गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" जर मन शांत असेल तर देहालाही पीडा नसेल."

प्रकरण बारा 

पंढरपूर 

स्वामी म्हणाले,
                 " तू रडू नकोस. तू अश्रू ढाळलेस तेव्हा माझ्या डोळ्यात रक्ताश्रू आले. तुझ्या हातातून रक्त आले तेव्हा माझ्याही हातातून रक्त आले. तुझी पावले भाजली तेव्हा माझेही पाय भाजले. त्याचप्रमाणे तुझ्या हृदयाची जखम माझ्या देहाची जखम झाली." 
                 २७ मे ह्या दिवशी मला झालेलं दुःख मी कोणत्या शब्दात सांगू ? त्यानंतर महिनाभर माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. माझ्या हृदयाची जखम ही स्वामींच्या देहावरील जखम बनली. कशाच्या तरी अलर्जी माझ्या त्वचेला आत्यंतिक कंड सुटली होती. मला खूपच त्रास होत होता. माझ्या हातांना व पायांना जखमा झाल्या होत्या. त्यातून द्रव पाझरत होता. अनेक दिवस माझ्या संपूर्ण अंगाची लाही लाही होत होती. 
हे प्रभू,
बंधमुक्त कर मज, ये मजसमवेत
सदा सर्वदा राहू दे हातात हात 
पुन्हा पुन्हा जन्म, किती दुःखभोग 
आस तुझ्या करूणदृष्टीची 
प्रीती तुझी असे माझा अक्षय ठेवा ! 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " परमेश्वराचे साम्राज्य तुमच्या प्रतिक्षेत असताना ऐहिक साम्राज्याची इच्छा कशाला ? "

प्रकरण बारा 

पंढरपूर 

                 २७ तारखेला स्वामींच्या स्वागताची जय्यत तयारी झाली होती. आम्ही डोळ्यात प्राण आणून स्वामींची प्रतिक्षा करत होतो. पण ते आले नाहीत. मी धाय मोकलून रडत होते. 
                 त्यानंतर स्वामी कोडाईकॅनलहून व्हाईटफिल्डला गेले. मी स्वामींना विचारले, " स्वामी, मी व्हाईटफिल्डला येऊ का ? " स्वामी म्हणाले," नको. तू येऊ नकोस." स्वामी ४ जूनपर्यंत दर्शन देणार नसल्याचे बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितले. त्यांनतर आम्हाला एक फोन आला, की स्वामींचे ऑपरेशन झाले आहे. त्यांनतर बऱ्याच जणांकडून ही बातमी खरी असल्याचे समजले. प्रत्येक फोनगणिक दुःखाचे कढ अनावर होऊन मी आक्रोश करत होते. स्वामींनी नंतर मला सांगितले," जगाच्या कर्मांचा संहार करण्यासाठी मी हे सोसतो आहे." 
                माझ्या अश्रूंना अंत नव्हता. काही दिवसानंतर मुक्ती निलयममधील, पुरुषभर उंचीचा स्वामींचा फोटो खाली पडला. कृष्णाच्या मूर्तीचा मुकुटू तुटला व त्याच्या हनुवटीलाही भेग पडली. मी एक महिना सतत रडत होते. त्यावेळी आम्ही स्वामींच्या फोटोवर रक्ताश्रू पाहिले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  
  

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


कलियुग अवतार भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या आगमन दिना निमित्त  

                 आज २३ नोव्हेंबर, सर्वशक्तिमान सर्वज्ञ आणि सर्वव्यापक श्री सत्य साई बाबांचा जन्मदिवस ! त्यानिमित्त श्री वसंतसाईंनी त्यांच्या पुस्तकातून केलेल्या उपदेशाचे वाचन करून तो आचरणात आणण्याचा संकल्प करून श्री सत्य साई बाबांचा जन्मदिन साजरा करू या.
अम्मा म्हणतात,
                 " विश्वाचे कल्याण कशामध्ये आहे ? प्रत्येकामध्ये आध्यात्मिक जागृती व्हायला हवी ! आपण हे जीवन का जगतो ? आपण जन्म का घेतला ? पुन्हा पुन्हा मृत्यू पावण्यासाठी आपण जन्म घेतला का ? नाही हा आपला उद्देश नाही. अंत नसलेल्या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी आपण जन्म घेतला आहे. आपण जन्म घेण्याचे हे एकमात्र कारण आहे. आता ही मुक्ती मिळवायची कशी ? अखंड साधनेद्वारे हे शक्य आहे . मी भक्तांना नेहमी सांगते की स्वामींच्या शिकवणीचा नियमित अभ्यास हेच आपले जीवन बनून गेले पाहिजे. जर आपल्यापैकी प्रत्येकाने आध्यात्मिक सत्यं जाणून घेतली तर खऱ्या अर्थानी आपली घरे माधुर्याने ओतप्रत भरून जातील. आपल्या घरांमधील परिवर्तनाने देशामध्ये परिवर्तन घडून येईल जर संपूर्ण देशात आध्यात्मिक जागृती आली तर संपूर्ण जगामध्ये सुपरिवर्तन दिसून येईल. आपण मानवतेच्या कल्याणाची उत्कट इच्छा ठेवली पाहिजे. " लोक समस्ता सुखिनो भवन्तु " चा हाच अर्थ आहे. (जगातील सर्व जीव सुखी होवोत )
                  हा धडा आपण आपल्या पूर्वजांकडून शिकलो आहोत.' संपूर्ण जग सुखात आनंदात राहो ' अशी एक म्हण आहे. हा आपला वारसा आहे, आपली संस्कृती आहे. समस्त जग सुखी होवो, हा आपल्या पूर्वजांकडून मिळालेला अमूल्य ठेवा आहे. भौतिक संपत्ती अशाश्वत असते परंतु आध्यात्मिक संपत्ती शाश्वत असते. आपण सदैव निःस्वार्थीपणे सामायिक  हिताचा विचार करून कार्य केले पाहिजे.




जय साईराम 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " परमेश्वरावर प्रेम करा. त्याचा ध्यास घ्या. तुम्हाला फक्त तो आणि तोच हवा आहे, हे त्याला सांगा. "

प्रकरण बारा 

पंढरपूर 

                  तसेच एकदा प्रेमयज्ञ करताना चुकून माझा पाय निखार्यावर पडला आणि माझा तळपाय भाजला. त्याच दिवशी आम्ही फोटोतील स्वामींच्या पायावर भाजल्याच्या खुणा पाहिल्या. अशा बऱ्याच घटनांमधून मी आणि स्वामी एक आहोत, हे स्वामी पुन्हा पुन्हा सिद्ध करत आहेत. 
                  पंढरपूरहून परत आल्यानंतर आम्ही ११ मे २००३ ला व्हाईटफिल्डला गेलो. कारण स्वामी तिथे होते. स्वामींनी तात्काळ समर कोर्स रद्द केला आणि ते कोडाई कॅनलला गेले. त्यांच्या पाठोपाठ आम्हीही कोडाई कॅनलला गेलो. तेथे ध्यानात स्वामी म्हणाले," तू  मुक्ती निलयमला जा. मी तिथे येईन." आम्ही त्वरित निमंत्रण पत्रिका बनवली. चार दिवसाच्या अवधीत स्वामींनी त्यांच्या भेटीशी संबंधित आमची १३ पत्रे व निमंत्रण पत्रिका घेतली. स्वामींनी आम्हाला आशीर्वाद दिले. आम्ही मुक्ती निलयमला आलो. स्वामींच्या स्वागताची सर्व तयारी केली. मी स्वामींना रोज प्रार्थना करत होते." स्वामी, तुम्ही माझ्यासाठी नाही, तर जगाच्या कल्याणासाठी मुक्ती निलयमला या. तुम्ही इथे येऊन मुक्तीचा ध्वज फडकवा. आम्ही येथे दररोज यज्ञ करतो. तुम्ही स्वतः येऊन, स्वहस्ते देवांना पूर्णाहुती द्या."  

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" निरंतर ईशचिंतन हीच खरी भक्ती."

प्रकरण बारा 

पंढरपूर 

आम्ही दोघं एक आहोत 
                 ऑक्टोबर २००२ साली मुक्ती निलयमच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी आम्ही ' शुद्ध सत्व ' इमारतीमध्ये यज्ञ केला. यज्ञात समिधा अर्पण करताना प्रत्येकवेळी मी म्हणत होते," स्वामी, तुम्ही पूर्णाहुती म्हणून माझा स्वीकार करून जगाला मुक्ती द्या. " आम्ही जेव्हा यज्ञात पूर्णाहुती दिली तेव्हा मी स्वतःस अग्नीला अर्पण करण्याचा प्रयत्न केला. परंतु एस. व्हीं. नी मला मागे ओढले. त्या वेळी माझा हात भाजला होता.
                 ऑस्ट्रेलियाच्या लुईसने माझे आणि स्वामींचे एकेक चित्र काढून मला दिले होते. आम्ही ते त्या दिवशी वेदिकेवर ठेवले होते. दुसऱ्या दिवशी त्यातील स्वामींच्या आणि माझ्या चित्रावर भाजल्याच्या खुणा आम्हाला दिसल्या. ध्यानात स्वामी म्हणाले," जे जे काही तुझ्या बाबतीत घडेल ते सर्व माझ्याही बाबतीत घडेल. आपण दोघं एक आहोत. " 
                एकदा गीता माझ्या हातात काचेच्या बांगड्या भरत असताना माझ्या हाताला बांगडीची काच लागली आणि रक्त आले. रक्ताचा रंग भगवा होता. त्यादिवशी संध्याकाळी माझ्या कॉटवरील स्वामींच्या फोटोतील बोटांवर कापल्याच्या खुणा दिसल्या, तसेच कॉटवर आणि उशीवर रक्ताचे काही थेंबही दिसले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " भक्ती हा परिपूर्णतेकडे जाणाऱ्या आत्म्याचा प्रवास आहे. सदैव ईश्वर चिंतनात लीन ही खरी भक्ती होय."

 प्रकरण बारा 

पंढरपूर 

                 वृंदावनमध्ये कृष्णाने राधेच्या गळ्यात अग्नी मंगळसूत्र बांधले. प्रेमयज्ञात अगदी तेच घडले. स्वामींनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातले. फोटोमधून हे सिद्ध झाले. फोटोत स्वामी व्हाईटफिल्ड - वृंदावन येथील स्टेजवर बसल्यासारखे दिसत आहेत. मला बनवायला सांगितलेल्या पोट्टू मंगळसूत्रास स्वामींनी २७ मे २००१ रोजी तिथेच आशीर्वाद दिले. त्यावेळी आमच्यापैकी फार थोड्या लोकांना या घटनेची माहिती होती. आता स्वामींनी हे परत एकदा अनेक लोकांसमोर दाखवले आहे. अग्नीला साक्षी ठेवून अग्नीसमोर, अग्निच्याद्वारे स्वामींनी ही घटना दाखवून दिली. त्यांनी माझ्या गळ्यात अग्नी मंगळसूत्र घातले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

               " भक्तांसाठी तो निर्गुण निराकार परमेश्वर अनेक रूपे धारण करतो. भक्तांच्या स्थायीभावानुसार ती रूपे वेगवेगळी असतात. "

प्रकरण बारा 

पंढरपूर 

                 १९६१ मध्ये स्वामी पंढरपूरला गेले होते, तेव्हा त्यांनी मंगळसूत्र साक्षात् करून रुक्मिणीच्या गळ्यात बांधले. राधाकृष्णाचा विवाह झाला नाही. माझ्या शरीर निवेदनासाठी स्वामींनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने विठ्ठल रुक्मिणी विवाह दाखवला. या सर्वज्ञ परमेश्वराची कुशल योजना कोणाला कळणार ? मी हे लिहित असताना मला एक प्रसंग आठवतो आहे. 
                 १९ ऑक्टोबर २००५. मुक्ती निलयमच्या उद्घाटन समारंभाचा वर्धापन दिन. सकाळी आम्ही प्रेमयज्ञ केला. अमरने यज्ञकुंडातील अग्निज्वालांचे बरेच फोटो काढले. एका फोटोमध्ये स्वामी माझ्या मस्तकाच्या वरती खुर्चीमध्ये बसलेले दिसत होते. अजून एका फोटोमध्ये जणूकाही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातले जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

              " प्रेमाने सिंचीत केलेल्या भक्तिच्या बीजातून भक्तिचे नाजुक रोपटे अंकुरते, त्याच्या संरक्षणासाठी साधनेचे कुंपण घालून परमेश्वर प्राप्तीचे फळ मिळवता येते. "

प्रकरण बारा 

पंढरपूर 

स्वामी म्हणाले,
               " तू इथून ताबडतोब निघून परत जा. येथील स्पंदने तू सहन करू शकणार नाहीस. तुझ्या भावनांवर नियंत्रण ठेव. अग मीच तो विठ्ठल आहे. यावर विश्वास ठेव. बालपणापासून तू  सदैव ह्याच रूपाचं चिंतन व भक्ती करत होतीस. तुला कल्पना नाहीय की हेच रूप तुझ्या हृदयावर कोरले गेले आहे. मीच तो खरा पांडुरंग आहे हे दाखविण्यासाठी मी तुला इथे बोलावले. नाहीतर मी रुक्मिणीच्या गळ्यात मंगळसूत्र कसे बांधले असते ? तुझी इष्टदेवता कोणती हे तुला माहीत नव्हते. आता ते तुला ज्ञात झाले." 
                 या अगोदर स्वामींनी मला सांगितले," वृंदावनमधील विवाहदृश्यामध्ये तू मला तुझे सर्वस्व अर्पण केलेस. तू तुझा देहही मला अर्पण केलास. याचा सबळ पुरावा मी तुला व्हाईटफिल्डमध्ये देईन. "
                त्यावेळी व्हाईटफिल्ड म्हणजे बंगलोरमधील व्हाईटफिल्ड असे आम्हाला वाटले. तथापि पंढरपूरमधील घटनेनंतर आमच्या लक्षात आले, की पांडुरंगाचे पंढरपूर म्हणजे व्हाईटफिल्ड पांडुचा अर्थ पांढरे आणि रंग म्हणजे क्षेत्र. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

           " आसक्ती आणि इच्छा विरहित मनुष्य जगातील सर्वात श्रीमंत मनुष्य आहे." 

प्रकरण बारा 

पंढरपूर 

                   "  माझा आत्मा ज्याला हाकारत होता, तेच आहे हे ! माझ्या हृदयाची केवळ हीच एक जागा आहे. हा माझा, माझ्या एकटीचा विठ्ठल आहे. आता माझ्या लक्षात आलं की युगानुयुगे मी त्याच्याशी संयुक्त होते. विरहाच्या जाणीवेने माझे डोळे अश्रूंनी डबडबले. मी आक्रोश केला." आता मी दुसरीकडे कुठेही जाणार नाही. मी ही जागा सोडून कुठेही जाणार नाही. पांडुरंगा !विठ्ठला ! मी तुझी आहे."
              कोठून उसळी मारून हे रडू येत होतं ? कुणास ठाऊक !  तेवढयात मंदिराचे पुजारी आले, त्यांनी गाभाऱ्याचे दार बंद केले. ते म्हणाले," तुम्ही रुक्मिणी मंदिरात जा."  मला पाय उचलणेही शक्य होत नव्हते. डोळ्यातून अखंड अश्रूधारा वाहत होत्या. मी अगदी वेडीपिशी झाले होते. मी मोठ्याने ओरडत होते. " नाही, नाही. मी नाही येणार. तुम्ही सगळे जा." मी पूर्णपणे भाववश झाले होते. माझ्या भावनांवर काबू करण्याचा मी प्रयत्न करत होते. माझ्या सोबत्यांच्या मदतीने मी रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात गेले व पुन्हा ध्यानाला बसले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " आपण आपली सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण केल्यानंतर हळूहळू चित्त शुद्धी होते." 
प्रकरण बारा 
पंढरपूर

" आत्म्याचा परमात्म्याशी पूर्ण योग झाल्यानंतरच पूर्ण सत्य प्रकट होते."
               वृंदावनला जाऊन आल्यानंतर आम्ही शिर्डीला गेलो, तेथून पंढरपूरसाठी निघालो. विठ्ठल मंदिराजवळ पोहोचल्यावर दर्शनासाठी रांगेमध्ये उभे राहिलो. गर्भगृहात प्रवेश मिळाल्यानंतर पांडुरंगाचे दर्शन झाले. मी विठ्ठल पाहिला ! त्याला पाहताक्षणी मला एक जबरदस्त ओढ जाणवली. मी विलाप करत वेदिकेच्या दिशेने ओढली गेले. त्याचा चरणस्पर्श करताक्षणी जणू काही माझ्या डोक्यापासून पायापर्यंत विजेचा झटका बसला. मी आता पूर्ण होते आहे. ही भावना हृदयाच्या गाभ्यातून विकसित झाली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम