गुरुवार, ११ मार्च, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

 

महाशिवरात्री संदेश 


शिवरात्रीस आपण काय केले पाहिजे, आणि परमेश्वराचे नामस्मरण करताना आपल्या मनातील भाव कसा असायला पाहिजे ह्याविषयी भगवान बाबा सांगतात. 

प्रेमस्वरूपलारा, 

आज शिवरात्रीचा मंगल उत्सव आहे. सर्व रात्रींमधील ही सर्वात विशेष रात्र आहे. रात्र म्हणजे अंधःकार हे नेहमीचे समीकरण आहे. परंतु ही विशेष रात्र अंधःकाराशी संलग्न नाही. ही रात्र तुम्ही प्रज्ञान, विज्ञान , सुज्ञान आणि तेजाची मंगलरात्र मानली पाहिजे. म्हणून ह्या रात्री आपण शुद्ध मनाने व पवित्र भावनेने ' लोकाः समस्ता सुखिनो भवन्तु ' ही प्रार्थना केली पाहिजे. सर्व जीव सुखी होवोत. सर्व जीवांचे हृदय शुद्ध आणि पवित्र होवो. सर्वांना सुबुद्धी लाभो - धोयोयोनः प्रचोदयात्

काल रात्री मी १ वाजता येथे आलो. सर्व भक्त आणि विद्यार्थी आंनदाने भजने गात होते. परंतु ह्या भक्तांमधील खरे भक्त कोण ? जे स्थिर मनाने आणि अनासक्त भावनेने परमेश्वराचे नामस्मरण करतात ते खरे भक्त होय. ह्या हॉलमध्ये हजारो लोकं बसलेले आहेत परंतु ते सर्वजण भक्त नाहीत. त्यांचा देह येथे आहे परंतु मन परमेश्वरावर केंद्रित नाही. म्हणून मनाला ईश्वराभिमुख करणे हीच खरी भक्ती. तुम्ही कोठेही असा परंतु मन मात्र परमेश्वराच्या सान्निध्यात असायला हवे. तुम्हाला तेथे दिव्यत्वाची अनुभूती होऊ शकते. जर तुम्हाला झोप आली असेल तर तुम्ही झोपू शकता परंतु झोपेत सुद्धा तुमच्या मनात ते दिव्यतत्व असायला हवे. जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि गाढ निद्रा ( सुषुप्ती )- अस्तित्वाच्या ह्या तीन अवस्थांतील ऐक्याच्या अनुभूतीमध्ये, खरे ज्ञान खरी जाणीव सामावलेली आहे. कोणत्याही क्षणी, मनामध्ये दिव्यत्वाची जाणीव ठेवा. केवळ परमेश्वरावरील प्रेमामुळे तुम्ही जागे आहात आणि मध्यरात्रीच्या वेळी येथे येऊन बसला आहात. जर तुमच्या हृदयात प्रेम नसते तर तुम्ही तुमच्या घरी झोपला असता. त्या झोपेचा त्याग करून येथे येऊन झाडाखाली, झाडाला टेकून बसणे हा एक दिव्य अनुभव आहे असे ते मानतात. ही खरी भक्ती आहे. तुम्हाला कोणत्याही सुखसोयी, अन्य कोणताही आनंद, खाणेपिणे कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही. शिवरात्र वर्षातून फक्त एकदाच येते असे मानू नका. आपण प्रत्येक रात्र शिवरात्र आहे असे मानले पाहिजे. जेथे मनामध्ये परमेश्वराचे चिंतन चालते, जेथे मनामध्ये उदात्त विचार येतात. तेथे शिवरात्र प्रकट होते. शिवम मंगलम !

जर तुम्ही अहंकाराचे शिंग काढून टाकले नाहीत तर उरते ते शवम (मृत देह ) शिवम आणि शवममध्ये काय फरक आहे ?

अहंकाराचे शिंगासह ते शवम (मृतदेह) आहे. आणि अहंकाराच्या शिंगाविना ते शिवम (मंगल) आहे प्रत्येकाने अहंकाराचा नाश केला पाहिजे. 




*     *     *

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा