गुरुवार, ३१ मार्च, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " सर्वकाही परमेश्वर आहे. प्रत्येक गोष्ट परमेश्वराचेच रूप आहे तेथे केवळ परमेश्वरच आहे अन्य काही नाही. " 

 प्रकरण एक

बीज पुढे सुरु

                  घरातील कामकाज आणि शेतीवाडीची  देखभाल यासाठी आमच्याकडे अनेक नोकरचाकर होते. आमच्यासाठी आणि विक्रीसाठी शेतात तांदूळ, डाळ व भाजीपाला याची लागवड केली जात असे. घराच्या मागील दारी गोठ्यात पुष्कळ गायी होत्या. आमच्या वडिलोपार्जित घराला तीन प्रवेशद्वारे होती. पुरुषमंडळी पुढील दाराने जा ये करत. स्त्रिया बाजूच्या दराने आणि नोकरमाणसं मागील दाराने जा ये करत. गावात प्रथम आमच्या घरात वीज आली. 
                  माझे पूर्वज शेतकारी होते. ५०० वर्षांपूर्वी ते आंध्रप्रदेशमधून तामिळनाडूमध्ये स्थलांतरित झाले. प्रथम आन्डी रेड्डी व कादुका रेड्डी हे दोघे मदुराईला येऊन स्थायिक झाले. त्यांनी शेतात खूप कष्ट केले. आमच्या समाजाची वाढ झाली. काळाच्या प्रवाहात अनियमित पावसामुळे शेती मागे पडली. समाजातील काही लोकांनी दुसऱ्या गावी जाऊन हॉटेल व्यवसाय सुरु केला. इतरांनीही तोच मार्ग स्वीकारला. गावात श्रीमंती आली. आमच्या गावात दरवर्षी मुनियांडी मंदिरात जत्रा असते. या जत्रेला मात्र व्यवसायानिमित्त दुसरीकडे स्थायिक झालेले सर्वजण न चुकता हजेरी लावतात. सर्वजण ह्यादिवशी सहकुटुंब - सहपरिवार येऊन मुनियांडी या ग्रामदेवतेची पूजा करून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम
 

रविवार, २७ मार्च, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" अनासक्त जीवन जगणे म्हणजेच मुक्ती होय. "

प्रकरण एक 

बीज पुढे सुरु 

                   डॉक्टरमामा - गावात राहणारे आमचे दूरचे नातेवाईक. त्यांच्या काही प्रेमळ आठवणी माझ्या मनात आहेत. सर्वजण त्यांना ' डॉक्टरमामा ' म्हणत. माझ्या वडिलांसारखे तेही एक स्वातंत्र्य सैनिक होते आणि तरुणपणात बऱ्याचदा तुरुंगात गेले होते. ते अविवाहित होते. ते त्यांच्या बहिणीच्या घरी रहात आणि माझ्या आजीच्या घरात त्यांचा दवाखाना होता. ते गरिबांवर मोफत औषधोपचार करीत. माझ्या लहानपणी ते रोज मला आंघोळ घालत. संध्याकाळी मी शाळेतून आल्यावर मला इंग्रजी व्याकरण शिकवत. ते खूप शिस्तप्रिय होते. जर मी व्यवस्थित अभ्यास केला नाही तर ते छडीचाही वापर करत. अध्यात्माचे धडे देऊन त्यांनी मला मोलाची मदत केली. ते माझे गुरु होते. त्यांनी माझ्या मुलांनाही इंग्रजी व्याकरण शिकवले. त्यांच्या कडकपणाला घाबरून, ते आले की मुले पळून जात किंवा लपून बसत. तरीही ते त्यांना शोधून काढत आणि पकडून अभ्यासास बसवत. त्यांनी गावातील मुलांनाही शिक्षण व अध्यात्माचे धडे देऊन मदत केली. त्यांचे नाव ' रामचंद्र ' होते, परंतु गावातील लहानथोर सर्वजण त्यांना डॉक्टरमामा म्हणत. 
                  चंदामामा हे नाव सर्वांना परिचित आहे. डॉक्टरमामा हे आमचे चंदामामा होते. ते खूप भाविक होते. त्यांचे देशावर प्रेम होते. दुसऱ्यांची सेवा करणे हा त्यांचा स्थायीभाव होता. 
                   मी अगदी लहान असताना मला झोप येत नसेल, तर डॉक्टरमामा आजीच्या बागेतील झाडाला बांधलेल्या झोक्यावर मला झोका द्यायचे. 
                   हे लिहिता लिहीताच माझ्या लक्षात आले की मी बालपणी रात्रंदिवस का रडत असे, परमेश्वरापासून विलग झाल्यामुळे. त्याचा विरह हेच माझ्या रडण्याचे कारण होते ! 

उर्वरित मजकूर पुढील भागात .....

जय साईराम

गुरुवार, २४ मार्च, २०१६

ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सुविचार 

        " आपल्या मार्गात अनेक अडथळे आले तरी आपण आपला धर्म, सदाचरण याच्याशी निष्ठावंत राहिले पाहिजे."
प्रकरण एक 

बीज पुढे सुरु

                   भगवान श्री कृष्णावर माझ्या आईची उत्कट भक्ती होती. ती आर्ततेने भगवंताचा धावा करत असे. तिच्या करुण हाकांनी आमचे रिकामे घर भरून जात असे. माझ्या आईला भौतिक सुखात अजिबात रस नव्हता. भौतिक सुख तिला माहितही नव्हते. दररोज एक तास माझी आई स्वतःला माडीवरच्या खोलीत कोंडून घेऊन कृष्णासाठी रडत असे. ती टाहो फोडून कृष्णाला विचारात असे, " हे कृष्णा, मला तुझे दर्शन कधी होईल ?" रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना तिचे करुण रुदन ऐकू येत असे. 
हे कृष्णा, माझ्यासाठी इथे कोण आहे ?
या गावात माझे स्वतःचे स्थान नाही 
माझे इथे कोणी नाही. 
हे प्रभु, मी तुझे चरण घट्ट धरून ठेवते. 
                   लहान असताना मी सतत आईजवळच असे आणि शांतपणे तिच्या उत्कट कृष्णध्यासामध्ये तल्लीन होऊन जात असे. माझी आई माझी गुरुही होती. तिने माझे पोषण भगवद् भक्तीनेच केले. " भक्ती हे मुक्तीचे बीज आहे. " ती सतत कृष्णाच्या फोटोशी बोलत असे. लहानपणी झालेल्या या संस्कारांमुळेच मी आज स्वामींच्या फोटोशी बोलते, परमेश्वराबरोबर हसते, रडते.
                   आमचे कुटुंब दानशूरतेसाठी प्रसिद्ध होते. अन्नदान आणि साधू संन्याशी, यात्रेकरू यांची सेवा या गोष्टी आम्हाला नित्याच्याच होत्या. घरातील वडीलधारी मंडळी अशा सेवाकार्यासाठी गरज पडल्यास घरातील स्त्रियांचे दागिने वापरण्यासही मागे पुढे पहात नसत. आमच्या गावातील गरीब शेतमजुरांसाठी माझी पणजी भल्या पहाटे मोठ्या भांड्यामध्ये ताक आणि भात बनवून व्हरांड्यात ठेवत असे. शेतावर निघालेले कामकरी जाताना त्यांच्या वाट्याचा ताक भात घेऊन जात. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २० मार्च, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वर केवळ शुद्ध, निष्कपट हृदयामध्ये वास करतो." 

प्रकरण एक

बीज पुढे सुरु 

                  विनोबाजी भूदान चळवळीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अवघ्या भारतभर पदभ्रमण करून श्रीमंतांकडून जमीन घेऊन गरिबांना वाटल्या. जेव्हा विनोबाजी आमच्या गावी आले, तेव्हा माझ्या वडिलांनी आमच्या काही जमिनी हरिजनांसाठी दान केल्या. 
                  माझी आई लग्नाच्या वेळेस फक्त १४ वर्षाची होती. लग्नानंतर एक वर्षानी २३ ऑक्टोबर १९३८ या दिवशी माझा जन्म झाला. माझ्या वडिलांनी डायरीत अशी नोंद केली. 
…. " पराशक्ती जन्मली ! तिने देशाची सेवा करावी !"
                 माझी आई वेदवल्ली तायार, अत्यंत साधी आणि आज्ञाधारी स्त्री होती. तिने माझ्या वडिलांना त्यांच्या सेवाकार्यात पूर्णार्थाने साथ दिली. माझ्या आईच्या आठवणी म्हणजे .. माझे वडील स्वातंत्र्यासाठी वरचेवर तुरुंगात असल्यामुळे तिला झालेला प्रदीर्घ विरह ! चौदा वर्षांच्या त्यांच्या वैवाहिक जीवनात फक्त एखाद दोन वर्षेच ते एकत्र राहिले असतील. स्वातंत्र्यानंतरही खादी चळवळीच्या निमित्ताने माझे वडील घरापासून दूरच राहिले. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १७ मार्च, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " मृत्युनंतर प्राप्त झालेल्या मोक्षाचा काय उपयोग ? मृत्युनंतर कोणी मोक्षप्राप्ती अनुभवू शकतो का ? साई आनंदापुढे कोणताही स्वर्गीय आनंद  फिकाच आहे. साई अमृताची इथेच या क्षणी अनुभूती घ्या. " 

प्रकरण एक

बीज पुढे सुरु
                   सामाजिक मेळाव्यांमध्ये माझे वडील प्रेरणादायी भाषण देत. त्यांच्या भाषणांमध्ये बऱ्याचदा स्त्रीशिक्षण व स्त्रियांचा उद्धार हे विषय असत. वडक्क्मपट्टीतील १० वी पर्यंत शिकलेली मी पहिली स्त्री आहे ! मी डॉक्टर व्हावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. परंतु ते होणे नव्हते. तमिळ कवी भारतीयार यांच्या कार्याचे माझ्या वडिलांना आदरयुक्त कौतुक होते. कवी भारतीयार यांनी कलियुगात सत्ययुग येईल, असे भाकित केले होते. 
                   गांधीजींचे समकालीन श्री विनोबाजी भावे प्रगाढ ज्ञानी होते. त्यांनी अनेक ग्रंथांवर टीका लिहिल्या आहेत. परंतु त्यांचे गीतेवरील भाष्य सर्वांना परिचित आहे. त्यांचे गीतेवरील पुस्तक माझ्या वडिलांना अत्यंत प्रिय होते. त्यांनी मलाही त्या पुस्तकाची गोडी लावली. त्यातील १८ वा अध्याय मी पुन्हा पुन्हा वाचत असे. मी ते पुस्तक पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत व शेवटच्या अध्यायापासून पहिल्या अध्यायापर्यंत अशा क्रमाने वाचत असे. विनोबाजींनी केलेले सुबोध स्पष्टीकरण, सविस्तर निरुपण व ज्ञान याचा माझ्या मनावर कायमचा ठसा उमटला. माझी तृष्णा भागवण्यासाठी भक्ती, ज्ञान आणि  वैराग्याचा स्त्रोत असलेली गीता माझ्यासाठी जीवित झाली. 

उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम
 

रविवार, १३ मार्च, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

            " पती, पत्नी, मुलेबाळे, माता पिता, आणि नातेवाईक यांच्याबरोबर निर्माण केलेल्या आसक्तीमुळे आपण ह्या जगामध्ये अनेक दुःख भोगतो व पुन्हा पुन्हा जन्म घेतो."

प्रकरण एक

बीज पुढे सुरु

                  कुटुंबात परंपरेने चालत आलेली विष्णूभक्ती माझ्या वडिलांच्या नसानसात भिनली होती. श्रीरंगमचे श्री रंगनाथ हे त्यांचे इष्टदैवत. ते अखंड ' ॐ नमो नारायणाय ' या मंत्राचा जप करत. ते धार्मिक रुढींचे काटेकोरपणे पालन करत. ते तिरुप्परायतुरै येथील रामकृष्ण मठातील संन्याशांना आमच्या घरी बोलवीत. हे संन्याशी आमच्या घरी अंतर्योग शिबिरे घेत. माझे वडील गावकऱ्यांना या शिबिरांमध्ये सहभागी होऊन त्याचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करत. माझ्या वडिलांनी १९४८ मध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, वाराणसी इ. तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्याकाळी प्रवास खूपच खडतर होता. त्यांनी ह्या यात्रा पायी चालून पूर्ण केल्या. 
                 आहारविषयक सवयी आणि स्वच्छता याबाबतीत माझे वडील कमालीचे काटेकोर होते. ते ' कृष्णार्पणम ' म्हणून सर्वकाही भगवंताला अर्पण करीत. भगवदगीतेतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांचे उच्चारण व प्रार्थना करताना कुटुंबीय व मुलांनीही त्यांच्याबरोबर म्हणावे असा त्यांचा आग्रह असे. त्यांनी गीतेतील श्लोकांचे केवळ उच्चारणच केले नाही, तर त्यातील शिकवणींचे आचरणही केले. दररोज ते गीतेतील एक श्लोक आपल्या डायरीत लिहित व दिवस अखेरीस प्रार्थना करीत, " हे भगवंत, मी तुला शरण आलो आहे. मला स्थितप्रज्ञ बनव. काळ सरत आहे. लवकरात लवकर मला तुझ्या चरणांशी घेऊन जा. केवळ तूच माझे आश्रयस्थान आहेस." 


उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १० मार्च, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" तेलाच्या संततधारेसारखे आपणही अखंड परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे."

प्रकरण एक 

बीज पुढे सुरु 

माझ्या वडिलांचा दिनक्रम 
पहाटे ४.२०                           : उठून उच्चारणासः नमस्कार, दंतमंजन, तोंड धुणे. 
         ४.४५ ते ५. ३०              : प्रार्थना, फुले वेचणे, उदबत्ती लावणे, अर्चना. 
         ५. ३० ते ६. ०५             : ध्यान, स्नान, पूजा. 
सकाळी  ७. ३० वा. नाश्ता       : इडली, कॉफी. 
             ७. ३० ते ९. १५         : बाहेरची कामे 
             १०. ०० ते १२. ००     : पवित्र ग्रंथांचे वाचन 
                                              ( नालायीरा दिव्य प्रबंधम आणि तिरुवायमोळी )
दुपारी १२. ०० ते १२. १५         : शुद्ध सात्विक शाकाहारी भोजन 
         १२. ४०                        : रेडिओवरील बातमीपत्र ऐकणे 
         १. ०० ते २. ००             : वामकुक्षी 
         २. ०० ते ३. ००             : भगवद्गीता पठण 
         ३. ०० वाजता               : कॉफीपान 
         ३. १५ ते ३. ४५             : लिखित जप, आंब्याच्या झाडाला पाणी घालणे 
संध्या  ५. ०० ते ७. ००           : शेतामध्ये एक मैलाचा फेरफटका. 
           ६. ०० ते ६. ३०          : शेतामध्ये ध्यान 
रात्री ७. ०० ते ८. ००              : श्रीरंगविलासमध्ये प्रार्थना, वैद्यकीय सेवा 
       ८. ०० ते ९. ००              : स्नान, प्रार्थना, रात्रीचे भोजन- डोसा 
       ९. ०० ते १०. ००            : दिव्य प्रबंधमचे वाचन 
        १०. ००                        : झोप 

उर्वरित मजकूर पुढील भागात .....

जय साईराम
        



सोमवार, ७ मार्च, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 



महाशिवरात्री निमित्त 


          महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस शिवाच्या चिंतनात घालवा म्हणजे मनावर विजय मिळवणे अगदी सोपे होते. कृष्ण पक्षातील १४ वा दिवस म्हणजे चतुर्दशी होय. तो दिवस शिवाच्या संगतीत राहिलात तर त्या दिवशी तुमचे आध्यात्मिक प्रयत्न कळसाप्रत पोहोचतील आणि यश तुमचेच असेल. म्हणून प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्र म्हटले जाते तसेच माघ महिन्यातील चतुर्दशीला महाशिवरात्र म्हटले जाते. शिवाप्रती विशेष भक्ती समर्पण करण्याचा हा दिवस आहे. आज येथे उपस्थित असणाऱ्यांनी व इतरत्र असणाऱ्यांनी शिवाची प्रार्थना करा की माझ्यामधून उदभवलेल्या लिंगामधून तुम्हा सर्वांना कृपा व लिंगोद् भवाच्या अलौकिक क्षणांचा आनंद लाभो. 
बाबा

भगवान बाबांनी ४ मार्च १९६२ रोजी दिलेल्या शिवरात्री संदेशातून 



जय साईराम

रविवार, ६ मार्च, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

    " प्रत्येकाच्या वैयक्तिक आकलनानुसार सत्याचे प्रकटीकरण होते." 

प्रकरण एक 

बीज पुढे सुरु 

                   विदेशी कपड्यांवर बहिष्कार दर्शविण्यासाठी, घराघरातून चरख्यावर सूत कातणे हे खादी चळवळीचे सूत्र होते. त्यामुळे ऐक्य, स्वावलंबन आणि अहिंसा यांना प्रोत्साहन मिळाले. 
त्या काळात काही घोषवाक्ये लोकप्रिय होती - 
' खादी म्हणजेच स्वातंत्र्य '
' खादी - गरीबांचा जीवनाधार '
' खादी देते धार्मिक विचारांना प्रोत्साहन '
' खादी करते ऐक्याची जोपासना ' 
                  भारत स्वतंत्र झाल्यानंतर बहुतेकांनी राजकारणात भाग घेतला; परंतु माझ्या वडिलांनी राजकारणात प्रवेश केला नाही. गांधीजींच्या विधानाला अनुसरून त्यांचेही म्हणणे होते, की काँग्रेसची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झाली; राजकारणासाठी नव्हे. स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्वतःला ग्रामीण आणि सामाजिक विकासकार्यात गुंतवून घेतले. माझ्या वडीलांनी गावकऱ्यांनी ' गांधी खादी विद्यालय ' स्थापन केले. तेथे त्यांनी ग्रंथालयही सुरु केले. तेथे ते गावकऱ्यांना दररोज मोफत औषध देत असत. रोज संध्याकाळी सहा वाजता सामुदायिक प्रार्थना होत असे. गावातील सर्वजण या प्रार्थनेत सहभागी होत. शुक्रवारी भजने होत. ते मुलांना गीता, नारायणसूक्त आळवार यांचे श्लोक, आंडाळरचित तिरुपावै शिकवत. सर्व गावकरी माझ्या वडिलांच्या श्रद्धेची आणि समर्पणवृत्तीची प्रशंसा करत. त्यांच्या धीरगंभीर आवाजाने गावकऱ्यांना आशा आणि दिलासा मिळत असे. 
                माझ्या वडिलांनी त्यांच्या शिस्तबद्ध पवित्र जीवनाचा आदर्श आमच्यासमोर ठेवला. ध्यान, व्यायाम, पठण, लिखित जप, सुत कातणे आणि रोजनिशी लिहिणे असा त्यांचा काटेकोर दिनक्रम होता. त्यांच्या दिनक्रमात कधीही खंड पडत नसे. जेव्हा ते संध्याकाळी शेतात फेरफटका मारायला जात तेव्हा शेतकरी आपापसात कुजबुजत, ' भाऊसाहेब आले, पाच वाजले '. 


उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ३ मार्च, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " प्रेमाला कोणी मर्यादा घालू शकते का ? संकुचित कृती अनिर्बंध प्रेमाची अनुभूती घेऊ देत नाही तर ती केवळ दोष शोधून काढते .   " 


भाग - पहिला 
आरोहण 
" आमच्या आगोदर आलेल्यांच्या खांद्यावर आम्ही उभे आहोत …. "


प्रकरण एक 

बीज 
" ' मी विना मी '- ज्ञानाचे बीज


                 हे माझे आत्मचरित्र आहे. भक्तीरसाने ओथंबलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला. माझ्या कुटुंबाच्या अनेक पिढ्या महाविष्णूची भक्ती करत होत्या. माझ्या मातापित्यास भगवानं कृष्णाबद्दल अपार प्रेम होते 
        माझे वडील मधुरकवी आळवार स्वातंत्र्यवीर होते. त्यांना अनेक वेळा तुरुंगवास घडला. माझ्या वडिलांचे चौथीपर्यंत शिक्षण झाले होते. परंतु तुरुंगात असताना त्यांनी हिंदी आणि संस्कृत भाषा आत्मसात केल्या आणि भगवदगीतेचा अभ्यासही केला. गांधीजींच्या अनेक चळवळीनमध्ये त्यांनी भाग घेतला. ' स्त्रिया, हरिजन आणि देशाचा उद्धार यासाठी मी माझे आयुष्य अर्पण करतो ' अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती. त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी ते अविश्रांत कार्य करत. खादी चळवळीप्रती त्यांची निष्ठा हे त्याचे एक उदाहरण आहे. माझ्या वडिलांनी आमच्या बागेत कापूस लावला होता. तो वेचून, त्यातील बिया काढून ते सुत कातत. चरख्यावर सुत काढणे हा त्यांचा दैनंदिन कार्यक्रम होता. माझ्या वडिलांनी आयुष्यभर खादी वापरली. घरातील सर्वांनी खादीच वापरावी, असा त्यांचा आग्रह असे. १९४० मध्ये गांधीजी मदुराईला आले, त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांना स्वहस्ते तयार केलेले खादीचे कापड अर्पण केले. त्यांचा चरखा अव्याहतपणे चालूच असे. सूत कातणे हे त्यांचे जीवनतत्व बनले होते. 

उर्वरित मजकूर पुढील भागात .....

जय साईराम