रविवार, २३ मे, २०२१

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ४१ 

संहार 

          " जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संहार होत आहे. आत्मपरिक्षण आणि स्वतःमध्ये बदल घडवून प्रत्येकाने स्वतःमधील वाईट, पाशवी वृत्तींचा नाश केला पाहिजे. संहार थांबवण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. विश्वकल्याणासाठी सर्वांनी एक होऊन दुष्प्रवृत्ती व कुविचार नष्ट केले पाहिजेत. आणि सद् विचारांचा सर्वत्र प्रसार केला पाहिजे. अधर्माविरुद्ध व दुष्प्रवृत्तींविरुद्ध आता आपण धर्मयुद्ध पुकारू या."असा स्वामींनी इशारा दिला. 

          २८ ऑक्टोबर १९९९ रोजी स्वामींनी सांगितले की जगाला अनेक आपत्तींचा सामना करावा लागेल. हिमालयातील काही भागांचा संहार होईल. कारगिल युद्धाविषयीही स्वामींनी सांगितले तसेच अमेरिकेत व जगाच्या अनेक भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संहार होईल . भूकंप, विमान दुर्घटना. युद्ध , वादळे ह्या सारख्या अनेक विपत्ती आल्याचे आपण पाहिले. 

          जगामध्ये घडणाऱ्या ह्या उलथा पालथीने लोक अत्यंत भयभयीत झाले. सर्वत्र प्रार्थना आयोजित करण्यात आल्या. जे लोकं परमेश्वराला मानत नव्हते ते आता मनोभावे भक्ती करू लागले. जेव्हा मनुष्याला संकटांचा सामना करावा लागतो ,जेव्हा मृत्यूचे भय वाटु लागते तेव्हाच त्याला परमेश्वराची आठवण होते. तेव्हा त्याच्या भक्तीमध्ये उत्कटता येते. परमेश्वराचे संरक्षण कवच लाभावे ह्यासाठी तो तळमळतो. ह्याच कारणासाठी पांडवांची माता कुंतीने कृष्णाकडे प्रार्थना केली," मला सतत संकट दे ज्यामुळे मला तुझे कधीही विस्मरण होणार नाही. " आज मनुष्याच्या बाबतीत हेच घडते आहे. पूर्वी तो त्याच्या मर्जीनुसार जीवन जगत होता. भौतिक सुखांच्या मागे धावण्यात व्यर्थ वेळ दवडत होता. आज जगामधील विनाश पाहून तो संरक्षणासाठी परमेश्वराच्या मागे धावतो आहे. 

          आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवा असा विनाश संहार का होतो ? जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो , हिंसेचे प्राबल्य वाढते तेव्हा निसर्गाचा कोप होतो. जर आपण सदाचरणाच्या मार्गावरून वाटचाल केली तर आपण सुखी जीवन जगू शकतो. चांगल्या वाईट दोन्ही साठी आपणच जबाबदार असतो. आपले दुर्गुण व दुष्कृत्ये ह्यांची  नकारात्मक कंपने बनतात व वातावरणात भरून राहतात. हे विनाशास कारणीभूत होते. जसे प्रत्येकाच्या संस्कारानुसार त्याला कर्म भोगावी लागतात. तसेच प्रत्येक देशाच्या इतिहास व संस्कृती नुसार देशाची कर्मे असतात. १९ सप्टेंबर २००१ रोजी स्वामींनी हे स्पष्ट करून सांगितले. 

         परमेश्वर लोकांच्या संरक्षणार्थ अवतार घेत नाही. तो धर्माच्या संरक्षणासाठी अवतार घेतो. जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, धर्माला दुःख सोसावे लागते तेव्हा निसर्ग कोपतो व आपत्ती कोसळतात. 

         आपली भारतमाता आध्यात्मिक क्षेत्रात सर्वश्रेष्ठ होती. येथे चारित्र्य संपन्नता होती. आता मात्र मूल्ये हरवत चालली आहेत. द्वेष, घृणा, वैरभाव, खोटेपणा, लोभ ह्यामुळे आपण प्रेमाच्या पारंपरिक ठेव्याला विसरलो आहोत. घराघरातील हृदयातील प्रेम शुष्क झाले आहे. स्वार्थासाठी मनुष्य काहीही करण्यास तयार आहे. हे ह्या विनाशाचे कारण आहे. व्यापक आणि निःस्वार्थ प्रेमाची जोपासना करा. हा एकमात्र उपाय आहे. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' वसंतसाई सत् चरित्र भाग- १ ' ह्या पुस्तकातून 

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा