रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" व्यक्तिगत आवडनिवडीने अंतर्ज्ञानाला झाकोळले आहे. " 

प्रस्तावना 

                   खरं सांगायचं तर मी लिहिलेली सर्व पुस्तके म्हणजे माझे आत्मचरित्र आहे. कारण माझा जन्म, मी ज्या पद्धतीने लहानाची मोठी झाले आणि माझ्या जीवनातील प्रत्येक दिवस हे जगासाठी एक उदाहरण आहे. माझ्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या मार्गावरून मी जीवनाची वाटचाल केली. माझे वडील गांधीजींचे अनुयायी होते. त्यांनी भगवदगीतेच्या मार्गावरून जीवनयात्रा केली. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची, प्रसंगाची ते त्यांच्या रोजनिशीत नोंद ठेवत असत. मलाही त्यांनी ही सवय लावली. त्यांच्या रोजनिशीतील बरीचशी पाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाने भरलेली आहेत. भगवंताशी एकरूप होण्याची असलेली तळमळ व आपले भावही ते डायरीमधून व्यक्त करत असत. दिवसाच्या शेवटी ते लिहित, " कान्हा, काळ सरतो आहे, लवकरात लवकर मला तुझ्या चरणाप्रत घेऊन जा. " 
                 माझ्या डाय-यांमध्ये फक्त माझी परमेश्वरप्राप्तीची उत्कट इच्छा व त्याविषयी माझ्या मनात उमलणारे भाव यांचाच उल्लेख आहे. रोजनिशीमध्ये काही खाजगी बाबी, कुटुंबातील काही गोपनीय वा इतर गोष्टी असू शकतात, त्यामुळे सहसा रोजनिशी दुसरे कोणी वाचत नाही. माझ्या रोजनिशा  मात्र पुस्तकांच्या रूपाने प्रकाशित झाल्यात, कारण माझ्या रोजनिशा केवळ परमेश्वराप्रती असलेल्या माझ्या प्रेमभावनेच भरलेल्या आहेत. या प्रेमभावातूनच अनेक गीते, काव्ये आणि अनुभव यांचा उद् भव झाला आहे. 
स्वामी म्हणतात, 

" आपुल्या प्रेमाचा खजिना न बंदिस्त पेटीत दागिन्यांच्या 
खुला ठेवला चौराह्यावर, पडण्या दृष्टीस सकलांच्या ! 
या ! या ! सकलजनांनो या ! 
पहा, पहा ! अन् जाणून घ्या !… करिसी तू पाचारण" 

                  मला मी ( अहम्) नसल्यामुळे, गोष्टी लपवून ठेवणे मला माहितच नाही. भौतिक प्रेम लपवले जाऊ शकते. परमेश्वराप्रती असणारे प्रेम लपवून का ठेवायचे ? कामवासना लपवल्या पाहिजेत कारण त्या भौतिकतेशी निगडीत असतात. परमेश्वराप्रती असणाऱ्या प्रेमात सर्वांना सहभागी करून घ्यावे, हा ' मी विना मी ' चा स्थायीभाव आहे. 
                   प्रत्येक जीवाचा अंतर्यामी परमेश्वर आहे. तो सर्वसाक्षी आहे. छोट्याशा निळसर रंगाच्या ज्योतीस्वरुपात तो हृदयामध्ये वास करतो. जीवाच्या साधनेतील प्रगतीनुसार परमेश्वर स्वतःचे प्रकटीकरण करतो. इथूनच जीवाच्या प्रभुचरणी संपूर्ण शरणागतीच्या प्रवासास सुरुवात होते. आपला अहंकार मन, बुद्धी आणि इंद्रिये प्रभूचरणी अर्पण करून जीव रिक्त बनतो. अहंकार पूर्णपणे प्रभूचरणी अर्पण केल्यानंतर ' मी ' चे अस्तित्व नाहीसे होते. वैयक्तिक ओळख राहतच नाही. जीव पूर्णपणे रिक्त झाल्यानंतर त्याला ' मी विना मी ' ही अवस्था प्राप्त होते. यालाच आत्मसाक्षात्कार वा आत्मदर्शन म्हणतात. 
                  प्रथमतः वसंता ' मी ', तिचा अंतर्यामी परमेश्वर सत्य साई यांच्यामध्ये एकरूप झाली. वसिष्ठ गुहेमध्ये तिचा स्वामींशी योग झाला. ही शुद्ध सत्व स्थिती आहे. तथापि देहाचे अस्तित्व राहिले. का ? देह निर्मल बनवून परमेश्वराला अर्पण करण्यासाठी देहाचे अस्तित्व राहिले. हा भौतिक देह केवळ याच कारणासाठी दिला जातो. ' मी विना मी ' ला नाम आणि रूप यांची गरज काय ? तर परमेश्वरामध्ये विलीन होण्यासाठी. त्यानंतर ' मी ' ची स्वतंत्र ओळख उरतच नाही आणि म्हणूनच ती अज्ञात जीवन जगत आहे. 
                  मी ज्योतीपासून जन्मले आणि परत ज्योतिस्वरुप होईन. नामरुपविरहीत ' मी विना मी ' ला जर ओळखायचं झालंच तर नवनिर्मिती, नवयुग, सत्ययुग ह्याद्वारा ओळखता येईल. 


वसंत साई

गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

           " सर्वजण माझे कुटुंबिय आहेत. माझे शेजारी, मार्ग सर्वकाही माझेच आहेत असा आपण विचार केला पाहिजे सर्वांच्या हातात हात घालून वैश्विक प्रेमाची अनुभूती घेता येते. "

संपादकीय 

                     ज्यांना वसंतसाईंचे लिखाण परिचित आहे, ते जाणतात की त्यांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक म्हणजे त्यांच्या आत्मचरित्राचा पुढचा अध्याय आहे. त्यांनी लिहिलेल्या ५० हून अधिक पुस्तकांचे संक्षिप्त रुपांतर कसे काय करायचे ? आत्म्याची परमात्म्याकडे होणारी आगेकूच, सत्याच्या प्रकटीकरणात झालेली त्याची परिणती व त्यातील गुंतागुंत असे हे महाकाव्य सांगायला शब्द शोधणे तरी शक्य आहे का ? वसंतसाईंनी शिस्त, साधना आणि त्याग याच्या सहाय्याने पातिव्रत्याचे परमोच्च शिखर गाठले, ज्यामध्ये नवीन युग आणण्याचे सामर्थ्य आहे. अशा या वसंतसाईंच्या जीवनाचा संक्षिप्त आढावा. तरी वाचकांना येईल का? 
                   ' दिव्यत्व स्वतःच्याच मानवत्वाकडे कोणत्या दृष्टीने पाहते ' ह्यावर दृष्टीक्षेप टाकणारे हे एक आगळेवेगळे पुस्तक आहे. परमोच्च प्रेमाचा परमोच्च सत्याकडे होणारा प्रवास व संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी झालेली त्याची नाट्यमय फलश्रुती याची ही कथा आहे. शुद्ध सत्व अवस्था प्राप्त केलेला जीव, तसेच स्वतःचे ' मी विना मी ' असे वर्णन करणारा हा आत्मा स्वतःच्याच जीवनाचा अभ्यास कसा करतो ? दिव्यत्वाशी योग झालेल्या, जीवनातील क्षण न् क्षण ईशचिंतनात घालवणाऱ्या जीवाला ज्ञान व प्रेमाच्या विस्तारित होणाऱ्या नोंद तर राहूच देत, गतजीवनातील मैलाचे दगड तरी कसे काय आठवणार ? पर्वतांच्या उंच शिखरांवरून जाऊन सर्वांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात त्या गुपित उघड करतात ' भगवान श्री सत्य साई बाबा या युगाचे अवतार आहेत . या लवकर या आणि त्यांच्या दिव्य सान्निध्याचा पुरेपूर लाभ घ्या. ' 
                 श्री वसंतसाई, एका छोट्याशा खेड्यातील बेताचे शिक्षण झालेली एक साधीसुधी स्त्री. पवित्र नाडीग्रंथामध्ये त्यांचा ' परमेश्वराची अर्धांगिनी ' असा वारंवार उल्लेख आला आहे. त्या आपल्या ज्ञानदृष्टीने गतआयुष्याकडे पाहतात, जे त्यांचे सत्यदर्शन करणारा मार्गच आहे. त्यांच्या ह्या आत्मचरित्रात, आतापर्यंत झालेले अवतार, कर्मकायदा, जीवात्माचा परमात्म्याकडे प्रवास आणि निर्मिती यासारख्या विषयांचे असामान्य अंतर्ज्ञान विशद केले आहे. 
                  केवळ भगवंतासाठी व्यतीत केलेल्या ७१ वर्षांच्या जीवनयात्रेतील चढउतार, वसंतसाईंच्या म्हणजेच मी विना मी च्या दृष्टीकोनातून उलगडून दाखवले आहेत. ज्याप्रमाणे गंगामातेने आपल्या जलप्रवाहाने पृथ्वीला व्यापून टाकले, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या प्रेमप्रवाहात अखिल जगताला चिंब भिजवून टाकले. त्या त्यांच्या प्रेमाने आणि तपोबलाने संपूर्ण जगामध्ये आणि सकलजनांमध्ये परिवर्तन घडवत आहेत. त्यांची परमेश्वरासाठी असणारी अतृप्त तृष्णा, त्यांच्या त्यागाची परिपूर्णता, ' भगवान श्री सत्य साई  बाबा ' हे पृथ्वीवर अवतरलेला परमेश्वर अशी अढळ निष्ठा आणि समस्त मानवजातीला मुक्ती मिळवून देण्याचा निर्धार, या पुस्तकाच्या वाचकांना प्रेरणा देवो. 
                   या आत्मचरित्राचे संकलन करताना श्री वसंतसाईंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रकाशित व अप्रकाशित पुस्तकातील महत्वाचे उतारे समाविष्ट करण्यास सांगितले; जे त्यांच्या जीवनाच्या विशिष्ट कालावधीतील त्यांच्या अवस्थेचे यथार्थ चित्रण उभे करतील. त्यांची पुस्तके म्हणजे त्यांचे जीवन, त्यांचे साध्य आणि त्यांची परमेश्वरासाठी असणारी अतृप्त तृष्णा हे प्रतिबिंबित करणाऱ्या दिव्य भावांचे वेलबुट्टीदार वस्त्र आहे. यातील काही गद्यरचना, पद्यरचना व गीते अम्मांनी स्वतः इंग्रजीमध्ये रचली आहेत. 

साई राम 

संपादक 

रविवार, २१ फेब्रुवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

           " प्रज्ञान म्हणजे अंतर्ज्ञान. हे परमज्ञान आपल्या प्रत्येकामध्ये आहे. "

 


श्री वसंतसाईंचे आत्मचरित्र


मी विना मी 
( जिथे अहंभाव आत्मस्वरुपात विलीन होतो ती अवस्था ) 


मी विना मी च्या आत्मचरित्राला स्वामींचे आशीर्वाद 

 
ज्या दिवशी या छापील पुस्तकाची पहिली प्रत पुट्टपर्तीला आली त्याच दिवशी स्वामी प्रशांती निलयमला परतले. दर्शनाच्या वेळी खूण करून त्यांनी पुस्तक मागवून घेतले, आपल्या मांडीवर ठेवले 
आणि आपल्या दिव्य करकमलांनी अनुग्रहीत केले.

अर्पण पत्रिका 


स्वामी, आपल्या चरणकमलांवर मी ' मी विना मी ' चे आत्मचरित्र आणि ह्या ' मी विना मी ' ला अर्पण करते. कृपया स्वीकार करून तुमच्या कृपेचा वर्षाव करा. अखिल जगताच्या कल्याणासाठी ह्या ' मी विना मी ' चा देह झिजू दे. 

केवळ तुमच्यासाठी जगणारी 
वसंत साई

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम