गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" ईश्वराभिमुख केलेले तुमचे भाव तुम्हाला परमेश्वर बनवतात."

सूत्र चौथे 

प्रेमाची सखोलता 

            माझ्या मनात केवळ एकच विचार असतो. स्वामींचा विचार. माझ्यामध्ये 'मी ' नसल्यामुळे मी ईशस्थिती वा अन्य कोणतीही अवस्था जाणू शकत नाही. तसेच या स्थितींमध्ये मी कार्यही करू शकत नाही. माझा ' मी ' स्वामींमध्ये पूर्ण विलीन झाला आहे. या प्रेमाने मला रिक्त केले आहे. 
            अगोदर एकदा स्वामींनी सांगितले," तू प्रेमसाई अवतार बनून येशील " मी घाईघाईने म्हणाले," नको, नको, मला भीती वाटते. तुम्ही माझे सर्व तपोबल घेऊन टाका."
            त्यांनतर स्वामींनी मला पूर्ण रिक्त केले आणि त्यांचे सत्य माझ्यामध्ये भरून राहिले. मला अवतार किंवा परमेश्वर व्हायचे नाही. मला फक्त स्वामी हवेत. म्हणून स्वामी म्हणाले," हे प्रेम परमेश्वरपदालाही सामान्य ठरवून त्याचा अव्हेर करते. ही आहे माझ्या प्रेमाची गहनता ! हे प्रेम मला बहाल केलेल्या देवत्वाच्या वेगवेगळ्या पदव्या नाकारते. हे वेडे प्रेम आहे. ते म्हणते," फक्त स्वामी,फक्त स्वामी पुरेसे आहेत." ही माझ्या प्रेमाची एक बाजू आहे. आता आपण माझ्या प्रेमाची दुसरी बाजू पाहूया. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम     

रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " संपूर्ण विश्वामध्ये एकच चैतन्य भरून राहिले आहे. आपले भाव आपल्याला त्या वैश्विक चैतन्याशी जोडतात. "

सूत्र चौथे 
प्रेमाची सखोलता 



२८ जून २००८ ध्यान 
वसंता - स्वामी, मी लिहिलेले ' या हृदयीचे त्या ह्रदयी ' हे प्रकरण कसे आहे ?
स्वामी - प्रिये, 
        तुझिया प्रेमाची सखोलता उमगली मज आता 
        अतिप्रगाढ हे प्रेम 
        झिडकारते ईशपदास लेखोनी सामान्य 
        प्रेमसूत्र लेखन तुझ्याविना लिहू जाणे कोण ? 
        अळी असो वा परमेश सर्वची सम तुझिया प्रेमास 
        बोलण्यास अधिक काय असे ?
        सदा तुझिया चिंतनी मी
        अणुरेणु माझे वेढून टाकिती तुझे प्रेम !
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात.....

जय साईराम   

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

गोकुळाष्टमी निमित्त 

रासलीला ..... ज्ञानाचे नूतनद्वार 


            बाळकृष्ण अतिशय खट्याळ होता. तो त्याच्या सवंगड्यांबरोबर गोपिकांच्या घरी जाऊन लोण्याची मडकी फोडून लोणी चोरून खात असे. गोपींना त्याच्या खोड्यांचा राग येत नसे याउलट परमेश्वराच्या खोड्यांचा त्या आनंद लुटत असत. ह्या बाललीलांनी गोपींना मोहिनी घातली होती. त्यांना अत्यंत आनंदमय वाटत असे. 
            जगातील ५८० कोटी लोकांचा वेगवेगळा स्वभाव आहे. सकाळ पासून रात्रीपर्यंत आपण असंख्य मनोभाव व्यक्त करत असतो. आपल्यामध्ये क्रोध, भीती, औदासिन्य, आनंद, चिंता, शांती, तिरस्कार इ. भावना असू शकतात. हे सर्व परमेश्वराची क्रीडा समजून त्याचा आनंद घेतला पाहिजे. उदा. आपले कौटुंबिक सदस्य आणि त्यांचे मनोभाव ह्याकडे बाळकृष्णाची लीला ह्या दृष्टीने पाहिले पाहिजे. जर आपण आपले भाव दर्शवून प्रतिक्रिया दिली तर आपल्यामध्ये भीती, क्रोध, तिरस्कार ह्यासारखे भाव आपल्यामध्ये उद्भवू शकतात. ह्या सर्व भावनांची मनामध्ये नोंद केली जाते व त्यातून भावी जन्मासाठी बीजरूपी संस्कार बनतात. अन्नासारखे ते गोड, खारे वा मसालेदार बनवले जातात व्यक्तिगत रुचीवर ते अवलंबून असते. आपल्या संस्कारावर आधारीत आपण पुढील जन्म घेतो.     
            आपण प्रत्येक गोष्ट परमेश्वराची लीला म्हणून पाहिले पाहिजे. कसे ? प्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की हे विश्व म्हणजे ह्या परमशक्तीची लीला आहे. तो एक आहे तोच अनेक झाला." एकोहम् बहुस्यामी." 
           उदा. बटाट्यापासून आपण सांबार, वेफर्स ह्यासारख्या विविध पाककृती बनवू शकतो. एकच भाजीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. त्याचप्रमाणे परमेश्वर हा सर्व निर्मितीचे मूलभूत तत्व आहे. कोणीही मग तो चांगला असो वा वाईट प्रत्येकामध्ये परमेश्वराचा निवास आहे. हे सत्य आपण जाणले तर आपण इतरांच्या मनोभावांवर प्रतिक्रिया देणार नाही. सर्व त्याची लीला आहे. जर आपण हे जाणले तरच आपण निरंतर परमेश्वराचे माधुर्य चाखू शकतो, परमेश्वराच्या मधुरामृताचे रसपान करू शकतो. मग अखिल विश्वच रासलीला बनून जाते. 
            जर कुटुंबातील कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर ती कान्हाची बाललीला आहे असे समजा. त्या व्यक्तीच्या क्रोधाचा, परमेश्वराचा क्रोध समजून आनंद घ्या. जर तुम्ही एखाद्याच्या वागणूकीने नाराज होत असाल तर ती दिव्य लीला समजून तिचा स्वीकार करा. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे परमेश्वराची लीला म्हणून पाहिले तर तुम्हाला दिव्य आनंदाची प्राप्ती होईल.

संदर्भ - श्री वसंत साईंच्या ' गीता गोविंदम् अगेन ' ह्या 
पुस्तकातून


    
जय साईराम 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प वीस 
चंदन 


६ सप्टेंबर २००४ मुक्ती निलयम

            आज गोकुळाष्टमी, गेल्या दोन दिवसांपासून स्वामींच्या फोटोवर चंदनाच्या रेषा उमटत आहेत. आम्ही यज्ञ करत असताना चंदनाचा सुगंधही सर्वत्र दरवळत होता. स्वामींनी मला सत्संगामध्ये चंदनाविषयी बोलण्यास सांगितले. 
             हळदी, कुंकवाप्रमाणेच चंदन पूजेच्या साहित्यातील एक शुभ घटक आहे. गंध उगाळणाऱ्याच्या हातांनाही चंदन त्याचा सुगंध बहाल करते. चंदनाकडून आपण हा धडा शिकला पाहिजे. जे आपल्याला त्रास देतात त्यांच्याशीसुद्धा आपण चांगले वागले पाहिजे. चंदनाचे खोड स्वतःला झिजवून आपला आकार गमावते व भुकटी स्वरूप बनते. त्याचप्रमाणे आपणही परमेश्वरासाठी आपले जीवन व्यतीत केले पाहिजे. आपल्या अहंकाराचा त्याग करून इतरांना मदत केली पाहिजे. 
             ज्या माणसाला चंदनाचे मूल्य माहित नाही तो त्याचा जळणासाठी उपयोग करतो. ज्याला त्याचे मूल्य माहित असते तो त्याचा वापर परमेश्वराला अर्पण करण्यात येणाऱ्या समिधांसाठी करतो. त्याचप्रमाणे आपला जन्म भौतिक जीवनासाठी नसून परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी आहे. प्रत्येकाने आपले जीवन यज्ञासामान बनवले पाहिजे. आपण सर्व इच्छांपासून स्वतःला रिक्त बनवले पाहिजे. जर आपण असे केले तर आपण चंदन बनून जाऊ. स्वामी ते चंदन घेतील व त्यांच्या देहावर लावतील. त्या जीवाचे जीवन आणि हृदय चंदनासारखे शीतल आणि सुगंधी असेल. 

व्याकुळ कृष्ण

'वेदना माझ्या तुम्ही जाणत नाही '
तक्रार ही तुझी तुझ्या सखीकडे
क्रिडा केली गोपींशी, परि त्यांच्यात पाहिले मी तुजसी 
त्यांच्या हृदयात केला विहार परी माझ्या हृदयी तुझा निवास 
दिव्यामृत माझे जाणून घे 
कृष्ण केवळ राधेसाठी 
सत्या केवळ वसंतेसाठी 
जेथे जेथे मी असेन 
तेथे तुझा अंगिकार करेन
वसिष्ठ गुंफेत मी शुद्ध सत्व 
तुजही बनवेन सी शुद्ध सत्व 
वृंदावनात मी कृष्ण 
तुज राधा मी बनवेन 
पंढरपुरात मी पांडुरंग 
तुज रुक्मिणी मी बनवेन 
मी परमेश्वर 
तू आनंदी तर मी आनंदी 
हे प्रिये ! करू शकेन का मी तुज आनंदी 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या 'Gita Govindam Again !' ह्या पुस्तकातून.

जय साईराम   


गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

         " पंचतत्वांचा पंचेंद्रियांवर थेट प्रभाव पडतो. जर आपण शुद्ध नसलो तर पंचतत्त्वही त्यांची शुद्धता गमावतात. म्हणून पंचतत्वांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आपण प्रत्येकजण जबाबदार आहोत. "

सूत्र तिसरे

ह्या हृदयीचे त्या हृदयी 

             " स्वामी प्रशांती निलयममध्ये दिव्य प्रवचन देत असताना आम्ही प्रत्यक्ष ऐकलं ! इतक्या वर्षांमध्ये असा अनुभव मी कधीच घेतला नव्हता ! मी किती दिवस अश्रू ढाळत होते. स्वामींचे ते मधुर गीत आणि त्यांचा मधाळ आवाज ऐकून मी धन्य धन्य झाले. अमृत वर्षावात न्हाऊन निघाले. "
              मी राजकुमारांना काय देऊ ? केवळ अश्रूंद्वारे कृतज्ञाता ! त्यांच्यामुळेच मला स्वामींचा मधुर आवाज ऐकणे शक्य झाले. त्या आवाजाने माझ्या देहामध्ये प्रवेश करून प्रत्येक अणुरेणुला स्पर्श केला व म्हणाला," मी इथे आहे... मी इथे आहे... मी इथे आहे.... " 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम    

रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" ईश्वर प्रेम आहे, ह्या प्रेमाची अभिव्यक्ती हा मानवधर्म आहे. "

सूत्र तिसरे 

या हृदयीचे त्या हृदयी

          जेव्हा मी काही लिखाण करते, तेव्हा स्वामींच्या पुस्तकामध्ये किंवा प्रवचनामध्ये त्या लिखाणाचा पुरावा शोधते. पुरावा मिळताक्षणीच ' आनंदाचे डोही आनंद तरंग ' अशी माझी अवस्था होते. जेव्हा जेव्हा आम्हाला स्वामींनी दिलेले संदेश सापडतात तेव्हा आमच्या आनंदाला उधाण येते. हा सशरीर अनुभव आहे. भविष्य कालात आम्ही दोघं एकमेकांचा निकट सहवास अनुभवू , तेव्हा केवढा  आनंद असेल त्यामध्ये ? त्याचे वर्णन मी कसे करू ? यालाच म्हणतात - या हृदयीचा त्या हृदयी अनुभव !
             काल रात्री ७ वाजता पुट्टपर्तीहून राजकुमारांनी फोन केला. ते म्हणाले," स्वामी आता प्रवचन देत आहेत. मी स्पीकरच्या जवळ फोन धरतो, म्हणजे तुम्हाला ऐकू  येईल." त्याचक्षणी स्वामींचा मधुर आवाज माझ्या कानी पडला. ' स्वामी किती दिवसांनी मी तुमचा आवाज ऐकते आहे.' त्यांनतर स्वामींनी " राम रुपम प्रेम मयम, प्रेम मयम ' हे भजन गायले. हे शब्द कानावर पडताच माझ्या अंतःकरणातून मधुरम स्त्रवू लागले.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " जर आपले भाव शुद्ध असतील तर आपण शक्ती आणि उत्साह दोन्हीचा आनंद घेऊ शकतो."

सूत्र तिसरे 

ह्या हृदयीचे त्या हृदयी 

            प्रेम साई अवतारामध्ये प्रेमसाई आणि मी, आमचे देह दोन असतील परंतु जीवप्रवाह एक असेल. जर दोन देह आणि दोन जीवप्रवाह असतील तर तेथे कामभावना निर्माण होईल. इथे मात्र दोन्ही देहांमध्ये एकच जीवप्रवाह कार्यरत आहे. देहाने केलेल्या प्रत्येक कृतीमधून आम्ही प्रेमानुभव घेतो. जेव्हा ते माझ्याबद्दल विचार करतात किंवा मी त्यांच्याबद्दल विचार करते, तेव्हा एक सुखद संवेदना देहामध्ये भरून राहते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " अन्न हेच आपल्या प्रकृतीस्वास्थ्यास कारणीभूत आहे असे आपल्याला वाटते वास्तवात आपले भाव आपल्या स्वास्थ्यास प्रभावकारक असतात."

सूत्र तिसरे 

या हृदयीचे त्या हृदयी 

            जर याच कृष्णाने राधेशी लग्न केले असते आणि युद्धभूमीवर तिला रथाचे सारथ्य करण्यास सांगितले असते, तर काय झाले असते ? ती कृष्णाच्या चेहऱ्याकडेच टक लावून पहात राहिली असती व रथ आहे त्या जागीच थांबला असता. त्याचप्रमाणे अवतार कार्य माझ्या हाती सोपवले असते तर काय झाले असते ? स्वामी ज्या पद्धतीने जगाचे नियंत्रण करत आहेत तसे मी करू शकत नाही. अवतार कार्य माझ्या हाती दिले तर मी स्वामींप्रमाणे कार्यवाही करू शकणार नाही. 
            मला फक्त माझे स्वामी हवेत. जर हजारो लोक माझ्या प्रतीक्षेत असतील तर मी त्यांना विचारेन," तुम्ही मला स्वामींच्या दर्शनाला घेऊन जाल का ? "
            म्हणूनच मी म्हणते की सत्तेचे अधिकार राजकन्यांना दिले जावेत व खेड्यातील मुलींना फक्त प्रेम. त्यांना प्रेमाशिवाय अन्य काहीच माहित नाही. त्यांना प्रेमाशिवाय अन्य काही नको. हे खरे प्रेम ! परमेश्वराच्या स्थूल रूपाशी जवळीकीची इच्छा म्हणजे तरी काय ? तर प्रत्येक क्षणी मिळणारी प्रेमाची अनुभूती !

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" प्रेम हवेला शुद्ध बनवून, पृथ्वीला मंगल बनवते."

सूत्र तिसरे

या हृदयीचे त्या हृदयी

             नरकासूराचा वध करण्यासाठी कृष्णाने सत्यभामेला आपल्या रथाचे सारथ्य करण्यास सांगितले. नरकासूर एक अवाढव्य राक्षस होता. त्याने १६,००० राजकन्यांचे अपहरण केले होते. कृष्णाला त्याच्याशी युद्ध करायचे असल्यामुळे सत्यभामेने रथाचे सारथ्य केले. ती एक कुशल सारथी होती. त्यामुळे कृष्ण त्या राक्षसाशी युद्ध करू शकला. रणांगणावर रथाचे सारथ्य करण्याच्या कलेत सत्यभामा वाकबगार होती. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

"आपले भाव आपल्या जीवननिर्मितीस जबाबदार असतात."

सूत्र तिसरे 

या हृदयीचे त्या हृदयी 

              ह्या भोळ्या भाबड्या खेडूत स्त्रियांची मथुरेला जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची इच्छा होती. या एकाग्र विचारांपुढे दोरखंडाने बांधलेली नाव सोडवायला हवी हे त्यांचा ध्यानीमनीही नाही. हे खेडवळ निरागस प्रेम आहे. माझे प्रेमही असेच आहे. मलाही अवतारपदाची तमा वाटत नाही. मला फक्त स्वामी हवेत. 
              शहरी व सुशिक्षित लोकं असे वागू शकतील का ? ते म्हणतील, " अगं खेडवळ बाई ! तू आकर्षक अवतारपद, परमेश्वरपद नाकारून, जे तुला मिळण्यासारखं नाही त्या सदेह दर्शनाचा ध्यास घेऊन बसली आहेस !"
            राम आणि कृष्ण यांनी राजकन्यांशी विवाह केले. त्यावेळी अवतार कार्यासाठी आणि धर्म संस्थापनेसाठी राजकन्यांची गरज होती. कृष्णाने रुक्मिणी व सत्यभामा यांच्याशी विवाह केला. त्या दोघीही राजकन्या होत्या.

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम   

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

      " आपले अस्तित्व म्हणजे जीवनभराचे एक स्वप्न आहे हे आपण जाणले पाहिजे."

सूत्र तिसरे 

या हृदयीचे त्या हृदयी 

           " एकदा एका संध्याकाळी राधा एकटीच मथुरेला निघाली. तिला जाताना पाहून सर्व गोपिका तिच्या पाठोपाठ निघाल्या. यमुनेच्या तीरावर पोहोचेपर्यंत अंधार पडला. गोपिका राधेला म्हणाल्या, की अंधार झाला असल्यामुळे तिने मथुरेला जाऊ नये आणि तरीही तिला जाणं भागच असेल तर त्याही तिच्याबरोबर जातील. वृंदावन सर्वांचे आहे आणि गोविंदाही सर्वांचा आहे, असे भाव राधेच्या मनात होते. ती सर्वांना मथुरेला घेऊन जाण्यास राजी झाली. त्या सर्वजणी यमुनेच्या तीरावर पोहोचल्या आणि नावेत बसल्या. एकीचीच दमछाक होऊ नये म्हणून सर्वजणी आळीपाळीने नाव वल्हवू लागल्या. अंधार झाला असल्याने त्यांनी इतर कोणत्याच गोष्टीकडे विशेष लक्ष दिले नाही. त्या रात्रभर नाव वल्हवत होत्या. तरीही गंमत अशी की त्या मथुरेला पोहोचल्याच नाहीत. पहाट झाल्यावर काही जणं नदीवर येत असल्याचे त्यांनी पाहिले. अरे ! ते तर गोकुळवासी होते. रात्रभर नाव वल्हवूनही त्या गोकुळमध्येच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. निरखून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की नदीतीरावर नावेला बांधलेला दोर त्यांनी सोडलाच नव्हता. "

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम