गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " आपल्याला इतरांप्रती वाटणारे प्रेम हे वास्तविकतः त्यांच्या अंतर्यामी वास करणाऱ्या ईश्वराप्रती वाटणारे प्रेम होय, हे आपण जाणून घेतले पाहिजे ."


कर्मकायदा - ओळख 

इच्छा हे संस्कारांचे मूळ आहे. 

          मनात उत्पन्न होणारी प्रत्येक भावना आपल्याला एक तर गुंतवते किंवा मुक्त करते. हे गुंतणे म्हणजेच बंधन होय. या बंधनातूनच '  मी आणि माझे '  हा विचार निर्माण होतो. हे  ' मी आणि माझे ' चे विचार प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनीच्या रूपात आपल्याकडे परत येतात, यालाच अनुभव म्हणतात. वाईट विचारांचे रूपांतर चिंता आणि दुःखात होते. त्याचे संस्कार होतात. त्यानुसार आपण पुन्हा जन्म घेतो. संस्कार म्हणजे दुसरं, तिसरं काही नसून कर्मकायदा आहे. जर संस्कार नसतील तर आपण पुन्हा जन्म घेणार नाही. आपला विश्वास आहे की, चित्रगुप्त हे यमराजाचे हिशेबनीस आहेत. लोक सहज म्हणतात, " आपला हिशोब चित्रगुप्तापर्यंत पोहोचतोच. तो नोंद करतोय. " आपले संस्कार म्हणजेच चित्रगुप्त. प्रत्येकामध्ये हा चित्रगुप्त संस्काराच्या रूपात वास करतो आहे. त्याच्या नोंदी आपलं जीवन आणि अनुभव ठरवित असतात. 
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा   

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २५ एप्रिल, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

"  सत्याच्या प्राप्तीबरोबरच साधनेची सांगता होते. "

 

कर्मकायदा - ओळख 

           ह्याच्यावर फक्त आमचाच हक्क आहे अस ते म्हणाले नाहीत. शास्त्रज्ञांनी किती औषधांचा शोध आजपर्यंत लावला आहे. जगाला त्याचा किती फायदा झालाय ! हे सर्व शोध सार्वजनिक संपत्ती आहे. अशाप्रकारे वागणे हेच प्रेम आहे. प्रेमाचा विस्तार आहे. 

           आता आपण आध्यात्मिक जगताविषयी पाहू या. आत्मसाक्षात्कार झालेल्या महान आत्म्यांनी अनेक सत्य प्रकट केली. उपनिषदांमध्ये त्या सर्वांच्या नोंदी केल्या, पण  त्यांनी त्यावर स्वतःचा हक्क प्रस्थापित केला नाही. त्यामुळे सर्व जगाला त्या प्राचीन ज्ञानाचा लाभ झाला. या ज्ञानालाच वेद म्हणतात. प्रेम विस्तारित होते, तेव्हा कर्म नसते. प्रेमरहित कृत्ये आपणाला बंधनात टाकतात, त्याच कर्मात रूपांतर होत. जिथे प्रेम नसते, तिथे मत्सर, अहंकार, द्वेष आणि क्रोध उत्पन्न होतात. त्यांचे संस्कार बनतात. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा  

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ४० 

सहस्त्रार 

           ' शिव - शक्ती स्वरूपा ' ह्या पुस्तकामध्ये स्वामींनी म्हटले आहे,

           " मन हे सहस्त्र पाकळ्यांच्या कमळासारखे आहे. प्रत्येक पाकळी एका विशिष्ठ वस्तु वा विशिष्ठ उद्दिष्टाकडे अभिमुख केलेली असते. कमळाच्या मध्यभागी एक ज्योत असते जी आत्म चेतनेचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा ती ज्योत त्या पाकळ्यांमधील एका पाकळीकडे कलते, आणि एखाद्या विशिष्ठ वस्तुने वा उद्दिष्टाने अहंकार अभिप्रेरित होतो आणि यश - अपयश , सुख- दुःख ह्यासारख्या द्वंद्वानी प्रभावित होतो. परंतु जर ज्योत १००० उद्दिष्टांपैकी कोणत्याही उद्दिष्टाकडे न झेपावता, ऊर्ध्वगामी आणि स्थिर असेल तर ती देहापासून दूर असते अलिप्त असते. मनुष्याच्या देह, मन वा कोणत्याही बाह्य व अंतर्गत साधनांच्या बाबतीत काहीही घडले तरी त्याचा त्या ज्योतीवर परिणाम होत नाही. "

           सहस्त्र पाकळ्यांचे हे कमळ म्हणजे मनुष्याच्या अनेक वासनांचे द्योतक आहे. वासना म्हणजे इच्छा, परंपरा, प्रवृत्ती आणि अतृप्त इच्छा होय. कमळाच्या मध्यभागी असणारा प्रकाश म्हणजे आत्मज्योती. नीळ्या रंगाचा हा प्रकाश तांदुळाच्या दाण्याच्या टोकाएवढा, अत्यंत छोट्या आकाराचा असतो असे नारायण सूक्तामध्ये सांगितले आहे. हा आत्मा आहे जो सर्वांमध्ये निवास करतो. ह्या आत्म्याच्या प्रकाशास कोणत्याही गोष्टीचा स्पर्श होऊ देऊ नये. ती ज्योत विचलीत होऊ न देता स्थिर राहिली पाहिजे. 

           आत्मा म्हणजे अंतरंगात वसणारा ' मी ' होय. ह्या ' मी ' स आपल्या नामरूपाशी संबंधित असणाऱ्या ' मी ' चा स्पर्श होऊ देऊ नये. 

           हे सहस्त्र दलांचे कमल नाम आणि रुपासंहित देहाशी निगडीत असणाऱ्या छोट्या ' मी ' ला निर्देशित करते. ह्या कमळाच्या सहस्त्र पाकळ्या म्हणजे ह्या ' मी ' च्या आवडी - नावडी आहेत. हा ' मी ' एक विचार प्रक्रिया आहे जी ठामपणे सांगते," मी हे नाम आणि रूप आहे. मला मुले, माझी पत्नी आणि माझे घर आहे. मला आता बढती मिळायला हवी. माझ्या मुलीचा विवाह व्हायला हवा. माझ्या शेजाऱ्यांशी माझे मित्रत्त्वाचे नाते नसावे .....अशा अनेक गोष्टी. कमळाची प्रत्येक पाकळी, आपल्या आवडी - नावडी आणि अतृप्त इच्छांशी अनुरूप असते. 

           जेव्हा मनामध्ये एखादी इच्छा जागृत होते, तेव्हा ह्या छोट्या ' मी ' ची पाकळी मोठ्या ' मी ' आत्म्यास स्पर्श करते. कमळाच्या मध्यभागी असलेली ज्योती ह्याचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा पाकळ्या छोट्या ज्योतीस स्पर्श करतात तेव्हा त्याच्या तेजाची शक्ती पाकळ्यांना प्राप्त होते. पाकळ्यांची शक्ती वृद्धिंगत होते. 

           ज्यांना हा छोटा ' मी ' नसतो तेथे पाकळ्या नसतात सर्वत्र फक्त प्रकाश, प्रकाश, प्रकाश असतो. पाकळ्यांची अनुपस्थिती म्हणजे इच्छा नाहीत आवडी नावाडी नाहीत. जेव्हा तेथे ' मी ' नसतो तेव्हा इच्छा कशा असतील ? जेव्हा तिथे ' मी आणि माझे ' नसते तेव्हा तेथे फक्त परमेश्वर असतो; प्रकाश असतो. तो ऊर्ध्व दिशेने जातो सहस्त्रार फोडून उघडतो आणि उच्च स्तरावर जातो. तो स्वयंप्रकाशित ज्योती रूपात तेजाने तळपतो. तो कशालाही स्पर्श करत नाही. तो स्वयंप्रकाशित ज्योतीरुपात राहतो. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' How the Satya Yuga is Coming ' ह्या पुस्तकातून. 

जय साईराम 

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार  

      " प्रेम म्हणजे अनेकांमध्ये त्या एकाला पाहणे आणि ज्ञान म्हणजे त्या एकामध्ये अनेकांना पाहणे. "

कर्मकायदा - ओळख 

         सूर्य एकच आहे..... त्याचे कसे तुकडे कराल ? भविष्यात, कली जेव्हा अनिष्टतेच्या शिखरावर असेल, तेव्हा कदाचित सूर्याच्या किरणांचे सुद्धा भाग पडतील, ' ही माझी किरणे, ती तुझी. '

          शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले. त्यांनी ते माणसांचे जीवन सुखकर व्हावे म्हणून जगाला बहाल केले. विजेचा शोध लावल्यावर ते असे नाही म्हणाले," हा माझा आहे फक्त माझ्यासाठी !" त्याच पेटंट घेतले असते तर कोणीही मुक्तपणे तिचा वापर करू शकले नसते. वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा शोध लागला आणि जगभर आगगाडी हे दळवळणाच साधन झालं. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. त्यांनी ते स्वतः पुरतेच ठेवले नाही. त्यांनी जगातील सर्वांना त्याचा लाभ घेऊ दिला. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा.  

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १८ एप्रिल, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " आपल्या अंतर्यामी असणाऱ्या परमेश्वराचा शोध घेतल्यानंतर होणारी अनुभूती म्हणजेच आनंद होय. "

कर्मकायदा - ओळख 

           आता माणसे पंचतत्त्वांची सुद्धा विभागणी करू लागलीत. ते म्हणतात, ' ही नदी ह्या राज्याची आहे. ती नदी त्या राज्याची आहे. आम्ही इतरांना पाणी देणार नाही. हे फक्त आमच्यासाठी आहे.' 

            एक राज्य धरण बांधून पाणी अडवते. शेजारच्या राज्याला एक थेंबही पाणी दिले जात नाही. जर पूर आला तर तुमच्या राज्याचे काय होईल ? ते पाण्याखाली बुडेल ! काय हे अज्ञान !किती वाईट ! ते म्हणतात ' ही जमीन आमच्या राज्यात आहे. ते शहर तुमच्या राज्यात आहे ,' आणि भांडतात. तरी बर अजून त्यांना हवेची वाटणी करण शक्य झाल नाहीय. सगळ्यांचे हिस्से करणाऱ्यांच्या डोक्यातून अजून हे निसटलय! नशीब की अजून अवकाशही ह्यांच्या नजरेतून निसटलय. पुढील कलियुगात कदाचित ते हवा, आकाश आणि वाऱ्याच्या पण वाटण्या करतील! 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा.  

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम      


गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " जर आपण अत्यंत एकाग्रतेने एखादी गोष्ट मागितली तर वैश्विक शक्तीकडून आपल्याला त्याचे उत्तर मिळते. "

१  

कर्मकायदा - ओळख 

           स्वामी परमेश्वराचं पितृत्व आणि मानवाच मातृत्व जतन करण्याची शिकवण देतात. फक्त परमेश्वरच सर्वांचा पिता आहे. सर्व मानवजात ही बंधुभगिनी आहेत. जर आपण सर्वांशी प्रेमाने व्यवहार केला तर कर्माचा कायदा निष्प्रभ होईल, मानवी जीवनात तो प्रवेशच करू शकणार नाही. 

            आपण जन्माच्या वेळी जगात काय घेऊन येतो ? मृत्युसमयी काय बरोबर घेऊन जातो ? काहीच नाही. अस असताना ' मी आणि माझे ' ही भावना का बर निर्माण होते ? याच कारण आपण स्वतःला नाव आणि शरीराशी निगडीत करतो. आपल्याला वाटते की जे काही या शरीराशी संबंधित आहे ते सर ' माझे ' आहे.   

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा.  

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, ११ एप्रिल, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " मनुष्य सिध्दींद्वारे जडवस्तूंचे सृजनीकरण करू शकतो परंतु जर तो त्याच्याही पलीकडे गेला तर तो परमेश्वर म्हणून स्वतःचे प्रकटीकरण करू शकतो. "

कर्मकायदा - ओळख 

           वर्णभेदामुळेसुद्धा दोन भाग झाले आहेत. कातडीच्या रंगाच्या आधारावर विभागणी ! हे देवा ! ह्या विभक्तीला काही अंतच नाही का ? गोरे एका देशात आणि काळे दुसऱ्या देशात. 

            प्रथम आपण कुटुंबात तुटकपणा पाहतो, त्यानंतर धर्माच्या आधारावर आणि आता वर्णभेद. माणसाच्या सर्व दुःखाच मूळ, विभाजन आणि भेदभाव होय. 

             प्रत्येक धर्माची माणसे त्यांच्यासाठी परमेश्वराची विभागणी करतात. हिंदु म्हणतात राम देव आहे, कृष्ण देव आहे, शिव देव आहे. खिश्चन येशूची प्रार्थना करतात. मुस्लिमांसाठी अल्ला परमेश्वर आहे. निरनिराळ्या धर्मांमध्येसुद्धा पुन्हा विभागण्या आहेत. हिंदू धर्मात शैव आणि वैष्णव इ., खिश्चनांमध्ये कॅथलिक आणि प्रोटेस्टंट, इस्लाम धर्मात शिया आणि सुन्नी, अरेरे !! किती, विभागण्या ! सर्व परमेश्वराची मुले असूनही किती हे भेदभाव !

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम    

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

"असीम प्रेम म्हणजे प्रज्ञान."


कर्मकायदा - ओळख 

           भारताच्या स्वातंत्र्याचे वेळी अनेकांना देश विभक्त करायचा होता. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही गांधीजी त्यांची मनं वळवू शकले नाहीत. काहींना देशाचे अखंडत्व मान्य नव्हते. अखेरीस, देश विभागला गेला. भारत हिंदुंसाठी आणि पाकिस्तान मुस्लिमांसाठी. फाळणीपूर्वी हिंदु मुस्लिम एकमेकांना भाई भाई म्हणत. नंतर धर्माच्या नावावर फाळणी झाली. जिथे प्रेम नसेल, तिथे फारकत होणारच. सर्व भारतमातेची मुले असूनही विभक्त झाली.

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, ४ एप्रिल, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" जन्म हे सर्व वेदना आणि दुःखाचे मूळ कारण आहे. "

कर्मकायदा - ओळख 

             एका व्यक्तीला दोन मुले आहेत. त्याच्या मृत्युनंतर त्यांना मिळालेल्या त्याच्या संपत्तीचे ते व्यवस्थितपणे दोन हिस्से करतात. ते घर, जमीन, पैसा, भांडी, कपाटे, सोफा सर्व गोष्टींचे दोन वाटे करतात. एका भावाला वडिलांच्या टेबलवर पेन्सिल मिळते. ती तो खिशात घालतो. दुसरा भाऊ लगेच म्हणतो," माझा हिस्सा दे !" ते त्या पेन्सिलचे दोन तुकडे करून अर्धी अर्धी घेतात. 

             दुसऱ्या कुटुंबात दोन मुलांनी भरपूर संपत्ती मिळवली आहे. ते पालकांची विभागणी करतात. एक भाऊ म्हणतो, ' मी आईला संभाळीन तू वडिलांना सांभाळ !' वय झाल्यावर एकमेकांना आधार देऊन जगायच्या काळात आई वडिलांना वेगळं केल जात. भविष्यकाळी त्या भावांची मुलेही त्यांना तसेच वागवतात. प्रेमाचा अभाव हेच सर्व दुःखाचं कारण आहे. केवळ प्रेमच मानवी जीवनाचे सार आहे. जर भाऊच असे वागतात तर समाजाचं काय? देश आणि जग कसे असेल ?

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम 


गुरुवार, १ एप्रिल, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " विवेकबुद्धी हा आपला आतील आवाज आहे. जेव्हा आपण चूक करतो तेव्हा तो आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. हा सत्य आणि सचोटीचा आवाज आहे. "

कर्मकायदा - ओळख 

            कर्मकायदा म्हणजे काय ? कर्मकायद्याचे काम कसे चालते ? कर्माच कारण काय ?

            विभक्तपणा हे कर्माचे कारण होय. जिथे पहावे तिथे आपल्याला विभाजन आणि भेदभाव आढळून येतो. 

            उदाहरणार्थ एका कुटुंबात दोन भावांमध्ये शत्रुत्व आणि द्वेष असतो, का? याच कारण ' मी आणि माझे ' ही भावना कर्म निर्माण करते. उदाहरणार्थ एक माणूस मित्राला त्याच्या घरी बोलावतो. तो त्याला सांगतो, " हे माझ घर, ही माझी पत्नी, ही माझी मुले, ही माझी गाडी. "

            मित्र शेजारच्या घराकडे बोट करून विचारतो, " तिथे कोण राहतात ?" तो माणूस म्हणतो, " माझा भाऊ.  "

            तो म्हणतो," मी, माझ घर, माझी पत्नी , माझी मुले आणि माझा भाऊ !यापैकी ' माझा भाऊ ' हा निकटवर्तीयांपैकी नसतो ! तो त्याच्या भावाला वेगळा करतो."

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम