शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

गोकुळाष्टमी निमित्त 

रासलीला ..... ज्ञानाचे नूतनद्वार 


            बाळकृष्ण अतिशय खट्याळ होता. तो त्याच्या सवंगड्यांबरोबर गोपिकांच्या घरी जाऊन लोण्याची मडकी फोडून लोणी चोरून खात असे. गोपींना त्याच्या खोड्यांचा राग येत नसे याउलट परमेश्वराच्या खोड्यांचा त्या आनंद लुटत असत. ह्या बाललीलांनी गोपींना मोहिनी घातली होती. त्यांना अत्यंत आनंदमय वाटत असे. 
            जगातील ५८० कोटी लोकांचा वेगवेगळा स्वभाव आहे. सकाळ पासून रात्रीपर्यंत आपण असंख्य मनोभाव व्यक्त करत असतो. आपल्यामध्ये क्रोध, भीती, औदासिन्य, आनंद, चिंता, शांती, तिरस्कार इ. भावना असू शकतात. हे सर्व परमेश्वराची क्रीडा समजून त्याचा आनंद घेतला पाहिजे. उदा. आपले कौटुंबिक सदस्य आणि त्यांचे मनोभाव ह्याकडे बाळकृष्णाची लीला ह्या दृष्टीने पाहिले पाहिजे. जर आपण आपले भाव दर्शवून प्रतिक्रिया दिली तर आपल्यामध्ये भीती, क्रोध, तिरस्कार ह्यासारखे भाव आपल्यामध्ये उद्भवू शकतात. ह्या सर्व भावनांची मनामध्ये नोंद केली जाते व त्यातून भावी जन्मासाठी बीजरूपी संस्कार बनतात. अन्नासारखे ते गोड, खारे वा मसालेदार बनवले जातात व्यक्तिगत रुचीवर ते अवलंबून असते. आपल्या संस्कारावर आधारीत आपण पुढील जन्म घेतो.     
            आपण प्रत्येक गोष्ट परमेश्वराची लीला म्हणून पाहिले पाहिजे. कसे ? प्रथम आपण हे जाणून घेतले पाहिजे की हे विश्व म्हणजे ह्या परमशक्तीची लीला आहे. तो एक आहे तोच अनेक झाला." एकोहम् बहुस्यामी." 
           उदा. बटाट्यापासून आपण सांबार, वेफर्स ह्यासारख्या विविध पाककृती बनवू शकतो. एकच भाजीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. त्याचप्रमाणे परमेश्वर हा सर्व निर्मितीचे मूलभूत तत्व आहे. कोणीही मग तो चांगला असो वा वाईट प्रत्येकामध्ये परमेश्वराचा निवास आहे. हे सत्य आपण जाणले तर आपण इतरांच्या मनोभावांवर प्रतिक्रिया देणार नाही. सर्व त्याची लीला आहे. जर आपण हे जाणले तरच आपण निरंतर परमेश्वराचे माधुर्य चाखू शकतो, परमेश्वराच्या मधुरामृताचे रसपान करू शकतो. मग अखिल विश्वच रासलीला बनून जाते. 
            जर कुटुंबातील कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर ती कान्हाची बाललीला आहे असे समजा. त्या व्यक्तीच्या क्रोधाचा, परमेश्वराचा क्रोध समजून आनंद घ्या. जर तुम्ही एखाद्याच्या वागणूकीने नाराज होत असाल तर ती दिव्य लीला समजून तिचा स्वीकार करा. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे परमेश्वराची लीला म्हणून पाहिले तर तुम्हाला दिव्य आनंदाची प्राप्ती होईल.

संदर्भ - श्री वसंत साईंच्या ' गीता गोविंदम् अगेन ' ह्या 
पुस्तकातून


    
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा