गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             " आपण केवळ ह्या परमेश्वराच्या निर्मितीचे विश्वस्त आहोत. आपण कोणत्याही गोष्टीचे मालक नाही. "

चिन्नकथा

शुचिता, ऐक्य, दिव्यत्व 

                    एका गावाच्या हद्दीला लागून एक छोटासा ओढा होता. त्याच्या काठावर एक पांढरा बगळा राहत होता. एक दिवस, तो एका पायावर उभा असताना दोन छोटे मासे पोहत तेथे आले. त्यांन पाहून बगळ्याने विचार केला," ह्या छोट्या माशांना सोडून देऊन मोठ्या माशांची प्रतिक्षा करावी." त्या दोन छोट्या माशांची नजर बगळ्यावर पडताच ते घाबरून गेले. परंतु त्याच्या तावडीतून सुटल्यानंतर ते आनंदाने परत मागे फिरले. परत जाताना त्यांना समोरून एक मोठा मासा येताना दिसला. त्यांनी त्याला सांगितले, " ओढ्याच्या काठाला जाऊ नकोस. तेथे एक बगळा वाट पाहात आहे. जर त्यानी तुला पाहिले तर तो तुला खाऊन टाकेल ! मोठा मासा म्हणाला, " ठीक आहे मी तुमच्या बरोबर येतो. " ते सर्वजण एकत्र पोहू लागले. थोड्या वेळाने तेथे अजून दोन मोठे मासे आले. त्या माशांनी त्यांना बगळ्याविषयी सांगितले. अशा तऱ्हेने त्यांनी बगळ्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व माशांना रोखले. ते सर्वजण बगळ्याच्या विरुद्ध दिशेने पोहू लागले. तो बिचारा बगळा वाट पहात बसला परंतु एकही मासा  त्याच्या दृष्टीस पडला नाही. 
                 त्या माशांसारखे आपण सर्वांमध्ये ऐक्य आणि परस्परांविषयी प्रेम असायला हवे. म्हणजे कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण सक्षम होऊ. माशांनी अत्यंत प्रेमाने आणि द्वेषभाव न ठेवता आपल्या बांधवांना येऊन ठेपलेल्या संकटांविषयी सूचना दिल्या. ते एकत्र राहिले त्यामुळे त्यांची मृत्युपासून सुटका झाली. ह्या माशांसारखे सर्वांनी एकमेकावर प्रेम करून एकमेकांना मदत केली पाहिजे. सर्वांनी एकोप्याने राहिले तर सर्वांची मृत्युच्या कराल दाढेतून सुटका होईल. जन्ममृत्युचे मुलभूत कारण असलेली द्वेषभावना तेथे नसेल. द्वेषभावनेचा अभाव म्हणजेच शुचिता होय. शुचिता आणि ऐक्य यांचा संयोग म्हणजे दिव्यत्व होय. एकमेकांवर प्रेम करणे म्हणजेच ऐक्य. शुचिता आणि ऐक्य या दोन्हीचा संगम याचा अर्थ दिव्यत्व. यांद्वारे जीवनातील कोणत्याही आपत्तीचा आपण सामना करू शकतो. 

व्ही. एस.


संदर्भग्रंथ :-  DIVINE STORIES 
                   and parables 
 
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा