गुरुवार, ३० जून, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

         " नावलौकिक व अनुयायांचा समूह तुम्हाला परमेश्वर साक्षात्कार घडवू शकतो का ? "

प्रकरण तिसरे

मूळ पुढे सुरू

                   मी दागिने घालण्याचे, उंची साड्या नेसण्याची सोडून दिले. सिनेमा पाहणे बंद केले. मासिके, कथा, कादंबऱ्या न वाचता केवळ आध्यात्मिक व महाकाव्यांचे वाचन करण्यास मी वचनबद्ध झाले. माझ्या वडिलांच्या ग्रंथालयातील सर्व आध्यात्मिक पुस्तके मी वाचून काढली. विनोबाजींचे भगवद्गीतेवरील पुस्तक व गांधीजींचे ' माझे सत्याचे प्रयोग ' हे पुस्तक, ही दोन्ही पुस्तके म्हणजे माझे दोन नेत्रच. नवीन जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी या पुस्तकांची मला खूपच मदत झाली.
                 पुढील काही वर्षे मी अनेक संतमहात्म्यांना भेटून, मला तुम्ही परमेश्वराचे दर्शन घडवाल का ? या जन्मात मला परमेश्वर प्राप्ती होईल का ? असे प्रश्न विचारात होते. माझे वडील रामकृष्ण मिशनमध्ये सहभागी झाले होते. ते वरचेवर तिरुपारयातुराई येथील चिदभावनन्द स्वामीजींच्या तपोवन या आश्रमामध्ये जात. १०/१५ दिवस तेथे राहून कठोर साधना करत. जेथे अंतर्योग शिबिरे आयोजित केली जात तेथेही ते जात असत. मी ही त्यांच्याबरोबर तेथे जात असे. रामकृष्ण मिशनतर्फे महिन्यातून एकदा किंवा दोनदा आमच्या घरीही अंतर्योग शिबिर आयोजित केले जात असे. स्वामी नित्यानंद, स्वामी अखिलानंद, स्वामी बोधानंद, स्वामी सदानंद आणि स्वामिनी अंबिकाप्रिया हे सर्वजण शिबिराच्या वेळी आमच्याकडे येत. त्यांनाही मी ' मला परमेश्वराचे दर्शन होईल का ? ' हाच प्रश्न विचारात असे. अंबिकाप्रिया अम्मा आणि स्वामी सदानंद यांनी मला माझ्या साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले व अडीअडचणींच्या प्रसंगी खूप मदत केली. मी त्यांना आध्यात्मिक साधनेविषयी अनेक प्रश्न विचारत असे. ते माझ्या शंकाकुशंकांचे निरसन करीत व मला माझ्या ध्येयाप्रत जाण्यासाठी प्रोत्साहित करीत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा