रविवार, १४ फेब्रुवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " जेव्हा समस्वभावी लोक एकाच ध्येयासाठी प्रार्थना करतात तेव्हा त्यांचे ध्येय साध्य होते."

चिन्नकथा

आज ज्याची उपेक्षा केलीत तेच उद्या पूजनीय ठरेल

                   एक मनुष्य रस्त्याने चालला होता. चालता चालता त्याच्या वाटेत एक मोठा पाषाण आला. त्याने त्याच्यावर पाय देऊन तो पाषाण जोरात दूर भिरकावला. थोड्या वेळाने दुसरा एक मनुष्य तेथून जात होता. त्यानेही तो पाषाण पाहिला. तो तेथे थांबून त्या पाषाणाचे निरीक्षण करू लागला. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने तो पाषाण घरी आणला. छिन्नी हाथोडा हातात घेऊन तो त्या पाषाणातून शिल्पकृती निर्माण करू लागला. पाहता पाहता त्या पाषाणातून कृष्णाची सुंदर मूर्ती साकारली. ती मूर्ती घडवण्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. अखेरीस कार्य पूर्ण झाले. त्याच्या शेजारी एक पुजारी राहत होते. ती मूर्ती पाहून ते त्याला म्हणाले, " अत्यंत सुंदर मूर्ती आहे ही ! आपण ही मूर्ती मंदिरात ठेवू या. " त्यानंतर त्या मूर्तीची मंदिरामध्ये विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. ती सुंदर कृष्ण मूर्ती मंदिरात येणाऱ्या सर्व भक्तांच्या मनाला भावली. ते त्या मूर्तीची आराधना करू लागले. 
                  ज्या मनुष्याने तो पाषाण पायदळी तुडवला होता; तो मनुष्य एक दिवस मंदिरात आला. त्याने भक्तिभावाने त्या मूर्तीचे दर्शन घेतले. परंतु त्याने पायदळी तुडवलेल्या पाषाणातून ही सुंदर मूर्ती घडवली असल्याची त्याला कल्पना नव्हती. या जगातील लोकही असेच आहेत. प्रत्येकामध्ये, प्रयेक गोष्टीत,सर्वत्र दिव्यत्व वास करते म्हणून कधीही कोणाची उपेक्षा वा अनादर करू नका. तुम्ही एखाद्या गोष्टीची उपेक्षा केलीत तर तीच गोष्ट एक दिवस तुमच्यासाठी पूजनीय ठरेल. 

संदर्भग्रंथ :-  DIVINE STORIES  
                       and parables 

 
जय साईराम 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा