रविवार, ४ जून, २०२३

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 
सुविचार 
       " जादूटोणा, चमत्कार वा मंत्र याद्वारे, प्रेम एका हृदयातून दुसऱ्या हृदयामध्ये स्थलांतरीत करता येत नाही. "
कर्मयोग - उपाय 

          सर्वसाधारण कृती योगात परिवर्तित करणे म्हणजे कर्मयोग. कृती योगात परिवर्तित करणे म्हणजे काय ?  याचा अर्थ असा की परिणामांचे ओझे न वाहता केलेले कर्म. कर्म करताना त्याविषयी मनात जे विचार येतात त्याचे ओझे होते. सुख- दुःख, चिंता, आवड-नावड या सर्व भावनांनी भरलेल्या विचारांचा मनावर ताण येतो. या भावना म्हणजेच बंधने. त्याचे संस्कार बनतात. ते 'मी' म्हणजेच अहंकाराची भावना निर्माण करतात. जर 'मी ' हा नसेल तर आपण चिंता आणि भीतीपासून मुक्त होऊ, आपली कर्म सहजतेने होत राहतील. अशी कर्म शुद्ध आणि निर्दोष असतात. हाच योग आहे. स्थिर मन म्हणजेच योग. 'मी कर्ता आहे' ही भावनाच आपली शांती बिघडवते. 
           आपण सकाळपासून रात्रीपर्यंत कामात व्यस्त असतो. धावपळीच्या जीवनात आपण अगदी थोडी विश्रांती घेतो. या सर्व धकाधकीतून आपण काय मिळवतो ? बायको, मुले, अधिकारपद आणि थोडीशी मालमत्ता. यासाठी आपण किती धडपड करतो, कित्येक वेळा दैवाला दोष देतो आणि मनःशांती हरवून बसतो. जीवनात जराही शांती नाही. यातून सुटका मिळवण्यासाठी माणूस सिनेमाला जातो, मित्रांना भेटतो, कादंबऱ्या, मासिकं वाचतो. हे सर्व तात्पुरते उपाय आहेत. काही काळ कदाचित तो त्याची दुःख विसरेल, पण घरी परतल्यावर ती पुन्हा त्याच्या मानगुटीवर बसतील. माणसानी कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे. सखोल चिंतन केल्यावर तुम्हाला याचं उत्तर सापडेल. जेव्हा तुम्ही सर्व कर्म परमेश्वराची पूजा म्हणून कराल तेव्हाच तुम्हाला खरी मनःशांती मिळेल. 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा