गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " जसे लोखंड वितळवून साच्यात ओतले जाते तसेच आपण पुन्हा पुन्हा आपले जीवन भक्तीमध्ये वितळवून आध्यात्मिक शिस्त अंगी बनवली पाहिजे. "


अमृतकलश फोडला 

           स्वामींनी जे सांगितले त्यावर मी चिंतन केले.
           ...' मी डेंटिस्टकडे जाणार नाही. स्वामींनाच मला बरं करू देत. ते कित्येक लोकांसाठी काय काय करत असतात. मग ते माझ्यासाठी का नाही करत ? काय, स्वामी मला क्षणात नाही बरं करू शकत ! पण ते माझ्यासाठी काहीच करत नाहीत. एकच चमत्कार !आणि माझे दात ठीक होतील.
मी बैचेन होते.
२० जुलै २००७ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी !माझे प्रभू ! माझा देह तुम्हाला अर्पण करण्यायोग्य होईल का?
स्वामी - सर्व काही तूच करशील.
वसंता - खरंच स्वामी ? माझे दात सशक्त होतील का ?
स्वामी - यात काय शंका आहे ? जर तुझे भाव जगपरिवर्तन करू शकतात, तर ते तुला नाही बदलू शकणार ?
 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम






रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " परमेश्वर केवळ एकच आहे, आपण सर्वजण त्याची लेकरे आहोत. हे सत्य आहे. "


अमृतकलश फोडला 

         त्वचारोगतज्ञ म्हणाले की दातांमुळे मला त्वचेची अ‍ॅलर्जी झाली आहे. मी ताबडतोब डेंटिस्टकडे जाऊन दात तपासून घ्यावे. मी, जावे का न जावे या संभ्रमात होते. मी स्वामींना प्रार्थना करून म्हटले की मी नाही जाणार.
संध्याकाळचे ध्यान
वसंता - स्वामी, मी डेंटिस्टकडे जायला हवे का ?
स्वामी - नको
वसंता - स्वामी, माझा देह पूर्णम्व्हायला हवा.
स्वामी - तसेच होईल. डॉक्टरकडे जायची अजिबात गरज नाही. तू स्वतःच सगळं करशील.   

१६ जुलै २००७ ध्यान
वसंता - स्वामी माझ्या लिखाणाविषयी सांगा.
स्वामी - तू म्हणजे सर्वांचे सुवर्णात परिवर्तन करणारा किमयागारांचा परीस आहेस. तू मूळ धातूचेच सुवर्णात रूपांतर करतेस. लोहयुगाचे सुवर्णयुगात होत आहे.
वसंता - मी डॉक्टरकडे जाणार नाही. तुम्हीच मला बरं करा.
स्वामी - तू स्वतःच सर्व काही करशील. तू धन्वंतरी आहेस.
ध्यानाची समाप्ती 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम





गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

वसंतसाई अम्मांचा जन्मदिन संदेश

सत्ययुग कसे उदयास येईल!



 वसंता : स्वामी, तुम्ही मला हवे आहात, तुम्ही मला हवे आहात.

स्वामी : प्रेम साई अवतारातील आपल्या मुलाप्रमाणे, मला धरून ठेवून तू म्हणतेस, 'तुम्ही मला हवे
आहात, तुम्ही मला हवे आहात.'
 
वसंता : स्वामी, मला फक्त तुम्ही हवे आहात.
स्वामी : तुझी तळमळ, तुझी आर्तता मला हलवून सोडते आहे. ही आर्तताच सर्वांमध्ये प्रवेश करून त्यांच्यामधील अंतर्यामीला हलवून सोडते आहे. प्रेमाच्या या अखंड माऱ्यामुळे, आत्मनिवासी जागृत होतो. साधू संतांची शक्ती त्यांच्या अंतरंगातच स्थित असल्यामुळे ते स्वतःला उन्नत करतात तथापि तू माझ्यासाठी अश्रू ढाळत असल्याने ती शक्ती बाहेर पडुन सर्वव्यापी परमेश्वरास हलवून सोडते.
वसंता : स्वामी, आपण लवकर भेटण्यासाठी माझ्यावर कृपावृष्टी करा. मला तुम्हाला भेटायचे आहे, लवकरात लवकर भेटायचे आहे! तुम्ही मला कधी बोलावणार?
स्वामी : आपल्या भेटीसाठी तू नेहमी अश्रु ढाळतेस. तू परमेश्वराला प्राप्त केले आहेस, त्याच्याशी एकत्व पावली आहेस तरीही असे म्हणून तू अश्रु ढाळतेस. तुझ्या सहस्रारातून उत्पन्न झालेली शक्ती बाहेर पडून सर्वांमध्ये असणाऱ्या शक्तीस धडक देते. सर्वांमध्ये असणारी ही कुंडलिनी शक्ती जागृत होऊन आज्ञा चक्रातील शिवास जाऊन मिळते. याच कारणासाठी तू आर्ततेने म्हणतेस, 'आपण भेटूया, आपण भेटूया.' जशी तुझी आर्तता आणि विलाप अधिकाधिक वाढत जातो तेव्हा शक्ती सर्वांमध्ये प्रवेश करते.

ध्यान समाप्ती

 जन्मापासून ते आता या क्षणापर्यंत स्वामींचा ध्यास, स्वामींची तृष्णा आणि 'मला स्वामी स्वामी हवेत' हा विचार, निरंतर माझ्यासोबत आहे. त्यांचा ध्यास माझ्या रक्तात भिनला आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणते, 'मला स्वामी हवेत, मला स्वामी हवेत.' ध्यानामध्ये मी स्वामींजवळ बसते, त्यांच्याशी बोलते तरीही माझ्या तृष्णा शमत नाही. श्वासाइतकीच स्वाभाविकपणे ही तृष्णा उत्पन्न होते. म्हणून स्वामींनी मला प्रेम साई अवतारातील दिव्यदृश्य दाखवले ज्यामध्ये त्यांनी म्हटले आमचा पुत्रही माझ्यासारखाच असेल.

 माझा अखंड विलाप केवळ स्वामीना नव्हे तर प्रत्येकामध्ये विद्यमान असणाऱ्या आत्मनिवासीलाही हलवून सोडतो. परमेश्वराचे हे अखंड चिंतन प्रत्येकामध्ये प्रवेश करून त्यांच्यातील अंतर्यामीला हलवून सोडते.

 सर्वसाधारणपणे आत्मसाक्षात्कारी व्यक्तींची शक्ती त्यांच्यामध्येच राहून ती त्यांना उन्नत पदाला नेते. माझ्या तपोबलाद्वारे मी अंतरंगातील परमेश्वराला पाहिले, त्याच्याशी संभाषण केले आणि ज्ञान प्राप्त केले तरीही माझे समाधान झाले नाही. त्याच्याविषयीची अखंड तळमळ आणि त्याला प्राप्त करण्याची दुर्दम्य इच्छा यामुळे ती शक्ती बाहेर पडून तिने सर्वांमधील अंतर्यामीला हलवले.

माझ्या मधील एका अंतर्यामीशी ऐक्य साधण्याने माझे समाधान झाले नाही म्हणून माझ्या मधील शक्तीने अखिल विश्वामध्ये जाऊन सर्वांमधील अंतर्यामीला जागृत केले. तिने सर्व व्यापी परमेश्वराला जागृत केले.

एखाद्याने साधना केल्यानंतर त्याच्या मधील आत्मनिवासी जागृत होतो आणि साधकाला मुक्ती प्राप्त होते तथापि माझी अवस्था वेगळी आहे. मी त्यावर संतुष्ट नव्हते मी परमेश्वरासाठी अधिकाधिक विलाप केला. या अतृप्त प्रेमाने सर्वव्यापी परमेश्वराला हलवले. त्याने सर्वांमधील ईशतत्त्व जागृत केले

"मला स्वामीना भेटायचे आहे, मला स्वामींना भेटायचे आहे." मी अक्रोश करत होते. पुण्याहून आल्यानंतर माझी तृष्णा अधिकच वाढली.

 जर एखाद्यास त्याची इच्छित वस्तू प्राप्त करण्यात अडथळा आणला तर ती इच्छा अधिकच तीव्र होते. जर आपण कोणाला म्हटले, "तेथे जाऊ नकोस." तर तो असा विचार करतो,'मी का बरं तेथे जाऊ नये? मी जाणारच.' हा विचार प्रबळतेने  त्याच्या अंतरंगातून उद्भवतो.

 दुसरे उदाहरण
 वर्तमानपत्राच्या जाहिरातीत म्हटले,' चौकटीमधील मजकूर वाचू नका.' वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशा जाहिराती बनवल्या जातात. यामधून मानवी मनाची वृत्ती दर्शवली जाते. जर एखाद्याला एखादी गोष्ट करू नको असे सांगितले तर तो निश्चितपणे ती करतो.

त्याच प्रमाणे ज्या अडचणींना मी तोंड दिले त्या अडचणीनी🙌 माझी स्वामींच्या दर्शनाची इच्छा अधिकच तीव्र केली. स्वामींनी माझा स्वीकार करावा यासाठी मी ७० वर्षांपासून प्रतीक्षा करत आहे.

 आता मी स्वामींना एक अट घातली, " जर तुम्ही स्वतः मला बोलावले नाही तर मी तुमच्या दर्शनाला येणार नाही. जर तुम्ही मला बोलावले नाही तर मी पुट्टपर्ती, वृंदावन वा कोडाईकॅनालला येणार नाही." मी स्वतः माझ्याभोवती ह्या मर्यादा घालून घेतल्या, अशा प्रकारे त्यांना भेटण्याची माझी इच्छा अधिकाधिक वाढत आहे. मी त्यांची प्रार्थना करत होते, आक्रोश करत होते, "तुम्ही मला बोलवा."
मी साधना केली, मला आत्मज्ञान झाले, आणि मोक्षप्राप्ती झाली.
२००२साली वशिष्ठ गुहेमध्ये शुद्ध चैतन्य स्वरूपात माझा स्वामींशी योग झाला तरीही मी नेहमी म्हणत असते, " स्वामी मला तुम्हाला भेटायचे आहे, तुम्हाला भेटायचे आहे." ऋषीमुनींना साधना करून आत्मज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर देह त्याग करून परमेश्वरामध्ये विलीन होतात. मी देह त्याग केला नाही. मी स्वामींना भेटण्यासाठी येथे विलाप करत आहे. या आर्त तळमळीतून निर्माण होणारी शक्ती बाह्य जगतात जाऊन सर्वांमधील कुंडलिनी शक्तीला धडक देते. सर्पाप्रमाणे वेटोळे घातलेली ही शक्ती मूलाधारामध्ये सुप्तावस्थेत स्थित असते. ती जागृत झाल्यावर एकेक चक्र भेदून आज्ञा चक्रातील शिवाला भेटते. येथे शिव आणि शक्तीचे मिलन होते. हे मिलन म्हणजे परम आनंदाची अवस्था होय. ही अवस्था मी प्राप्त केली
तथापि माझ्या सहस्रारामधून स्वामींना भेटण्याची तृष्णा उत्पन्न होत आहे , सतत वृद्धिंगत होत आहे. सर्वांमधील कुंडलिनी शक्तीला ती जागृत करते आणि शिव आणि शक्तीचे मिलन होते. या दोन्ही अवस्था, सत्ययुग कसे निर्माण होईल हे दर्शवतात.
 "मला स्वामी हवेत, मला स्वामी हवेत" ही तृष्णा बाह्य जगतात जाऊन सर्वांमध्ये वास करणाऱ्या विश्वव्यापी, आत्मनिवासीला हलवते. 'मला स्वामी हवेत, मला स्वामींना भेटायचे आहे  ही तृष्णा बाहेर पडून सर्वांमधील कुंडलिनी शक्तीला जागृत करेल. हललेला शिव आणि जागृत झालेली शक्ती यांचे मिलन होते, आज्ञा चक्रात त्यांचे ऐक्य होते.

 हे ऐक्य प्रत्येक वस्तूमध्ये आणि प्रत्येकामध्ये घडेल. विश्वव्यापी परमेश्वर आणि विश्वव्यापी शक्ती यांचे मिलन म्हणजेच सत्ययुग होय!
ही व्यक्तिगत जागृती आणि वैश्विक जागृती या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडतात.

 जेव्हा व्यक्तिगत जागृती होते तेव्हा विश्वाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होतो. आतापर्यंत हे कलियुग विश्व आहे. *जागृती नंतर ते सत्ययुगानुसार कार्यरत होईल.*

 श्री वसंतसाई अम्मा

संदर्भ - श्री वसंतसाई अम्मांच्या 'शिवसूत्र' (प्रकरण सहा- दिव्य मिलन) या पुस्तकातून हा उतारा घेण्यात आला आहे.
 

 

जय साईराम




 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

अम्मांच्या सत्संगातून....

आज मी स्वामींचा तमिळमधील सनातन सारथीचा या महिन्याचा अंक वाचला. त्यातील स्वामींच्या दिव्य संदेशात त्यांनी असे म्हटले आहे,  हा कलियुगातील काळ अत्यंत वाईट आहे. सर्वांनी परमेश्वराचे नामस्मरण करुन आपल्या उच्चार, विचार आणि आचार केवळ स्वामींनी व्यापलेले  असायला हवेत. माझे जीवन मी अशाप्रकारे व्यतीत केले आहे.

सर्वसाधारणपणे मनुष्य, मी, माझे आणि आसक्ती या भावांमुळे अतोनात दुःख, क्लेश सोसतो आहे. परमेश्वर आणि त्याची निर्मिती हे वेगवेगळे नाही  याचा बोध झाल्यावर त्याच्या दुःखाचा अंत होईल.

मनुष्य जन्मतः दिव्य आहे म्हणून त्याने आपले विचार, उच्चार आणि आचार यामधून प्रेम, सहनशीलता, करुणा आणि विनयशीलता हे दैवी गुण दर्शवले पाहिजेत.

 प्रेम ईश्वर आहे आणि ईश्वर प्रेम आहे. तो सृष्टीच्या कणाकणामध्ये आणि प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. सर्वांप्रति समान प्रेम दर्शवणे हा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे तथापि या मार्गावर वाटचाल करताना मनुष्याने या मार्गावर येणाऱ्या अनेक अडथळ्यांना तोंड दिले पाहिजे.

 हे अडथळे कोणते आणि त्यावर कशी मात करायची हे सर्व
धर्मग्रंथांमध्ये दर्शवले आहे. क्रोध, इच्छा आणि आसक्ती हे मनुष्याचे तीन प्रमुख शत्रू आहेत.

जर हे दुर्गुण दूर केले नाही तर ते आपला विध्वंस करू शकतात. त्याची काही उदाहरणे आपण पाहूया
रावण काम वा इच्छांनी व्याप्त होता. त्याच्या या दुर्गुणामुळे केवळ त्याचाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला. दुर्योधनाच्या क्रोधामुळे हे महायुद्ध झाले आणि त्याची संपूर्ण वंशावळ नष्ट झाली. रणांगणावर, आसक्तीमधून निर्माण झालेली अर्जुनाची भ्रांती दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने गीतेची शिकवण दिली. भ्रांती आणि आसक्ती दूर करा, हा गीतेतील संदेश आहे.

स्वामींच्या एका कॅलेंडरवरील एक सुवचन आपण पाहूया

 "तुमच्या सर्व गोष्टींचे मूळ तुमचे विचार आहेत म्हणून तुमचे विचार केवळ उदात्त, पवित्र आणि शुद्ध असायला हवेत."
आता आपण जे जीवन जगतो आहे ते आपल्या गतविचारांनी निश्चित केलेले आहे. आपण स्वतःच आपले विधीलिखित लिहितो. शुद्ध आणि उदात्त विचार असणे अत्यंत आवश्यक आहे तरच आपण भविष्यामध्ये पवित्र जीवन जगू शकू.

- श्री वसंतसाई अम्मा


संदर्भ - हा उतारा अम्मांच्या नोव्हेंबर २०२३ च्या सत्संगातून....

जय साईराम


रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " सर्व गोष्टींची अनुभूती घेण्याची इच्छा ठेवू नका तर सर्वांतर्यामी परमेश्वराची भक्ती करा. "


उतारा ( रामबाण औषध )

 

          ....माझं विश्वरूप आनंदमयी आहे. त्याचा कर्माच्या हिशोबांशी काहीही संबंध नाही. लोकांचा कर्म ऋणानुसार- जन्म होत नाही. मी त्यांचे कर्मांचे सर्व हिशोब नाहीसे केले. मी स्वयंभू आहे. सर्व माझीच प्रतिकृती आहे. मीच सर्व आहे. सर्वजण या वसंताची प्रतिकृती आहेत. मी स्वयंप्रकाशित सत्-चित्-आनंदरूप आहे. मी वैश्विक सत्यम-शिवं-सुदरं आहे. मी सदारहित प्रेमस्वरूप आहे. प्रेम हे सर्वांमध्ये दुथडी भरून वाहणारे मधुर अमृत आहे. हीच 'सर्वांवर प्रेम करा' ची स्थिती आहे.

*     *     *

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      जर तुम्ही सर्वांवर भरभरून प्रेम केलेत तर तेच प्रेम तुमच्याकडे येईल."


उतारा ( रामबाण औषध )

 

          प्रभू श्रीकृष्णाने अर्जुनाला त्यांचे विश्वरूप दाखवले. ते काळाचं विश्वरूप होतं, सर्वांचा संहार करणारे रौद्ररूप होते. अर्जुनाने प्रभूच्या जबड्यात सर्व जीव चिरडले जाताना पाहिले. सर्वांचा भयावह मृत्यु पाहून त्याचा भीतीने थरकाप झाला. मी माझे विश्वरूप पाहिले. ते नवनिर्मितीचं आंनंददायी नृत्य होत. हे रूप प्रलयाविना सर्वांचं परिवर्तन करते. हे रूप पाहताना जराही भीती वाटत नाही, किंबहुना ते सर्वत्र आनंद देते. त्याची व्याप्ती काळ अथवा स्थानापुरती मर्यादित नाही. ही अमरत्वाची स्थिती आहे.
          २८ जून २००७, दुपारचे ध्यान
वसंता - स्वामी, प्लिज मला कृष्णाच्या विश्वरूपाविषयी आणि शक्तीच्या विश्वरूपाविषयी थोडं अजून सांगा नं !
स्वामी - कृष्णाने परमेश्वराचे कालरूप प्रकट केले. ते संहार दाखवते. शक्ती परिवर्तनाचे  कार्य करते. अर्जुन बंधमुक्त व्हावा म्हणून श्रीकृष्णाने त्याला गीता  शिकवली. तू तुझ्या आनंददायी रूपात सर्वांचे परिवर्तन करते आहेस. कृष्णाचे कालरूप हे कर्मकायद्यानुसार होते. त्याने सर्व सजीवांना गिळंकृत केले. तुझे रूप हे आनंदमयी आहे. त्याचा कर्माच्या हिशोबाशी काही संबंध नाही. हे स्वयंभू रूप आहे; तू तुझी निर्मिती सगळीकडे पाहत आहेस.
ध्यानाची समाप्ती

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल."


उतारा ( रामबाण औषध )


           दुसरी अतिशय महत्वाची शक्ती स्वामींनी मला देण्यास सांगितली ती म्हणजे आत्मसंन्यास. गृहस्थजीवन जगणाऱ्या साधकांना ती उपयुक्त आहे. ती विश्वरूप घेते तेव्हा सर्वजण बंधमुक्त होतात. सर्वजण संन्यासी जीवन जगातील. *' मी विना मी ' चं **'मी आहे मी ' मध्ये परिवर्तन होईल. सर्वजण कर्मयोगी म्हणून जीवन जगातील. स्वामी म्हणाले की त्यांच नाव प्रेम आहे, त्यांच स्वरूप प्रेम आहे. माझ्या उग्र तपश्चर्येमुळे पुढील अवतारात मी 'प्रेमा' नाव मिळवले आहे. माझा प्रेममय स्वभाव हाच वसंतमयम् सृष्टीचा पाय आहे. हे संपूर्ण जग प्रेममय होईल. सर्वजण कर्मयोग्यांप्रमाणे बंधनमुक्त जीवन जगातील.
            हे संपूर्ण जग वसंतमयम्, प्रेममयमच आहे. हे जग विस्तृत प्रेमाने परिपूर्ण असेल. तिथे बंधनांचा लवलेशही नसेल. बंधने नसल्याने या जगातून अहंकार नाहीसा होईल.   


*'मी विना मी' - अहंकारी 'मी' च अहंकाररहित 'मी' होणं
** '
मी आहे मी' - 'मी' च ' विश्वात्मक 'मी', सर्वव्यापी चैतन्य होणं

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल."


उतारा ( रामबाण औषध )


           कलीचं विष जे दुष्ट कंपनांद्वारे अवकाशात व्यापले आहे त्याच्यावर हाच एक उतारा आहे. मुक्ती स्तूपाद्वारे, जगभर ह्या उताऱ्याचे विश्वस्तरावर इंजेक्शन दिलं जात आहे. झाडांवर जंतुनाशक औषधांची फवारा करीत आहे. ते संपूर्ण विश्वात भरून राहते. कोणाचाही अथवा कशाचाही गरज नाही. हा उतारा शुद्ध चैतन्य म्हणून अवकाश व्यापत आहे. आता धर्माचा ऱ्हास होणार नाही. स्वामींनी आणि मी भावपरिवर्तन केले आहे, हेच बियाणे आहे. सर्वजण नवीन निर्मिती म्हणून जन्माला येतील. व्यक्तीगत वसंताचे भाव, वसंतमयम् होण्यासाठी विश्वव्याप्त झाले आहेत.  


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
रत्न - १०
प्रोफेसर रुहेलांनी वसंतसाईंची घेतलेली मुलाखत 


एस पी आर :  अम्मा, तुमच्या गतजन्मातील राधेच्या वा त्यापूर्वीच्या कोणत्याही जन्मातील काही स्मृती तुमच्याकडे आहेत का?
अम्मा : मी पूर्व जन्मात राधा असल्याचे स्वामींनी मला ध्यानामध्ये सांगितले. ध्यानामध्ये स्वामी मला गोकुळात घेऊन गेले. त्यांनी मला यमुना नदी, कालिया घाट,  जंगल आणि नंदगावातील कृष्णाचे घर दाखवले. जेथे त्यांच्या पालकमातेने यशोदेने त्यांना उखळाला बांधून ठेवले होते ती जागाही दाखवली आणि एका विशिष्ट घराकडे जाणारा रस्ता दाखवला. स्वामी मला म्हणाले की हे राधेचे घर आहे.
 मला स्वतःला, माझ्या कोणत्याही पूर्व जन्मातील स्मृति नाहीत.
 एस पी आर :  अम्मा, तुम्ही ध्यानामध्ये पाहिलेल्या राधेच्या घराचे कृपया वर्णन करू शकता का?

ते अगदी छोटसं आणि साधं घर होतं. त्या घरामध्ये तीन-चार खोल्या होत्या. बाहेरच्या बाजूस दोन छोटे खांब होते. बाहेरील बाजूस फरश्यांचा मंडप होत.   मी आत मधील सर्व खोल्यांमध्ये गेले आणि मी स्वामींना दाखवले की   पूर्वजन्मात, राधा असताना  कृष्णाच्या काळामध्ये, कृष्णाच्या मुरलीच्या ध्वनीचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी त्या खिडकी जवळ उभी राहत असे. कृष्ण त्या रस्त्यावरून येत आहे वा नाही हे पाहण्यासाठी मी त्या दारासमोर उभी राहत असे. मी एका खोलीत गेले आणि स्वामींना सांगितले की या खोलीमध्ये मी दररोज तासन तास कृष्णासाठी अश्रू ढाळत असे.

तेथे एक पलंग होता परंतु मी जमिनीवरती कोसळले. मी स्वामींना सांगितले, " मी कृष्णासाठी तासंतास अश्रू ढाळत होते आणि  माझी शुद्ध हरपली. हा माझा गोकुळातील पहिला अनुभव होता. माझ्या ध्यानामधील हे दृश्य पाहून मी भयभीत झाले. मी त्वरित देवघरातून बाहेर आले. हे दृश्य आठवून मी अश्रू ढाळत होते. त्यावेळी माझे सांत्वन करण्यासाठी घरामध्ये कोणीही नव्हते. ते भाव माझे मी सहन केले. २५ नोव्हेंबर १९९७ रोजी दुपारी ४ वाजता मी हे दृश्य पाहिले. नंतर स्वामींनी मला ध्यानामध्ये सांगितले की राधा विवाहित होती आणि तिला मुलबाळं नव्हते.

हा उतारा प्रोफेसर एस.पी. रुहेला- यांच्या "राधेचा पुनर्वतार वसंत साई " या पुस्तकातून घेतला आहे.

जय साईराम


रविवार, ५ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल."


उतारा ( रामबाण औषध )


           मला 'मी' नसल्यामुळे मी अनेक देवदेवतांना मला शक्ती देताना पाहिले. खरे तर, माझ्यातच अंतर्भूत असलेल्या शक्तींची ती रूपं होती. स्वामींनी स्वतःमला ध्यानात सांगितले, तेव्हाच मला हे सर्व समजले.
२७ जून २००७ दिव्य दृश्य
          माझ्या शक्तींनी संपूर्ण विश्व व्यापलं आहे. मी या अमर्याद वैश्विक शक्तीचा आनंदपूर्ण नाच पाहात आहे. मी समजले की वेगवेगळ्या देवतांच्या शक्ती ह्या एका निरहंकारी वसंताला दिल्या गेल्या, पण सत्य हे आहे की या सर्व शक्ती माझ्याच अंतर्यामी होत्या.
            पुढील तक्त्याद्वारे आपण या शक्तींची अधिक माहिती घेऊ या. 

 

 शक्तीचे नाव

 व्यक्तिगत पातळीवर परिणाम

 विस्तार

 सावित्री शक्ती

 विवाह आणि वैवाहिक प्रश्न

 नवनिर्मिती सर्व पुरुष सत्य आणि सर्व स्त्रिया प्रेम होऊन विवाह करतात.

 सरस्वती शक्ती

 शिक्षण

 ज्ञानी मुले

 गायत्री शक्ती

 तेजोवृद्धी

 वैश्विक जागृती

 हयग्रीव शक्ती

 आत्मज्ञान

 अखिल सृष्टीस आत्मज्ञान

 धन्वंतरी शक्ती

 आरोग्य

 विश्वकल्याण

 दुर्गा शक्ती

 कर्मसंहार

 जागतिक कर्मसंहार

 हनुमान शक्ती

 साधनेसाठी शक्ती

 अवतार कार्यासाठी एकजुटीने एकाग्र प्रयत्न

 दत्तात्रय शक्ती

 उत्पत्ती, स्थिती आणि लय

 प्रलयाविना सत्याचे संरक्षण-लयस्थिती - पुर्णम्

 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम