गुरुवार, २ जुलै, २०१५

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

" प्रेम हवेला शुद्ध बनवून, पृथ्वीला मंगल बनवते. "

पुष्प ३९ पुढे सुरु

               पराकोटीच्या श्रद्धेमुळे त्याच्या मनाने गुरु हाच भगवंत हा भाव निर्माण केला; त्यामुळे त्याला दुसऱ्या भगवंताची गरज कुठे ! ही अति उच्च मनोवस्था आहे. अजून एकदा सर्वजण कावेरी नदी पार करत होते. त्यावेळी रामानुजांनी पादत्राणे काढून नम्बीच्या हाती दिली. रामानुज एक ट्रंकेमध्ये सर्व मूर्ती व पूजा साहित्य ठेवत असत व दररोज त्या मूर्तींची पूजाअर्चा करत. ती ट्रंक नम्बीनी शिरावर घेतली होती. तीर पार केल्यावर रामानुजांनी नम्बीकडे पादत्राणे मागीतली. नम्बीनी ट्रंक शिरावरून उतरवून त्यात ठेवलेली पादत्राणे काढून दिली. रामानुजांना धक्काच बसला, ते त्याच्यावर ओरडले, " हे तू काय केलेस ? माझी पादत्राणे देवाच्या ट्रंकेत ?" नम्बी शांतपणे उत्तरला," माझा देव तुमच्या देवाहून कमी नाही !" केवढी ही महान भक्ती ! ही उदाहरणे परमेश्वराचे चरण घट्ट धरून ठेवणा-यांसाठी आहेत. असे लोक सहजतेने व जलद गतीने संसार सागर पार करून मोक्षास प्राप्त होतात. 
               यासाठी शास्त्रपुराणे शिकण्याची व वाचण्याची गरज नाही. एकलव्याने गुरुविना विद्या कशी प्राप्त केली ? याचे कारण त्याने आपल्या हृदयात गुरूंची प्रतिष्ठापना करून बाह्यतः त्यांच्या रूपावर भक्तीचा अपरिमीत वर्षाव केला. आपणही आपल्या इष्ट देवतेच्या नामरूपाची बाह्यतः भक्ती करतो. प्रत्येकाने स्वतःची इष्ट देवता समोर ठेवून साधना केली पाहिजे, जप, ध्यान व मनःपूर्वक प्रार्थना करावयास हवी. आपण आपल्या अंतरंग निवासी साक्षीभावातील भगवंतास जागृत करावे, तो आपल्याला समग्र ज्ञान देईल.

उर्वरित वसंतामृत पुढील भागात …. 

जय साईराम 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा