गुरुवार, ३० जानेवारी, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       " आपले जीवन एक स्वप्न आहे. जेव्हा आपण त्या स्वप्नातून जागे होऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की ही सर्व प्रभूची दिव्य लीला आहे " .

पुष्प अकरावे पुढे सुरु

*अर्चना :- पृथु राजाने पूर्ण विश्वात परमेश्वर पहिला आणि त्याने त्याचा प्रत्येक विचार , उच्चार व कृती भगवंतास अर्पण केली.  मी माझ्या जीवनात याचे आचरण कसे केले ? मी प्रत्येकात अन्  प्रत्येक गोष्टीत परमेश्वराला पाहिले.  मला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मी त्यांचे चांगले गुण आत्मसात केले.  मी सर्वांना माझा गुरु मानते , सर्वांशी नम्रतेने वागते.  जसे आपण परमेश्वरासमोर वागतो तसेच प्रत्येकाबरोबर वागले पाहिजे.  मी प्रत्येकामध्ये व प्रत्येक गोष्टीत परमेश्वरास पाहिले हा माझा स्वभाव आहे.  मी माझा प्रत्येक विचार , उच्चार व कृती परमेश्वरास अर्पण करते.  त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीत सावधानता बाळगते. 
           माझे जीवन म्हणजे अर्चना आहे. अर्चना म्हणजे भगवंताची सहस्त्र नामे उच्चारत फुले वाहणे नव्हे. अर्चना म्हणजे आपले पुष्प समान विचार परमेश्वराला अर्पण करणे.  आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार हा परमेश्वराला अर्पण करण्यासाठी ताज्या टवटवीत फुलासारखा असायला हवा.  त्याला अर्पण करण्यासाठी प्रत्येक विचार जणू नुकतेच उमलेले तजेलदार पुष्प ! आपण अर्चना करतांना कधीही वाळलेली किंवा शिळी फुले वापरत नाही. म्हणून आपल्या मनात कुविचार येता कामा नये.  आपले विचार चांगले असावे तरच त्यानुसार आपले उच्चार व कृती होतील. 
* वंदना :- यासाठी अक्रूराचे उदाहरण सर्वोत्तम आहे असे स्वामींनी सांगितले आहे.  अक्रूर सदैव परमेश्वराची नम्र वंदना करीत असे.  वंदन करण्यासाठी विनयशीलता आणि शुचिता अत्यंत आवश्यक आहेत.  स्वामी म्हणतात की , " केवळ पुज्यभावाने दोन हात जोडून नमस्कार केल्याने खरी वंदना होत नाही , तर वंदना म्हणजे ज्ञानेन्द्रिये व कर्मेंद्रिये यासहीत परमेश्वर चरणी संपूर्ण शरणागत होणे.  सदैव परमेश्वराच्या इच्छेनुसार कर्म करा.  यासाठी माझी अवस्था कशी बरं अनुरूप आहे ?
           वशिष्ट गुहेत माझे मन , बुद्धि , इंद्रिये , अहंकार आणि चित्त स्वामींमध्ये विलीन झाले , अन् केवळ देह उरला . तो ही ज्योतीरूप होऊन स्वामींच्या देहात विलीन होईल . देहासहित अंतर्बाह्य वंदन कसे करावे हे यातून दर्शवले गेले . अक्रूर सदैव परमेश्वरासमोर नतमस्तक असे . माझ्या जीवनात स्वामी सदैव माझ्याजवळ आहेत . मला ' मी ' नसल्यामुळे मी जे काही करते ते स्वामीच माझ्याद्वारे करतात . 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात....... 
जय साई राम

रविवार, २६ जानेवारी, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

    " प्रवाहा बरोबर जाऊन आनंदाची प्राप्ती करुन घ्या . परमेश्वराला त्याच्या इच्छेनुसार तुमचे जीवन नियंत्रित करू दया ".
वसंतामृतमाला

पुष्प अकरावे 
देह सेतू आहे
            
           १० व्या मालेमध्ये नवविधा भक्तिमार्गावर चिंतन करत मी लिहायला सुरवात केली.   श्रवण व कीर्तन या विषयी आपण पहिले , आता विष्णुस्मरण पाहू .
* विष्णुस्मरण :- विष्णुस्मरण म्हणजे परमेश्वराचे अखंड नामस्मरण . भक्त प्रल्हादावर ओढवलेल्या अनेक आपत्तींचे निवारण विष्णुस्मरणामुळे झाले .लहानपणापासून मी दररोज ध्यानानंतर ' ॐ नमो नारायणाय ' चा ५०,००० जप करीत असे . यापूर्वी मीही अनेक संकटांचा सामना केला . मी भूतलावर प्रथमच जन्म घेतल्यामुळे मला माझा जन्म ही एक आपत्तीच वाटते . जरा , व्याधी व मृत्यू या तीन आपदांपासून सुटका करून घेण्यासाठी मी अखंड नामस्मरण केले . ह्या तिन्ही गोष्टी मला स्पर्श करणार नाहीत असे स्वामींनी मला सांगितले तथापि माझी यातून सुटका झाली की नाही हे केवळ काळच ठरवेल. कालच याला उत्तर देईल . याची फल निष्पति मला माहित नाही , त्यामुळे मी सदैव परमेश्वराचा धावा करते मी प्रल्हादाने जपलेल्या ' ॐ नमो नारायणाय ' ह्या मंत्राचाच जप करते , त्यामुळे सत्य नारायणाने स्वतः मी त्यांची शक्ती असल्याचे घोषित केले . ही परमोच्च अवस्था आहे , नामस्मरणाचे  शिखर परमेश्वराने स्वतः नामस्मरणाचे फळ व्यक्त केले .
* पादसेवन :- महालक्ष्मी याचे उत्तम उदाहरण असल्याचे स्वामींनी सांगितले . तिने स्वतःस पूर्णत्वाने परमेश्वराच्या पदसेवेसाठी समर्पित करून केवळ त्यांचे चरण घट्ट पकडून ठेवले . त्या चरणांपासूनच सृष्टीची निर्मिती होते हे जाणल्यामुळे तिने त्यांचे चरण घट्ट पकडून ठेवले . ब्राम्ह्देवांनी स्वतः ते चरण पवित्र गंगाजलाने धुतले आहेत . अखिल विश्व व्याप्त करणारे हे चरण ! लक्ष्मीने त्यांचे सर्वव्यापकत्व जाणले असे स्वामींनी सांगितले . मी माझ्या जन्मापासून स्वामींचे चरण पकडून ठेवले आहेत . माझे वडील , आजोबा आणि सर्व कुटुंबिय विष्णुचरणी शरणागत होते . आमच्या घरामध्ये भगवत्   चरणांची पूजा होत असे . आमच्या घराच्या प्रवेशद्वारावर तसेच प्रत्येक दरवाज्यावर शंख , चक्र व चरणकमलांची चित्रे चितारली होती .
           मला स्वामींविषयी समजल्यानंतर , मी त्यांचे चरण पकडून ठेवले , त्यामुळे मला स्वामींच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेल्या पादुका मिळाल्या . जेथे जाईन तेथे मी पादुका घेऊन जात असे . १९८६ मध्ये दिलेल्या प्रवचनात पदसेवेविषयी स्वामी म्हणाले की संपूर्ण विश्वाची उत्पत्ती या चरणांमधून झाली आहे . आता मुक्ती निलयम् मधून स्वामी न मी प्रत्यक्ष दर्शवित आहोत . आम्ही स्वामींच्या पादुकांसाठी विश्व ब्रम्ह गर्भ कोटम्  मंदिर बांधून तेथे पादुकांची स्थापना केली . मंदिरातून उगम पावणारे आमचे भाव मुक्ती स्तूपाद्वारे सर्वदूर फैलावत नवनिर्मिती करतात . मी माझ्या जीवनाद्वारे पदसेवनाचा महिमा दर्शवत आहे . आणि म्हणूनच आम्ही महाविष्णु व महालक्ष्मी असल्याचे स्वामी घोषित करतात . ब्रम्ह गर्भ कोटम् हे वैकुंठ आहे . येथूनच वैकुंठ भूतलावर  उतरते  व कलियुगाच्या पृथ्वीचे वैकुंठात परिवर्तन होते . इथे मुक्ति निलयम् मधे जागोजगी स्वामींची पदचिन्हे उमटली आहेत भूमिपूजनाच्या   वेळी  वाळूमध्ये  स्वामींची पदचिन्हे स्पष्ट उमटल्याचे सर्वांनी पाहिले .  
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......  

जय साई राम  
             
           

गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

ॐ  श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " मेणबत्ती जशी प्रकाश देण्यासाठी स्वतः जळते , तसे तुम्ही जगातील सर्वांना प्रेम द्या ".

पुष्प दहावे पुढे सुरु 

२७ एप्रिल २०१३ - ध्यान 
वसंता - स्वामी , कीर्तनाचे उदाहरण देताना तुम्ही शुकाचे नाव घेतलेत।  हे कस काय स्वामी ?
स्वामी - शुकाने सात दिवस अखंड परमेश्वराचे गुणगान केले .  त्याचप्रमाणे तू सदैव परमेश्वराचा महिमा लिहित आहेस.  याविषयी तू लिही. 
वसंता - मी लिहीन स्वामी .
ध्यान समाप्त .
           आता आपण या विषयी पाहू . मी नवविधा भक्तीचे मार्ग कसे आचरणात आणले व त्याचे अनुसरण केले याविषयी स्वामींनी मला लिहिण्यास सांगितले .
           श्रवण- परिक्षित श्रवणभक्तीचे उदाहरण आहे. त्याने अखंड सात दिवस बसून परमेश्वराच्या थोरवीचे श्रवण केले .त्याला सात दिवसांमध्ये मृत्यू येईल असा शाप मिळाला होता . तद्नंतर शुकमुनींनी भगवत स्तुती पाठ केले . मला लहानपणापासून मृत्यूची भीती वाटे .मी माझ्या वडीलधा-याकडून दिवसरात्र हरिकथा ऐकत असे. मला खेळ खेळण्यात अजिबात रस नव्हता . आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याकडे मी गोष्ट सांगण्याचा आग्रह धरत असे . माझे काका दररोज संध्याकाळी गावातील लोकांसाठी रामायणाचे वाचन करीत . गोष्ट ऐकल्याविना मी रात्री झोपत नसे . लहानपणापासूनची ही माझी सवय अजूनही आहे .मला आता स्वामी ध्यानात गोष्टी सांगतात . लहानपणी मी ऐकलेली आंडाळची कथा माझ्या कोवळ्या मनात बिंबली .
           श्रवणभक्ती करत परिक्षितसारखा मला देह त्याग करायचा नाही ! नाही ! मी माझा देह अशा रीतीने सोडणार नाही . लहानपणापासून ज्याची मला भिती वाटत होती तो मृत्यू माझ्याकडे फिरकणार नाही .  आंडाळप्रमाणे माझा देहही कृष्णामध्ये विलिन झाला पाहिजे . मला कृष्णाशी विवाह करायचा होता . बालवयापासुनची ही माझी एकमेव इच्छा आहे . माझे जीवन श्रवण भक्तीचे उत्तम उदाहरण आहे . लहानपणी शाळेत जा ये करतेवेळी सर्व मोठी  माणसे मला हाकमारत व म्हणत , " ये इकडे , मी तुला एक गोष्ट सांगतो ". अशा तऱ्हेने ते माझ्याशी बोलत . माझ्याशी संवाद साधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मला गोष्ट सांगणे ; हे सर्वांना ठाऊक होते . ते इतर मुलांना बोलावून त्यांना चॉकलेट , गोड , तिखट खाऊ देत असत . मला मात्र गोष्टीचाच खाऊ लागे . अन्यथा मी कोणाच्याही घरी जात नसे . याच कारणासाठी आता स्वामी गोष्टीरूपाने मला पूर्व अवतारांविषयी सांगतात आणि ते ज्ञान मी लिहिते .
* कीर्तन :- शुकमुनी कीर्तनाचे उदाहरण आहेत असे स्वामी सांगतात . आताच मी उल्लेख केल्यानुसार त्याने अखंड सात दिवस परमेश्वराचे गुणगान केले . विनोबाजींनी गीतेवर लिहिलेल्या संबंधात लिहिले आहे की, " शुकाने जागेवरून न हलता सात दिवस अखंड परमेश्वराचा महिमा गायला . लोकं ध्यानामध्ये फार तर एक ते दोन तास एकाजागी बसू शकतात . परंतु इथे शुकाने अखंड सात दिवस एका जागी बसून परमेश्वराचे गुणगान केले . मी गेले ७० वर्षे परमेश्वराचा गुणगान गात आहे .  नकळत्या वयातच मी देवदेवतांवर अनेक गीते व लेख लिहिले , शेकडो काव्ये रचली , स्वामींचे स्तवन करणारी हजारो काव्ये व गीते लिहिली . हा सर्व कीर्तनाचाच भाग आहे . आता स्वामी जे काही सांगतात ते मी लिहिते , हे सर्व लिखाण पुस्तक रुपात प्रकाशित होते . आज ह्या पुस्तकांचा आकडा १२० च्या वर गेला आहे . आता मी  ई/e पुस्तके लिहिते मी सकाळपासून रात्रीपर्यंत एका जागी बसून लेखन करते . गेली ७३ वर्षे माझ्या लेखनाचा एकुलता एक विषय आहे .
' स्वामींचा महिमा !' 
जय साई राम 
                  व्ही.एस.                     

रविवार, १९ जानेवारी, २०१४

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

        " प्रथम भाव  निर्माण होतात , त्यानंतर त्याचे विचार बनतात . त्यावर कृती करण्या अगोदर विवेकाचा वापर करा , विचार करा , हे सतकृत्य आहे का ? परमेश्वर प्राप्तीसाठी मला हे सहाय्य करेल का " ? 

पुष्प दहावे पुढे सुरु 

* विष्णुस्मरण :- परमेश्वराचे नामस्मरण म्हणजेच विष्णुस्मरण . प्रल्हाद हे याचे उत्तम उदाहरण आहे . सुख असो वा दुखः प्रल्हाद सदैव ईश्वर चिंतनात मग्न असे . प्रल्हादला जीवे मारण्याचे अनेक प्रयत्न केले गेले . विष प्रयोग , पर्वतावरून खाली ढकलून देणे , समुद्रात फेकणे  अशा अनेक प्रसंगांचा त्याने सामना केला . परंतु त्याने कधीही ' ॐ नमो नारायणाय ' चा जप करणे सोडले नाही. अखेरीस भगवंताने नरसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपुचा वध केला , प्रल्हादाचे रक्षण केले.
* पादसेवन :- परमेश्वराच्या चरणांची सेवा म्हणजे पादसेवन होय. सर्व भक्तांना परमेश्वराच्या पदसेवेची संधी मिळत नाही आणि जेव्हा मिळते तेव्हा बहुतांशी भक्त ती भौतिक  इच्छापूर्तीसाठी वापरतात . विष्णुपत्नी लक्ष्मी हे पादसेवनाचे परमोच्च उदाहरण आहे. तिने स्वतःला केवळ यासाठी अर्पित केले आहे. 
* अर्चना :-  ह्या भक्तिमार्गाचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराज पृथु होय.  कोणत्याही परिस्थितीत सर्व कर्मांमध्ये पृथुने भक्तीला अग्रकर्म  दिला होता. ते चराचरामध्ये परमेश्वर पाहतात. त्यांचा प्रत्येक विचार, उच्चार व आचार ते ईश्वरचरणी अर्पण करतात. 
* वंदना :- दैनंदिन भक्ती म्हणजे वंदना. अक्रूर यासाठी उत्तम उदाहरण आहे. अक्रूराने अत्यंत विनम्र व विशुद्ध मनाने परमेश्वराची वंदना करत आपले जीवन सार्थकी लावले. स्वामी म्हणतात," की केवळ दोन्ही हात जोडून केलेल्या नमस्कारास वंदन म्हणत नाहीत , तर शरणागत भव ठेऊन ज्ञानेंद्रिये अन कर्मेंद्रिये जे काही करतात ते सर्व परमेश्वरास अर्पण करणे असा याचा अर्थ आहे ". जो कोणी भगवंताची इच्छा शिरसावंदय मानेल त्याला सर्वत्र विष्णुचे दर्शन होईल. 
* दास्य :- याचा अर्थ सेवा . हनुमान हे याचे महान उदाहरण आहे . त्याने रामाची दासभक्ती केली. तो निरंतर रामाच्याच विचारात असे. हनुमान हा काही साधारण जीव नव्हता. त्याला चौसष्ट कला अवगत होत्या. राम त्याचे शांतीचा नायक असे वर्णन करत. त्याच्याकडे प्रचंड शक्ती व ज्ञान होते. हातात घेतलेल्या प्रत्येक वस्तूवर रामाचे नाम आहे की नाही हे तो तपासून पाहत असे आणि जर ते नसेल तर तो मूल्यवान रत्नेही निव्वळ पाषाण समजून अव्हेरत असे. लंकेचा सेतू बांधतांना , रामनामाचे उच्चारण करूनच हनुमान पाण्यात पाषाण फेकत असे , ते खाली न जात पाण्यावर तरंगत ! एका पाषाणावर ' रा ' तर दुसऱ्यावर ' म ' असे लिहून दोन्ही पाषाण समुद्रात टाकल्यानंतर ते पृष्ठभागावर एकत्र येत. सेतू अशा पद्धतीने बांधण्यात  आला त्याच्या रोमारोमातून रामनामाचा ध्वनी ऐकू येत असे. रावणाने त्याला तो कोण आहे असे विचारले असता हनुमान उत्तरला , " मी रामाचा सेवक आहे " . 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 
जय साई राम

गुरुवार, १६ जानेवारी, २०१४

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 


 सुविचार 


         " भौतिक वस्तूंमधून मिळणारी शांती ही खरी शांती नव्हे , याचे जेव्हा मनुष्याला ज्ञान होते आणि तो शांतीचा मुलस्तोत्र  शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या आध्यात्मिक यात्रेचा प्रारंभ होतो ".


वसंतामृतमाला
पुष्प दहावे 

सहज सुख
            
             ज्या वहीमध्ये मी स्वामींना पत्र लिहित असे त्यामध्ये स्वामींनी खालील तीन हिंदी शब्द आणि त्याचे इंग्रजी शब्दार्थ लिहिले . 
                      सहज सुख - Natural Comfort
                      समझ - Understanding
                      चिंतन - Contemplation
             मी लिहिलेली वसंतामृत माला सर्वांनी वाचावी व त्यावर चिंतन करावे . तुम्ही हे तुमच्या आचरणात आणल्यावर तुमचे जीवन सहज सुखाने परिपूर्ण होईल . या जगात जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ  आहे . हे जग सोडताना आपण आपल्याबरोबर काहीही घेऊन जात नाही . हे माहित असूनही आपण कुटुंब , नावलौकिक व धनसंपदा वाढवण्यात व्यस्त  असतो . स्वामींची पुस्तके वाचून आचरणात आणा अन्  गेल्या ८४ वर्षात त्यांनी दिलेली शिकवण समजून घ्या . आचरण केले तरच खऱ्या सुखाची गोडी चाखता येईल , अन्यथा सर्व व्यर्थ आहे . 
            या जगात आपण जे काही अनुभवतो . त्याने सहज सुख प्राप्त होत नाही . हे दर्शविण्यासाठी स्वामींनी भूतलावर अवतार धारण केला . या पूर्वी कोणत्याही अवताराने इथे येऊन सर्वांशी संभाषण , मार्गदर्शन असे काही केले नाही . भौतिक ज्ञान व्यर्थ आहे . प्रत्येकाने अध्यात्म जाणून घेऊन अध्यात्मिक ज्ञान संपादन करावयास हवे . नवविधा भक्तीमार्गातील कोणताही मार्ग अंगिकारा परमेश्वर प्राप्तीसाठी तो पुरेसा आहे . आपण आता नवविधा भक्तीचे मार्ग पाहू या .  
* श्रवण :- याचा अर्थ ऐकणे / श्रवण करणे . राजा परिक्षित याचे उत्तम उदाहरण आहे . परिक्षितला सात दिवसांत मृत्यू येईल असा शाप मिळाला . त्याने विचार केला , " मृत्यूचा स्वीकार कसा करावा ?" शुकमुनी आले व त्यांनी सात दिवस भागवत ग्रंथाचे अखंड पारायण केले . ते ऐकण्यासाठी अनेक ऋषीमुनींनीही तेथे उपस्थिती लावली . भागवतामध्ये कृष्णमहिमा वर्णन करण्यात आला  आहे . शुकमुनी अहोरात्र भगवंताच्या माहात्म्याचे पठण करत असता आनंदाचे दोहो आनंद तरंग अशा अवस्थेत श्रवण करत परिक्षिताने देह त्याग केला . आमच्या गावामध्ये मरणासन्न अवस्थेत असणाऱ्यांसाठी गरुड पुराणाचे वाचन करण्याची पद्धत होती . हे ऐकत ऐकत  ते देह त्याग करत . अळवार त्यांच्या गीतांमधून सांगतात , " तुमच्या मुलाला देवाचे नाव  ठेवा म्हणजे मृत्यूसमयी त्याला हाक मारलीत की तुम्ही आपोआप देवाला हाक मारल ". 
* कीर्तन :- यासाठी स्वामींनी शुकमुनींचे उदाहरण दिले . शुकाने अखंड सात दिवस भागवताचे वाचन करून परमेश्वराचे गुणगान केले , भगवन्नाम व महिम्याचे पारायण केले . 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .......
जय साई राम 




 


रविवार, १२ जानेवारी, २०१४

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

    " मधुर बोला पण केवळ मुखातून नव्हे तर हृदयापासून ".

भज साईश्वरम

भज साईश्वरम भज साईश्वरम
साईश्वर भज मूढमते
संप्राप्ते सन्निहिते काले
नही नही रक्षति कायारूपे 

संसार सागरे सदाचारे 
सत्य धर्म शांती तत्वम 
साई महिमा गाओ नित्यम
साई वचनम सत गतित्वम

पुनरपि जननम्  पुनरपि मरणम् 
पुनरपि जननी जठरे शयनम
इह संसारे बहु दुस्तारे 
कृपया अपारे साई मुरारे 

पुनरपि जननम्  लोक उद्धारणम् 
नही नही चिंता समाधी शयनम
अवतार जननम् शेष शयनम
साई महिमा निल गतित्वम


भज साईश्वरम ( अर्थ )

हे मूर्ख मनुष्या , साईश्वराचे नामस्मरण कर 
पुन्हा पुन्हा कर . अखेरच्या श्वासापर्यंत कर . 
या संसार सागरातून कोणीही तुझ्या सुटकेसाठी येणार नाही .
सत्य धर्म शांती या तत्वांचे सदैवअनुसरण कर 
नित्य साईश्वराचे गुणगान कर . साई महिमा गा . 
त्यांचे शब्द तुला सुमार्गदर्शन करतील
तू वारंवार जन्म घेतोस  आणि मृत्यू पावतोस.
या अडीअडचणीननी भरलेल्या संसारातून 
हा करुणामय साई प्रभू केवळ तुला वाचवू शकतो .
जगदोद्धारण कार्यासाठी तो पुन्हा पुन्हा अबतरतो .
त्याच्या समाधी शयनामुळे तू चिंतीत होऊ नकोस .
तो पूर्णावतार असून नित्य  आदिशेषावर  पहुडलेला असतो .
निरंतर त्याचे गुणगान केल्याने तुझा उद्धार होईल . 

( रचना आणि भाषांतर - वसंत साई )



गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

ओम श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " जे काही तुम्ही करत असाल ते  सर्व ईश्वरास समर्पण करा " .

पुष्प नववे पुढे सुरु 
           
            स्वामींनी दिव्य टपालात चौकटच्या आकाराचे एक कार्ड दिले त्यावर खालील शब्द लिहिले होते -
          हे नवीन प्रकरण तुमच्या जीवनात प्रेम आनंद आणि सामाधानाची वृष्टी करो . 
            कार्डच्या मागील बाजूस टेंडर थॉट्स  असे लिहिले होते . त्याच्यावर जाळी लावलेले एक वर्तुळ होते . त्यामध्ये खालच्या बाजूस लाटांसारख्या रेघा होत्या . त्या वर्तुळाजवळ एक उडणारे कबुतर होते त्याच्या एका पंखावर Love शब्द लिहिला होता आणि त्या खाली ( Tender Thoughts) टेंडर थॉट्स , हे दोन शब्द असून त्या दोन शब्दांमध्ये हृदय काढले होते .
          आता आपण या विषयी पाहू या . ह्या नवनिर्मितीचा जन्म स्वामींच्या आणि माझ्या कोमल , प्रांजळ विचारांमधून झाला . या चित्रातील लाटा भवसागर सूचित करतात . त्या वर्तुळावरील जाळी मनुष्य या भवसागरात अडकल्याचे सूचित करते .त्यामुळे तो पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या फेऱ्यात अडकतो . हे जन्म मृत्यूचे चक्र आहे . ' मी आणि माझे ' या भावनेमुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि मृत्यू पावतो . ही वसंतामृत माला वाचा आणि जागे व्हा ! ' मी आणि माझे ' आता पुरे झाले ही माया हा संभ्रम पुरे ! या प्रकरणाच्या सहाय्याने यातून बाहेर पडा. प्रेम आनंद आणि समाधानाने युक्त जीवन तुमची वाट पाहत आहे . 
            हे कृपाशिर्वाद स्वामी तुम्हाला देत आहेत . तुमचे उद्धरण करण्यास आलेल्या परमेश्वराचे नाम स्मरण करा . गुणगान करा . त्याच्या कथा वाचा . भवसागर पार करा . अनासक्त राहून कर्म करा आणि परमेश्वराला प्राप्त करून घ्या . परमेश्वराची शिकवण आचरणात आणा. ही दोन प्रकरणे वाचा आणि जाणून घ्या . स्वामींनी तुम्हाला आशिर्वादित केले आहे . तुम्हाला वेद पुराने वाचण्याची गरज नाही . हे ज्ञान तुमच्या ह्रदयात खोलवर झिरपू दे . सर्वांना त्यांच्या पापातून मुक्ती देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी हा महाअवतार येथे आला .                           
            परमेश्वराला जरा ( वृद्धत्व ) , व्याधी आणि मृत्यू नाही . या पूर्वीच्या कोणत्या अवताराने हे दर्शवले ? या पूर्वी कोणताही अवतार चालू शकत नव्हता वा त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते ? कोणत्या अवताराने हॉस्पिटलमध्ये देह त्याग केला होता ? मग या अवताराने असे का केले ? कारण स्वामींनी सर्वांच्या पापांचा स्वीकार केला . आता तुम्ही तुमची कृतज्ञता कशी व्यक्त कराल ? जागे व्हा आणि सत्य जाणून घ्या . 


जय साई राम 
व्ही. एस.    

रविवार, ५ जानेवारी, २०१४

ॐ  श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

        " अतृप्त इच्छाच केवळ पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचे कारण ठरतात " .

पुष्प नववे पुढे सुरु
         
                   हे मा  ,  
धारण करुनी चरणांवरती 
तव रक्त रंजित आसू , 
चाल थांबविली त्यांनी.
कोणा न दिसे 
तव प्रेमाचे मंगल सत्य 
ठेवा तव प्रेमाचा 
ते राखिती त्यांच्यासाठी
             हे या प्रकरणासाठी समर्पक आहे.  स्वामी माझ्या प्रेमाचे सत्य त्यांच्या चरणांखाली ठेवतात त्यामुळे ते कोणीही पाहू शकत नाही.माझे रक्तरंजित   अश्रू त्यांनी चरणांवर  धारण केल्यामुळे ते चालू शकत नाहीत  असे  ते सांगतात  .  ते  अदृश्य  देहात  आहेत  . जेव्हा माझे रक्तरंजित अश्रू थांबतील  तेव्हा ते बाहेर येतील आणि सर्वांना दिसू शकतील. तो पर्यंत ते पुट्टपर्तीतील हिल हाउस मध्ये अदृश्य देहात असतील . त्यांच्या चरणांखाली  केवळ रक्त नव्हे तर मी ही तिथेच आहे. 
             हे वाचा आणि पहा या कलयुगात मला किती दुखः सोसावे लागतेय ! यातून जागे व्हा , हे जाणून घ्या. केवळ परमेश्वराची कास धरा. त्याच्याशिवाय काहीही  सत्य नाही . जगात  येतांना  आपण काहीही  बरोबर घेऊन येत नाही. हा करुणाघन परमेश्वर कलियुगातील  लोकांचे रक्षण करण्याकरिता येथे आला आहे. 
             तमिळनाडुमध्ये शिबी  नावाचा राजा होऊन गेला.  त्याने त्याच्याकडे संरक्षण मागण्यासाठी आलेल्या कबुतरासाठी  आपले प्राण दिले. दुसरा राजा मनोनिधी चेला. त्याने मृत वासरासाठी आपल्या पुत्राच्या जीवनाचा त्यागकरण्याची तयारी दर्शवली. एक दिवस अनवधानाने त्याच्या पुत्राच्या रथाखाली येऊन एक वासरू मारले गेले. त्या राजानी त्याच रथाच्या चाकाखाली आपल्या पुत्रास ठेऊन तो  रथ चालवणार एवढयात अचानक परमेश्वर तेथे प्रकट झाला व त्याने त्या वासराला पुनर्जीवन दिले आणि राजपुत्राचे प्राण वाचवले त्याच भारत भूमीमध्ये एका राजाने मन्सूरचे हात पाय तोडले ! अलेक्झ्यांड्रीयामध्ये त्या सम्राटाने  कॅथरीनचा शिरच्छेद केला ! कसे हे जग विचित्र आहे ! या राजांबरोबरच येथे वासरू आणि कबुतर यांना न्याय दान करणारे राजेही होऊन गेले ! कलियुगातील लोकांच्या पापांमुळे अवताराने त्याचे जीवन त्यागले. स्वामींनी जीझस प्रमाणे दुखः भोगले आणि सर्वांच्या पापांमुळे देह त्याग केला. प्रत्येक घरातील देव घरामध्ये खालील  शब्द ठळक मोठया अक्षरात लिहिले पाहिजेत.
" भगवान सत्य साई बाबांनी माझ्या पापांसाठी देह त्याग केला ".  
           तुम्ही हे लिहा आणि रोज वाचा. मी जगातील सर्व लोकांना आर्जव करून एक प्रतिज्ञा करण्यास सांगते : जीवनामध्ये स्वामींची एक शिकवण प्रत्यक्ष कृतीत आणा. दररोज स्वामींची किमान एक शिकवण आचरणात आणा. 
पुढील वसंतामृत पुढील भागात .......