणार आहे. 
ध्यान समाप्त.  
आता आपण पाहू यात - राधेचा उदभव कृष्णामधून झाला आणि माझा स्वामींमधून. आम्ही स्त्री आणि पुरुष अशा व्यक्ती नाही आहोत. राधा कृष्णाची ल्हादिनी शक्ती आहे. मी स्वामींची संकल्प शक्ती; जी त्यांचा संकल्प पूर्ण करते, ती शक्ती मी आहे. नवसृष्टीची निर्मिती हे स्वामींचं कार्य आहे. जेव्हा भगवान निर्मितीचा संकल्प करतो तेव्हा तो विराट पुरुषाचं रूप धारण करतो. ह्या रूपामध्ये स्त्री व पुरुष आलिंगन अवस्थेत असतात. हे दोघे विभक्त झाले की निर्मितीची सुरुवात होते. हे सर्व प्रतिकात्मक आहे. स्वामी आणि मी;आम्ही भौतिक पातळीवर कधीच एकमेकांना स्पर्श केला नाही, अथवा कधी एकमेकांशी बोललोसुद्धा नाही. आमचा फक्त आणि फक्त भावसंगम, हृदयाचं मीलन आहे. आमच्या हृदयाच्या मीलनानेच बाहेर विश्व् ब्रह्म गर्भ कोट्टम या मंदिराचं रूप धारण केले आहे. येथूनच आमचे भाव स्तुपाद्वारे अवकाशात प्रवेशतात आणि जग परिवर्तन घडून येते. बाल वयातच स्वामींनी घोषित केलं होतं की, " मी माझ्यापासून मला विभक्त केले, जेणेकरून मी स्वतःवर प्रेम करू शकेन." स्वामींनी मला त्यांच्यापासून विभक्त केले. तद्नंतर मी प्रकाशरूपात माझ्या आईच्या गर्भात प्रवेश केला, आणि माझा जन्म झाला. अखेरीस माझ्या कायेचं ज्योतीमध्ये रूपांतर होऊन मी स्वामींमध्ये विलीन होईन. आम्ही साधारण स्त्री पुरुष नाही,याचा हा पुरावा आहे.

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा