रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार

" प्रत्येक गोष्टीत चांगले पाहा तोच परमेश्वर  होय." 

पुष्प ४१ पुढे सुरु 

               भगवान तिरुपती त्यांच्या अर्धांगिनीपासून वेगळे होऊन सप्तगिरीनच्या माथ्यावर एकटेच राहतात. त्याचप्रमाणे माझे नातलगही विभक्त झाले. 
              असे माझे विचार होते. पती पत्नि विभक्त होण्याचे कारण काय असेल हे कोणी पाहील कां ? परंतु मी यावर सखोल विचार करून कारण शोधून काढले. मी तिरुपती भगवानांवर रागावले, माझ्यात वैराग्यभाव उत्पन्न झाला. 
              ..... मी सर्वांमधील मूलाधार शक्तीचा सप्तगिरीच्या माथ्यावर वास करणाऱ्या भागवानाशी योग घडवून आणीन ..... 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

                                    जय साईराम 

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार

" प्रेम हे नाम, रूप, स्थळ आणि काळ या सर्वांच्या पलीकडे आहे."

पुष्प ४१ पुढे सुरु 

..... हे सदुपदेशक माते, आमच्यासाठी प्रार्थना कर ..... 
                 स्वामी मला इतरांसाठी उपदेश देतात, तो मी लेखनबध्द करते. लहान वयात मी गीता व रामायण वाचले; त्यांतील उपदेश आचरणात आणला. गांधीजींचे पुस्तक,' सत्याचे प्रयोग ' आणि भगवत् गीता जणू माझे दोन मार्गदर्शक नेत्रच होत. मी त्या मार्गावरून वाटचाल केली. गीतेच्या १८ अध्यायांचे निर्देशन मी माझ्या जीवनप्रणालीद्वारे केले. स्वामींच्या सर्व उपदेशांचे मी तंतोतंत पालन केले. मी स्वामींचा चालता बोलता उपदेश आहे. लहान वयापासूनच मी सत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. सत्य स्वरूप भगवान श्री सत्यसाईना मी प्राप्त केले. ते प्रकट करत असलेल्या उच्च ज्ञानाचे मी लेखन करत आहे. ते, माझा अंतरात्मा आहेत. तेच सर्वकाही लिहितात . मला काहीही माहित नाही . त्यांनी सांगितलेले मी जशेच्या तसे लिहिते. मी एक रिक्त घट आहे. त्यामध्ये परमेश्वर त्याची कृपा भरतो. 
..... हे न्यायाचे प्रतिबिंब, आमच्यासाठी प्रार्थना कर ..... 
                  हो, मी न्यायाचे प्रतिबिंब आहे. माझ्या डोळ्यासमोर घडणारा अन्याय मी सहन करू शकत नाही. माझे श्रीनिवासन काका व तिरुवेंगम मामा त्यांच्या कुटुंबापासून वेगळे आमच्या घरी राहात असत. अलमेलमंगै व चेंगमलम् या माझ्या काकी व मामी होत. ह्या दोन्ही जोडप्यांची नावे तिरुपती भगवान व त्यांच्या अर्धांगिनीची आहेत. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
  
जय साईराम 




     

रविवार, २३ ऑगस्ट, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

         " खऱ्या प्रेमाला देह अथवा विवाहाची आवश्यकता नसते केवळ भावना पुरेशा असतात." 

पुष्प ४१ पुढे सुरु 

..... हे प्रेममयी माते, आमच्यासाठी प्रार्थना कर ..... 
                  मैत्री म्हणजे काय ? मानवी नात्यांमध्ये मैत्रीचे स्थान सर्वोच्च आहे. मित्रांमध्ये कोणतीही गोष्ट गौप्य नसते. ते एकमेकांशी मोकळ्या मनाने बोलतात. पति आपल्या पत्नीला जे सांगू शकत नाही ते मित्रांजवळ मोकळेपणी बोलतो. 
                माझ्या जीवनात कोणतीही गोष्ट गौप्य नाही. माझे जीवन म्हणजे एक खुले पुस्तक. आजवर मी कोणतीही गोष्ट कोणापासूनही लपवलेली नाही. मला कधी तशी गरज वाटलीच नाही. माझ्या जीवनाविषयी मी १२० हून अधिक पुस्तके लिहिली. 
               मला स्वामींनी ई-बुक्सही लिहायला सांगितले. ही पुस्तके जगभरातील वाचक वाचतात. ह्या पुस्तकांमधून मी माझ्या हृद्यवेदनांमधून उगम पावणारे भाव व्यक्त करते. वाचक व माझ्यामध्ये मैत्रभाव मानून मी हे लिखाण करते. मी परमेश्वरावर माझे सारे भाव वर्षिते. माझे रुदन, हास्य, माझा विलाप, माझी तळमळ असे विविध भाव ओतून मी वाचकांसाठी शब्दबद्ध करते. कोणतीही गोष्ट लपविणे माझ्या स्वभावातच नाही. 
..... हे अलौकिक माते, आमच्यासाठी प्रार्थना कर ..... 
                  माझे जीवन अजब आहे. माझ्या जगावेगळ्या जीवनशैली विषयी जग अनभिज्ञ आहे. गत युगांत असे कधीही घडलेले नाही. या कलियुगात जन्म घेऊन मी क्लेशमय जीवन जगत आहे. भूतलावर पूर्वी कधीही जन्म घेतला नसल्यासारख्या मला यातना होत आहेत. मानवाबरोबर जीवन कसे जगावे हे मला माहीत नाही. त्यांच्याशी कसे वागावे हे मला कळत नाही. मला फक्त परमेश्वर हवा, हे जग नको असा विलाप मी अखंड करते. मला भुकेची भावना नाही. बालपणापासून शौचास जाताना मी रडत असे. शरीरातील त्याज्य घटक बाहेर टाकणे हे एक नैसर्गिक क्रिया असल्याचे माझ्या आजीने मला समजावले. सामान्य माणूस हे सहजतेने घेतो. मला देहाची घृणा वाटते. विष्ठेकडे पाहून आपल्याला किळस येते. तथापि ती शरीराच्या आत असते. हे टाळण्यासाठी ' अखंड उपवास हा एकच उपाय ' असा विचार करून मी वर्षभर सर्व खाण बंद केले. तेव्हा मी सकाळ व संध्याकाळ १ कप दुध घेत असे. त्यावेळी विश्व ब्रम्ह गर्भ कोटम् चे बांधकाम चालू होते. काही खात नसूनही आठवड्यातून एकदा मी शौचास जात होते. उपाशी असूनसुद्धा कडक उपवास करूनसुद्धा शौचास कां जावे लागते या विचाराने मी हैराण होत असे. सर्वजण माझी समजूत काढत. गर्भकोटमच्या च्या उद्घाटन समारंभानंतर स्वामींनी मला पुन्हा खाणे सुरु करावयास सांगितले. त्यांनी सांगितले की प्रथम एक चमचाभर दुध भात व नंतर २ चमचे दहीभात खावा. आतासुद्धा मी ४ चमच्याहून अधिक भात खाऊ शकत नाही. मी अशी सर्वांहून निराळी कां बरे ? मला या जगाची भीती वाटते, म्हणून स्वामींनी मला आश्रमवास सांगितला. इथे जगाशी काही संबंध येत नाही. माझे जीवन म्हणजे एक महद् आश्चर्यच !

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ..... 

जय साईराम   


गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

      " नैसर्गिक साधनसंपत्तीविषयी मनुष्याला असणाऱ्या लालसेपोटी निसर्गाचा समतोल बिघडला आहे ." 

पुष्प ४१ पुढे सुरु

…..  हे अबाधित माते, आमच्यासाठी प्रार्थना कर ….. 
                  ' इतरांना दुखवू नका ' ह्या शब्दात स्वामींनी हे सांगितले आहे. माझ्या जीवनात याचे पालन कसे होते ते आपण पाहू. कोणालाही न दुखविण्याचा पाठ मी लहानपणापासूनच आचरणात आणला. मी प्रत्येकाकडून व प्रत्येक गोष्टीमधून चांगले तेच आत्मसात केले. कृतज्ञतेपोटी गुरुदक्षिणा म्हणून या सर्वांना मुक्ती प्रदान करण्यासाठी स्वामींकडे प्रार्थना केली. मी कधीही, कोणालाही काया, वाचा वा मनाने दुखविले नाही. सर्वांप्रती विनम्रता हा गुण माझ्यात जोपासला गेला. विनम्रता कशी येते ? विनम्रता ' मी विना मी ' या अवस्थेतून येते. जेथे ( अहंकार ) ' मी ' आहे तेथे इतरांप्रती क्रोध उत्पन्न होतो. क्रोधाची परिणती दुःखात होते. मला इतरांविषयी विचार करायला सवडच नाही; त्यांना मी दुखावेन कशी ? दिवसाचे २४ तास माझे मन केवळ स्वामींचाच विचार करते. 
….. हे विमल माते, आमच्यासाठी प्रार्थना कर ….. 
                   घाण किंवा मळ म्हणजे काय ? हा मळ साबण व पाण्याने येणारा बाह्य मळ आहे कां ? नाही. ही आपल्या पंचेंद्रियांवर जमा झालेली अंतर्धूळ आहे. ही झटकून टाकून इंद्रियशुद्धी करायला हवी. अपशब्द उच्चारू नका. चांगले पहा व ऐका. स्वामी सांगतात, ' चांगले पहा, सत्कर्म करा, सत् प्रवृत्त व्हा. मन विमल करा. वाईट विचारंना थारा देऊ नका. जन्मानुजन्म मनावर साठलेली घाण साफ करून मन विमल करा.' घाम, कफ इत्यादी अंतर्गत मालिन्य साफ करण्यासाठी मी तप करते आहे. ही काया विमल करून परमेश्वराला अर्पण करणे माझे ध्येय आहे.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……. 

जय साईराम   
  

रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

     " मनुष्याने विवेकबुद्धीचे अनुसरण केल्यास पंचतत्वांमध्ये समन्वय राहील." 

पुष्प ४१ पुढे सुरु 

…..  हे पतिव्रता माते, आमच्यासाठी प्रार्थना कर …..  
                  माझ्या पातिव्रत्यामुळेच कलियुग सत्ययुगात बदलत आहे. पातिव्रत्य म्हणजे पत्नीचे पतिप्रति एकनिष्ट प्रेम. या देशांत अनेक महान पतिव्रता होऊन गेल्या. सावित्रीने यमाशी युक्तिवाद करून मृत पतीस संजीवन दिले. त्यामुळे ती एक महान पतिव्रता म्हणून ओळखली जाते. देह त्याग केलेल्या अवतारास मी परत आणत आहे. हे असामान्य पातिव्रत्य आहे. मी स्वामींना क्षणभरही विसरू शकत नाही. माझे पातिव्रत्य असे आहे.
भगवान श्री कृष्णाने भगवत् गीतेत घोषित केले आहे की …
' ममैवांशो जीवलोके जीवभूतः यनातनः। '
                सर्वजण परमेश्वराचा अंश म्हणून जन्मले आहेत, तथापि त्यांना ह्याचे विस्मरण झाले आहे. कलियुगातील मानवाने त्यांच्यामध्ये असणारा ईश्वरी अंश धुवून टाकला, तो पशुवत् जीवन जगत आहे. त्या मृत ईश्वरी अंशाला मी संजीवनी देते. मी साईंचा अंश परत आणत नाही तर त्यांना त्याच रुपात परत आणीन. माझ्या पातिव्रत्यामध्ये सर्वांना सत्यसाई करण्याचे सामर्थ्य आहे. मला स्वामींशिवाय अन्य काहीही पाहायचे नाही की बोलायचे ही नाही. मला कोणीही पाहू नये म्हणून मी तप करते आहे. सत्ययुगाचे आगमन ही फलश्रुती आहे. इथे केवळ आम्ही दोघं असू. 
               माझ्या पातिव्रत्याचे स्पष्टीकरण अर्ध्या पानाच्या लिखाणांतून होणे नाही. हे समजण्यासाठी तुम्ही माझ्या सर्व पुस्तकांवरील लेखनावर सखोल चिंतन, मनन करायला हवे. कण्णगीच्या पतीची अन्यायाने हत्या झाल्यामुळे तिने मदुराई नगर बेचिराख केले. हे तिच्या पातिव्रत्याचे सामर्थ्य. सर्वांचा काम व कर्मांचा संहार करण्याची ताकद माझ्या पातिव्रत्यामध्ये आहे. हे कलिचा संहार करत नूतन सत्ययुग आणते. पातिव्रत्य म्हणजे नुसते पतीविषयी प्रेम दर्शविणे नव्हे तर पतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टीत रुची नसणे. मला ह्या जगात स्वामींशिवाय अन्य कशातही स्वारस्य नाही. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 

जय साईराम  
       

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

        " परमेश्वराची निर्मिती परस्परावलंबी आहे. निर्मितीत समतोल राखण्यासाठी आपण वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीची परतफेड केली पाहिजे." 

पुष्प ४१ पुढे सुरु

…..  हे सुमंगल माते, आमच्यासाठी प्रार्थना कर …..  
                ह्या मातेचे मांगल्य कसे वर्णावे ? तिच्या मनात उगम पावणारे सर्व विचार तसेच तिच्या मुखाने उच्चारलेले शब्द शुद्ध व सुमंगल आहेत. तिची प्रत्येक कृती मंगलदायक आहे. सामान्य मानवी जीवनात हे शक्य आहे का ? माझ्या मनात स्वामींशिवाय अन्य कोणतेही विचार नाहीत. मी केवळ स्वामींविषयी बोलते. माझी प्रत्येक कृती स्वामींप्रीत्यर्थ असते. माझ्या अवस्थेविषयी सांगणे जसे कठीण तसे समजून घेणेही कठीणच ! माझे मन, बुद्धि, इंद्रिय, अहंकार, जाणीव हे सर्व वशिष्ठ गुहेत स्वामींमध्ये विलीन झाले आहे. जेव्हा स्वामींचा अर्धा फोटो गुलाबी झाला तेव्हा " हा आपल्या ऐक्याचा पुरावा आहे " असे स्वामी म्हणाले. आता माझी काया उरली आहे. ही काया शुद्ध , सुमंगल करत तिचे ज्योतीमध्ये रुपांतर करून मी स्वामींच्या देहात विलीन होईन. हे माझ्या शुद्धतेचे व मांगल्याचे पुरावे आहेत.
…..  हे पवित्र माते, आमच्यासाठी प्रार्थना कर …..  
                  माझ्या पावित्र्यामुळे भूतलावर वैकुंठ निर्माण होते. ह्या कलियुगात भूतलाचे मी वैकुंठ कसे बरे करणार ? कृत, त्रेता वा व्दापार आदि युगांमध्ये कोणीही हे विश्व वैकुंठात परिवर्तीत केले नाही. असे असताना कलियुगात मला हे कसे साध्य होईल ? ह्या कारणासाठीच परमेश्वर अवतरला. मी स्वामींपासून जन्मले. आमच्या पावित्र्याद्वारे स्वामी व मी हे भूतल वैकुंठात रुपांतरीत करतोय. कलियुग मलीन आहे. मानवाच्या मानसिक प्रदुषणामुळे पृथ्वी दुषित झाली आहे. स्वामी व मी मिळून सर्वकाही मंगल व पवित्र करत आहोत. घरांत एकदा मृत्यू घडला तर १२ दिवसांनी पुरोहित येतात; धार्मिक संस्कार करून शुद्धी करतात. १२ व्या पर्यंत मंत्रपठण करत सर्व संस्कार संपवितात. १२ व्या दिवशी विशेष पूजा करून घरांत सर्वत्र कलशामधील पवित्र जल शिंपडून घराची शुद्धी करतात. अगदी असेच माझ्या संतत अश्रू सिंचनाने मी हे कलियुग रुपी गृह शुद्ध करते. युगानुयुगे संचित झालेली संस्कारांची ही घाण मी माझ्या अश्रूंनी धुवून काढत सर्व शुद्ध करत आहे.
  
     उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम 

रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

          " निसर्गाच्या प्रकोपास रोखण्यासाठी सर्वांप्रती प्रेमभाव हा एकमात्र उपाय आहे. " 

पुष्प ४१ पुढे सुरु 

                  मेरी पवित्र आहे. पावित्र्यामुळे ती प्रभू परमेश्वराची माता बनू शकली. याचप्रमाणे स्वामींनी त्यांच्या अवतारकार्यासाठी मला निवडले. हे महत्वपूर्ण न भूतो न भविष्यती असे अवतारकार्य आहे. त्यांच्या कार्यासाठी मी त्यांचे साधन झाले. काही वर्षांपूर्वी स्वामींनी आम्हाला माझ्या खोलीचे पावित्र्य राखण्यास सांगितले होते. केवळ माझे भाव स्तूपात प्रवेशतील. माझ्या कॉटला कुणाचाही स्पर्श होऊ नये तसेच कोणीही माझ्या खोलीत येऊ नये असे त्यांनी बजावले होते. ह्याला पुरावा म्हणून स्वामींनी कॉटवर व दरवाज्यावर पवित्र ( Holy) शब्द लिहिला. माझ्या कायेचे पावित्र्य राखण्यासाठी माझा वावर असलेली खोली व पलंग यांना कोणाचाही स्पर्श होऊ नये असे स्वामींनी तेव्हा सांगितले होते. मीही अखिल जगतासाठी अखंड प्रार्थना करते आहे. पूर्वी हजारो लोकं त्यांची दुःखे व व्याधींबाबत मला फोनवर अथवा पत्रातून कळवत असत. मी त्या सर्वांसाठी मनःपूर्वक प्रार्थना केली. स्तूप स्थापन झाल्यानंतर मी प्रार्थना करणे थांबवले. आता लोक स्वतःच स्तूपाला प्रार्थना करत प्रदक्षिणा घालतात. 
...  हे दिव्य कृपादात्री माते, आमच्यासाठी प्रार्थना कर ...
                  स्वामींच्या दिव्य कृपेने हे माझे रूप धारण केले आहे. परमेश्वर निराकार आहे. अवतरीत होण्यासाठी तो रूप धारण करतो. सत्यसाई भूतलावर अवतरित झाले. त्यांच्या कृपाभावाला त्यांनी माझे रूप दिले. धर्ममार्गावरून मानवतेचे झालेले अधःपतन पाहून, अपार करुणेपोटी त्यांनी भूतलावर प्रवेश केला. स्वामींनी त्यांचा कारुण्यभाव वेगळा करून माझ्या रुपात येथे आणला. माझ्या प्रार्थनेद्वारे ते सर्व ठीक करतात. मी अखिल जगतासाठी प्रार्थना करून त्यांच्याकडे वैश्विकमुक्तीचे वरदान मागितले. कलियुगात व्यक्तिगत मुक्तीची प्राप्ती महाकठीण आहे, तर वैश्विकमुक्ती कशी बरे साध्य होईल ? स्वामी, सर्वांना मुक्ती देण्यासाठी, सर्वांवर कृपावर्षाव करण्यासाठी येथे आले. आपले कारुण्य वेगळे करून त्यांनी तिला / त्याला  अखिल विश्वासाठी प्रार्थना करण्यास प्रवृत्त केले. समस्त विश्व त्यांच्या अमृतकृपा वर्षावामध्ये न्हात मनमुराद आनंद लुटेल. हे सत्ययुग आहे. 


उर्वरित वसंतामृत पुढील भागात …. 

जय साईराम 
          

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

         " जीवनमुक्तास मानवी देहात असतानाच मोक्ष प्राप्ती होते. तो परमशांतीला प्राप्त होतो व आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो." 

पुष्प ४१ पुढे सुरु 

३ जून २०१३ ; मध्यान्ह ध्यान 
वसंता - स्वामी, मदर मेरी विषयी हे काय लिहिले आहे ? 
स्वामी - तू माता आहेस. तुझी तुलना मदर मेरीशी करत तू लिही. 
वसंता - स्वामी, मी कसे बरे लिहू ?
स्वामी - यापूर्वी तू तुझी तुलना संत कॅथरीनशी करून लिहिलेस तसेच आता लिही. 
वसंता - स्वामी, ही मेरीची १७ नावे काय आहेत ? तुम्ही मला माझ्या कायेशी संबंधित ८९  नावे दिलीत. 
स्वामी - तू लिहायला लागलीस की आपोआप सगळ स्पष्ट होईल. 
वसंता - ठीक आहे. स्वामी, मी लिहीन. 
ध्यान समाप्त.    
                आपण आता याविषयी सविस्तर पाहू. अमरने इंटरनेटवर शोधले, तेव्हा ती प्रार्थना ६०० हून अधिक ओळींची असल्याचे दिसून आले. इथे मी स्वामींनी सुचित केलेल्या ओळींचे भाषांतर दिलेय. स्वामींनी त्या ६०० ओळींतील केवळ १७ नामे निवडून मला तुलनात्मक लिहावयास सांगितले. त्या अगोदर स्वामींनी माझ्या कायेशी संबंधित ८९ नामे दिली होती. आता पाहू पहिली प्रार्थना. 
  ..… हे पवित्र मेरी, आमच्यासाठी प्रार्थना कर ….. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम  

रविवार, २ ऑगस्ट, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

            " जीवाने इच्छा वासनांपासून रिक्त झाले पाहिजे आणि अस्तित्वासाठी अहंकाराचा नाश केला पाहिजे. " 

वसंतामृतमाला  
पुष्प ४१ 
काटेरी मुकुट होतो काटेरी कॉट 

           
                आज स्वामींनी मदरमेरीचे चित्र दिले. त्यात तिचे हृद्य लाल रंगात होते, त्याभोवती काटेरी वर्तुळ असून त्यावर ज्योत होती तर त्याच्याहीवर स्तूपाची प्रतिमा. तिच्या गळ्यातील साखळीत पदक असून मस्तकाभोवती तेजोवलय होते व त्यावर अष्टदली १२ कमळे होती. लाल शाईने वेगळ्या भाषेत १७ ओळींचा मजकूर लिहिलेला दिसून आला. एडीच्या मते ती लॅटिन भाषा असावी. तो मजकूर असा… 

- हे पवित्र मेरी आमच्यासाठी प्रार्थना कर. 
- हे दिव्य कृपा दात्री माते, आमच्यासाठी प्रार्थना कर. 
- हे सुमंगल माते, आमच्यासाठी प्रार्थना कर. 
- हे पवित्र माते, आमच्यासाठी प्रार्थना कर.
- हे पतिव्रता माते, आमच्यासाठी प्रार्थना कर.  
- हे अबाधित माते, आमच्यासाठी प्रार्थना कर.  
- हे विमल माते, आमच्यासाठी प्रार्थना कर.  
- हे प्रेममयी माते, आमच्यासाठी प्रार्थना कर.  
- हे अलौकि माते, आमच्यासाठी प्रार्थना कर.  
- हे सदुपदेशक माते, आमच्यासाठी प्रार्थना कर. 
- हे न्यायाचे प्रतिबिंब आमच्यासाठी प्रार्थना कर.
- हे ज्ञानपीठ आमच्यासाठी प्रार्थना कर.
- हे आनंदाचे निधान आमच्यासाठी प्रार्थना कर. 
- हे आध्यात्मिक घट आमच्यासाठी प्रार्थना कर. 
- हे पूजनीय  माते, आमच्यासाठी प्रार्थना कर.  
- हे रुग्णांचे स्वास्थ्य आमच्यासाठी प्रार्थना कर.  
- हे पाप्यांचे आश्रयस्थान आमच्यासाठी प्रार्थना कर.  
                  आम्ही इंटरनेटवरून इंग्रजी भाषांतर मिळविले. परंतु त्याचा अर्थ न उमगल्याने मी स्वामींना विचारले. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 

जय साईराम