शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ४० 

सहस्त्रार 

           ' शिव - शक्ती स्वरूपा ' ह्या पुस्तकामध्ये स्वामींनी म्हटले आहे,

           " मन हे सहस्त्र पाकळ्यांच्या कमळासारखे आहे. प्रत्येक पाकळी एका विशिष्ठ वस्तु वा विशिष्ठ उद्दिष्टाकडे अभिमुख केलेली असते. कमळाच्या मध्यभागी एक ज्योत असते जी आत्म चेतनेचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा ती ज्योत त्या पाकळ्यांमधील एका पाकळीकडे कलते, आणि एखाद्या विशिष्ठ वस्तुने वा उद्दिष्टाने अहंकार अभिप्रेरित होतो आणि यश - अपयश , सुख- दुःख ह्यासारख्या द्वंद्वानी प्रभावित होतो. परंतु जर ज्योत १००० उद्दिष्टांपैकी कोणत्याही उद्दिष्टाकडे न झेपावता, ऊर्ध्वगामी आणि स्थिर असेल तर ती देहापासून दूर असते अलिप्त असते. मनुष्याच्या देह, मन वा कोणत्याही बाह्य व अंतर्गत साधनांच्या बाबतीत काहीही घडले तरी त्याचा त्या ज्योतीवर परिणाम होत नाही. "

           सहस्त्र पाकळ्यांचे हे कमळ म्हणजे मनुष्याच्या अनेक वासनांचे द्योतक आहे. वासना म्हणजे इच्छा, परंपरा, प्रवृत्ती आणि अतृप्त इच्छा होय. कमळाच्या मध्यभागी असणारा प्रकाश म्हणजे आत्मज्योती. नीळ्या रंगाचा हा प्रकाश तांदुळाच्या दाण्याच्या टोकाएवढा, अत्यंत छोट्या आकाराचा असतो असे नारायण सूक्तामध्ये सांगितले आहे. हा आत्मा आहे जो सर्वांमध्ये निवास करतो. ह्या आत्म्याच्या प्रकाशास कोणत्याही गोष्टीचा स्पर्श होऊ देऊ नये. ती ज्योत विचलीत होऊ न देता स्थिर राहिली पाहिजे. 

           आत्मा म्हणजे अंतरंगात वसणारा ' मी ' होय. ह्या ' मी ' स आपल्या नामरूपाशी संबंधित असणाऱ्या ' मी ' चा स्पर्श होऊ देऊ नये. 

           हे सहस्त्र दलांचे कमल नाम आणि रुपासंहित देहाशी निगडीत असणाऱ्या छोट्या ' मी ' ला निर्देशित करते. ह्या कमळाच्या सहस्त्र पाकळ्या म्हणजे ह्या ' मी ' च्या आवडी - नावडी आहेत. हा ' मी ' एक विचार प्रक्रिया आहे जी ठामपणे सांगते," मी हे नाम आणि रूप आहे. मला मुले, माझी पत्नी आणि माझे घर आहे. मला आता बढती मिळायला हवी. माझ्या मुलीचा विवाह व्हायला हवा. माझ्या शेजाऱ्यांशी माझे मित्रत्त्वाचे नाते नसावे .....अशा अनेक गोष्टी. कमळाची प्रत्येक पाकळी, आपल्या आवडी - नावडी आणि अतृप्त इच्छांशी अनुरूप असते. 

           जेव्हा मनामध्ये एखादी इच्छा जागृत होते, तेव्हा ह्या छोट्या ' मी ' ची पाकळी मोठ्या ' मी ' आत्म्यास स्पर्श करते. कमळाच्या मध्यभागी असलेली ज्योती ह्याचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा पाकळ्या छोट्या ज्योतीस स्पर्श करतात तेव्हा त्याच्या तेजाची शक्ती पाकळ्यांना प्राप्त होते. पाकळ्यांची शक्ती वृद्धिंगत होते. 

           ज्यांना हा छोटा ' मी ' नसतो तेथे पाकळ्या नसतात सर्वत्र फक्त प्रकाश, प्रकाश, प्रकाश असतो. पाकळ्यांची अनुपस्थिती म्हणजे इच्छा नाहीत आवडी नावाडी नाहीत. जेव्हा तेथे ' मी ' नसतो तेव्हा इच्छा कशा असतील ? जेव्हा तिथे ' मी आणि माझे ' नसते तेव्हा तेथे फक्त परमेश्वर असतो; प्रकाश असतो. तो ऊर्ध्व दिशेने जातो सहस्त्रार फोडून उघडतो आणि उच्च स्तरावर जातो. तो स्वयंप्रकाशित ज्योती रूपात तेजाने तळपतो. तो कशालाही स्पर्श करत नाही. तो स्वयंप्रकाशित ज्योतीरुपात राहतो. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' How the Satya Yuga is Coming ' ह्या पुस्तकातून. 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा