रविवार, २९ डिसेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्याचा क्रोध परमेश्वराचा क्रोध आहे.असे मानून आनंद घ्या."

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभव ज्ञान

           कालीमातेचे मंदिरामध्ये रामकृष्ण तिच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी तळमळत असत. कालीमाता त्यांची इष्टदेवता होती. माझी इष्टदेवता स्वामी आहेत, ते आता अवताररूपाने भूतलावर वावरत आहेत. 
            मी स्वामींचे दर्शन घेतले आहे, परंतु मला त्यांचे सान्निध्य हवे आहे. मला त्यांच्या भौतिक सहवासात राहायचे आहे. मी त्यांच्या सामीप्यासाठी रडते. अनेकांनी स्वामींचे दर्शन, स्पर्शन, संभाषण यांचा लाभ घेतला आहे. त्यांची अवस्था माझ्याहून वेगळी आहे. माझे प्रज्ञान जाणते की, आम्ही कोण आहोत, आमचे नाते काय आहे. अनेकांनी स्वामींचे सान्निध्य अनुभवले असले तरीही त्यांच्या स्वामींशी असलेल्या नात्याबद्दल त्यांच्या प्रज्ञानाला जाणीव नाही. पांडुरंगाच्या मूर्तीला स्पर्श केल्यानंतर माझ्या प्रज्ञानाने आमच्यातील नाते ओळखले. हे दिव्य नाते आहे. जर ते कृष्ण असतील तर मी राधा आहे ; राम असतील तर मी सीता आहे, ते रंगनाथ असतील तर मी आंडाळ आहे, पांडुरंग असतील तर मी रखुमाई आहे, सत्यसाई असतील तर मी वसंता आहे, प्रेमसाई असतील तर मी प्रेमा आहे. हे सत्य माझ्या प्रज्ञानाला कळून चुकले. आता त्याचे अनुभवज्ञानात परिवर्तन होईल. स्वामींनी इतरांना दर्शन, स्पर्शन, संभाषण देणे आणि मला देणे यामध्ये खूप फरक आहे. म्हणून मी क्षणोक्षणी रामकृष्णांसारखे दुःख सोसते आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
 
सुविचार 

     " सज्जन असो वा दुर्जन परमेश्वर प्रत्येकाच्या अंतर्यामी वास करतो. "

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभव ज्ञान 

            जन्मतः प्रत्येकामध्ये प्रज्ञान असते. जेव्हा या प्रज्ञानाचे अनुभवामध्ये परिवर्तन होते तेव्हा त्यातून अधिक फळ मिळते. स्वामींनी म्हटले आहे की, सीता म्हणजे मूर्तिमंत प्रज्ञान ! स्वामींनी त्यांच्या प्रवचनात सांगितले आहे की, सीतेचे लंकेहून परतून रामाशी मीलन हे अनुभवज्ञान आहे. प्रज्ञानाचे अनुभवज्ञानात परिवर्तन हे खरे ज्ञान आहे. रामकृष्णांनी कालीमातेच्या दर्शनासाठी दीर्घ प्रतीक्षा केली. रोज रात्री ते आक्रोश करत," कालीमातेचे दर्शनाशिवाय अजून एक दिवस वाया गेला." 
           मी याची माझ्या अवस्थेशी तुलना करून अनेक पुस्तकांमध्ये याविषयी लिहिले आहे. माझी अवस्था त्यांच्यासारखीच आहे. स्वामींच्या सामीप्यविना गेलेला प्रत्येक क्षण वाया जातो या विचाराने मी विलाप करत असते. मला स्वामींचे सान्निध्य केव्हा मिळणार ?

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
 
जय साईराम     

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प चोवीस 
सूक्ष्म जगत

           मनुष्याला तीन शरीरे असतात. इच्छाशक्तीमुळे ही तीन शरीरे एकत्रित राहतात. मनुष्याच्या अतृप्त इच्छा त्याच्या बंधनाचे मूळ कारण आहे म्हणून मनुष्य ह्या तीन शरीरांच्या नियंत्रणात राहतो. स्थूल देहात, इच्छा, इंद्रिय सुख,अहंकार अभिमान खोलवर रुजलेला असतो. पंचेंद्रिये मनुष्याला पाच हजार दिशांना ओढत असतात असे भगवद् गीतेत सांगितले आहे. ह्यातून सुटका करून घेण्यासाठी मनुष्याने कठोर साधना करणे आवश्यक आहे. हे केवळ भक्तीद्वारे शक्य आहे.
          साधनेद्वारे सूक्ष्म देह प्राप्त होतो. सूक्ष्म जगत हे भौतिक जगताहून पूर्णतः वेगळे आहे. सूक्ष्म जगतात व्यक्ती भाव भावनांद्वारे जीवन जगतात. सूक्ष्म देहात स्पंदनांच्या शक्तीने इच्छापूर्ती होते. तथापि व्यक्ती त्याच्या येथील अनुभव आणि दृश्यांमुळे भ्रमित होऊ शकते.सूक्ष्म देहातील दृश्यं केवळ अर्धसत्य असते. त्या व्यक्तीच्या कल्पना,अतृप्त इच्छा आणि भविष्यातील स्वप्ने ह्यांचे ते मिश्रण असते. ह्या अवस्थेत, ही अनेक दृश्यं आणि अनुभव घेतल्यानंतर साधकाने पथभ्रष्ट होऊ नाय ह्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे. येथे सूक्ष्म इच्छांचे प्रकाशरूपात परिवर्तन होते. सूक्ष्म जगतातील इच्छा स्वनिर्मित प्रकाशरूपाद्वारे पूर्ण होतात. हे जाणल्यानंतर, साधकाने सर्व गोष्टी माया समजून नाकारून आपली मुक्तता करून घेतली तरच तो सूक्ष्म देहाच्या संभ्रम पलीकदिल कारण जगतत् प्रवेश करू शकतो. कारण देहात, इच्छा निर्माण झाल्यावर तात्काळ त्यांची परिपूर्ती होते. व्यक्ती मुक्तीच्या उंबरठ्यावर उभी असते परंतु ती कारण देहात राहते. श्री युक्तेश्वर म्हणतात की अशा व्यक्ती अखिल सृष्टीकडे परमेश्वराचे स्वप्न म्हणून पाहतात. ते केवळ संकल्पाने कोणतीही गोष्ट सृजित करू शकतात. परिणामतः त्यांना इंद्रिय सुखं आणि सूक्ष्म जगतातील सुखं नगण्य वाटतात. त्या सुखांमुळे आत्म्याची सूक्ष्म संवेदनशीलता दाबून टाकली जाते असे त्यांना वाटते.
          आता आपण ह्या विषयी पाहू. इंद्रियांद्वारे प्राप्त झालेली सुखं कमी प्रतीची असल्यामुळे त्यातून दुःख,व्याधिणी अशांती वाट्यास येते. सूक्ष्म देहातील अनुभवांमधुन विविध भाव भावना उद्दीपित होतात. उन्नतीसाठी त्यांचा काहीही उपयोग नाही हे साधकाने जाणले पाहिजे.

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या उपनिषदांच्या पलीकडे ह्या पुस्तकातून.

जय साईराम 

रविवार, २२ डिसेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" तो केवळ एकच आहे, जो एकातून अनेक झाला आहे."

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभव ज्ञान

         आज मी सतत रडत होते. मी हे सर्व कशासाठी लिहिले ? कोणासाठी लिहिले ? कोणत्या उद्देशाने लिहिले ? जर मी तुम्हाला पाहू शकत नसेन तर या सर्व लिखाणाचा काय उपयोग ? माझा माझ्यावर ताबा राहू शकत नाही. सर्वजण माझे सांत्वन करतात परंतु, मी माझे अश्रू थांबवू शकत नाही. काल मी दीड तास रडत होते. 
दुपारचे ध्यान 
          स्वामी म्हणाले,
          " तू अशी का बरं रडतेस ? आपली निश्चित भेट होणार आहे. तू मला कुठे पाहू इच्छितेस सांग बरं, पुट्टपर्ती का वृंदावनात ? २७ मे ला आपण एकमेकांना पाहिले. त्याचप्रमाणे आपण लवकरच एकमेकांना पाहू. तू नक्की येशील, आपण एकमेकांना पाहू. चल, आपण आपल्या घरी जाऊ. इथे आपण दोघं राहणार आहोत. रडू  नकोस. तू अनुभवशील. मी तुला इथे आणणार आहे. तू माझ्यासमवेत ७० वर्षे अनुभवणार आहेस. आपला तो अनुभव तुझ्या कल्पनेच्याही पलीकडचा असेल."
ध्यान समाप्त 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " पती, पत्नी, मुलेबाळे माता पिता आणि नातेवाईक यांच्याबरोबर निर्माण केलेल्या आसक्तीमुळे आपण ह्या जगामध्ये अनेक दुःख भोगतो व पुन्हा पुन्हा जन्म घेतो."

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभव ज्ञान 

६ जुलै २००८ ध्यान 
वसंता - स्वामी, प्रज्ञानाचे अनुभवज्ञानात परिवर्तन म्हणजे काय? 
स्वामी - प्रज्ञान सर्वांमध्ये असते. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर ते अनुभवज्ञानात होते आणि उच्च ज्ञान प्रकटते. 
वसंता - स्वामी, माझ्या बाबतीत काय ?
स्वामी - तू मूर्तिमंत प्रेम आहेस. प्रेमाला अनुभव लागतो. म्हणून तू लहानपणापासून परमेश्वराच्या अनुभूतीसाठी तळमळत आहेस. तुझे प्रेम सर्वत्र व्यापून राहिले आहे, म्हणून तुला प्रत्येक गोष्टीतून परमेश्वराची अनुभूती घ्यायची आहे. 
वसंता - आता मला समजले, स्वामी प्रज्ञान प्रत्यक्ष अनुभव बनते. 
स्वामी - ज्ञानाचे अनुभवज्ञानात परिवर्तन झाल्यांनतर अधिक फळ मिळते. 
ध्यान समाप्ती 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

रविवार, १५ डिसेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

"केवळ साधना आणि परिवर्तन याद्वारे परमेश्वर प्राप्ती होते."

सूत्र नववे

प्रज्ञान आणि अनुभव ज्ञान 

           माझ्या मनात धगधगणारा हा विरहाग्नी कधी शांत होईल ? माझ्या विरहाचा आणि दुःखाचा कधी अंतः होईल ?
           मी शेल्फमधून पुस्तक काढले ' समर शॉवर्स इन वृंदावन ' १९९६ पान नं. ८५, त्यात स्वामींनी म्हटले आहे, 
           " बिभीषणाला राज्याभिषेक केल्यानंतर रामाला सीता परत मिळाली. मूर्तिमंत अनुभव ज्ञान. अखेर प्रज्ञानाचे अनुभवज्ञानात परिवर्तन झाले. प्रज्ञानाचे अनुभवज्ञानात परिवर्तन हेच खरे ज्ञान आहे."
           स्वामींनी सांगितले की, रामकृष्ण परमहंसांनी परमेश्वराच्या दर्शनाकरता किती प्रतीक्षा केली, दुःख सोसले. रोज रात्री ते आक्रोश करत," अजून एक दिवस कालीमातेच्या दर्शनाविना व्यर्थ गेला." कलकत्यामध्ये अरविंद घोष, बिपीनचंद्र पाल यांच्यासारखे अनेक महान पंडित होऊन गेले. परंतु रामकृष्णाचे नाव अजरामर झाले. सर्वांच्या अंतःकरणात कोरले गेले.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

        " साधनेच्या मार्गाद्वारे साधक अध्यात्मातील उंच उंच शिखरे पादाक्रांत करतो." 

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभव ज्ञान 

            ही सर्व पुस्तके, हा आश्रम, स्तूप त्यांच्याकडून मिळणारा दिलासा हे सर्व असून सुद्धा मी विरहामुळे अशोकवनातल्या सीतेप्रमाणे रडत असते. मी पुढील अवतारापर्यंत  वाट पाहू शकत नाही. सर्वजण आता स्वामींचे सान्निध्य अनुभवत आहेत. मी ह्या अवतारावर, या साईंवर प्रेमवर्षाव करते आहे. मग प्रेमसाई अवतारात त्यांचे प्रेम आणि जवळीक अनुभवण्यात काय अर्थ आहे ? मी आता भुकेने मृत्युपंथाला लागले आहे. 
            स्वामी म्हणतात, " तू दहा वर्षं धीर धर. मी तुला मोठी मेजवानी देईन."  माझ्या आताच्या क्षुधेसाठी मला एक दृष्टिक्षेप, एक शब्द, एक स्पर्श पुरेसा आहे. सर्वांना हे आता मिळते आहे. त्यांच्या मनात कोणते भाव आहेत याची मला पर्वा नाही. स्वामी म्हणाले," त्यांची मने, मत्सर आणि अहंकारयुक्त आहेत." असू देत. जर मत्सर, अहंकार, वैर या भावांमुळे स्वामींचे दर्शन होत असेल तर ते गुण माझ्यामध्येही येऊ देत. या ७० वर्षांच्या तपाचा काय उपयोग ? माझ्या पदरी केवळ विरह आणि अश्रू पडले. मला तुमचा एक दृष्टिक्षेप, एक शब्द, एक स्पर्श  हवा आहे. त्यांनतर माझे अज्ञान, मत्सर, अहंकार आणि वैर नष्ट करण्यासाठी मला हजारो जन्म घ्यावे लागले तरी मला फिकीर नाही. त्यांनतर मी मोक्ष प्राप्त करेन. आता मला मोक्षप्राप्ती नको, काही नको. मला फक्त स्वामींचे  सान्निध्य हवे आहे. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, ८ डिसेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
  
सुविचार

" केवळ प्रेमानेच सत्याची प्राप्ती होते. "

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभव ज्ञान

              ध्यान संपल्यानंतर मी खूप रडले. तसे पाहायला गेले तर वानरे कुरूप असतात. परंतु, सीतामाईला रामनाम उच्चारणाऱ्या वानरामध्येही सौंदर्य दिसले. पुस्तकात हे उद्धृत केले आहे. ते म्हणतात, 
             " वानरांचे रूप फार गम्मतशीर असते. तथापि रामनामाचे उच्चारण करणाऱ्या वानरामध्ये सीतेला सौंदर्य दिसले .सीता रामापासून दूर होऊन अशोकवनात असताना तिने हनुमानाला रामनाम उच्चारताना पाहिले. त्यामध्ये तिला सौंदर्य दिसले."
             याचप्रमाणे काही जण स्वामींच्या अगदी निकट सान्निध्यात आहेत, तरीही त्यांची मने मर्कटचाळे करतात. ते स्वामींच्या निकट असतील. परंतु त्यांची मने मत्सर आणि अहंकार यांनी८ भरलेली आहेत. यालाच मर्कटमन चेहरा म्हणतात. 
             तरीही त्यांच्या या गुणामध्ये मी सौंदर्य पाहते. ते वारंवार स्वामींच्या निकट असतात. त्यामुळे मला ते देखणे वाटतात. जरी त्यांनी मला अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गांनी दुखावले असले तरी मला त्यांचे सामीप्य हवे आहे. त्यांच्या संपर्कात राहायचे आहे. मी स्वामींना बऱ्याचदा विचारले की, मी त्यांच्याशी बोलू का ? स्वामी नेहमी म्हणतात," नको, नको. "

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम   

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

       " जेव्हा समस्वभावी लोक एकाच ध्येयासाठी प्रार्थना करतात तेव्हा त्यांच्ये ध्येय साध्य होते."

सूत्र नववे 
प्रज्ञान आणि अनुभव ज्ञान 


             मी ' सुंदर, तरुण आणि अक्षत ' हे प्रकरण लिहीत होते, मध्येच सहज ' समर शॉवर्स इन वृंदावन ' हे पुस्तक वाचले. त्यामध्ये स्वामींनी सांगितले आहे की, एक छोटेसे वानर रामनाम उच्चारताना सीतेने पाहिले. त्यातले सौंदर्य तिला भावले. मी स्वामींना ध्यानामध्ये विचारले ... 
वसंता - स्वामी, काही जण मत्सरग्रस्त भावाने कर्म करतात. त्यांच्या मनाचे मर्कटचाळे चालू असतात, तरीही ते वारंवार तुमच्याकडे येतात. ते तुमच्या निकट असतात. त्या मर्कटमनाच्या चेहऱ्यांमध्येही मी सौंदर्य पाहते. स्वामी, मी त्यांच्याशी बोलू का ? स्तूप, आश्रम, सर्वकाही त्यांच्या स्वाधीन करून त्यांना विचारेन," मला तुम्ही स्वामींकडे घेऊन जाल का ?"
स्वामी - तू असे काही करू नकोस. तू काहीही केलेस तरी त्यातून केवळ तुझे प्रेमच प्रकट होते. तू जे काही वाचतेस ते माझ्याशी जोडून तू अश्रू ढाळतेस. मी तुला बोलावेन. तू त्यांच्या घरी जाऊ नकोस. 
वसंता - तुमचे सान्निध्य आणि प्रेम लाभलेले सर्वजण खूप भाग्यवान आहेत. 
स्वामी - हे शाश्वत नाही, सत्य नाही. 
वसंता - परंतु स्वामी ते आता अनुभवत आहेत.
ध्यानसमाप्ती  

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम  

रविवार, १ डिसेंबर, २०१९

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " प्रत्येक गोष्टीकडे आपण ईश्वरलिला या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. हे विश्व म्हणजे त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराचे नाट्य आहे."

सूत्र आठवे 

भगवंत परतफेड करतो 

             स्वामींनी मला ध्यानामध्ये, प्रेमसाई अवतारातील आमच्या घरी नेले आहे आणि अनेक गोष्टी दाखवल्या आहेत. भविष्यामध्ये होऊ घातलेले आमचे स्वर्गातील अनुभव मी आता ध्यानात अनुभवते आहे. माझे जीवन केवळ परमेश्वरावर केंद्रीत आहे. म्हणून माझे आताचे अनुभव माझ्या भविष्यकालीन अनुभवांचे सूचक आहेत. 
              एक उदाहरण, पुढील प्रेमावतारात राजा प्रेमासाठी निळ्या रंगाची साडी खरेदी करतात. या जन्मामध्ये स्वामींनी मला ३००० रु. दिले आणि ती साडी खरेदी करण्यास सांगितले. स्वामींच्या सांगण्यावरून विकत घेऊन आता मला नेसण्यास सांगितलेली प्रत्येक साडी पुढील अवतारात राजा प्रेमासाठी विकत घेतील. आज मी ध्यानात स्वामींच्या सहवासाचा अनुभव घेत आहे, पुढील अवतारात मी त्यांच्याबरोबर स्थूलदेहात वावरेन. मी सदैव स्वामींचे चिंतन करते. त्यांचा विरह असह्य होऊन मी सतत रडत असते. म्हणून आता ते मला आमचे भविष्यकालीन जीवन दाखवतात, ज्यामध्ये मी त्यांच्याबरोबर असेन. ते स्थूलदेहाद्वारे माझ्यासाठी काहीही करू शकत नसल्यामुळे आम्ही ध्यानामध्ये एकत्र जगतो. 
             त्यामुळे आमच्या पुढील जन्मात हेच जीवन सुरु राहील. आज मी कारणदेह आणि महाकारण देह याद्वारे जे जे अनुभवते आहे ते पुढील जन्मात मी स्थूलदेहात अनुभवणार आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम