ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प सत्तावीस
तत्वमसि
' तत्वमसि ' ह्या महावाक्याचा अर्थ काय ? तू ते आहेस. तू कोण आहेस ? तू देह वा मन वा नाम वा रूप वा इंद्रिये आहेत का ? त्याचा शोध घेतल्यावर असे लक्षात येते की तू ह्यापैकी कोणीही नाहीस. तू भाव आहेस. तुमचे भाव तुम्हाला जन्म, नाम आणि रूप देतात. तुमचे जसे भाव असतात त्यावर आधारीत तुम्हाला जन्म प्राप्त होतो.
जन्मापूर्वी भाव निराकार अवस्थेत अंतरिक्षात व्यापून राहिलेले असतात. ते योग्य पात्र, काळ, स्थान व पालक ह्यांच्या शोधात असतात. जेव्हा भावांना योग्य पात्र प्राप्त होते, तेव्हा आत्मनिवासी प्रवेश करतो. आता भावांना जीवन प्राप्त होते व नाम आणि रूप धारण करून पृथ्वीवर जन्म घेतात म्हणून ' मी कोण आहे ? ' ह्या प्रश्नाचे उत्तर ' मी भाव आहे ' असे आहे.
जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्याच्या मनात जे भाव उद्भवतात त्याचे मनावर संस्कार होतात. मृत्यूसमयी ते भाव तो त्याच्या बरोबर घेऊन जातो व पुढच्या जन्मासाठी सिद्ध होतो. त्याचा देह पृथ्वीवर पडतो व त्याचे भाव अंतरिक्षात जातात. पृथ्वीवर केलेल्या प्रत्येक कर्माला प्रतिबिंब, प्रतिक्रिया व प्रतिध्वनी असतो. कर्माच्या परिणामांवर आधारित असलेले त्याचे भाव योग्य पात्राचा शोध घेतात. जेव्हा भावांना देह, काळ, स्थान व पालक प्राप्त होतात तेव्हा आत्मनिवासी प्रवेश करून चैतन्य देतो. अशा प्रकारे मृत पावलेला जीव पुन्हा जन्म घेतो.
आता आपण ' ते ' म्हणजे काय ते पाहू .'ते' म्हणजे परमेश्वर. ना नर ना नारी म्हणून परमेश्वरास 'ते ' शब्द वापरतो. ते कोठे असते. तुमच्या अंतर्यामी जेव्हा तुमचे भाव रूप धारण करतात तेव्हा ते त्यास जीवन देते. त्याला आत्मनिवासी म्हणतात. ते प्रत्येकामध्ये व प्रत्येक वस्तुमध्ये विद्यमान आहे. ते (आत्मनिवासी ) नसेल तर जीवन नसते. प्राणशक्तीद्वारे ते निराकारास साकार बनवते.
आपण त्या आत्मनिवासीशी एकत्व पावले पाहिजे. हेच ' तत्वमसि ' आहे. ही अवस्था कशी प्राप्त करायची ? आपले भाव आणि कर्म सदैव ईश्वराभिमुख असायला हवे.
सुरुवातीला आत्मनिवासी साक्षी अवस्थेत असतो. मनुष्य जेव्हा मनाच्या लहरीनुसार जीवन व्यतीत करतो तेव्हा तो साक्षी होऊन अवलोकन करतो. तथापि एक दिवस जीव ' जीवनाचा उद्देश्य काय ? ह्या जीवनाला खरा अर्थ आहे का ?' ह्या विचाराने जागृत होतो . अशा वेळेस आत्मनिवासी ह्या जागृत होत असलेल्या जीवाच्या मदतीस धावून येतो. तो त्याला साधना मार्गावर प्रोत्साहीत करतो.
कधी कधी जीवास त्या मार्गावर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तो नाउमेद होऊन मदतीसाठी प्रार्थना करतो. आत्मनिवासी त्याच्या सुटकेसाठी धावून येतो व त्याला साधना सुरु ठेवण्यासाठी सहाय्य करतो. जीवास कृपा प्राप्त होते व अधिक साधना करण्यास प्रवृत्त होतो. तो कर्मफलांचा त्याग करून म्हणतो," मी कर्ता नाही तू कर्ता करावित आहेस तू त्या कर्मफलांचा आस्वाद घे." अशा तर्हेने जीव पूर्णपणे शरणागत होतो. तेव्हा तो ' महेश्वर ' अवस्था प्राप्त करतो. ह्या अवस्थेमध्ये तुम्ही ' ते ' बनता. म्हणजेच जीव शिव बनतो.
* * *
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' शिव शक्ती तत्व ' ह्या पुस्तकातून.
जय साईराम