ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
अम्मांच्या सत्संगातून....
आज मी स्वामींचा तमिळमधील सनातन सारथीचा या महिन्याचा अंक वाचला. त्यातील स्वामींच्या दिव्य संदेशात त्यांनी असे म्हटले आहे, हा कलियुगातील काळ अत्यंत वाईट आहे. सर्वांनी परमेश्वराचे नामस्मरण करुन आपल्या उच्चार, विचार आणि आचार केवळ स्वामींनी व्यापलेले असायला हवेत. माझे जीवन मी अशाप्रकारे व्यतीत केले आहे.
सर्वसाधारणपणे मनुष्य, मी, माझे आणि आसक्ती या भावांमुळे अतोनात दुःख, क्लेश सोसतो आहे. परमेश्वर आणि त्याची निर्मिती हे वेगवेगळे नाही याचा बोध झाल्यावर त्याच्या दुःखाचा अंत होईल.
मनुष्य जन्मतः दिव्य आहे म्हणून त्याने आपले विचार, उच्चार आणि आचार यामधून प्रेम, सहनशीलता, करुणा आणि विनयशीलता हे दैवी गुण दर्शवले पाहिजेत.
प्रेम ईश्वर आहे आणि ईश्वर प्रेम आहे. तो सृष्टीच्या कणाकणामध्ये आणि प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. सर्वांप्रति समान प्रेम दर्शवणे हा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे तथापि या मार्गावर वाटचाल करताना मनुष्याने या मार्गावर येणाऱ्या अनेक अडथळ्यांना तोंड दिले पाहिजे.
हे अडथळे कोणते आणि त्यावर कशी मात करायची हे सर्व
धर्मग्रंथांमध्ये दर्शवले आहे. क्रोध, इच्छा आणि आसक्ती हे मनुष्याचे तीन प्रमुख शत्रू आहेत.
जर हे दुर्गुण दूर केले नाही तर ते आपला विध्वंस करू शकतात. त्याची काही उदाहरणे आपण पाहूया
रावण काम वा इच्छांनी व्याप्त होता. त्याच्या या दुर्गुणामुळे केवळ त्याचाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला. दुर्योधनाच्या क्रोधामुळे हे महायुद्ध झाले आणि त्याची संपूर्ण वंशावळ नष्ट झाली. रणांगणावर, आसक्तीमधून निर्माण झालेली अर्जुनाची भ्रांती दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने गीतेची शिकवण दिली. भ्रांती आणि आसक्ती दूर करा, हा गीतेतील संदेश आहे.
स्वामींच्या एका कॅलेंडरवरील एक सुवचन आपण पाहूया
"तुमच्या सर्व गोष्टींचे मूळ तुमचे विचार आहेत म्हणून तुमचे विचार केवळ उदात्त, पवित्र आणि शुद्ध असायला हवेत."
आता आपण जे जीवन जगतो आहे ते आपल्या गतविचारांनी निश्चित केलेले आहे. आपण स्वतःच आपले विधीलिखित लिहितो. शुद्ध आणि उदात्त विचार असणे अत्यंत आवश्यक आहे तरच आपण भविष्यामध्ये पवित्र जीवन जगू शकू.
- श्री वसंतसाई अम्मा
संदर्भ - हा उतारा अम्मांच्या नोव्हेंबर २०२३ च्या सत्संगातून....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा