रविवार, २७ मार्च, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" अनासक्त जीवन जगणे म्हणजेच मुक्ती होय. "

प्रकरण एक 

बीज पुढे सुरु 

                   डॉक्टरमामा - गावात राहणारे आमचे दूरचे नातेवाईक. त्यांच्या काही प्रेमळ आठवणी माझ्या मनात आहेत. सर्वजण त्यांना ' डॉक्टरमामा ' म्हणत. माझ्या वडिलांसारखे तेही एक स्वातंत्र्य सैनिक होते आणि तरुणपणात बऱ्याचदा तुरुंगात गेले होते. ते अविवाहित होते. ते त्यांच्या बहिणीच्या घरी रहात आणि माझ्या आजीच्या घरात त्यांचा दवाखाना होता. ते गरिबांवर मोफत औषधोपचार करीत. माझ्या लहानपणी ते रोज मला आंघोळ घालत. संध्याकाळी मी शाळेतून आल्यावर मला इंग्रजी व्याकरण शिकवत. ते खूप शिस्तप्रिय होते. जर मी व्यवस्थित अभ्यास केला नाही तर ते छडीचाही वापर करत. अध्यात्माचे धडे देऊन त्यांनी मला मोलाची मदत केली. ते माझे गुरु होते. त्यांनी माझ्या मुलांनाही इंग्रजी व्याकरण शिकवले. त्यांच्या कडकपणाला घाबरून, ते आले की मुले पळून जात किंवा लपून बसत. तरीही ते त्यांना शोधून काढत आणि पकडून अभ्यासास बसवत. त्यांनी गावातील मुलांनाही शिक्षण व अध्यात्माचे धडे देऊन मदत केली. त्यांचे नाव ' रामचंद्र ' होते, परंतु गावातील लहानथोर सर्वजण त्यांना डॉक्टरमामा म्हणत. 
                  चंदामामा हे नाव सर्वांना परिचित आहे. डॉक्टरमामा हे आमचे चंदामामा होते. ते खूप भाविक होते. त्यांचे देशावर प्रेम होते. दुसऱ्यांची सेवा करणे हा त्यांचा स्थायीभाव होता. 
                   मी अगदी लहान असताना मला झोप येत नसेल, तर डॉक्टरमामा आजीच्या बागेतील झाडाला बांधलेल्या झोक्यावर मला झोका द्यायचे. 
                   हे लिहिता लिहीताच माझ्या लक्षात आले की मी बालपणी रात्रंदिवस का रडत असे, परमेश्वरापासून विलग झाल्यामुळे. त्याचा विरह हेच माझ्या रडण्याचे कारण होते ! 

उर्वरित मजकूर पुढील भागात .....

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा