रविवार, ६ मार्च, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

    " प्रत्येकाच्या वैयक्तिक आकलनानुसार सत्याचे प्रकटीकरण होते." 

प्रकरण एक 

बीज पुढे सुरु 

                   विदेशी कपड्यांवर बहिष्कार दर्शविण्यासाठी, घराघरातून चरख्यावर सूत कातणे हे खादी चळवळीचे सूत्र होते. त्यामुळे ऐक्य, स्वावलंबन आणि अहिंसा यांना प्रोत्साहन मिळाले. 
त्या काळात काही घोषवाक्ये लोकप्रिय होती - 
' खादी म्हणजेच स्वातंत्र्य '
' खादी - गरीबांचा जीवनाधार '
' खादी देते धार्मिक विचारांना प्रोत्साहन '
' खादी करते ऐक्याची जोपासना ' 
                  भारत स्वतंत्र झाल्यानंतर बहुतेकांनी राजकारणात भाग घेतला; परंतु माझ्या वडिलांनी राजकारणात प्रवेश केला नाही. गांधीजींच्या विधानाला अनुसरून त्यांचेही म्हणणे होते, की काँग्रेसची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झाली; राजकारणासाठी नव्हे. स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्वतःला ग्रामीण आणि सामाजिक विकासकार्यात गुंतवून घेतले. माझ्या वडीलांनी गावकऱ्यांनी ' गांधी खादी विद्यालय ' स्थापन केले. तेथे त्यांनी ग्रंथालयही सुरु केले. तेथे ते गावकऱ्यांना दररोज मोफत औषध देत असत. रोज संध्याकाळी सहा वाजता सामुदायिक प्रार्थना होत असे. गावातील सर्वजण या प्रार्थनेत सहभागी होत. शुक्रवारी भजने होत. ते मुलांना गीता, नारायणसूक्त आळवार यांचे श्लोक, आंडाळरचित तिरुपावै शिकवत. सर्व गावकरी माझ्या वडिलांच्या श्रद्धेची आणि समर्पणवृत्तीची प्रशंसा करत. त्यांच्या धीरगंभीर आवाजाने गावकऱ्यांना आशा आणि दिलासा मिळत असे. 
                माझ्या वडिलांनी त्यांच्या शिस्तबद्ध पवित्र जीवनाचा आदर्श आमच्यासमोर ठेवला. ध्यान, व्यायाम, पठण, लिखित जप, सुत कातणे आणि रोजनिशी लिहिणे असा त्यांचा काटेकोर दिनक्रम होता. त्यांच्या दिनक्रमात कधीही खंड पडत नसे. जेव्हा ते संध्याकाळी शेतात फेरफटका मारायला जात तेव्हा शेतकरी आपापसात कुजबुजत, ' भाऊसाहेब आले, पाच वाजले '. 


उर्वरित मजकूर पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा