रविवार, २७ जुलै, २०१४

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार 

           " जेव्हा प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पित केले जाते तेव्हा त्याचा योग होतो . " 

पुष्प २४ पुढे सुरु 

            राधेचे कृष्णाप्रतीचे प्रेम कसे होते ? अत्यंत शुद्ध , निर्मल , निष्कलंक व अहंकार रहित असे राधेचे प्रेम होते . त्यामुळे कृष्ण तिच्यापुढे तत्काळ प्रकट झाला . तुमच्या हृदयात काकणभर मलीनता वा अहंकार जरी असेल तर भगवान तुमच्यापुढे कधीही प्रकट होणार नाही . तुम्ही किती तास , दिवस अथवा किती युगे त्याची प्रार्थना केली याला काही महत्व नाही . 
           यशोदा राधेचा हात धरत म्हणाली , " आजपर्यंत मी अहंकार व अज्ञान यांच्या प्रभावाखाली होते . आज तू माझ्या नेत्रांत अंजन घातलेस . ह्या जगामध्ये कृष्णावर माझ्याहून अधिक प्रेम करणारे कित्येक असतील परंतु अज्ञानामुळे , माझे प्रेमच सर्वश्रेष्ठ आहे असे मी मानत होते . ही माझी चूक होती . कृपया तू अनुसरत असलेला प्रेमपथ , तू मला दाखव . मला त्या मार्गाची शिकवण दे ." राधा उत्तरली , " ही अशी गोष्ट नाही जी कोणी तुम्हाला शिकवू शकेल वा देऊ शकेल . तुमची कृष्णावर पूर्ण श्रद्धा असेल व तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला असेल तर ते प्रेम आपोआपच तुमच्यामधून अभिव्यक्त होईल . " 
            स्वामींनी कार्ड देऊन त्यावरील चित्राचे असे स्पष्टीकरण दिले . यशोदेला कृष्ण तिचा मुलगा असल्याचा थोडा अहंकार होता . तिच्याइतके त्याच्यावर कोणीही प्रेम करत नाही असा तिचा भाव होता . परमेश्वर भूतलावर अवतरीत होतो तेव्हा तो त्याचे पालक , कुटुंब , वंश , राष्ट्र व धर्म यांची संपत्ती नसतो ; तो सर्वांसाठी सामाईक असतो . अवतार जगदोध्दारणासाठी  , सर्वांच्या हितासाठी अवतरतो . त्याला केवळ प्रेमाने बांधता येते . ते प्रेम कसे असावे ? शुद्ध न्  निष्कलंक . प्रेम कलंकित मलीन कसे होते ? विचार , उच्चार व देह याद्वारे . म्हणून मनामध्ये परमेश्वराशिवाय दुसरे कोणतेही विचार नसावेत . बोलण्यामध्ये परमेश्वराशिवाय इतर कोणतेही विषय नसावेत आणि देहही त्याहून वेगळा नसावा . हे शक्य आहे कां ?


उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....

जय साई राम

 
             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा