गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

       " आसक्ती विरहीत प्रेम दिव्य असून ते परमेश्वराचेच रूप आहे. " 

पुष्प ३६ पुढे सुरु 

                   स्वामींनी लिहिलेल्या पत्रातही मी हे लिहिले. सर्व ऐकल्यानंतर स्वामींनी माझ्या विषयावर पडदा पाडण्यास सांगितले. तथापि त्यांनी स्वामींच्या शब्दांचा मान ठेवला नाही. स्वामींचे विमान विमानतळावर उतरत असताना त्यांच्या दर्शनासाठी गेलेल्या आमचे त्यांनी फोटो काढले. तेथून स्वामी कोडाई कॅनलला गेले. मी तेथे गेले असता मला आतमध्ये जाऊ दिले नाही. त्यांनी आश्रमातील इतरांचेही फोटो काढले होते त्यामुळे त्यांनी केवळ मलाच नव्हे तर आश्रमवासीयांनाही स्वामींच्या दर्शनाची परवानगी दिली नाही. काहीजण आश्रमात आले आणि त्यांनी स्तूपाचे आणि आश्रमाचे फोटो काढले. त्यांनी भगवंताच्या आदेशाची अवज्ञा केली. १९९८ पासून सुरुवात झालेल्या माझ्या विषयाचे प्रकरण स्वामींनी मिटवून टाकण्यास सांगितले होते. तरीही असे त्यांनी का केले ? जर त्यांना स्वामींची आज्ञा पाळायची नसेल तर संघटनेस त्यांचे नाव कशासाठी ? 
२१ मे २०१३ 
वसंता - स्वामी,  मी भीष्मानविषयी लिहू का ? 
स्वामी - हो, तू लिही ? जर एखादी  महान व्यक्ति तिच्या डोळ्यासमोर अधर्म घडत असलेला पाहून काही करत नसेल तर ते महापाप आहे. कृष्णानी सांगितले आहे की छोट्याशा चुकीचेही परिणाम भोगावे लागतात. प्रत्येकाला त्याच्या कर्माचे परिणाम भोगावेच लागतात. चांगल्या कर्माचे परिणाम चांगले तर वाईट कर्माचे परिणाम वाईट होतात. मी त्यांना हे प्रकरण मिटवून टाकण्यास सांगितले होते. परंतु पुन्हा पुन्हा त्यांनी चुका केल्या. तुझे पहिले पुस्तक मी त्यांना पुस्तकांच्या दुकानात ठेवण्यास सांगितले होते परंतु त्यांनी ते ठेवले नाही. जेव्हा एखादा परमेश्वराशी संबंधित गोष्टीबाबत चूक करतो तेव्हा त्या परिणामांची मात्रा अत्यंत तीव्र आणि गंभीर असते. 
वसंता - हे सगळ कैकयीसारखं आहे का ? 
स्वामी - कैकयी रामाच्या कुटुंबातील एक सदस्य होती. ते सर्वजण अवतार कार्यासाठी आले होते. त्याचप्रमाणे तुझ्या कुटुंबातील सर्वजण अवतार कार्यासाठी आले आहेत. हे लोक वेगळे आहेत. 
वसंता - आता मला समजले,  स्वामी.
ध्यान समाप्ती 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 

जय साईराम      

रविवार, २६ एप्रिल, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

            " शुद्ध भावांमुळे आपल्याला सत्याची दृष्टी प्राप्त होते. " 

पुष्प ३६ पुढे सुरु 

                  जेव्हा माझा एवढा अपमान केला जात होता तेव्हा स्वामींनी काही केले नाही. मी रडत होते, विलाप करत होते. २००७ मध्ये स्वामींनी ' भगवंताचे अखेरचे ७ दिवस ' हे पुस्तक स्वहस्ते घेतले. त्यानंतर त्यांनी मला प्रशांतीमधून बाहेर घालवले. त्यावेळी स्वामी माझ्याबरोबर बाहेर पडले. त्यांनी मला एक फोटो घेऊन हे सिध्दही  केले. याविषयी मी यापूर्वी लिहिले आहे. स्वामींनी त्यांचा माया देह प्रशांतीमध्ये ठेवला. ज्या देहामध्ये स्वामींनी  ७३ १/२ वर्षे तेथे वास केला, नंतर त्यांनी तो देह ठेवला. माझ्यामध्ये असलेला त्यांचा सत्य देह बाहेर पडला आणि त्याने भ्रमण करणाऱ्या संन्याशाच्या रुपात हरिद्वारमध्ये वास्तव्य केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या खऱ्या रुपात सिमला गुहेत वास केला. अखेरीस स्वामी पुट्टपर्तीतील हिल हाऊस मध्ये राहू लागले लवकरच ते त्यांच्या पूर्णम स्वरुपात बाहेर प्रकट होतील. 
                    हे महानाट्य अवतारकार्यासाठी घडत आहे. स्वामींनी मायादेह सोडला आणि आता ते नवीन देह धारण करून पूर्णत्वाने पुन्हा येतील. मला बाहेर घालवल्यानंतर त्यांनी स्वामींना माझ्याविषयी विचारले. येथे आश्रमात काय चालले आहे हे पाहण्यासाठी स्वामींनी चेट्टीयारांना पाठवले. ते येथे आले आणि त्यांनी सगळी चौकशी केली. 
                    मी म्हणाले, " मला हा आश्रम नको. नावलौकिक मिळवण्यासाठी वा गर्दी जमा करण्यासाठी आम्ही हा आश्रम बांधला नाही. स्वामींनी सांगितल्यानंतरच आम्ही सुरुवात केली. मी हे सर्व स्वामींच्या संघटने स्वाधीन करायला तयार आहे. मी हिमालयात जाऊन गंगातीरी तप करेन. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 

जय साईराम

गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

          " जर तुम्हाला परमेश्वराबरोबर संभाषण करायचे असेल, त्याचा आवाज ऐकायचा असेल तर केवळ भाव महत्वाचे आहेत. "

पुष्प ३६ पुढे सुरु

                   आता आपण पाहू या. भीष्म शरशय्येवर असताना कृष्ण पांडवांना घेऊन त्यांना भेटायला गेले. भीष्मांनी त्यांना सदाचरण आणि राजाची धर्मसंहिता यांची शिकवण दिली. त्यावेळी द्रौपदी तेथे आली आणि हसली. धर्मराजाने तिला हसण्याचे कारण विचारले ती म्हणाली, " कौरवांनी धर्म मार्ग आचरला नाही. त्यांनी कौरवांना धर्म संहितेची शिकवण दिली नाही का ? सदैव धर्माचे पालन करणाऱ्या पांडवांना ते का शिकवण देत आहेत ?"
                  त्यावर कृष्णाने सांगितले, " जेव्हा कौरवांच्या राजसभेत द्रौपदीची विटंबना केली जात होती तेव्हा भीष्म, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य काही न करता केवळ पाहत राहिले. तिच्यावर होणाऱ्या  अन्यायाचा त्यांनी प्रतिकार केला नाही. समोर अधर्म घडत असताना काहीही न करता पाहत राहणे हे महापाप आहे. " स्वामींनीही हेच सांगितले की समोर अधर्म घडत असेल तर काहीही न करणे हे महापाप आहे. 
                   भीष्म महाज्ञानी होते. विश्वासाठी ते सन्मार्ग दर्शक आहेत. त्यांनी सर्वसंग परित्याग केला. तथापि समोर अधर्म घडत असताना पाहत राहण्याची चूक त्यांनी केली. या कारणासाठी ते आता स्वर्ग लोकामध्ये फिरून कोठे अधर्म तर घडत नाही ना याची खातरजमा करतात. भीष्मांनी स्वामींना विचारले , " स्वामी , तुमच्या समोर अधर्म घडत असताना तुम्ही सुद्धा काही न करता पाहत राहिलात ना ? "
 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात …… 

जय साईराम

रविवार, १९ एप्रिल, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार

            " परमेश्वराप्रत पोहोचण्याच्या प्रवासामध्ये मनातील भाव अत्यंत महत्वाचे आहेत ."


वसंतामृतमाला

पुष्प ३६

परमेश्वरासमोर अधिक परिणाम

२० मे २०१३ ध्यान
वसंता - स्वामी, एखादी गोष्ट किंवा काहीतरी सांगा ना.
दृश्य
नारद प्रवेश करतात
नारद - स्वामी, देवलोकामध्ये एक व्यक्ती आली. काही न करता, ते एकटेच इकडे तिकडे फिरले आणि नंतर निघून गेले.
स्वामी म्हणाले, " नारदा, ते भीष्म होते."
नारद - भीष्म ? कशासाठी आले होते स्वामी ?
स्वामी - भीष्म शरशय्येवर होते. इच्छामृत्युच्या वरदानामुळे उत्तरायणकाला पर्यंत प्रतिक्षा केल्यानंतर ते देहत्याग करू शकले. ह्या काळात त्यांनी धर्म संहितेची शिकवण दिली. त्यावेळी द्रौपदी हसली आणि म्हणाली, " तुम्ही दुर्योधनाला धर्मसंहितेची शिकवण दिली नाहीत का ? " कृष्ण म्हणाले, " समोर अधर्म घडत असताना गप्प राहणे हे महापाप आहे. आता कोठेही अधर्म अनाचार घडत नाही ना, याविषयी भीष्म  सर्वत्र कसून शोध घेतात.
भीष्म येतात ……
भीष्म - स्वामी तुम्ही एक चूक केली आहे.  मातेचे क्लेश पाहून तुम्ही गप्प राहिलात.
स्वामी - हे अवतार कार्य आहे. हे सर्व अशाच पद्धतीने घडले पाहिजे. लवकरच आमचा योग होईल आणि आम्ही एकत्र येऊ .
सर्व अंतर्धान पावले.
वसंता - स्वामी, भीष्म काय म्हणत होते ? प्रशांतीतील पदाधिकाऱ्यांनी माझा अपमान केला तरी ते सगळ तुम्ही केवळ पाहत होतात, असं त्यांना म्हणायचे आहे का ?
स्वामी - जे मी सांगितले ते त्यांनी एकले नाही. त्यांनी तो विषय संपवला नाही.
वसंता - आता मला समजले स्वामी , मी लिहीन.
ध्यान समाप्ती

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम

गुरुवार, १६ एप्रिल, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

               " कमलपत्रावरून घरंगळणाऱ्या दवबिंदूप्रमाणे आपण कोणत्याही गोष्टीचा स्पर्श होऊ न देता अनासक्त जीवन जगायला हवे. ''
  
पुष्प ३५ पुढे सुरु 

१७ ऑगस्ट २०१३ 
                 आज सकाळी आम्ही विश्व ब्रम्ह कोटममध्ये जात असताना फ्रेडने मंडपाच्या खाली डाव्या पायाची पाऊलखुण दाखवली. पाणी वा तेल यांने बनलेली पाऊलखुण अगदी स्पष्ट दिसत होती. तेथे पूर्ण पाय नसून पायाची बोटे व पायाचा पुढील भाग एवढेच दिसत होते जणुकाही कोणी पाऊल पुढे टाकण्यासाठी तयार आहे ! दुसऱ्या दिवशी आम्ही ' जर परमेश्वराने चूक केली तर तो ही पुनर्जन्म घेतो ' ही वसंतामृतमाला प्रकाशित केली. जेव्हा मी स्वामींना पाऊलखुणेविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, 
                 " मी त्रिविक्रम अवताराप्रमाणे येत आहे. मी संपूर्ण विश्वाला एका छताखाली आणणार आहे. " 
                 अशा प्रकारे स्वामींनी त्यांचा डावा पाय पृथ्वीवर ठेवला आहे व उजव्या पायांनी ते संपूर्ण पृथ्वीचे मोजमाप करत आहेत. म्हणून तेथे डावा पाय केवळ अर्धाच दिसतो आहे . या वसंतामृतमालेत मी जे काही लिहिले त्याचे हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. विश्व ब्रम्ह गर्भकोटममधून स्वामींचे भाव उद् भवतील व संपूर्ण  विश्वाला एका छताखाली आणतील. 

जय साईराम 
व्ही.एस.

रविवार, १२ एप्रिल, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः

सुविचार 

           " या जगामध्ये आपण केवळ धडे घेण्यासाठी जन्म घेतला आहे . "

पुष्प ३५ पुढे सुरु 

              मनुष्याचा उर्ध्वगामी प्रवास व अधोगामी प्रवास दर्शविणारा मी तयार केलेला एक साधा तक्ता पुढे देत आहे . "



 मनुष्य 


 * स्थूल देह - सूक्ष्म देह - कारण देह याद्वारे मनुष्याचा प्रवास 
* प्रत्येक देहातून प्रवास करत मनुष्य तळापासून वर जातो. 
* मनुष्याचा प्रवास व्यक्तिगत असतो. 
* स्थूल देहामध्ये असताना मनुष्य कामावर आधारित वंशावळ निर्माण करतो आणि फलस्वरूप जन्म मृत्युच्या चक्रात अडकतो. 
* मनुष्य स्थूल देहाद्वारे, कामावर आधारित वंशावळ निर्माण करतो. 
* मनुष्य बंध आणि जन्म मृत्यूचे चक्र निर्माण करतो. 
* येथे पुरुष आणि स्त्री 
* हा मनुष्याचा व्यक्तिगत प्रवास असतो परंतु त्याच्या ' मी आणि माझे ' या प्रवासाद्वारे तो अनेक संबंध जोडतो. 
* प्रवासाच्या अंतसमयी मनुष्याचे परमेश्वराशी ऐक्य होते. 



 परमेश्वर 


 * दिव्यत्वाकडून - महाकारण देह - कारण देह - सूक्ष्म देह - स्थूल देह असा परमेश्वराचा प्रवास. 
* स्थूल देहापर्यंत पोहोचण्यासाठी परमेश्वर वरून खाली अवतरतो. 
* परमेश्वर आणि त्याची शक्ती यांचा हा संयुक्त प्रवास असतो. 
* परमेश्वर आणि त्याची शक्ती स्थूल देहात असताना ते सत्य आणि प्रेम यावर आधारित नवनिर्मिती करतात. 
* परमेश्वर आणि शक्ती स्थूल पातळीवर उतरतात आणि त्यांच्या हृद्यांद्वारे सत्य आणि प्रेम यावर आधारित आद्य निर्मिती करतात. 
* परमेश्वराची निर्मिती मुक्ती आणि सर्वांना जीवनमुक्त अवस्था प्रदान करते. 
* येथे परमेश्वर आणि त्याची शक्ती, उर्जा, ते पुरुष  आणि स्त्री नव्हेत. 
* परमेश्वराच्या प्रवसात दोघं असल्यासारखे असते परंतु वास्तवात परमेश्वर एकच आहे. 
* परमेश्वर आणि त्याची शक्ती यांच्या प्रवासाच्या अंतसमयी त्यांचा संयोग होतो. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम

गुरुवार, ९ एप्रिल, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 
 
सुविचार 

          " तुम्ही जेथून आलात, तेथे म्हणजे परमेश्वराप्रत तुम्हाला परत घेऊन जाणे, हे सर्व योगांचे उद्दीष्ट आहे. "

पुष्प ३५ पुढे सुरु 

                परमेश्वर त्याने केलेल्या चुकीमुळे प्रेम साई बनून जन्म घेईल. आता स्वामी त्यांच्या एका शब्दासाठी, एका दृष्टीक्षेपासाठी आणि एका स्पर्शासाठी मला व्याकुळ करतात. मला करुण विलाप करायला लावतात म्हणून जेव्हा ते प्रेम साई बनून येतील तेव्हा ते माझ्यासाठी व्याकुळ होतील. प्रत्यक्ष परमेश्वरालाही त्याच्या कृतींचे परिणाम अनुभवण्यासाठी पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. तर मनुष्याची काय गत ? तुम्ही जे काही कर्म करता त्याला परिणाम असतो. रामाने छुप्या मार्गाने वालीचा वध  केला. वालीने पुन्हा जन्म घेतला आणि कृष्णाचा वध केला. आता तरी जागे व्हा ! चिंतन करा ! जाणून घ्या ! मी , माझे आणि आसक्ती यामुळे सर्व घडते. पुरे आता ! पुरे हा जन्म. तो करुणासागर परमेश्वर, महावतार घेऊन हे दर्शवण्यासाठी येथे आला. त्याने सर्वांना हे दर्शविले सर्वांची पापकर्म बरोबर घेऊन त्यांनी देह त्याग केला. म्हणून सांगते या मायेमधून जागे व्हा! 
                मनुष्य उन्नत होऊन स्थूल देहातून सूक्ष्म देहात त्यानंतर कारण देहात जातो. खऱ्या मर्यादा पार करून तो परमेश्वराला प्राप्त करून घेतो व त्याच्याशी एकत्व पावतो. 
                परमेश्वर दिव्यत्वामधून महाकारण देहात, कारण देहात त्यानंतर सूक्ष्म देहात व अखेरीस स्थूल देहात येतो. जेव्हा आम्ही दोघ एकत्र स्थूल देहात येऊ तेव्हा नवनिर्मितीचे आगमन होईल. 
                ध्यानानंतर मी सत्य साई स्पीक्स् ( १६ वा भाग ) पुस्तक उघडले त्या पानावर खालील मजकूर होता. 
                 ते हत्तीच्या चीत्कारांसारखे होते आणि परमेश्वर त्याला आशिर्वाद देण्यासाठी पुढे आला. -----
                 या प्रकरणासाठी हा एक चांगला पुरावा होता. 
.  .  .
 
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……

जय साईराम
    

रविवार, ५ एप्रिल, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

         " कर्मफळाचा त्याग केल्यानंतरच परमेश्वर प्राप्ती होते . "

पुष्प ३५ पुढे सुरु 

                   मनुष्याला असणाऱ्या कोणत्याही जाणीवा  मला नाहीत. स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत. ही  व्यक्तिगत यात्रा नाही. ही स्वामींची आणि माझी सह्यातत्रा आहे. मनुष्य साधना करून उन्नती करतो, स्थूलातून सूक्ष्म आणि सूक्ष्मातून कारण देह अशी टप्याटप्याने एक एक अवस्था पार करतो. परंतु स्वामी आणि मी खाली येऊन नंतर वर जातो. जगाला हे सर्व निर्देशित करण्यासाठी आम्ही असे करतोय. आम्ही मुक्ती निलयममध्ये आल्यानंतर स्वामींनी येथील इमारतींना वेगवेगळ्या अवस्थांची नावे दिली. उदा. भौतिक, सूक्ष्म आणि कारण लोक. याद्वारे त्यांनी प्रत्येक अवस्था दर्शवली. आता स्वामींनी सांगितले की  आम्ही दिव्य देह धारण केला आहे आणि त्यांनी आम्हाला विश्व ब्रम्ह गर्भ कोटम् बांधण्यास सांगितले. हे स्वामींचे परम् धाम आहे. अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्य अवस्थांमध्ये खाली आलो. स्थूल देहामधे आमचा योग व्हायलाच हवा.
                   ७३ वर्षाच्या वियोगानंतर, मला स्वामींचे दर्शन, स्पर्शन आणि संभाषणाचा लाभ होईल. त्यानंतरच नवनिर्मितीचा श्रीगणेशा होईल. ही  नवनिर्मिती आहे. स्वामींनी यापूर्वी दिलेल्या ' हे एकल्या कमलपुष्पा ( O Lonly Lotus )' या कवितेद्वारे हे सिद्ध केले आहे. या कवितेतून आमचा मुलाधारापासून सहस्त्रारापर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. आम्ही शिवशक्ती असल्याचे स्वामी यातून दर्शवतात. मला ' मी ' नसल्यामुळे स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात  …… 

जय साईराम

गुरुवार, २ एप्रिल, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार

            " अमरत्व केवळ त्यागाद्वारे प्राप्त होते. जेव्हा आपण परमेश्वरासाठी आपल्या भौतिक जीवनाचा त्याग करतो तेव्हा आपल्या कर्मांच्या परिणामांचा नाश होतो. "
पुष्प ३५ पुढे सुरु

                  तथापि एक दिवस तो जागृत होतो आणि विचार करू लागतो, " हा जन्म कशासाठी ?"असा विचार करू लागल्यानंतर, तो स्थूल देहाचा त्याग करतो आणि सूक्ष्म देह धारण करतो. येथे त्याच्या सोबत कोणीही नसते. मनुष्याचे जीवन आगगाडीच्या प्रवासासारखे आहे. त्या प्रवासात सगळे एकत्र बसतात, हसत खेळत गप्पा गोष्टी करतात परंतु आपले स्टेशन आले की उतरून जातात. कुटुंबाचेही असेच आहे. सर्वजण एकत्र असतात, वेळ येताच सर्वजण वेगळे होऊन आपापल्या मार्गाने निघून जातात. जेव्हा मनुष्याला याचा बोध होतो तेव्हा त्याला सूक्ष्म देह प्राप्त होतो. आणि ही व्यक्तिगत यात्रा असल्याची त्याला जाणीव होते. साधना करून तो एकेका देहाच्या पलीकडे जातो. सूक्ष्म देहाच्या पलीकडे गेल्यानंतर त्याला कारण देह प्राप्त होतो आणि तो संतपदाला पोहोचतो. अखेरीस तो कारण देहाचा त्याग करून परमेश्वरामध्ये विलीन होतो. याबरोबर मनुष्याच्या यात्रेची सांगता होते. 
                 माझ्याबाबतीत मात्र जन्मापासूनच असे नव्हते. स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत. ही  व्यक्तिगत यात्रा नसून , स्वामी आणि मी , आम्हा दोघांची ही सह्यात्रा आहे. यापूर्वी मी भूतलावर कधीही जन्म न घेतल्यामुळे मी जन्मापासून अश्रू ढाळले आहेत. तान्हेपणी लक्ष्मणाला रामापासून दूर केल्यानंतर तो सतत रडत असे. आणि रामाच्या बाजूला पाळण्यात ठेवल्यानंतर रडायचा थांबत असे. मी स्वामींपासून वेगळी झाल्यानंतर सतत रडत होते. माझ्या आईवडिलांनी, वडिलधाऱ्यांनी नाना तऱ्हेनी मला शांत करण्याचा प्रयत्न केला तरीही माझे रुदन थांबले नाही. आता स्वामींनी हे उघड केले की तेव्हा त्यांनी माझे रडणे थांबवण्यासाठी त्यांचा अंगठा माझ्या तोंडात दिला. त्याचप्रमाणे मला भुकेची जाणीव नाही. 

उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……. 

जय साईराम