गुरुवार, ३१ जुलै, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 
 
       " मनाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानंतर , ते ( मन ) आणि ती गोष्ट एक होऊन जाते . परमेश्वराचा ध्यास घेतलेले मन परमेश्वर बनते . "

पुष्प २४ पुढे सुरु 

            होय , हे मी माझ्या जीवनाद्वारे दर्शवले आहे . गेली ७२ वर्षे माझ्या हृदयाला स्वामींशिवाय कोणतेही विचार माहित नाहीत . हे माझे हृदय विश्व ब्रम्ह गर्भकोटम् रूपाने बाहेर अवतीर्ण झाले . स्वामींव्यतिरिक्त अन्य कशाचाही उच्चार न करणारे माझे मुख बाह्य जगात स्तूप होऊन अवतरले . ही वाक् सिद्धी आहे . वाणीची शुद्धता . आता आपण निष्कलंक देहाविषयी पाहू . 
          माझ्या देहातील अणूरेणूमध्ये स्वामी विद्यमान आहेत . हे स्वामींनी दाखवले . असे असूनही माझी काया ज्योती स्वरूप होऊन स्वामींच्या स्थूल देहात विलीन व्हायला हवी . याकरता मी माझा देह अजुन शुद्ध व पवित्र करण्यासाठी तप केले . असे हे अनिर्बंध , अपरिमीत प्रेमच त्याला बंदी बनवू शकते . तुमच्या हृदयात अल्पांशानेही मलीनता वा अहंकार नसावा ; कारण त्यामुळे तुम्ही युगानुयुगे केलेली प्रार्थनासुद्धा व्यर्थ ठरेल . ' तो ' येणार नाही . 
          इथे स्वामी एक इशारा देतात . किती वेळा तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेत राहणार ? पूर्णम् अवस्था  प्राप्त करणे हा जन्म घेण्याचा खरा उद्देश आहे . तो पर्यंत हे जन्ममृत्यूचे चक्र अव्याहत चालू राहील . कोणत्याही अवताराने हे सर्व इतक्या यथार्थपणे मानवतेला समजावून सांगितलेले नाही . या महान अवताराने इथे अवतरित होऊन अवघ्या मानवतेला हे शिकवले . ह्या ' मी आणि माझे ' बरोबर हेलकावे खाणे आता पुरे ! जागे व्हा ! 
          कृष्णावताराने छोट्या छोट्या प्रसंगांतून हे शिकवले . तथापि त्यावेळी ही त्याची लीला आहे असे लोक मानत . स्वामींनी आता इथे येऊन त्यातील गर्भितार्थ स्पष्ट करून सांगितला . हा अवतार यापूर्वी कधीही आला नाही . सर्व देवता सामावलेले असे हे एक रूप आहे . कलियुगातील लोकांबद्दल त्याला वाटणाऱ्या कळकळीमुळे तो येथे आला. ही संधी चुकवू नका .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम        
               

रविवार, २७ जुलै, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार 

           " जेव्हा प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पित केले जाते तेव्हा त्याचा योग होतो . " 

पुष्प २४ पुढे सुरु 

            राधेचे कृष्णाप्रतीचे प्रेम कसे होते ? अत्यंत शुद्ध , निर्मल , निष्कलंक व अहंकार रहित असे राधेचे प्रेम होते . त्यामुळे कृष्ण तिच्यापुढे तत्काळ प्रकट झाला . तुमच्या हृदयात काकणभर मलीनता वा अहंकार जरी असेल तर भगवान तुमच्यापुढे कधीही प्रकट होणार नाही . तुम्ही किती तास , दिवस अथवा किती युगे त्याची प्रार्थना केली याला काही महत्व नाही . 
           यशोदा राधेचा हात धरत म्हणाली , " आजपर्यंत मी अहंकार व अज्ञान यांच्या प्रभावाखाली होते . आज तू माझ्या नेत्रांत अंजन घातलेस . ह्या जगामध्ये कृष्णावर माझ्याहून अधिक प्रेम करणारे कित्येक असतील परंतु अज्ञानामुळे , माझे प्रेमच सर्वश्रेष्ठ आहे असे मी मानत होते . ही माझी चूक होती . कृपया तू अनुसरत असलेला प्रेमपथ , तू मला दाखव . मला त्या मार्गाची शिकवण दे ." राधा उत्तरली , " ही अशी गोष्ट नाही जी कोणी तुम्हाला शिकवू शकेल वा देऊ शकेल . तुमची कृष्णावर पूर्ण श्रद्धा असेल व तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला असेल तर ते प्रेम आपोआपच तुमच्यामधून अभिव्यक्त होईल . " 
            स्वामींनी कार्ड देऊन त्यावरील चित्राचे असे स्पष्टीकरण दिले . यशोदेला कृष्ण तिचा मुलगा असल्याचा थोडा अहंकार होता . तिच्याइतके त्याच्यावर कोणीही प्रेम करत नाही असा तिचा भाव होता . परमेश्वर भूतलावर अवतरीत होतो तेव्हा तो त्याचे पालक , कुटुंब , वंश , राष्ट्र व धर्म यांची संपत्ती नसतो ; तो सर्वांसाठी सामाईक असतो . अवतार जगदोध्दारणासाठी  , सर्वांच्या हितासाठी अवतरतो . त्याला केवळ प्रेमाने बांधता येते . ते प्रेम कसे असावे ? शुद्ध न्  निष्कलंक . प्रेम कलंकित मलीन कसे होते ? विचार , उच्चार व देह याद्वारे . म्हणून मनामध्ये परमेश्वराशिवाय दुसरे कोणतेही विचार नसावेत . बोलण्यामध्ये परमेश्वराशिवाय इतर कोणतेही विषय नसावेत आणि देहही त्याहून वेगळा नसावा . हे शक्य आहे कां ?


उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम

 
             

गुरुवार, २४ जुलै, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" खरा आनंद आत्मसाक्षात्कारामध्ये दडलेला आहे ." 

पुष्प २४ पुढे सुरु

           आता आपण पाहू या . ह्या महिन्याच्या सनातन सारथीमध्ये मी जे वाचले ते खाली देत आहे . त्यामध्ये स्वामी म्हणतात , 
          " जेव्हा सत्य आणि प्रेम यांचा योग होईल तेव्हा जग तुझ्यासाठी स्वतःची ओळख गमावेल . तुला जगाची अशी वेगळी ओळख राहणार नाही . सर्वत्र ब्रम्ह दृष्टीस पडेल ".
                   यानंतर स्वामींनी यशोदेचे उदाहरण दिले . 
         एकदा यशोदा श्रीकृष्णाला शोधत होती . ' कुठे आहे कृष्ण ? कोठे गेला हा ? ' ती देही कृष्णाला शोधत होती . कृष्ण सर्वत्र भरून उरला आहे याची एकदा का तुम्हाला जाणीव झाली की मग त्याला शोधण्याची गरज उरत नाही . 
           यशोदा त्याला शोधत असता राधा तिथे आली . यशोदेने राधेला विचारले , ' हे राधे , तू माझ्या मुलाला पाहिलेस का ? माझा गोपाळ तुझ्या घरी आला आहे कां ? मी सगळे रस्ते , सगळी घरे पालथी घातली परंतु मला तो सापडला नाही . तू त्याला कोठे पाहिलेस कां ' ? राधेने डोळे बंद करून प्रेमातिशयाने कृष्णाचे नाम उच्चारले , तत्क्षणी कृष्ण तिथे आला . ह्या प्रसंगाने यशोदेचे डोळे उघडले . ती राधेला म्हणाली , " कृष्ण माझा पुत्र आहे व मी त्याची माता , कृष्णावर माझ्याइतके प्रेम करणारे दुसरे कोणीही नाही , असा माझा ठाम विश्वास होता . या जगात त्याच्यावर माझ्याइतके अपरंपार प्रेम वर्षविणारे अन्य कोणीही नाही, असा मला अभिमान होता . तुझे कृष्णाप्रती असणारे प्रेम उच्चकोटीचे असून ते अति ताकदवान आहे हे मला आजवर उमगले नाही . तुझ्या प्रेमातील शक्तीमुळे तू त्याचे स्मरण करताच तो तुझ्यासमोर प्रकट झाला .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ...... 

जय साई राम  

रविवार, २० जुलै, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार 

" निर्मल हृदय स्वच्छ आरशासारखे प्रतिबिंबित होते " .


वसंतामृतमाला
पुष्प २४ 
मातेची ममता व विशुद्ध प्रेम 


१० मे २०१३ 
             आज स्वामींनी दिव्य टपालामध्ये एक कार्ड दिले . त्याच्या एका बाजूला उंच उंच हिरवेगार वृक्ष होते आणि पाठीमागच्या बाजूस खड्यांनी व राखाडी  रंगाच्या चमकत्या मण्यांनी बनविलेले कृष्णाचे चित्र होते . कृष्णाच्या दोन्ही बाजूस निळ्या रंगात दोन चमकदार आकृत्या होत्या . त्यातील एक आकृती कृष्णाला हाताने खून करून बोलावत होती . कृष्ण मागे वळून पहात होता . त्याच्या चेहऱ्यासमोर दुसरी आकृती होती . 
१० मे २०१३  : सायं ध्यान 
वसंता - स्वामी , हे कोणाचे चित्र आहे ? कृष्ण व यशोदेचे तर नव्हे ? 
स्वामी - यशोदेकडे मातेची ममता होती तर राधेमध्ये विशुद्ध प्रेम . 
वसंता - स्वामी , राखाडी मणी आणि पांढरे खडे म्हणजे काय ?  
स्वामी - मातृभाव म्हणजे आसक्ती , म्हणून राखाडी मणी . पांढरे खडे विशुद्ध प्रेम दर्शवितात .
वसंता - स्वामी , काल सनातन सारथीमध्ये मी हेच वाचले .... मनरहित अवस्था म्हणजे काय ? 
स्वामी - मनरहित अवस्था म्हणजे शांती ; म्हणजेच स्थितप्रज्ञता . तुझी अवस्था अशी नाही . तू तुझे वेगवेगळे भाव माझ्यापाशी व्यक्त करतेस . हे तुझे १९ गुण आहेत . ही तुझी अवस्था आहे . 
वसंता - मला आता समजले स्वामी . मी लिहीन . 
ध्यान समाप्ती .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साई राम 


गुरुवार, १७ जुलै, २०१४



ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

      " परमेश्वराचे अखंड चिंतन म्हणजे परमेश्वराचे अखंड सानिध्य ". 


वसंतामृतमाला
पुष्प २३ 
' सदहंकार

                मी अन् माझे येतच राहते . हे कोठून येते ? कोणालाही माहित नाही . जर एखाद्याने तुमचा अपमान केला तर तुम्ही म्हणता , ' हे काय ! मला त्याने योग्य तो मान दिला नाही '.
*    *    *
          जडभरत हे एक महान ऋषी होते . तथापि हरिणीच्या नवजात पडसाविषयी वाटणाऱ्या आसक्तीमुळे त्यांना पुढील जन्म हरिणाचा घ्यावा लागला . पूर्व जन्मीच्या संस्कारांमुळे ते हरीण ऋषींच्या आश्रमा भोवती फिरत असे . कालांतराने त्यांचा मृत्यू होऊन ते पुन्हा जन्मले . यावेळी त्याने एखाद्या पाषाणासारख्या जड अचेतन अवस्थेत वावरणाऱ्या मानवाचा जन्म घेतला . गावातील सर्वजण त्याच्याकडून विविध प्रकारची कामं करून घेत . कोणी पाणी आणायला सांगे तर कोणी लाकडे तोडायला . कोणीही त्याचा आदर करत नसे . ते सदैव त्याला ओरडत रागवत . परंतु त्याने कधीही आपले तोंड उघडले नाही . 
          वास्तविक तो एक महान संत होता हे अखेरीस राजाच्या लक्षात आले . राजा त्याच्यापुढे नतमस्तक झाला . त्याला महाज्ञानी संबोधून राजाने त्याची प्रशंसा केली . तद्नंतर तो कोण आहे हे सर्वांना समजले . त्यांनी त्याचा सन्मान केला . जडभरत अहंकार रहित अवस्थेत प्रत पोहोचला होता . परंतु सामान्य माणसाचे काय ? त्याला प्रत्येकाकडून मानसन्मान हवा असतो . 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साईराम 




 
        
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       " जादूटोणा , चमत्कार वा मंत्र याद्वारे प्रेम एका हृदयातून दुसऱ्या हृद्यामध्ये स्थलांतरित करता येत नाही ".

पुष्प २३ पुढे सुरु

                   काल मी बाथरूममध्ये एक डास पाहिला . तो चालत होता ! त्या डासाला मी विचारले , " तू चालत का आहेस ? " मग मी नळ सुरु केला . पाण्याचा आवाज ऐकल्यावर तो उडू लागला . हे पाहून माझ्या मनात एक विचार  आला . पक्षी न् कीटक  पंखांच्या सहाय्याने उडतात . ते किती दूरवर उडतात , किती उंच उडतात ! परमेश्वराने मानवाला चालण्यासाठी पाय दिले आणि त्याच्या मनाला पंख दिले ! मनाद्वारे तो एक दिवस अगदी स्वर्गा पर्यंत उडतो तर दुसऱ्या दिवशी नरकात जातो . हे कसे विचित्र पंख आहेत ! माणूस मनाद्वारे कोठेही जाऊ शकतो . हे मन म्हणजे ' मी ' आहे . या ' मी ' द्वारे त्याचे जीवन क्षणाक्षणाला बदलते . जर तुम्ही त्या ' मी ' ला मनापासून विभक्त करून तेथे भगवंताला स्थापित केलेत तर तुमचे जीवनच स्वर्ग होईल . मनुष्य जरी मानव म्हणून जन्माला आला असला तरी तो पशुवत जीवन जगतो . वरील शीर्षकाद्वारे स्वामींनी हे सूचित केले . 
स्वामी पुढे लिहितात - 
    अहंकाराचे विविध प्रकार - दास्याहंकार , ज्ञानाहंकार 
१० मे २०१३ 
प्रातः ध्यान 
वसंता - स्वामी , हा ' सदहंकार म्हणजे काय ? दास्याहंकार व ज्ञानाहंकार यांची उदाहरणे कोणती ? 
स्वामी - जय व विजय दास आहेत . सनत् कुमार वैकुंठी आले असता त्यांनी सनत्  कुमाराना प्रवेश नाकारला . नारद ज्ञानाहंकाराचे उदाहरण आहे . तो सर्वज्ञानी आहे तरीही त्याला शांती नाही . त्याने सनत्  कुमाराना विचारले की शांती कशी मिळवावी ?
वसंता - मला समजले स्वामी . आता मी लिहीन . 
ध्यान समाप्ती 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साईराम 




                  
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

      " मनामध्ये कधीही न क्षमणारी आध्यात्मिक तृष्णा जागृत झाल्यास नरजन्माचे सार्थक होते ". 

पुष्प २३ पुढे सुरु

            आता आपण या विषयी पाहू या . जय , विजय हे वैकुंठाचे द्वारपाल आहेत . एकदा महाविष्णूंच्या दर्शनासाठी चार सनत् कुमार वैकुंठास आले . द्वारपालांनी त्यांना प्रवेश करण्यास मनाई केली . कुमारांनी त्यांना शाप दिला . या चुकीचे प्रायश्चित घेण्यासाठी विष्णूंनी जय विजय यांना एक प्रश्न विचारला , " तुम्हाला तीन जन्म परमेश्वराचा शत्रू बनायला आवडेल का शंभर जन्म भक्त बनायला आवडेल ?" ते उत्तरले भगवंताचा शत्रू होऊन लवकरात लवकर विष्णूकडे परत येणे पसंत करतील . अशा तऱ्हेने जय विजय हिरण्यकश्यपू - हिरण्याक्ष , रावण - कुंभकर्ण , शिशुपाल - दंतवक्र म्हणून तीन वेळा जन्मले . या तीन जन्माद्वारे ते शापमुक्त झाले , आणि वैकुंठास परतले . तथापि आपण जर अशाप्रकारे विचार केला तर ते कधीही घडणार नाही . ते सदैव परमेश्वराच्या निकट असल्यामुळे त्यांना लवकर मुक्ती मिळणे शक्य झाले . 
            नारदाचे काय ? त्याला शांती नव्हती . म्हणून त्याने सनत्  कुमारांना विचारले , " शांती मिळण्याचा मार्ग कोणता ?"  सनत्  कुमारांनी त्यांना विचारले , " तुम्हाला कोणत्या विषयाचे ज्ञान आहे ? " नारद उत्तरले , " मला ६४ कला आणि सर्व वेद , शास्त्रे  , पुराणे अवगत आहेत ". त्यावर सनत्  कुमार म्हणाले , " याचा काही उपयोग नाही .  भगवंत नाम पुरेसे आहे ". नारदही सदैव परमेश्वराच्या निकट होते परंतु त्याला ' सर्वज्ञानी ' असण्याचा अहंकार होता . हे स्वामी इथे दाखवून देतात .
           परमेश्वराच्या निकट असलेल्यानाही अहंकार येतो . याला स्वामी ' सदहंकार ' म्हणून संबोधतात . नारद व जय विजयना सदैव परमेश्वराचे सान्निध्य  प्राप्त आहे . जर त्यांना सुद्धा अहंकार होतो तर भूलोकावरील सामान्य माणसाचे काय ? म्हणून उठा ! जागे व्हा ! अहंकार कोणत्या दिशेने येईल हे आपण सांगू शकत नाही . अहंभावाला कोठून पालवी फुटेल हे सांगता येत नाही . जागृत राहा . सदसत्  विवेक बाळगा. अहंकार कसा येतो याचा शोध घेऊन त्याचे समूळ उच्चाटन करा . जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्त व्हा . या महामहीम अवताराच्या कालखंडात प्रयत्नांची शिकस्त करा . यासाठीच तो करुणासागर इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन करत आहे . हे भोग आता पुरे ! 


जय साई राम

व्ही. एस.  
              

शनिवार, १२ जुलै, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार


        " तपोबल व परमेश्वराप्रती एकाग्र प्रेम , वैश्विक कर्मांचा संहार सर्वांना मोक्ष पदास घेऊन जात आहे ."

उत्कट गुरुभक्ती 


            एकदा रामाजुनांना श्रीरंगमहून दुसऱ्या गावी जावे लागले . त्यांनी त्यांची भगवी वस्त्रे काढून साधी पांढरी वस्त्रे धारण केली . त्यांच्या बरोबर त्याचे काही शिष्यही होते . नम्बी नावाच्या शिष्याकडे रामानुजांच्या आराधनेच्या साहित्याची पेटी होती .
           जेव्हा मठाधिपती मठ सोडून दुसरीकडे जातात तेव्हा ते त्यांच्या नित्य पूजेच्या मूर्ती बरोबर घेऊन जातात . मठ सोडून दुसरीकडे जातांना त्या पूजेमध्ये खंड पडू नये म्हणून त्या मूर्ती बरोबर घेऊन जातात . एकदा नम्बी रामानुजांची आराधना पेटी डोक्यावर घेऊन त्यांच्या मागोमाग जात होता . वाटेत त्यांना कावेरी नदी ओलांडून पलीकडे जायचे होते . त्यावेळी रामानुजांनी त्यांची पादत्राणे काढून नम्बीकडे दिली . त्याने ती  हातात घेतली व तो पुढे चालू लागला . ते नदी ओलांडून दुसऱ्या तीरावर आले . रामानुजांनी नम्बीला त्यांची पादत्राणे मागितली . नम्बीनी त्यांची पादत्राणे आराधना पेटीवर ठेवली होती . त्यानी ती काढून रामानुजांना दिली . ते पाहून रामानुजांना धक्का बसला . त्यांनी त्याला खडसावून विचारले , " तू असं का केलस ? देव पूजेच्या पेटीवर पादत्राणे ठेवणे योग्य आहे का ? हे महापाप आहे ". 
           नम्बीने त्यांना शांतपणे उत्तर दिले , " माझा देव तुमच्या देवाहून कमी नाही ". हे ऐकून सगळे अवाक झाले . त्याच्या प्रत्येक कृतीमधून त्याची गुरुभक्ती प्रतीत होत होती . प्रत्येकाला आपापल्या भावभावनांनुसार लाभ होतो . यत्  भावम्  तत्  भवती . जसा तुमचा भाव तसे तुम्ही बनता . त्याने त्याच्या गुरूंमध्ये  परमेश्वर पाहिला .
वेदामध्ये सांगितले आहे - 
मातृ देवो भव 
पितृ देवो भव
आचार्य देवो भव
अतिथी देवो भव 


माता देव आहे 
पिता देव आहे 
गुरु देव आहे 
अतिथी देव आहे 
             या वचनानुसार त्याने परमेश्वर मानून त्याच्या गुरूंची भक्ती केली .

जय साई राम 


     

मंगळवार, १ जुलै, २०१४

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" तुमच्या मुखाने केवळ सत्य वदावे , अन्य काही नाही " . 

पुष्प २२ पुढे सुरु

भगवत् गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतो , 
       ' मी सर्व प्राणीमात्रांचे बीज आहे . सर्वजण माझाच सनातन अंश आहेत . ' 
           सर्वजण परमेश्वराचा अंश आहेत . आपण सर्व त्यांच्यापासून जन्मलो आहोत . सर्वांनी त्याला प्राप्त करायलाच हवे . तो पर्यंत हे जन्म मृत्यचे चक्र थांबणार नाही . जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपल्याबरोबर धन, विद्या , शास्त्रीय ज्ञान , पद , पदवी यापैकी काहीही येत नाही . मात्र प्रभू परमेश्वर आपल्यासोबत असतो . खेडूत , अशिक्षित गोपगोपीना याचे ज्ञान होते . ते सदैव कृष्ण चिंतनात मग्न असत . त्या घरकाम , पती , मुलेबाळे , सर्वांप्रती असणारी त्यांची कौटुंबिक कर्तव्ये पार पाडत परंतु त्यांचे मन कृष्ण चिंतनात निमग्न असे . ते कृष्णाच्या नामरूपात विलीन झाले होते . 
           भौतिक बाबींमध्ये मनुष्य कोणतीही गोष्ट करत असता त्याचे मन दुसरीकडे असते . जेथे आपला देह वावरतो ते आपले खरे जीवन नसून आपले मन जेथे असते तेच खरे जीवन . गोपगोपीनी जे काही केले ते ईश्वरचिंतनात करून हे सिद्ध केले . संतमहात्म्यांनी ही हेच केले . त्यांनी प्रत्यक्ष आचरनाद्वारे हे दर्शविले . गीता व उपनिषदे यांनीही हेच सांगितले आहे . 
          माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मी एकाग्र विचाराने सर्वकाही केले . मी कृष्णाबरोबर काल्पनिक जगात जगले . भौतिक जीवनातील व्यवहार चालूच होते . तथापि माझे मन कृष्णामध्ये लीन झाले होते .  माझी काया जगात वावरत होती . हे आहे ' यत्  भावम्  तत्  भवती ' भगवंत केवळ आपला भाव पाहतो . माझे संपूर्ण जीवन असेच आहे . यामुळे जेथे स्वामी व मी केवळ दोघेच असू अशा नूतन युगाची मी निर्मिती करू शकते . प्रत्येक मानवामध्ये एवढी प्रचंड शक्ती असते परंतु ' मी व  माझे ' यामुळे ही शक्ती तो वाया घालवितो . तो इंद्रियांचा गुलाम बनतो . 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात 

जय साईराम 





ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार
 
    " परमेश्वराप्रती असणारी अढळ श्रद्धा , परमेश्वराहून अधिक महान आणि सामर्थ्यशील आहे " .

पुष्प २२ पुढे सुरु

            एका कागदावर रामकृष्ण परमहंसाचे वचन होते , त्यावर स्वामींनी लिहिले -
          " तुम्ही हजारो युक्तिवाद करा , परंतु ' मी ' पुन्हा पुन्हा येत राहणार . एखादे झाड अगदी जमिनीपासून छाटले तरी काही महिन्यातच एक कोवळा कोंब दृष्टीस पडतो . तसेच मी वा अहंकार राहतोच . म्हणून तो बदमाश ' मी ' तुमचा गुलाम बनून राहायला हवा . जो पर्यंत तुमच्या देहात प्राण आहे तुम्ही म्हटले पाहिजे ,  हे प्रभू ! तू माझा स्वामी आहेस , मी तुझा दास . तुझी इच्छा प्रमाण ! " 
            त्यापुढे स्वामींनी लिहिले , कृष्णा ! आपण आपला अहंकार दूर करण्यासाठी नाना प्रकारे शोध घेतो . प्रयत्न करतो तरीही तो पुन्हा पुन्हा येत राहतो. त्याचप्रमाणे जर आपण एखादे झाड जमिनीपर्यंत छाटले तर थोड्याच कालावधीत त्याला पुन्हा कोंब फुटतो तथापि ते झाड मुळासकट तोडले तर पुन्हा अंकुरित होणार नाही . अहंकाराचे मुळ कोणते ? ते आपल्याला दिसत नाही . हजारो जन्म तो ' मी ' मनुष्याचा पाठपुरावा करतो . याचा समूळ नाश करायचा उपाय कोणता ? त्यासाठी एकच उपाय आहे . परमेश्वराला शरण जाऊन त्याची साश्रू नयनांनी प्रार्थना करणे . 
            प्रत्येक मानवी देहात अमाप शक्ती आहे परंतु ' मी व माझे ' यांच्या मागे लागून आपण ती वाया घालवतो . ' मी व माझे ' यांनी त्या सर्व शक्ती हिरावून घेऊन मानवाला गुलाम बनवले आहे . अहंकार दूर करण्यासाठी विनयशीलता हा एकच एक मार्ग आहे . त्यायोगे आपण अहंकाराला आपला दास बनवू . मी काहीही करत नाही . जे घडते ते सर्व परमेश्वराच्या इच्छेनुसार घडते . यावर पूर्ण श्रद्धा ठेवा . धन , पद , प्रतिष्ठा , ज्ञान , पदवी हे सर्व अहंकार वाढवतात . यावर विजय कसा मिळवावा ? 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात ...... 

जय साईराम 




  
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

     " सत्याचा शोध घेण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे तप . या तपाद्वारे ज्ञान प्राप्त होते व ज्ञानातून परमानंदाची अनुभूती होते ".

पुष्प २२ पुढे सुरु 

               तीन दिवसांपूर्वी मी सत्य साई स्पीकस्  व्हॉल्यूम २९ भाग मधील १६० पान वाचले . त्यातील एक प्रसंग मला आवडतो . स्वामी बद्रीनाथला गेले होते . त्यांच्या बरोबर उत्तर प्रदेशचे राज्यपाल रामकृष्ण राव आणि २०० भक्त मंडळीही गेली होती . रामकृष्ण राव स्वतः सर्वांना पाणी देऊन सेवा करत होते . ते नेहमी म्हणत , " मी स्वामींचा दास आहे ". रामकृष्ण राव आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री असतानाच्या कालावधीत स्वामी जेव्हा मालक पेट येथे गेले होते तेव्हा स्वामींच्या दर्शनासाठी हजारो लोक रांगेमध्ये उभे होते स्वयंसेवक वेळ वाचविण्यासाठी भक्तांना घाई करत होते . रामकृष्ण रावही त्या रांगेत उभे राहिले . वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्यांना रांगेत उभे न  राहता थेट दर्शनास जाण्याची विनंती केली . रामकृष्ण राव त्यांना म्हणाले , " राजकीय दृष्ट्या मी मुख्यमंत्री असेनही परंतु आध्यात्मिक दृष्ट्या मी कोणी महान नसून एक सर्वसामान्य भक्त आहे . ही आहे अहंकार रहित अवस्था . ' मी ' ला दास कसा बनवायचा याचे हे एक उत्तम उदाहरण आहे . ते मुख्यमंत्री होते . तरीही वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्याने बोलावल्यावर ते गेले नाहीत . ते सामान्य व्यक्तीसारखे रांगेत उभे राहीले . अहंकाराला दास बनविण्याचा हा एक मार्ग आहे . ते म्हणाले की ते परमेश्वराचा दास आहेत . परमेश्वर ( स्वामी ) स्वतः त्यांचे उदाहरण देऊन विद्यार्थांना त्यांची गोष्ट सांगत आहे . 
            अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक मार्ग आहे . स्वामींच्या दर्शनासाठी त्यांनी त्यांचे उच्च पद , हुद्दा व प्रसिद्धी या कशाचाही वापर केला नाही . केवळ असे लोक परमेश्वराला प्रिय असतात . ' प्रशांती निलयम्  ' मध्ये अनेक लोक स्वामींच्या जवळ असतीलही परंतु त्यातील ' मी विना मी ' किती आहेत ? मात्र अहंकार रहित लोक प्रभूला प्रिय असतात . मला ' मी ' नाही . त्यामुळे ' मी विना मी ' अवस्थेत मी स्वामींचे अवतार कार्य करू शकते . मानवाला सुमार्गावर नेण्यासाठी स्वामींनी कितीतरी गोष्टी व उदाहरणे सांगितली आहेत . स्वामी येथे आले , त्यांनी माता पित्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन केले . जागे व्हा ! मायेला दूर सारा ! तुमच्या ; मी ' ला हुसकून लावा .


जय साईराम