गुरुवार, ३० जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

         " नावलौकिक व अनुयायांचा समूह तुम्हाला परमेश्वर साक्षात्कार घडवू शकतो का ? "

प्रकरण तिसरे

मूळ पुढे सुरू

                   मी दागिने घालण्याचे, उंची साड्या नेसण्याची सोडून दिले. सिनेमा पाहणे बंद केले. मासिके, कथा, कादंबऱ्या न वाचता केवळ आध्यात्मिक व महाकाव्यांचे वाचन करण्यास मी वचनबद्ध झाले. माझ्या वडिलांच्या ग्रंथालयातील सर्व आध्यात्मिक पुस्तके मी वाचून काढली. विनोबाजींचे भगवद्गीतेवरील पुस्तक व गांधीजींचे ' माझे सत्याचे प्रयोग ' हे पुस्तक, ही दोन्ही पुस्तके म्हणजे माझे दोन नेत्रच. नवीन जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी या पुस्तकांची मला खूपच मदत झाली.
                 पुढील काही वर्षे मी अनेक संतमहात्म्यांना भेटून, मला तुम्ही परमेश्वराचे दर्शन घडवाल का ? या जन्मात मला परमेश्वर प्राप्ती होईल का ? असे प्रश्न विचारात होते. माझे वडील रामकृष्ण मिशनमध्ये सहभागी झाले होते. ते वरचेवर तिरुपारयातुराई येथील चिदभावनन्द स्वामीजींच्या तपोवन या आश्रमामध्ये जात. १०/१५ दिवस तेथे राहून कठोर साधना करत. जेथे अंतर्योग शिबिरे आयोजित केली जात तेथेही ते जात असत. मी ही त्यांच्याबरोबर तेथे जात असे. रामकृष्ण मिशनतर्फे महिन्यातून एकदा किंवा दोनदा आमच्या घरीही अंतर्योग शिबिर आयोजित केले जात असे. स्वामी नित्यानंद, स्वामी अखिलानंद, स्वामी बोधानंद, स्वामी सदानंद आणि स्वामिनी अंबिकाप्रिया हे सर्वजण शिबिराच्या वेळी आमच्याकडे येत. त्यांनाही मी ' मला परमेश्वराचे दर्शन होईल का ? ' हाच प्रश्न विचारात असे. अंबिकाप्रिया अम्मा आणि स्वामी सदानंद यांनी मला माझ्या साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले व अडीअडचणींच्या प्रसंगी खूप मदत केली. मी त्यांना आध्यात्मिक साधनेविषयी अनेक प्रश्न विचारत असे. ते माझ्या शंकाकुशंकांचे निरसन करीत व मला माझ्या ध्येयाप्रत जाण्यासाठी प्रोत्साहित करीत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २६ जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " पूर्णपणे शुद्ध होऊन परमेश्वराच्या चरणी स्वतःला समर्पित केले पाहिजे."

प्रकरण तिसरे 

मूळ पुढे सुरू 

                    माझ्या वडिलांचे माझ्याकडे लक्ष्य होते. त्यांनी मला रोज गीतेतील श्लोक म्हणण्यास सांगितले. आमच्याच घरात राहणाऱ्या संन्यासी राजाराम स्वामीजींची आध्यात्मिक प्रवचने मी ऐकत होते. 
                  यावर चिंतन केल्यानंतर परमेश्वराशी एकरूप होण्याची माझी तृष्णा मी पुन्हा नव्याने जागृत करण्याचे ठरवले. परमेश्वराचा शोध पुन्हा एकदा सुरू झाला. 
साधना, साधना साधना ... 
                 आजारपणातून उठल्यानंतर मी माझी घरातील कामे करू लागले. परमेश्वरप्राप्तीचे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने मी लगेचच शिस्तबद्ध जीवनशैली अंगिकारली. काळ, धन, अन्न आणि ऊर्जा अजिबात वाया न घालवता मी माझे विचार सतत परमेश्वरावर केंद्रित करण्याचे ठरविले. गृहस्थाश्रमी असल्यामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करून आदर्श जीवन जगण्याचा मी मनाशी निर्धार केला. 

उर्वरित मजकूर पुढील भागात .....

जय साईराम

गुरुवार, २३ जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
 
 सुविचार 

               " प्रेम म्हणजे काय ? कोणत्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता परमेश्वरावर केलेले अपरिमित प्रेम. "
 
प्रकरण तिसरे 

मूळ पुढे सुरू 

                   आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला रोज माझ्या शरीराचे तापमान पाहून त्याची नोंद ठेवण्यास सांगितली. एक महिन्यांनी त्यांनी त्या नोंदी पाहिल्या आणि ते म्हणाले की माझ्या शरीराचे सर्वसाधारण तापमान खूपच जास्त होते. १०० डिग्री फॅरनहाईट. लहानपणी मी माझ्या आजीजवळ झोपत असे. तेव्हा मी माझे कपडे काढून अंगावर ओली चादर घेऊन झोपत असे. 
                  सर्वजण मला विचारत की मी असे का करते. मलाही त्याचे कारण माहीत नव्हते. आज मला त्याचा उलगडा होतो आहे. शरीराचे उंच्च तापमान अग्नीचे द्योतक आहे. परमेश्वरापासून अलग झाल्याचा विरहाग्नी. त्यानेच आता मुक्ती स्तूपाचे रूप धारण केले आहे. 
                    हा काळ माझ्या जीवनाला कलाटणी देणारा होता. जीवनाचे पुन्हा मूल्यमापन करावे, जीवनाच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करावे असे मला वाटू लागले. मी तीन मुले असलेली २१ वर्षाची स्त्री आहे याची मला एकाएकी जाणीव झाली. हे काय झाले ? आंडाळ आणि मीरा यांच्यासारखे परमेश्वरमध्ये विलीन होण्याच्या माझ्या स्वप्नाचे काय झाले ? मला आता मातेची अनेक कर्तव्ये बजावायची होती. हे असे कसे घडले ? 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, १९ जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" जन्म हे सर्व वेदना आणि दुःखाचे मूळ कारण आहे."

प्रकरण तीन 

मूळ 

                  " जो सर्व धर्म परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो तो सर्वसंग परित्याग केलेला संन्यासी बनतो... तू गृहस्थाश्रमी जीवन दर्शवणारी संन्यासिनी आहेस "... बाबा 
गृहस्थाश्रमी संन्यासी 
                   लहानपणी उराशी बाळगलेले स्वप्न मागे ठेवून मी जुलै १९५५ मध्ये श्री. मनोहरन यांच्याशी विवाहबद्ध झाले. गृहस्थाश्रम - जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश केला. या माझ्या नव्या भूमिकेत मी ६ ते ८ वर्षे आनंदात घालवली. आयुष्यात प्रथमच मी वेगवेगळ्या रंगछटांच्या रेशमी साड्या नेसले. वसतिगृहामध्ये असताना माझ्यामध्ये निर्माण झालेला न्यूनगंड आता राहिला नव्हता. मी मदुराईला जाऊन एकेक साडी पसंत करण्यासाठी तास न् तास घालवत होते. माझ्या वडिलांनी मला खादीव्यतिरिक्त इतर काहीही वापरू दिले नाही. लग्नाच्या वेळेस वरपक्षाकडून मला पहिली रेशमी साडी मिळाली, तेव्हा मात्र माझ्या वडिलांनी ती नेसण्याची मला परवानगी दिली. माझे पतीही खादीच वापरत असत. ते अनेक वर्ष सरकारी खादी मंडळाचे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. आता आमचा तिसरा मुलगा मणिवन्नन त्यांची परंपरा पुढे चालवतो आहे. तो गांधी निकेतन आश्रमात नोकरी करतो. 
                   १९६१ मध्ये मणिवन्ननच्या जन्माच्या वेळी मी आजारी पडले. प्रसूती कळांमुळे माझ्या हृदयाचा आकार वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अशी लाखात एखादीच केस असते. डॉक्टरांनी मला एक वर्षभर पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले. पहिले तीन महिने तर मी अंथरुणावर पडूनच विश्रांती घेतली. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १६ जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " आपले मन शुद्ध झाल्यानंतरच आपण परमेश्वराचे स्पष्ट प्रतिबिंब पाहू शकतो व त्याचा खरा आवाज ऐकू शकतो." 
प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरू 

                   आमच्या घरी आम्ही खाण्याचे पदार्थ दुकानातून कधीही विकत आणत नव्हतो. चकल्या, बर्फी, लाडू  इ. जिन्नस आम्ही घरीच बनवत असू. माझ्या घरी माझी आजी, काका, मामा, वडील, पती, मुले या सर्वांसाठी खाण्याचे वाटे करून वेगवेगळ्या डब्यात ठेवले जात. प्रत्येकासाठी बरोबर मोजून मी ते डब्यात ठेवत असे. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत माझ्यासाठी सर्वजण सारखेच होते. 
                 माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझे वडील आणि मी एकटे पडलो. माझी मामी तिच्या दोन मुलांना घेऊन तिच्या वडिलांच्या घरी गेली. त्यामुळे मामा आमच्या घरी रहायला आले. माझ्या काकांच्या बाबतीतही तसेच घडले. काकी तिच्या वडिलांच्या घरी गेली म्हणून काका आमच्या घरी येऊन राहिले. ह्या सर्व घटनांचा माझ्या मनावर बराच परिणाम झाला. वैवाहिक जीवन असे का ? कुटुंबे विभक्त का बरे होतात ? प्रत्येक कुटुंबाला असे का भोगावे लागते ? हे सर्व दुःख कसे दूर करता येईल ? मला याचे खूप दुःख होत असे. मग माझ्या मनात विचार आला की अवतारांचे कुटुंबही असेच होते, यावर उपाय काय ? जगामध्ये बदल घडवण्यासाठी मी स्वामींची प्रार्थना केली. ज्याप्रमाणे खाद्यपदार्थांचे मी सर्वांसाठी समान वाटे करते, त्याप्रमाणे या जगात प्रत्येकाला आनंदही समान मात्रेत मिळावा, प्रत्येक कुटुंब आनंदाने व एकोप्याने रहावे,- माझे विचार हे असे होते. 

जय साईराम

रविवार, १२ जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

            " सर्व इच्छा आकांक्षा यापासून मनाला रिक्त करून, साधक परमेश्वराशी संपूर्ण शरणागत झाल्यानंतर परमेश्वर त्याचे सत्य स्वरूप प्रकट करतो." 
प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु

                     प्रथम स्वामी म्हणाले, " तू राधा आहेस " नंतर त्यांनी मला दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती म्हणून संबोधले. नंतर ते म्हणाले," तू अवतार होशील तू  ब्रम्हावस्था प्राप्त केली आहेस." हे सर्व माझ्या कठोर तपश्चर्येचे व साधनेचे फळ म्हणून मला मिळणार होते. तथापि मी ते नाकारले. कारण माझ्या दृष्टीने ती निव्वळ मानांकित पदे होती. मला फक्त परमेश्वर हवा आहे. 
                     लहानपणी माझ्याकडे खण भरून बाहुल्या होत्या. एकदा मला कचकड्याची छोटीशी बाहुली हवी होती. त्यासाठी मी रडून रडून आकांत केला. माझ्या आईनी  आणि आजीनी खणातल्या सगळ्या बाहुल्या काढून माझ्यापुढे ठेवल्या व त्यातील प्रत्येक बाहुलीची गोष्ट सांगितली. त्यांनी माझी समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण मी हट्टाला पेटले होते. जेवणखाण सोडून मी नुसती रडत होते. ती बाहुली मिळाल्यावरच मी रडायची थांबले. 
                      मला फक्त स्वामी हवेत, असे मी म्हणाले; तरीही स्वामींनी मला बाहुल्यांच्या मालिकेसारख्या राधा, दुर्गा, लक्ष्मी, अवतारपद, ब्रम्ह आणि ब्रम्हअवस्था  या सर्व अवस्था दाखविल्या. मी म्हणत राहिले, " मला या बाहुल्या नकोत मला फक्त तुम्ही हवे आहात." शेवटी स्वामी म्हणाले, की ते केवळ माझ्यासाठी पुढील अवतार घेणार आहेत. मला जे हवे ते मिळेपर्यंत संतुष्ट न होण्याचा माझा हट्टी स्वभावच मला परमेश्वर प्राप्त करून देत आहे. या सर्व अवस्थाही जर मी बाहुल्यांप्रमाणे नाकारते आहे, तर मला भौतिक गोष्टींची गरजच काय ? मला हा आश्रम, नावलौकिक, गर्दी काहीही नको. स्वामींनी मला आश्रम बांधण्यास सांगितले. मुक्ती स्तूप आणि मुक्ती निलयम आश्रम स्वामींच्या संकल्पानुसार बांधले गेले आहेत. माझ्या दृष्टीने तेही सामान्य बाहुल्यांप्रमाणेच आहे. मला हे काहीही नको.

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ९ जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " ज्याचे मन सदैव परमेश्वराच्या ठायी निमग्न असते तो खरा ब्रम्हचारी होय." 

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

                  मी या जगाविषयी अज्ञानी आहे. मी फक्त परमेश्वरासाठी जगते आहे. लोक माझ्याकडे भौतिक दृष्टीकोनातून पाहतात आणि माझा अनादर करतात. सत्य काय आहे, जीवनाचे सार्थक कशात आहे हे जगाला अजून समजत नाहीय आणि म्हणूनच मी स्वतःला या संसारी कचऱ्यापासून  दूर ठेवले आहे. 
                  लहानपणी मी खूप हट्टी होते. एकदा का एखादी गोष्टी हवी असे वाटले की ती मिळेपर्यंत मला चैन नसे. मला बाहुल्या खूप आवडत असत आणि एखादी बाहुली मला आवडली की  माझे वडील आणि आजी ' एजंट ताता ' यांना ताबडतोब मदुराईला बाहुली आणण्यासाठी पाठवत. त्यासाठी त्यांना आमच्या आडगावापासून कालीगुडीला जावे लागे व तेथून आगगाडीने मदुराईला जावे लागे. ती बाहुली हातात पडेपर्यंत मी काहीही न खाता पिता रडून नुसता गोंधळ घालत असे. बाहुली मिळाल्यावर मी खुशीने तिच्याबरोबर खेळत असे. असा माझा हट्टी स्वभाव - मला जे पाहिजे ते मी मिळवतेच. याच माझ्या हट्टी स्वभावाने मागणी केली, " मला परमेश्वर पाहिजे, मला त्याला आत्ता याक्षणी पहायचे आहे. त्याच्याशी बोलायचे आहे, मला त्याच्याशी लग्न करायचे आहे, त्याच्याबरोबर रहायचे आहे. त्याच्यामध्ये विलिन व्हायचे आहे." 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साई राम

रविवार, ५ जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " ज्ञानाने चित्तशुद्धी होते. आणि म्हणून आपले सर्व अनुभव सत्य असतात."

प्रकरण दुसरे 

अंकुर पुढे सुरु 

                   माझ्याप्रमाणेच माझे काका, आजी आणि वडील मुलांना भक्तीरसाने ओथंबलेल्या कथा सांगत. आम्ही त्यांना भक्तीमार्गावर आणले. आम्ही त्यांना गीता, नारायणसूक्त आणि तिरुपावै, आंडाळचे महान भक्ती कार्य शिकवले. रोज सकाळी ६ वाजता आम्ही सर्वजण प्रार्थना, भजन आणि गीतेतील श्लोकांचे पठण करत असू. संध्याकाळी काही वृद्ध मंडळी आमच्या व्हरांड्यात येऊन बसत. तेव्हा मी त्यांना रामायण व भक्तविजय वाचून दाखवत असे. आमच्या आयुष्यात फक्त परमेश्वर होता. दुसरे काहीच नव्हते.  
                     जगाची रीत का बरे वेगळी आहे ? आमचे कुटुंब का इतरांहून वेगळे होते ? मी नेहमी यावर विचार करत असे. आम्ही कधीही कोणाशी बोललो ते सत्यच बोललो. गोष्टी जशा होत्या तशाच सांगितल्या. मला नवल वाटे ' लोक सत्य का लपवतात ? ते खोटं का बोलतात ? उत्तर न मिळाल्याने माझे मन भीतीने ग्रासून जात असे.'
                     या संसारी लोकांना पाहून मला भीती वाटे आणि म्हणून मी एकटीच रहात असे. माझा स्वभाव त्यांच्या स्वभावाशी मिळता जुळता नसल्याने मी माझ्या कृष्णाबरोबर एकटीच रहात असे.

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २ जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

             " अनेक जन्मांमध्ये साठवलेल्या टाकाऊ आणि अमंगल गोष्टींमुळे आपले मन अपवित्र आणि कलंकित झाले आहे. आपल्याला चित्तशुद्धी च्या सत्वपरिक्षेस उतरायलाच हवे."

प्रकरण दुसरे

अंकुर पुढे सुरु

भगवद्प्रीत्यर्थ जीवन
                     बालपणी माझ्या वडिलांनी मला त्यांच्याप्रमाणे आत्मपरिक्षणाची डायरी लिहायला शिकवली. आम्ही ती रोज लिहित असू. हीच सवय मी माझ्या तिन्ही मुलांना लावली. रात्री आम्ही दिवसभरात केलेल्या चुका लिहित असू.
* मी कोणाशी कठोर शब्दात बोलले का ?
* मी कोणाशी खोटं बोलले का ?
* मी क्रोधित झाले का ? 
* मी दुसऱ्यांमधील दोष काढले का ? 
* मी दुसऱ्यांना मदत केली का ? 
                    मुले या प्रश्नांची उत्तरे लिहित आणि स्वतःच्या वर्तणुकीचे परीक्षण करीत; याच्यामुळे दुसऱ्यांमधील दोष न काढता ती स्वतःचे परीक्षण करण्यास शिकली. मी त्यांना सांगितले, की हा जन्म आपल्याला आपल्यातील चुका सुधारण्यासाठी दिला गेला आहे.  
                  माझ्या वडिलांनी जसे मला शिकवले तसेच मी माझ्या मुलांना शिकवले. 
                 हे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आदर्श हीच माझ्या कुटुंबाची धनदौलत होय. मुलांना वाढवताना स्वयंशिस्तीवर माझा भर होता. तसेच त्यांनी चांगल्या  सवयी अंगी बाणवाव्यात, यासाठी मी त्यांना प्रोत्साहन दिले. शिक्षणासाठी बाहेर राहिल्यावर याचा त्यांना खूप उपयोग झाला. कावेरीने फातिमा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अरविंदन आणि मणिवन्ननने विवेकानंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे आध्यात्मिक, शिस्तबद्ध जीवन चालू राहिले. 

उर्वरित मजकूर पुढील भागात .....

जय साईराम