गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

ॐ श्री साई वसंत साई साय नमः 

सुविचार 

        " आपल्या भावविचारांनी मनावर झालेले खोलवर संस्कार आपला पुढील जन्म ठरवतात . "
 
पुष्प ३२ पुढे सुरु 

              स्वामी त्यांच्या विदयार्थ्यांना , कधी कोणाशी वाद घालू नये असे नेहमी बजावून सांगत असत . हे सर्व सत्याच्या मार्गावरील अडथळे आहेत. सर्व अडथळे दूर केले तरच आपल्याला स्वातंत्र्य प्राप्ती होईल. आपण प्रथम आपल्यामधील मलिनता दूर केली पाहिजे . याविषयी मी " उपनिषदांच्या पलीकडे ' या पुस्तकातील ' कली , काली , खाली ' या अध्यायात लिहिले आहे. सर्वांमधील दुर्गुणांचे उच्चाटन करून त्यांना रिक्त करण्यासाठी मी साधना करते . आम्हा दोघांचे भाव त्यांच्यामध्ये प्रवेश करतात व सर्वांना जीवनमुक्त बनवितात . याला म्हणतात देहासह मुक्तीची अनुभूती. देहामधील सर्व नकारात्मक गोष्टी आपण बाहेर काढून टाकल्या पाहिजेत.
     क्रमांक ४६     प्रश्न - सत्य कोठे आहे ? 
                हा काय प्रश्न आहे ? सत्य नाही अशी कोणती जागा आहे का ? परमेश्वर सत्य आहे . या जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे परमेश्वर नाही . म्हणूनच इथे कोणतीही जागा नाही जिथे सत्य नाही . भक्त प्रल्हादाने खांबापासून ते गवताच्या पात्यापर्यंत सर्वत्र परमेश्वराचे अस्तित्व सिद्ध केले . तथापि हे पाहण्यासाठी ज्ञानचक्षूच हवेत . केवळ ज्ञानचक्षूनद्वारे आपण सर्वत्र परमेश्वर पाहू शकतो . मी माझ्या ज्ञानचक्षूनद्वारे स्वामींना सर्वात पाहते . माझ्या सारखेच सर्वांना असे पाहता यावे याकरिता माझे तप सुरु आहे . 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात …. 
 
जय साईराम  
 

रविवार, २५ जानेवारी, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

        " आपल्या अतृप्त इच्छा, आकांक्षा व आसक्ती पुढील जन्मात आपल्या बरोबर असतात ."
पुष्प ३२ पुढे सुरु

                अशा तऱ्हेने मानवी शक्तीचा ऱ्हास झाला आहे . त्याने जेथे जायला हवे तेथे तो जाऊ शकत नाही . म्हणून आपण यांवर नियंत्रण ठेवून सर्वकाही ईश्वराभिमुख करावे . असे केल्याने ज्ञानोदय होतो. मनुष्यातील स्वल्प ' मी ' ला अनेक गोष्टींची हाव असते . जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काहीतरी हवे असते . जेव्हा इंद्रिये अनेकविध इच्छांकडे वळतात तेव्हा तो अहंकार बनतो . आणि जेव्हा इंद्रियनिग्रह करून त्यांना ईश्वराभिमुख केले जाते तेव्हा ते ज्ञानात परिवर्तित होते . ' मी ' भौतिक गोष्टींकडे वळल्याने अनेक दुर्गुण मागोमाग येतात . अतृप्त इच्छांमुळे क्रोध जन्मतो तर  इच्छातृप्तीमुळे लालसा जन्मते . एक इच्छा पूर्ण होता होता पाठोपाठ दुसरी प्रतिक्षेत असते . सर्व इच्छा एकामागोमाग एक रांगेत उभ्या असतात . जो यांवर ताबा मिळवून भगवंतावर मन एकाग्र करतो तो स्वामी बनतो . अनेक इच्छांचा पाठपुरावा केल्याने अनेक दुर्गुण येतात व तो ' मी ' चा गुलाम होतो . हा ' मी ' तुम्हाला गुलाम बनवून तुमच्या देहातील सर्व शक्ती हिरावतो .  शास्त्रज्ञ या शक्तीद्वारे चंद्रावर जाण्याचा मार्ग शोधतात ! तथापि संतमहात्मे या शक्तीचा वापर करून चंद्रसुर्यादींचा  निर्माता अशा भगवंताप्रत पोहोचण्याचा मार्ग शोधतात. 
                 निर्मितीवर मालकी मिळविण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. त्याऐवजी निर्मात्यालाच आपलेसे करा ! ' मी ', मत्सर , क्रोध आणि विवादामुळे हे येते . अहंकारातून विवाद उभे राहतात . जर एकादी व्यक्ती तुमच्याशी वाद घालत असेल तर शांत रहा वा तेथून निघून जा . चिंतन करा . जर दोष तुमचा असेल तर तुम्ही स्वतःचा दोष सुधारा . वाद घालणाऱ्या व्यक्तीचा दोष असल्यास त्यांचे प्रारब्ध असा विचार करून सोडून द्या . झालं गेलं विसरून जा . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम  

गुरुवार, २२ जानेवारी, २०१५


ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

        " तुमचे सर्व भाव ईश्वराकडे वळवा. जर तुम्हाला राग आला असेल तर तो परमेश्वराप्रती व्यक्त करा, " मला तुझे दर्शन का नाही मिळाले ?" त्याच्यापाशी तुम्ही तुमचे भाव व्यक्त करा . "  

पुष्प ३२ पुढे सुरु 

               अखेरीस, माझ्या कुंडलिनीने स्थूल जगात स्तूपाचे रूप धारण केले. त्यामधून स्त्रवणाऱ्या अमृताने सर्व काही अमृतमय होऊन वैकुंठ भूलोकी आले. या देहात सर्वांना मुक्ती देण्याचे सामर्थ्य आहे. स्वतःस रिक्त करणे ही त्याची प्रथम पायरी आहे . ' उपनिषदांच्या पलीकडे ' या पुस्तकात मी माझ्या साधनेविषयी सविस्तर लिहिले आहे. ब्रिटीश सरकार खूप छोटे होते व भारत देश खूप मोठा , असे असूनही त्यांनी आपल्यावर राज्य केले . याचे प्रमुख कारण, भारतामध्ये ऐक्य नव्हते . गांधीजी व इतर नेत्यांनी एकत्र येऊन लोकांमध्ये जागृती निर्माण करत त्यांच्यात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत प्रज्वलित केली . 
             याप्रमाणेच प्रत्येक माणूस अत्यंत शक्तिशाली असूनही संकुचित ' मी ' ( अहंकार ) ने त्याला आपला गुलाम बनविले आहे. प्रत्येकामध्ये कलियुगाचे सत्ययुगात परिवर्तन करण्याचे सामर्थ्य आहे. या सर्वव्यापी अहं ने सर्वांमध्ये असणाऱ्या या शक्तिवर ताबा मिळविला आहे. याचे कारण काय ? तर मन, बुद्धी व इंद्रिये यांमध्ये ऐक्याचा अभाव . ही तिघं मनुष्याला वेगवेगळ्या दिशांना खेचतात . यामुळे मानवी शक्ती वाया जात आहे , शक्तिचा क्षय होत आहे . आपण मन, बुद्धी, इंद्रिये यासर्वांवर नियंत्रण ठेऊन ती एकाग्र करायला हवीत . मी अगदी लहान असताना एक गीत लिहिले त्यातील काही ओळी पुढे देत आहे . 
सारथ्य करीती मनरूपी रथाचे 
पंचेंद्रियांचे पंचअश्व 
प्रतिदिनी घेऊन जाती ते मना 
पंचशत दिशांना .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साईराम  

रविवार, १८ जानेवारी, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

        " तुम्ही तुमचे सर्व भाव ईश्वराभिमुख केले पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला चांगल्या फलांची प्राप्ती होईल. केवळ हेच तुम्हाला मुक्ती प्रदान करेल . " 

वसंतामृतमाला

पुष्प ३२ (पुष्प ३१ वरून पुढे चालू )

देह्भावाचा त्याग करा


                   स्वामींनी १२ मे ला एक छापील कागद दिला . त्याचे शीर्षक होते , ' एक नंबर निवडा '
                त्यातील पहिला नंबर होता २७ तर शेवटचा ४७. स्वामीनी त्यातील एक नंबर निवडून प्रश्न सोडविण्यास सांगितले . निरखून पाहिले असता त्यामध्ये ३७,३८ व ४२ हे नंबर नसल्याचे आमच्या लक्षात आले. मागील पुष्पामध्ये मी ३७ व ३८ नंबरांविषयी स्पष्टीकरण केले. स्वामींनी ४२ नंबर ही लिहिला नव्हता .
     क्रमांक ४२ 
                १९४२ साली काय घडले ते आपण पाहू . त्यावर्षी ' भारत छोडो ' ( चले जाओ ) चळवळीस प्रारंभ झाला . विदेशी शक्तीनी भारत सोडावा, यासाठी हा लढा पुकारला होता . कॉंग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन ही चळवळ सुरु केली . याचा संदर्भ जोडून लिहिण्यासाठी मी चिंतन केले . 
               आपण प्रथम आपल्या शरीरामधील वाईट गोष्टींचे उच्चाटन केले पाहिजे . हा एक लढाच आहे . ह्या सर्व गोष्टी बाहेर काढल्यानंतरच व्यक्तिगत स्वातंत्र्यचा उदय होईल . सामान्य मानवी देहात केवढी प्रचंड शक्ती आहे . हे मी माझ्या जीवनशैलीतून सिद्ध केले आहे . सर्वजण साधनेद्वारे परमेश्वरास प्राप्त करून घेतात ; आणि साधू, संत, ऋषीमुनी  अशा पदांस प्राप्त होतात . साधनेद्वारे मलाही मुक्ती प्राप्त झाली तरीसुद्धा सर्वांना मोक्षप्राप्तीची अनुभूती मिळेपर्यंत मला ती अनुभूती नको आहे . मी इतरांना दिल्याशिवाय अन्नसुद्धा ग्रहण करत नाही . मी अधिक तप केले, अश्रू ढाळले, करूण विलाप केला . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साईराम

गुरुवार, १५ जानेवारी, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

           " स्पर्श संवेदना सर्व भावांचे मुलभूत कारण आहे . देह स्पर्श संवेदनेचा पाया आहे आणि तो ( देह ) जन्माने प्राप्त होतो ."

पुष्प ३१ पुढे सुरु

                काल मी एक वेगळीच साडी नेसले . उषाने त्यावर सर्वत्र स्वामींच्या पादुका रंगविल्या होत्या. ह्या स्वामींच्या पादुका माझे सर्वांग झाकतात . माझे विश्व पादुका विश्व असल्याचे ह्यातून सूचित होते. माझी काया प्रकृति मध्येविस्तारित झाल्यानंतर समस्त विश्व पादुका विश्व बनते.
                खालील कविता स्वामीनी पूर्वी दिली आहे . या कवितेत स्वामी माझे आई-वडील व माझे जीवन सांगतात . कवितेचे नाव आहे , ' वैश्विक स्फोट '

वैश्विक स्फोट


२३ ऑक्टोबर १९३८
अमावस्येची काळोखी रात
अहो आश्चर्यम् 
अवसेच्या अंधाऱ्या रात्री
जाहला पुनवेचा जन्म !
पिता मधुरकवी आळवार
माता वेदवल्ली
दक्षिणेकडील मदुरैसमीप
वडकमपट्टी ग्राम तयांचे
कन्येच्या आगमने आनंद त्यांसी शब्दातील
सानुल्या ह्या देवदूताचे
नामाभिधान केले 'वसंता '
केवढे समर्पक नामकरण
केले तयांनी अजाणता !
वसंता अर्थात वसंतऋतू
अखेरीस त्या शुष्क मानवी जीवांना
गवसले प्रयोजन
आनंदाचा उत्सव करण्या
प्रभूवराचे गुणगान गाण्या !

स्वागत तुझे माता मेरी
साक्षात् प्रभुशी विवाह करी !
या ! सकलजन हो या ....
तिची कथा पुढे ऐकण्या !

कट्टर गांधीवादी पिता
आचरे जीवनी भगवत् गीता !
असे अत्यंत दानशूर
स्वातंत्र्य सैनिक शूरवीर
तळपला शुक्रताऱ्यासम
सच्चा पुत्र भारतमातेचा !

वेद्वल्ली वैष्णव भक्तपरायण
रात्रंदिन प्रार्थनेत रममाण
पतीस घडता तुरुंगवास
त्या दुर्बल स्त्रीस
आसरा ना कोणी दूजा
केवळ एक प्रभू परमेश , प्रभू परमेश !

हे प्रभू, आहेस कोठे तू ?
अंतरलास का मजसी तू ?
हे माझ्या कृष्णा ! कृष्णा !
मज उध्दरणार नाहीस का ?
तिच्या करून रुदनाचे पडसाद उमटती स्वर्गलोकी
भार असह्य वसुंधरेसी
प्रभू म्हणे, " परतुनी ये स्वगृहासी
प्रतिक्षेत मी तव नेत्रातील अश्रू पुसण्यासी !"

भगवंतासही अपयश येते क्वचित
कसं ? ते पाहू आपण
बालवसंतेने नेली पुढे
मातेची प्रज्वलित ज्योत
त्या प्रखर ज्योतीने
जर दाहिले प्रभूवरां
तर दोष कोणा द्यावा बरे ?

धगधगता अग्नि भक्तीचा
उद्रेक ज्वालामुखीचा
अर्थात स्फोट विश्वाचा
' ब्रम्हांड स्फोट ' सिद्धांत नव्हे हा
आहे साक्षात स्फोट ब्रम्हांडाचा !

भगवंतासी संकल्प बदल अनिवार्य आता
२७ मे २००१ ह्या शुभदिनी
मांगल्य दिले ब्रम्हचारी बाबांनी
देऊनी मांगल्य केली घोषणा मूक
" आम्ही दोघं आहोत एक "

नायक नायिकेचा विवाह होऊनी
सदा जीवनी सुखी होता
कथेची होते सुफळ सांगता !

परि अम्मा याहुनी न्यारी
वसंता न केवळ , ही आहे विश्वमाता
तिचे विश्व, तिचे लेकुरे दुःखात चूर असता
असेल का संतोष तिच्या चित्ता ?

जोवरी ना देसी 
वरदान वैश्विक मुक्ती 
नसे मज शांती विश्रांती 
अग्निप्रवेश , नरक यातना 
सिद्ध मी , याहुनी घोर सत्वपरीक्षा देण्या 
पाऊले ना ढळतील माझी मार्गावरुनी
हा वैश्विक मुक्तीचा मार्ग,
मानवा, दानवा,
कीटक, पशू, जलचरा 
मुक्त करील चराचरा .

जय साईराम


रविवार, ११ जानेवारी, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार

          " तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या जन्माची निर्मिती करता. तुमचे भाव तुम्हाला जन्ममृत्युच्या चक्रात अडकवतात ."

पुष्प ३१ पुढे सुरु

                त्यावेळी, स्वामी माझ्या प्रत्येक दैनंदिनीला नाव देत असत. या डायरीचे नाव होते, ' आत्मसाक्षात्काराने काठोकाठ भरलेली...' माझी सात चक्रे उघडून नवनिर्मिती होते. या नवनिर्मितीमध्ये स्वामी व मी सर्वव्याप्त होतो . ही अमृत निर्मिती आहे . जीव आत्मसाक्षात्काराने ओतप्रोत भरल्याने अमृत स्त्रवते; आणि विश्वातील सर्वांना आत्मसाक्षात्कार प्रदान करते . ही पूर्ण डायरी स्वामींबरोबरच्या अनेक अनुभवांनी भरलेली आहे . रात्रंदिवस स्वामींसाठी अश्रू ढळत मी झोपूही शकत नव्हते , केवळ ज्ञान व अनुभव याद्वारे आपण परमेश्वर प्राप्त करू शकतो . अहंकाराचे समूळ उच्चाटन ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. 
१६ मे २०१३ 
                 आज सकाळी मी उठल्यानंतर मच्छरदाणी काढण्यासाठी विमला व फ्रेड माझ्या खोलीत आले . ते मच्छरदाणी काढत असताना स्वामींचा फोटो, पादुका व माझी चंदनाची माळ मी हातात धरली होती . त्यांचे काम झाल्यानंतर मी फोटो खाली ठेवला व त्याला चंदनाची माळ घातली. माझ्या लक्षात आले की तेथे एकच पादुका होती . मी न्  विमलने सगळीकडे शोधले , परंतु व्यर्थ . अचानक आमचे लक्ष स्वामींच्या फोटोकडे गेले . पादुका जपमाळेत गुंतली होती . फ्रेडने फोटो काढला . एडी व अमरही खोलीत आले . सर्वांनी हे पाहिले . अभिषेकानंतर मी फोटो बाहेर आणला ; पादुका आहे त्या स्थितीतच होती . त्या फोटोवर स्वामी अमृत देतात म्हणून मी माळ काळजीपूर्वक काढून दुसऱ्या फोटोवर घातली . पादुका खाली न पडता आहे तशीच होती . ही माळ चंदनाच्या मण्यांची आहे . माझा देहही चंदनासारखा आहे. विश्वकल्याणासाठी मी माझा देह झिजवते आहे. स्वामींच्या पादुका सदैव माझ्यासोबत असतात, हे यावरून निर्देशित होते . 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साईराम  

गुरुवार, ८ जानेवारी, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार

        " जर आध्यात्मिक शिकवण, विचार, उच्चार आणि आचार यामध्ये उतरवली तर विवेक आणि ज्ञान प्राप्त होते. निव्वळ पुस्तकी ज्ञान निरर्थक आहे . "

पुष्प ३१ पुढे सुरु 

                 आता आपण ४७ वा प्रश्न पाहू . 
                 माझ्या जीवनाचे सार काय ? १९४७ साली ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त होऊन भारत स्वतंत्र झाला. माझ्या वडिलांच्या त्यागातून भारत देशाचे स्वातंत्र्य आले . माझ्या त्यागामुळे केवळ विशिष्ट व्यक्तींस स्वातंत्र्यप्राप्ती न होता संपूर्ण विश्व स्वतंत्र होईल . हे नक्की घडेल . स्वभावतः मानव मुक्त आहे परंतु तो ' मी आणि माझे ' यांचा गुलाम बनला आहे ; त्याने आपले स्वातंत्र्य गमावले आहे . असे करून त्याने ईश्वर दत्त देणगी आनंद व शांती गमावली आहे . या गुलामगिरीतून स्वामी व मी मानवाला मुक्त करू . 
                 मनुष्य ज्या गोष्टींसाठी अविरत धडपड करतो उदा. पत्नी, घर, गाडी, पद, प्रतिष्ठा, मुलंबाळ हे सर्व खरा ठेवा नव्हे . ह्या गोष्टी त्याला निरंतर आनंद देऊ शकत नाहीत . तर त्यास पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लावतात . मानवाची यातून मुक्तता करून त्याला स्वातंत्र्य प्रदान करणे हे स्वामींचे अवतार कार्य आहे . यासाठी स्वामींनी मला इथे आणले आहे . आमच्या जीविताचे हे मुलतत्व आहे . संपूर्ण विश्वात शांती व आनंद नांदेल . प्रत्येकजण सर्वांमध्ये परमेश्वरास पाहिल . संपूर्ण विश्वामध्ये सत्य, ज्ञान व प्रेम भरून उरेल . केवळ याकरिता तो महामहिम प्रभू परमेश्वर येथे आला . अखिल विश्वास शांती प्रदान करण्यासाठी तो आला . यापूर्वी कोणत्याही युगात वा कोणत्याही अवताराकडून हे घडले नाही . न भूतो न भविष्यति. स्वामींमुळे या जगातील किती जण लाभान्वित झाले आहेत . यावर चिंतन करून सर्वांनी जागृत व्हायला हवे . भौतिक मायेचे हे बंधन तोडून टाका ! केवळ परमेश्वरला धरून ठेवा. 
                  माझ्या १९९६ च्या डायरीमधून स्वामींनी सूचित केलेल्या उन्मनी अवस्थेविषयी मी लिहिले आहे . काल स्वामींनी एक गुलाबी रंगाचा कागदी बाण दिला . त्यावर लिहिले होते....7 VS Diary Amma's Brim 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात......

रविवार, ४ जानेवारी, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" जर ज्ञान आचरणात आणले नाही तर ते अपूर्ण ठरते ". 

पुष्प ३१ पुढे सुरु 

               स्वदेशाच्या कल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे, हे मी माझ्या वडिलांकडून शिकले . केवळ परमेश्वर प्राप्तीची इच्छा धरणे हा धडा मी माझ्या आईकडून शिकले . ते दोघं गृहस्थाश्रमी जीवन जगले नाहीत . इथे केवळ विश्वकल्याण व भगवत्  भक्ती या दोनच गोष्टी होत्या . या दोहोंच्या संगमातून माझा जन्म झाला . 
               कृष्णा सोबतच मी लहानाची मोठी झाले न्  काल्पनिक विश्वातील माझा कृष्णा समवेत मी जगू लागले . माझे शिक्षण झाले व नंतर स्वामींशी विवाह झाला . परंतु वैवाहिक जीवनाविषयी मी अनभिज्ञ होते. मी माझ्या भाव विश्वात कृष्णाबरोबर झुला झुलत असे. हसत, खेळत, बागडत असे, गात असे . मला वाटे की वैवाहिक जीवन असेच असते. माझ्या आईप्रमाणेच मलाही गृहस्थाश्रमी जीवन कसे असते हे माहित नव्हते . परमेश्वरी कार्यासाठी इथे आल्यामुळे आम्हाला या विषयाचे प्रशिक्षण मिळाले नाही . हे माझ्या कुटुंबातील सर्वांनाच लागू आहे. त्यामुळे आमच्यामध्ये कामभाव नव्हता . गृहस्थी करायला शिकवावे लागत नाही. त्याचे ज्ञान सर्वांना स्वाभाविकपणे असते. जन्मोजन्मीच्या प्रशिक्षणामधून काम जन्माला येतो . आमच्यापैकी कोणालाही ना ह्याचे प्रशिक्षण मिळाले , ना आम्ही कोणी या विषयी परिचीत होतो . माझा जन्म १९३८ साली झाला . आगोदर दिलेल्या एका कवितेत माझे माता,पिता व मी कोण आहोत याविषयी स्वामींनी लिहिले आहे . त्यामध्ये आमच्या विवाहाचाही उल्लेख आहे .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात....

जय साईराम

गुरुवार, १ जानेवारी, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

         " प्रवासामध्ये कुटुंबातील सर्वजण सामानाचे ओझे वाटून घेतात परंतु कर्मांचे मात्र तसे नाही . कोणीही तुमच्या कर्मांचे ओझे वाटू शकत नाही . " 

पुष्प ३१ पुढे सुरु 

              प्रश्नावली बनवताना एक पासून क्रमांक दिले जातात . स्वामींनी २७ क्रमांकापासून सुरुवात केली. २७ हा आमचा विवाह दिन आहे . आमचा विवाह २० मे २००१ रोजी झाला . इथपासून प्रश्नांना सुरुवात झाली . स्वामी १९२६ साली जन्मले .
             आता आपण यामध्ये नसलेल्या नंबरांविषयी पाहू . पहिला नंबर ३७ यादीत नाहीय . माझा मातापित्यांचा १९३७ मे मध्ये झालेल्या विवाहाचा निर्देश करतो. त्यावेळी माझी आई फक्त १३ वर्षांची तर वडील २३ वर्षांचे होते . वयाच्या १६-१७ व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये माझ्या वडिलांनी स्वताःस झोकून दिले . गांधीजींच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रीय, असे माझे वडील सर्वत्र भ्रमण करीत असत. माझ्या आजीने विचार केला की त्यांचे लग्न केले तर त्यांचा बाह्य विषयांमधील रस कमी होऊन त्यांची भ्रमंतीही थांबेल . अशा रितीने त्यांचा विवाह झाला . माझी आई, वडिलांच्या नजरेला नजर द्यायला व त्यांच्याबरोबर एकटी राहायला भिऊन रडत असे . या नवविवाहित दाम्पत्याला एक महिना आपल्या घरी राहायला बोलवावे असे कुटुंबातील वडीलधाऱ्यांनी ठरविले . त्यांच्याकडून माझ्या आईला वैवाहिक जीवनाचे व पत्नीने कसे वागावे याविषयीचे प्रशिक्षण मिळाले . 
              अशा मातापित्याच्या पोटी ऑक्टोबर १९३८ मध्ये माझा जन्म झाला . परंतु लग्नानंतरही माझे वडील सर्वत्र हिंडून गांधीजींच्या आदर्शांविषयी व्याख्याने देतच होते . यासाठी ते तुरुंगातही गेले . माझ्या आईजवळ सोबती म्हणून कृष्णाचे एक चित्र होते ती त्या चित्रासमोर बसून अश्रू ढाळत असे , विलाप करत असे . तिच्या शेजारी बसून पाहात राहणे हेच माझे प्रशिक्षण झाले . माझ्या वडिलांनी सर्वस्वाचा त्याग करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य केले . तरुणपणातच त्यांनी त्यांची पत्नी , मुलगी, कुटुंब व संपत्ती या सर्वांचा त्याग केला . माझ्या आईने रडत, आक्रोश करत केवळ परमेश्वरासाठी जीवन व्यतीत केले . अखेरीस, वयाच्या २८ व्या वर्षी तिला तिचा कृष्ण प्राप्त झाला .

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......

जय साईराम